कशी ही प्रेमाची परिभाषा... (संदीप काळे)

कशी ही प्रेमाची परिभाषा... (संदीप काळे)

कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरतात; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे. 
 

महाराष्ट्राचा आणि गोव्याचा दौरा करून मी मध्य प्रदेशात पोचलो. इंदूर, उज्जैन ही त्या राज्यातली शहरं सांस्कृतिक शहरं म्हणून ओळखली जातात. उज्जैनमध्ये असणारी वेगवेगळी मंदिरं आणि त्या मंदिरांच्या अवतीभवती असलेलं सगळं 'कोरीव साम्राज्य' लक्ष वेधून घेतं. महाकालेश्‍वर, कालभैरव, हरसिद्धिमाता मंदिर अशी कितीतरी प्रकारची वेगवेगळी मंदिरं या भागात आहेत. विक्रमगडही याच भागात आहे. विक्रमादित्य आणि त्यांच्या नवरत्नांचा दरबार मूर्तींच्या माध्यमातून इथं भरवण्यात आलेला आहे. आसपास खूप कोरीव आणि रेखीव कलाकृती नकाशासह आणि अन्य माहितीसह ठेवण्यात आलेल्या आहेत. जवळच आठव्या शतकापासूनच्या वेगवेगळ्या मूर्तींचं प्रदर्शन एका मोठ्या वस्तुसंग्रहालयात भरवण्यात आलेलं आहे. महादजी शिंदे यांनी केलेलं बांधकाम, क्षिप्रा नदीमध्ये त्या काळी बांधलेलं कुंड हे राजाच्या दूरदृष्टीची प्रचीती देणारं. मन हरखून टाकणारा हा परिसर आहे. विक्रमादित्याचं सगळं साम्राज्य पाहून मी पायऱ्यांनी खाली उतरत होतो. मध्य प्रदेशात कमालीचा उन्हाळा; त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. या गडावर एक छोटंसं झाड होतं आणि त्या झाडाखाली कुणीतरी अंगावर पांघरूण घेऊन झोपल्याचं माझ्या लक्षात आलं. समोर एक कटोरा होता आणि येणारे-जाणारे जमेल तसे पैसे त्या कटोऱ्यात टाकत होते. 

एवढ्या उन्हात आपण पाच मिनिटंही राहू शकत नाही; पण हा माणूस झोपू कसा शकतो, असा प्रश्न मला साहजिकच पडला. मी त्या माणसाच्या जवळ गेलो आणि माझ्याजवळची सगळी चिल्लर- आवाज होईल अशा पद्धतीनं- त्या कटोऱ्यात टाकली; जेणेकरून त्याचं माझ्याकडं लक्ष जावं. माझ्या अपेक्षेनुसार, तो माणूस खडबडून जागा झाला व उठून बसला. माझ्या हातातली पाण्याची बाटली त्याला देत मी म्हणालो : ''एवढ्या उन्हात का झोपलात तुम्ही?'' 

तो म्हणाला : ''महाकालाची सावली आहे माझ्यावर! मला कुठं ऊन्ह लागतंय?'' 

अंगावर कमरेखाली छोटंसं वस्त्र, गळ्यात वेगवेगळ्या माळाच माळा, दाढी आणि डोक्‍यावरचे केस प्रचंड वाढलेले, फक्त एक अंथरूण-पांघरूण, मळकटलेल्या थैलीत थोडंबहुत किरकोळ सामान...असं एकंदरीत चित्र होतं. 

मी त्याला म्हणालो : ''काही खाणार का तुम्ही?'' 

तो म्हणाला : ''नाही.'' 

त्याला वेगवेगळ्या प्रकारे बोलतं करण्याचा मी प्रयत्न केला; पण तो बोलत नव्हता. मी त्याला आसपासच्या परिसरातली माहिती विचारली; तसंच त्याच्या कुटुंबीयांची, त्याच्या गावाची माहिती विचारली; पण तो ढिम्मच. काहीच बोलेना... 

झाडाखाली असूनसुद्धा ऊन्ह इतकं लागत होतं की तिथं बसायची माझी हिंमत होत नव्हती. मी त्या माणसाचा, म्हणजेच वेशावरून साधूबाबा दिसणाऱ्या त्या बाबाचा निरोप घेऊन पुढं जायचं ठरवलं, तितक्‍यात त्या बाबांनीच मला स्वत:हून विचारलं :''कहॉं से आये हो?'' 

मी म्हणालो : ''महाराष्ट्र...मुंबई से।'' 

ते म्हणाले : ''किस लिए आये हो?'' 

मी म्हणालो : ''इथल्या ऐतिहासिक गोष्टी बघण्यासाठी आलोय.'' आमच्या थोड्याफार गप्पा झाल्यावर मी त्यांना म्हणालो : ''चला वर, मला मंदिर दाखवा.'' 

