नोमोफोबिया

सकाळी उठल्यापासून ब्रश, आवराआवर, आंघोळ असं सारं होत आलं; पण मनात मोबाईल... ‘कुठं ठेवला होता,’ या प्रश्नाला सगळी संभाव्य उत्तरं देऊन झालीयत. मनातल्या मनात शंभरदा हाच प्रश्न विचारून झालाय.
nomofobia
nomofobiasakal
Summary

सकाळी उठल्यापासून ब्रश, आवराआवर, आंघोळ असं सारं होत आलं; पण मनात मोबाईल... ‘कुठं ठेवला होता,’ या प्रश्नाला सगळी संभाव्य उत्तरं देऊन झालीयत. मनातल्या मनात शंभरदा हाच प्रश्न विचारून झालाय.

सकाळी सातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर उशाशी ठेवलेला मोबाईल सापडत नाहीय... इकडं तिकडं चाचपून पाहिलं, उशी-गादी वर-खाली करून पाहिली तरी हाताशी मोबाईल लागत नाहीय... गजर कधी होऊन गेला, आठवत नाही. पाच-सहा मिनिटांची शोधाशोध वाया गेलीय... अजून मोबाईल सापडत नाहीय... बेडरूमची शोधाशोध करून झाली तरी मोबाईल नाही... आता पंधरा मिनिटं होऊन गेली, अर्धा तास झाला. मोबाईल काही सापडत नाही... घरभर शोध सुरू आहे.

इकडे ठेवला होता का, तिथं होता का, रात्री नेमका कुठं ठेवला, पाणी पिण्यासाठी जाग आली तेव्हा मोबाईल होता का... शंभर प्रश्न मनात. मोबाईल काही सापडत नाही... तासभर होऊन गेला, तसतशी शोधाची मानसिकता त्रस्तपणाकडे झुकलेली. सापडत नाही म्हणजे काय...? रिंग तर होतेय, कुणी उचलत तर नाहीय मग गेला कुठं मोबाईल? परत सगळा शोध. तासाचे दोन तास होऊन जाताहेत तशी मानसिकता त्रस्तपणाकडून चिडचिडीकडे सरकलेली. घरातल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, आपलाच कसा गायब झालाय? दोन तास मोबाईलशिवाय दुसरं काही मनात नाही. चिडचिड वाढत चाललेली.

सकाळी उठल्यापासून ब्रश, आवराआवर, आंघोळ असं सारं होत आलं; पण मनात मोबाईल... ‘कुठं ठेवला होता,’ या प्रश्नाला सगळी संभाव्य उत्तरं देऊन झालीयत. मनातल्या मनात शंभरदा हाच प्रश्न विचारून झालाय. भूतकाळातल्या सगळ्या जागा शोधून झाल्यात. मोबाईल कुठल्याही जागेवर नाही. नव्वद-शंभरदा रिंग करून झाली असेल...मोबाईलचा आवाज म्हणून नाही...कुठं व्हायब्रेटरची किंचितशी थरथरही नाही. हातात मोबाईल नाही आणि मनात आता संतापाच्या उकळ्या फुटताहेत...आजची सकाळ साफ खराब झालीय. हरवला तर नसेल कुठं...? पण, हरवायला बाहेर जाण्याचा प्रश्नच आला नव्हता काल रात्री...! मनाचेच प्रश्न आणि मनाचीच उत्तरं...

...आणि दोन तासांचा शोध अखेर संपला. कॅलेंडरची रिंगटोन कुठं तरी ऐकू आली. पुस्तकांची चळत कडेलाच होती. तीत हरवून गेलेला मोबाईल अखेर सापडला. किणकिणता रिंगर वाजवून वाजवून ऐकला जीव (आणि मन) भांड्यात पडला...

