इंदूमाई (संदीप काळे)

Sandeep Kale
Sandeep Kale

रोजचा डबा, नाहीतर तेच ते कॅन्टीनचं जेवण! अनेकदा हा सगळा कंटाळवाणा प्रकार वाटतो...जिभेला वेगळं आणि चमचमीत खायला फार आवडत असतं. महिन्यातून एक-दोन वेळा का होईना; बाहेर खाण्याची हुक्‍की येतेच आणि आणलेला डबा तसाच ठेवला जातो आणि काहीतरी चमचमीत खाण्याच्या शोधात बाहेर पडावसं वाटतं. त्या दिवशी असाच बेलापूरच्या ‘सकाळभवन’मधून बाहेर पडलो... नवी मुंबई हे देशातलं नंबर दोनचं शहर. ते जसं चकचकीत; तसंच खाण्यासाठीही चमचमीत...वेगवेगळे मासे आणि खाद्यप्रकार ही नवी मुंबईची खासियत...काहीतरी वेगळं खाण्याचा मूड होता...दोन घास उभ्याउभ्याच पोटात ढकलून कार्यालयांत जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होती.

काही ठिकाणी ताटात उष्टं राहिलेलं अन्न खाण्यासाठी भिकाऱ्यांच्या छोट्या छोट्या मुलांमध्ये मारामारी चालली होती... उष्टी प्लेट पडली की त्यातलं उरलेलं अन्न खाण्यासाठी एका बाजूनं मुलं धावायची आणि दुसऱ्या बाजूनं कुत्रे...या अशा रोजच्याच दृश्‍यांकडं काणाडोळा करण्यात मुंबईकर पटाईत. धावत्या मुंबईत असं वागण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो म्हणा.

ही अशी निरीक्षणं करत करत मी पुढं निघालो होतो. काहीतरी वेगळं खायला मिळतंय का याचा शोध घेत होतो. बेलापुरात कोर्टाच्या अगदी समोर एका दुकानापुढं भलीमोठी रांग लागली होती. हे दुकान नेमकं कशाचं ते दुरून काही कळेना...जवळ गेल्यावर लक्षात आलं की ही एवढी मोठी रांग वडापाव घेण्यासाठी लागली होती...या रांगेकडं पाहून अनेक प्रश्न पडले. जवळ गेल्यावर या सर्व प्रश्नांची उत्तरंही मिळाली...‘झटपट खाद्यपदार्थ’ या प्रकारात वडापाव हा खाद्यपदार्थ मोडतो. ‘महाराष्ट्राचा बर्गर’ म्हणावं एवढी लोकप्रियता वडापावला लाभलेली आहे. वडापावसोबत असणारी लसणाची चटणी म्हणजे तर काही विचारूच नये. मुंबई आणि वडापाव यांचं अविभाज्य नातं आहे. माणूस कितीही मोठा असू द्या... रस्त्याकडेच्या छोट्याशा गाडीवर जाऊन वडापाव खाण्याची इच्छा त्याला होतेच. अशा मंडळींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे... 

कामावर जाण्याच्या लगबगीत एका हातात वडापाव नसेल तर तो मुंबईकर कसला...! मी ज्या वडापावच्या दुकानावर जाऊन थांबलो होतो, तिथं वडापाव खाणाऱ्यांचीही रांग एकीकडं होती आणि दुसरीकडं वडापावचं पार्सल घेऊन जाणारेही लोक बरेच दिसत होते... बरं, ही पार्सलंही काही लहानसहान नव्हती. छोट्याशा मालगाड्यांतून ही पार्सलं नेली जात होती. एवढी मागणी आहे म्हणजे या वडापावमध्ये नक्कीच काहीतरी विशेष असणार, असा विचार मनात आला.

एक महिला वडापाव तळण्यासाठी पीठ तयार करत होती, एक महिला वडे तळत होती, एक व्यक्ती पैशांचा व्यवहार बघत होती आणि एक व्यक्ती लोकांना वडापाव देण्याचं काम करत होती. चार व्यक्तींच्या बळावर ही केवढी मोठी उलाढाल...! दुपारची भुकेची वेळ...त्यात तिथंच उभे राहून खाणारे आणि पार्सल नेणारे एकदमच आल्यामुळं तासभर गर्दी काही संपली नाही...हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. म्हटलं, अगोदर वडापाव खावा आणि मग बाकीचं...! पोटपूजा उरकून घेतली. अजून खातच राहावं अशी चव...आता माझं प्रश्न विचारणं सुरू झालं आणि उत्तरं ऐकून चकित होणंही...!

