पिंपळेगावची सावित्री... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.''

सती सावित्रीची पुराणातली कथा लहानपणी ऐकली होती. जी सावित्री आपल्या पतीचा प्राण परत मागण्यासाठी यमाच्या मागं जाते आणि पतीचा प्राण परत घेऊन येते, तशाच तोडीची वास्तवातली कथा पुणे कार्यालयातले माझे एक सहकारी मला फोनवरून सांगत होते. "ती बाई मला कोर्टात भेटली आणि तिची कहाणी ऐकून मला अतिशय वाईट वाटलं. तू जा पिंपळेगावला, तुला वेगळी स्टोरी करता येऊ शकेल,' अशी माहिती मला त्या सहकाऱ्यानं दिली. त्यांनी सुचवल्यानुसार, मी एके दिवशी पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळच्या पिंपळेगावला पोचलो. खूप साधं गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्येचं. पिंपळेगाव नावालाच पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. मराठवाडा आणि विदर्भ इथल्यापेक्षाही भीषण दुष्काळ आहे तिथं. पिंपळेगावच्या जवळच असलेल्या बोधडी सुपेगाव इथून छोटेखानी पाईप टाकून गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जानेवारी महिना संपला की इकडं उन्हाळा सुरू होतो. या गावाकडं आणि इथल्या शेतकऱ्यांकडं पाहिल्यावर वाटतं की "पश्‍चिम महाराष्ट्र संपन्न आहे' असं म्हटलं जातं; पण ते सर्वस्वी खरं आहे काय? गावात माणूस नाही आणि शेतात जाण्याची गरज नाही, मग ही सगळी माणसं गेली कुठं? तर आसपास असणाऱ्या छोट्या-मोठ्या शहरांत ती कामाला जातात. त्यातून चार पैसे मिळवतात आणि उदरनिर्वाह चालवतात.

मला ज्या घरी जायचं होतं, त्या घरी मी पोचलो. पत्र्याचं छोटंसं घर. मी गेलो तेव्हा घर नेमकंच शेणानं सारवलेलं होतं. बाहेर तुळशीजवळ महादेवाच्या पिंडीशेजारी लावलेल्या उदबत्तीचा सुवास प्रसन्न करून गेला. घरात एक महिला भाकरी थापत होती. गोल गरगरीत भाकरी. वाऱ्याच्या झुळकीसरशी भाकरीचा वास
वातावरणात पसरत होता आणि भुकेला निमंत्रण देत होता. मला पाहिल्यावर त्या महिलेनं भाकरी थापायच्या थांबवल्या आणि "पाय धुवा' म्हणत भरलेला तांब्या घेऊन ती माझ्याकडं आली. पाय धुऊन झाल्यावर जमिनीवर अंथरलेल्या एका पोत्यावर मी बसलो. ते घर तसं नावालाच घर होतं. चार भांडी आणि चार कपडे, अंथरुण-पांघरुणासाठी चार-दोन गोधड्या. एका कोपऱ्यात एक खाट आणि त्या खाटेवर सतत खोकत असलेली व्यक्ती...असं सारं चित्र होतं. बाहेर जसा चारी बाजूंनी दुष्काळ होता तसाच तो घरातही असल्याचं दिसत होतं. घराबाहेर असणाऱ्या तुळशीनं तिथल्या वातावरणात हिरवेपणा आणला होता, तेवढाच काय तो! भाकरी करणारी ती महिला माझ्यासमोर येऊन बसली. मी माझी ओळख सांगितली. त्या महिलेचं नाव वर्षा पोमण. वर्षाताईंनी बोलायला सुरवात केली आणि तेवढ्यात त्यांची नजर घड्याळाकडं गेली. "आलेच' म्हणून त्या उठल्या आणि त्यांनी एका हातानं आपल्या पतीला- संजय यांना - उठवलं. त्यांना गोळ्या दिल्या, थोडं खाण्यासाठी दिलं आणि परत झोपवलं.
मी बसलो होतो तिथं त्या पुन्हा आल्या आणि
मला म्हणाल्या ः ""विचारा...काय माहिती द्यायचीय मी तुम्हाला?''
मी विचारलेले सर्व प्रश्न त्यांनी समजून घेतले आणि मग बोलायला सुरवात केली.
पुराणातल्या आख्यायिकेनुसार, सावित्री फक्त एका यमासोबत लढली; पण पिंपळेगावच्या या अशिक्षित सावित्रीनं तर कितीतरी पातळ्यांवर लढे दिले असल्याचं त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत गेलं.