मग, भराभर एकेक अॅप उघडणं आलं. गेल्या दोन तासांत एकही कॉल आलेला नव्हता. सात मेसेज आलेले, ते सारे स्पॅम दर्जाचे किंवा प्रमोशनल. मग व्हॉट्सअॅप उघडलं. तिथं गुड मॉर्निंगचे भारंभार मेसेज. आजच्या पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या लिंक्स. अनाहूत व्हिडिओ आणि कित्येक ग्रुपवर तेच ते मेसेजेस. फेसबुकवर अजून वाढदिवस पडलेले नव्हते. जे होतं त्यात दिल्लीतल्या राजकारणावर गल्ली-बोळातल्या मित्र-मैत्रिणींची मतं. इन्स्टाग्रामवर अनाकलनीय फॅशन्सचे रिल्स...झालं, दहा मिनिटांत सगळं जग पालथं घालून संपलं.

मोबाईल सापडला होता. दोन तासांत जगातली काडीही इकडची तिकडे हललेली नव्हती. समजा हलली असेलही तर त्या काडीचा आपल्या आयुष्यावर काडीचाही परिणाम झालेला नव्हता. हललं होतं ते फक्त डोकं. तेही मोबाईल न सापडल्यानं.

मोबाईल तास-दोन तास हाताशी न लागण्याची स्थिती अशी अचानकपणे उद्भवली तर येणारी ही अस्वस्थता आज मानसिक विकाराच्या दर्जाला पोहोचली आहे. या मानसिक अवस्थेचं नाव आहे ‘नोमोफोबिया’! ‘नो मोबाईल फोन फोबिया’ या इंग्लिश शब्दांचं ‘नोमोफोबिया’ हे लघुरूप.

स्मार्टफोन हातात नसल्यानं येणारी ही अवस्था अनेकांच्या रोजच्या जगण्यात कळत-नकळत डोकावली आहे. यावर गेल्या दशकभरात गंभीरपणानं संशोधन सुरूय आणि त्यातून समोर येणारी माहिती पुढच्या काळासाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे.

मोबाईलचा वापर मुख्यतः संवादासाठी अपेक्षित. त्यातही बोलून व्यक्त होणारा संवाद महत्त्वाचा. म्हणून मोबाईलवर स्पीकर-रिसिव्हर आहे. बोलता यावं आणि बोललेलं ऐकू यावं यासाठी. मोबाईलचा स्मार्टफोन बनणं, स्मार्टफोन अखंड इंटरनेटशी कनेक्ट राहणं आणि त्याद्वारे जगभरातल्या अगणित माहितीचा भडिमार क्षणोक्षणी होत राहणं हा सारा दहा वर्षांतला बदल. या बदलानं झालंय काय, तर मोबाईलचा बोलण्यासाठी किमान आणि माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी सर्वाधिक वापर होतोय. माहितीच्या निमित्तानं मोबाईलशी प्रत्येक क्षणी चिकटून राहणं सवयीचं बनलंय. या सवयीला ज्या क्षणी धक्का बसतोय, त्या क्षणी आपल्यापैकी कुणीही नोमोफोबियाची शिकार बनतोय.

आपण शिकार बनलोय हे कळणंही अशक्य. हाताशी मोबाईल हवा, ही मागणी मेंदूतल्या जणू प्रत्येक पेशी इतक्या ताकदीनं करायला लागतात की, मोबाईल जितका वेळ दुरावलेला असतो तितका वेळ अन्य विचारही जणू दुरावलेले राहतात. अस्वस्थता, चिडचीड, संताप या भावना सारासार विवेकाची जागा घ्यायला लागतात.

दुरावलेला मोबाईल हातात आल्यानंतर मिळणारी माहिती भले ९९.९९ टक्के वेळा निरुपयोगी असते; पण तीही समाधान देऊन जाते. हे समाधान मोबाईल हाताळण्याचं असतं. तंत्रज्ञानावर विलक्षण अवलंबित्वाचं हे उदाहरण जवळपास प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी नोमोफोबियाचा अनुभव देत आहे.