इंदू नावाच्या एका साठीच्या महिलेनं मुंबईत खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात हा इतिहासच घडवला होता म्हणा ना. 

आता अनेकजण तिला प्रेमानं माई म्हणतात. इंदूमाई. 

इंदूमाई एका हातानं वडापाव विकत होती आणि दुसऱ्या हातानं भिकाऱ्यांनाही वडापाव देत होती. 

‘‘अहो, किती वाटप करता?’’ असं त्यांचा एक सहकारी म्हणाला.. त्यावर इंदूमाई म्हणाली ः ‘‘ बाबा माणसं जगली पाहिजेत...पैशाचं काय एवढं!’’

असं उदारहस्ते दान देणाऱ्या महिलेला कुणी माई - म्हणजे अर्थातच आई- असं संबोधलं तरच ते यथार्थच म्हणता येईल. इंदूमाईचा चवदार, रुचकर वडा आज मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे आणि लोकांच्या खाद्यसवयीचा एक भाग झाला आहे. इंदूमाईची रोजची कमाई काही लाखात आणि वर्षाची तर विचारूच नये. कमाईपेक्षा किती जणांच्या हाताला काम मिळालं, किती जणांनी आपला वेगळा व्यवसाय सुरू केला, किती जणांची भूक शमली... हे इंदूमाईच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे...इंदूमाईचा हा वडा एकेकाळी केवळ मुंबईपुरताच होता. तो आता राज्याभर पसरला आहे. बाहेरच्या राज्यांतही गेला आहे. एवढंच नव्हे तर, परदेशातही या वड्याला मोठी मागणी आहे... आधुनिक तंत्रज्ञान, स्वतंत्र वाहनव्यवस्था आणि पॅकिंगची अनोखी पद्धत यामुळे हा वडा सातासमुद्रापार गेला आहे. लोक आपल्या वडापावची चव चाखतात आणि आनंदी होतात, यातच इंदूमाईचाही आनंद सामावलेला आहे. इंदूमाईचा वर्तमानकाळ चांगला आहे. मात्र भूतकाळ? तो मात्र अतिशय खडतर होता. 

सन १९७२ चा काळ. राज्यावर तेव्हा मोठ्या दुष्काळाचं सावट होतं.

पोटाची खळगी भरण्यासाठी कितीही वणवण केली तरी भाकरीचा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता, अशी स्थिती तेव्हा सगळीकडंच. या परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातलं आपलं ‘मेहूण’ हे गाव सोडायची वेळ इंदूबाईंवर आली. पती साहेबराव यांच्यासोबत इंदूबाईंनी मुंबईचा रस्ता धरला आणि नवी मुंबईतल्या सानपाड्यात ते राहू लागले. नवी मुंबईचे दोन फायदे त्या काळात होते आणि आजही आहेत. एक म्हणजे मुंबईत असल्याचा फील, हाताला काम आणि दुसरा फायदा म्हणजे, मूळ मुंबईतल्या राहणीमानाच्या तुलनेत स्वस्त असणारं जीवनमान. असं असलं तरीही एकाच्या जिवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होणं तसं अवघडच होतं. ही बाब लक्षात आल्यावर इंदूबाईंनी गल्लोल्ल्ली जाऊन वडापाव विकायला सुरवात केली. संसाराला हातभार लावणं सुरू झालं. सात वर्षांच्या काळात इंदूबाईंना दोन अपत्यं झाली. मुलगा संतोष आणि मुलगी ममता. संसार गुण्यागोविंदानं सुरू असतानाच इंदूबाईंचे पती साहेबराव यांचं निधन झालं. त्या वेळी संतोष दहा वर्षांचा, तर ममता सात वर्षांची होती. इंदूबाईंच्या आयुष्यातला हा कसोटीचा, परीक्षेचा काळ होता. या सगळ्या परिस्थितीतून इंदूबाई सावरल्या. आपल्या गाड्यावरचा व्यवसाय त्यांनी परत सुरू केला. काबाडकष्ट केले. संतोष-ममताला उच्चशिक्षित केलं. संतोषला मोठ्या कंपनीत नोकरी लागली; पण त्या नोकरीत त्याला रुची नव्हती. आईनं मोठ्या कष्टानं वाढवलेला वडापावचा व्यवसाय आणखी वाढवावा असा त्याचा विचार होता. त्यानं तसं केलंही. ‘इंदूवडा ’ या नावानं अनेक ठिकाणी व्यवसायाच्या शाखा सुरू केल्या. खूप भरभराट झाली. काळ इंदूबाईंची दुसऱ्यांदा परीक्षा घेण्यासाठी तयारच होता. ममता खूप गंभीर आजारी पडली. होतं-नव्हतं ते विकून, गहाण ठेवून इंदूबाईंनी ममताला या आजारातून बाहेर काढलं. पुढं काबाडकष्ट करून व्यवसायात वाढ होत राहिली. उदार मनाच्या इंदूबाईंना लोक इंदूमाई म्हणू लागले.