वर्षा-संजय हे पती-पत्नी मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. संजय यांचं वय 40, तर वर्षा आहेत 38 वर्षांच्या. निखिल आणि शुभम ही त्यांची दोन मुलं. दोन एकरांचा जमिनीचा छोटासा तुकडा आहे खरा; मात्र त्यात काहीही पिकत नाही. दोघंही काबाडकष्ट करून दोन पातळ्यांवर लढतात. एका बाजूला संसार आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही मुलांचं शिक्षण. वर्षभरापूर्वी संजय यांचं पोट फुगलं म्हणून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं. हे दुखणं कमी व्हावं यासाठी वर्षभर दवाखान्याच्या खूप वाऱ्या कराव्या लागल्या; पण आजार काही कमी होईना. शेवटी पुण्याच्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. दाखल केल्यानंतर कळलं की संजय यांना हृदयाचा मोठा आजार आहे. डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया करणं अपरिहार्य होतं. शरीरात काही मशिनही बसवाव्या लागणार होत्या. त्यासाठी दहा लाखांचा खर्च रुग्णालयाकडून सांगण्यात आला. दहा लाखांचा आकडा ऐकूनच वर्षा यांच्या पायाखालची जमीन सरकली. जिथं दहा रुपयेही शिल्लक पडू शकत नव्हते तिथं दहा लाख रुपये कुठून जमा करायचे, असा प्रश्न वर्षा यांच्यासमोर उभा राहिला. तशा त्या जिगरबाज. पतीवर त्यांचं निस्सीम प्रेम. संजय यांचंही वर्षा यांच्यावर तसंच प्रेम...पण पुन्हा तोच प्रश्‍न...एवढी मोठी रक्कम उभी करायची कशी? दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी खाण्याची व्यवस्था अशी एकंदर या कुटुंबाची परिस्थिती. त्यातच "शस्त्रक्रिया केल्यानंतरही तुमचा नवरा वाचेल, याची शाश्वती देता येऊ शकणार नाही,' हे डॉक्‍टरांनी उच्चारलेलं वाक्‍य वर्षा यांना साहजिकच अतिशय अस्वस्थ करून गेलं. त्यात पुन्हा "मी वाचणार नाही हे माहीत असतानाही माझ्यावर चार पैसे कशाला खर्च करायचे?' अशी भूमिका संजय यांनी घेतलेली. एकंदर अशा सगळ्या परिस्थितीत वर्षा यांनी अनेक रात्री जागून काढल्या. काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. "संजय यांना वाचवण्यासाठी मला काहीतरी मदत करा,' अशी विनवणी करत त्या पाहुण्यांकडं दारोदार फिरू लागल्या. त्यांची हक्काची माणसं होती. त्यांच्याकडून थोडाबहुत पैसा जमाही झाला. वर्षा प्रचंड काबाडकष्ट करतात, हे गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना माहीत होतं. त्याच लोकांनी, छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर बॅंकेतून चार पैशांचं कर्ज मिळावं, यासाठी बॅंकेकडं आग्रह धरला. त्यात यशही आलं. बऱ्यापैकी पैसा जमा झाला. "सरकारी दवाखान्यात किंवा ट्रस्टच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया करावी,' असा सल्ला वर्षा यांना अनेकांनी दिला. त्यावर वर्षा यांनीही इतर काहीजणांचा सल्ला घेतला. मात्र, शस्त्रक्रियेची हमी घेतली जाऊ शकत नाही, असं चर्चेच्या माध्यमातून कळलं. आपल्या पतीला वाचवायचं तर त्यासाठी आयुष्यच पणाला लावावं लागेल, हे वर्षा यांच्या लक्षात आलं. मग संजय यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी सगळी ताकद त्यांनी पणाला लावली. पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. जी काही पाच लाखांची पुंजी जमली होती, त्या पुंजीवर ही शस्त्रक्रिया झाली. मात्र, शस्त्रक्रियेला एकूण दहा लाख रुपये खर्च आला होता आणि "जोपर्यंत खर्चाची संपूर्ण रक्कम भरली जात नाही तोपर्यंत रुग्णाला घरी सोडता येणार नाही,' असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. शिवाय, "शस्त्रक्रियेदरम्यान जी काही उपकरणं शरीरात, शरीरावर लावण्यात आली होती, तीही परत काढून घेण्यात येतील', अशी भूमिका रुग्णालयानं घेतली. तत्पूर्वी, दरम्यानच्या काळात "पुण्याच्या "शासकीय चॅरिटी ट्रस्ट'मार्फत आपल्याला मदत मिळावी,' यासाठी वर्षा यांनी विनंती केली होती. शासकीय नियमानुसार, "वर्षा यांच्या पतीची मोफत शस्त्रक्रिया करण्यात यावी,' असं पत्र "मुख्यमंत्री आरोग्य कक्षा'च्या माध्यमातून या रुग्णालयाला देण्यात आलं.