मोह टाळता येत नाही

‘वय जितकं कमी, तितका नोमोफोबिया जास्त’ असं आजपर्यंतच्या वैज्ञानिक संशोधनात समोर आलेलं आहे. माणूस वयानं वाढत जातो, तसतसं त्याचं एकप्रकारे सामाजिकीकरण होऊ लागतं. व्यापक समाजाचा तो एक भाग बनत जातो. लहान मुलं, विशेषतः पौगंडावस्थेतील मुलं-मुली, व्यापक समाजाचा भाग अद्याप बनायची असतात. त्यांचं स्वतंत्र विश्व असतं. गेल्या दहा वर्षांत या वयोगटाचा अविभाज्य घटक मोबाईल बनला आहे.

त्यामुळे, नोमोफोबियाच्या टोकाच्या अवस्था लहान आणि पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये दिसतात. हे काही फक्त आपल्या आसपास घडतंय असं नाही. जगभरात, जिथं जिथं कुटुंबातील प्रत्येकाकडे मोबाईल आहे अशा ठिकाणी हे दिसल्याचं संशोधन सांगतं आहे. बरं, मोबाईलमधून मिळणारी प्रत्येक माहिती उपयोगाची नसते हे ठाऊक आहे; तरीही माहितीचा मोह टाळता येत नाही, असा वयाचा हा टप्पा असतो. या टप्प्यावर माहिती एकप्रकारे डोस देण्याचं काम करत राहते आणि हा प्रकार धोकादायक असतो.

तरुणवर्ग विळख्यात

नोमोफोबियाची लक्षणं समजून घेतल्यावर आता प्रश्न पडतो, याच्या परिणामांचं काय? सगळ्यात गंभीर परिणाम म्हणजे मानसिक अस्थिरता. मोबाईलमध्ये मान खुपसून बसलेली व्यक्ती वरकरणी एकाग्रचित्त भासत असली तरी वास्तव नेमकं उलटं असतं. मोबाईलवर प्रसारित होत राहणारी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मानवी मेंदूवर वेगवेगळे परिणाम एकाच वेळी करत असते. चेन्नईत तीन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नोमोफोबियाचं प्रमाण किती आहे हे तपासलं गेलं. त्यातून समोर आलेला निष्कर्ष धक्कादायक होता. नोमोफोबियाची लक्षणं ९९ टक्के विद्यार्थ्यांमध्ये आढळली आणि त्यापैकी १७.५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये ही लक्षणं आजाराच्या पातळीवर गेलेली होती.

नोमोफोबिया हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनतो आहे, याबद्दलची जाणीवच अद्याप तयार व्हायची आहे. त्यामुळे, हातातील मोबाईलकडे पाहत रस्ता ओलांडणारे हजारो लोक शहरांमध्ये दिसतात. लहान वयात किंवा पौगंडावस्थेत योग्य पद्धतीनं मोबाईलवापराची सवय न लागल्यानं स्वाभाविकपणे अशा नागरिकांमध्ये आजघडीला सर्वाधिक तरुण दिसतात. शहरांमधील ही परिस्थिती निमशहरी आणि ग्रामीण भागातही झिरपताना दिसते आहे.

‘आजार’ दूर ठेवा!

नोमोफोबियावर ‘अक्सीर इलाज’ शोधण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. वापरावर स्वतः मर्यादा आणणं, यापलीकडे फारसे काही समोर आलेलं नाही. मोबाईल फोनच्या अतिवापराचे कित्येक खरे-खोटे किस्से चर्चेत असतात. नोमोफोबिया हा किस्सा न राहता आजाराच्या स्तरावर येऊन पोहोचला आहे. उद्याच्या जगातल्या आव्हानांना सामोरं जाताना असा जडवून घेतलेला आजार आजच दूर ठेवता आला, तर उत्तम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com