इंदूबाईंनी ममताच्या आजाराची कहाणी सांगितली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षं गेली. आता सर्व काही ठीक आहे. संतोषनं त्याचा संसार थाटला. ममताचं याच महिन्यात तिच्या आवडत्या मुलाशी धूमधडाक्‍यात लग्न झालं. संतोष आणि ममता आईच्या शब्दाबाहेर नाहीत...आईनं आपल्यासाठी जे काही केलं, याची जाण दोघा भावंडांना आहे. ‘आई ही आमच्यासाठी सर्व काही आहे’ हे त्या दोघांनी मिळून काढलेले उद्‌गार. 

‘आपण खूप जणांचे आशीर्वाद घेतले की आपल्यालाही निसर्ग साथ देतोच देतो. हार मानायची नाही आणि इमानदारी सोडायची नाही, सातत्य ठेवायचं. हे सगळं तंतोतंत पाळलं की तुमचं यश कुणीही रोखू शकत नाही...’ इंदूमाईनं स्वानुभवाचे बोल सांगितले. इंदूमाईची ही मेहनती वृत्ती आणि कमालीची जिद्द पाहून नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे 

गेल्या ३५ वर्षांपासून इंदूमाईच्या प्रेमात आहेत. इंदूमाईविषयी बोलताना त्या म्हणाल्या ः ‘‘खूप काबाडकष्ट करणारी ही प्रेमळ आणि शिस्तबद्ध बाई. एखाद्या पुरुषाला लाजवेल असं तिचं सामर्थ्य. संसारात अडचण आली की पुरुष आत्महत्या करतात, व्यसनाकडं वळतात. बायका मात्र आलेल्या परिस्थितीचा सामना करतात. इंदूमाई हे त्याचं उत्तम उदाहरण...मी इंदूमाईच्या सुख-दुःखांची साक्षीदार आहे... मात्र, अशा महिलांना समाज मदत करत नाही म्हणून त्यांच्या अडचणीही अधिक वाढतात. इंदूमाईनंही हे भोगलं आहे.’’ 

कवी मनोज बोरगावकर यांच्या ‘जातच राहील प्रेतयात्रेला’ या कवितेतल्या काही ओळींचा उल्लेख यानिमितानं आवर्जून करावासा वाटतो. ते म्हणतात ः 

माणसांच्या देहाच्या आकारावरून
लाकडाच्या क्विंटलचे हिशेब
मी सांगायचो पर्फेक्‍ट
मजबूत हाडापेराचं माणूस
साडेचार क्विंटल लाकडात आटोपतं
लहान चणीच्या माणसाला 
राखरांगोळी व्हायला 
अडीच क्विंटल लाकडं पुरतात 
तर बाईमाणसाला जाळायला 
फारशी लाकडं लागत नाहीत 
आयुष्यभर जळत राहिल्यामुळे 
शेवटी जळण्यासाठी तिच्याजवळ 
देहाशिवाय फारसं काही
शिल्लक उरत नाही...!

 

इंदूमाईकडं आज काय शिल्लक आहे? भुकेलेल्यांनी प्रेमानं, कृतज्ञतेनं दिलेली ‘माई’ नावाची मोलाची पदवी. ज्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी झिजण्याचा वसा घेतला आहे, अशा महिलांचं प्रतिनिधित्व इंदूमाई करते. एक छोटा व्यवसाय... त्यात सातत्य असेल तर 

किती मोठी झेप घेता येते, याचं मोठं उदाहरण म्हणजे इंदूमाई आणि तिचा इंदूवडा.

संकटं येतील आणि जातील...आपण खंबीर राहायचं...हाच बोध इंदूमाईकडं पाहून घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com