वर्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या पत्रावर रुग्णालयानं कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही.' पुण्याचे उपधर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप आणि सहधर्मादाय उपायुक्त शिवाजी कचरे यांनी वर्षा यांना मदत केली आणि "तुम्ही या व्यक्तीची (संजय यांची) शस्त्रक्रिया नियमानुसार मोफत केली पाहिजे,'
अशी लेखी तंबीही रुग्णालयाला दिली. तरीही रुग्णालय काही ऐकायला तयार नव्हतं. शेवटी, वर्षा यांनी आपलं राहतं घरही गहाण ठेवलं आणि आणखी चार पैशांची व्यवस्था केली. घर, शेती आणि अनेकांची कर्जं काढून रुग्णालयाच्या बॅंकखात्यात पैसे जमा केले; पण कितीही वर्षं काम केलं तरी आपण ज्यांचं कर्ज घेतलं आहे ते परत करू शकणार नाही,' याची वर्षा यांना जाणीव होती. एकीकडं, खूप कर्ज झालं, आता पुढं काय करायचं हा मोठाच ताण होता, तर दुसरीकडं, आपला वाघासारखा माणूस वाचला, याचा मोठा आनंदही!
वर्षा यांना कायद्याचं फारसं ज्ञान नाही; पण रुग्णालय आपली फसवणूक करत असल्याचं त्यांना जाणवत होतं. "आपल्या गावातल्या अनेक गरिबांचे मोठ्या खासगी रुग्णालयांत इलाज झाले; मग माझ्या नवऱ्याचा इलाज का होऊ शकत नाही,' असा त्यांचा प्रश्न होता.
सर्व पातळ्यांवर लढल्यावर वर्षा यांना यश आलं; पण ज्या खासगी रुग्णालयाच्या विरोधात त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून असलेली लढाई जिंकली होती, त्याच खासगी रुग्णालयानं "आपण बरोबर आहोत', असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथंही वर्षा आपली लढाई लढत आहेत. आता मुंबईत "तारीख पे तारीख' सुरू आहे. ऍड विश्वजित सावंत आणि ऍड प्रभाकर जाधव हे वर्षा यांची केस मोफत लढत आहेत.

आपल्या पतीचा जीव वाचवण्यात या आधुनिक सावित्रीला यश आलं खरं; पण त्यांना आता तारेवरची कसरत करायची आहे ती रोजचं जीवन जगण्यासाठी. त्यांची दोन्ही मुलं जी आजवर शाळा शिकत होती, ती आता शाळा सोडून रोज मजुरीला जात आहेत. वर्षा यांनाही इतरांच्या शेतात जाऊन काबाडकष्ट करावे लागत आहेत. लोकांची भरपूर मोठी रक्कम चुकती करायची आहे. मात्र, ती कधी चुकती केली जाऊ शकेल, हे काही निश्‍चितपणे सांगता येत नाही. रोज नवीन दिवस येतोय...कुणीतरी आपल्या मदत करील या आशेवर...पण तसं काहीच होत नाही. गेल्या आठ दिवसांपासून वर्षा आणि त्यांचं सगळं कुटुंब रात्र जागून काढतंय...त्याचं कारण, गावात रोजच चोऱ्या होत आहेत. वर्षा यांच्या घराशेजारची दोन घरं चोरांनी फोडली. तेच चोर दुसऱ्या दिवशी वर्षा यांच्या घरातही शिरले होते. वर्षा आणि त्यांच्या मुलांनी चोरांना चांगलाच चोप दिला. साहजिकच चोरांना पळ काढावा लागला.
आता दर महिन्याला संजय यांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयात घेऊन जावं लागतं. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर पैसा लागतोच आहे. अशा परिस्थितीत भाकरीचा रोजचा प्रश्न सोडवायचा की पतीच्या दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावायचा, हे प्रश्‍नचिन्ह वर्षा यांच्या पुढं आहे.

अर्धी भाकरी कमी खाऊन पतीचं व्यवस्थित संगोपन करण्याचा निर्णय वर्षा यांनी घेतला आहे. वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळेच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' बायकोविषयी बोलताना संजय यांचे डोळे साहजिकच पाणावले होते. एकमेकांना "टॉलरेट' करण्याची क्षमता कमी कमी होत चालली असल्याचा हा सध्याचा काळ...मात्र, सध्याचा काळ हा असा असला तरी अपार काबाडकष्ट करून आपलं कुंकू जपण्याचा आटापिटा करणारी ही "आधुनिक सावित्री'ही याच काळातली...सगळंच अविश्वसनीय. मृत्यूला धडका मारून, दारिद्य्राशी दोन हात करणारी वर्षा यांच्यासारखी माणसं पाहिली की "सामान्यांचं आयुष्य अन्‌ मानवतेची कहाणी हा इतिहासाचा विषय असतो,' या टॉलस्टॉयच्या व्याख्येची प्रचीती येते.

कारणं काहीही असोत; पण आज पती-पत्नींमधले वाढणारे ताण-तणाव, त्यांच्यात सातत्यानं होणारी भांडणं, छोट्या छोट्या मुद्द्यांवरून घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणं आपण रोज पाहतो. एकट्या महाराष्ट्रात दिवसाकाठी तीस घटस्फोट होतात. अशा जोडप्यांपुढं वर्षा-संजय यांच्या अतूट प्रेमाचं उदाहरण अनोखं ठरावं. सती सावित्रीची कथा सत्य आहे की नाही ते माहीत नाही; पण वर्षा-संजय यांची ही घटना मात्र सत्य आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com