मी त्यांच्याशी वरवर बोलत नव्हतो हे बाबांच्या लक्षात आलं असावं... त्यांनी आपलं अंथरुण-पांघरुण थैलीत भरलं आणि मला मंदिर दाखवण्यासाठी माझ्याबरोबर निघाले. मंदिर पाहणं हे तर माझं एक निमित्त होतं. त्या बाबांविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्यात मला अधिक रस होता. आम्हा दोघांचं फिरून झाल्यावर आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबांच्या गळ्यातल्या वेगवेगळ्या माळांवर माझी सारखी नजर जात होती. त्या माळांचं महत्त्व काय आहे, हेही मी त्यांना विचारलं. मग त्यांच्या खासगी जीवनाविषयी, त्यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांचं इथं उज्जैनला येणं याविषयीची सर्व हकीकत मी त्यांना विचारली आणि त्यांनीही ती सांगितली. 

मला भेटलेले हे साधूबाबा म्हणजे एका कादंबरीचा विषय होते...त्यांचा त्यांच्या गावापासूनचा मध्य प्रदेशापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांविषयी त्यांनी जे सांगितलं ते आठवणीतून न जाणारं आहे. हे सगळं सहन करण्याची एक श्रद्धायुक्त ताकद त्यांच्यात असल्याचं जाणवलं . कालभैरव देवावर श्रद्धा ठेवून ते जगतात. 

''त्या कालभैरव देवामुळे मला ऊन्ह लागत नाही... कालभैरवामुळे मला त्रास होत नाही...कालभैरव देवामुळे मला भविष्याची चिंता नाही...' असा बाबांचा दृढविश्वास! माझ्यासारख्या पूर्णपणे नास्तिक माणसाला हे सगळं मान्य नव्हतं; पण जे काही आहे ते वास्तव माझ्यापुढं होतं. उघड्या माणसाला 45 डिग्रीतही ऊन्हाचा त्रास होत नाही आणि मला अंगावरच्या कपड्यांचं संरक्षण असूनसुद्धा एकही मिनिट उन्हात थांबायची हिमत होत नाही, हे कसं? अशा नाना प्रश्नांनी मी गोंधळून गेलो होतो. मला आपली सगळी करुण कहाणी सांगितल्यावर बाबांनी चिलीम काढली आणि जोरदार धूर बाहेर फेकायला सुरवात केली. 

या बाबांचं संन्यासानंतरचं नाव होतं 'बाबा कालभैरव'. कोणे एकेकाळी शंकरदास म्हणून मथुरेजवळच्या सरई या गावात ते राहत असत. जेमतेम परिस्थिती. आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य. शंकरदासचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि आई-वडिलांना मदत करत स्वत:ही कुटुंबाला आर्थिक हातभार लावायला त्यानं सुरवात केली. दहा वर्षं कुटुंबाच्या जडणघडणीच्या प्रवासात कधी निघून गेली हे कळलंच नाही. त्याच्याच गल्लीत असणाऱ्या नंदिता नावाच्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं. दोन वर्षं उलटली; पण लग्नाचा मुहूर्त काही येईना! कारण, दोन्ही कुटुंबं अत्यंत गरिबीतली. राजस्थानातल्या कुटुंबानं नंदिताला मागणी घातली आणि तिचं त्या वयस्कर व्यक्तीशी लग्नही झाला. लग्न ठरल्यापासूनच्या दोन वर्षांच्या काळात शंकर आणि नंदिता यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं. मात्र, नंदिताचं अचानकच दुसरीकडं लग्न ठरल्याचं ऐकून शंकरदासला मोठाच धक्का बसला. नंदिताच्या नवऱ्याचं हे तिसरं लग्न होतं. त्याचा राजस्थानात मोठा व्यवसाय होता. अगोदरच्या दोन्ही बायका वारल्यामुळे त्यानं नंदिताच्या वडिलांना मोठी आर्थिक रक्कम देत तिच्यासोबत लग्न केलं. नंदिताचं लग्न झाल्यावर सहा महिने शंकरदासनं कुणाशीही संपर्क ठेवला नाही. त्याच्या आई-वडिलांनी त्याची अनेकदा समजूत काढली; पण त्यानं त्यांनाही प्रतिसाद दिला नाही. तशातच एकदा शंकरदासच्या गावात स्वामी रंजनबाबा यांचा डेरा आला. तीन दिवस या डेऱ्याच्या कार्यक्रमातून शंकरदासला ईश्वरभक्तीची आवड निर्माण झाली. शेवटच्या दिवशी प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यावर शंकरदास रंजनबाबांना भेटला आणि 'मला तुमच्यासोबत राहायचंय, कालिभक्त म्हणून राहायचंय,' अशी विनंती त्यानं रंजनबाबांना केली. रंजनबाबा म्हणाले :''तुझ्या आई-वडिलांना घेऊन ये.'' शंकरदास आई-वडिलांना घेऊन आला. शंकरदासनं रंजनबाबांना केलेली विनंती आई-वडिलांनी ऐकली आणि त्यांना साहजिकच खूप वाईट वाटलं. आपल्याला एकच मुलगा आणि तोही आता या बाबांसोबत गेला तर आपलं काय होणार, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, रंजनबाबांनी शंकरदासच्या आई-वडिलांची समजूत काढली. शिवाय, मुलाच्या हट्टापुढंही त्यांचं काहीही चाललं नाही. अखेर, शंकरदा आई-वडिलांना सोडून रंजनबाबांच्या डेऱ्यामध्ये सहभागी झाला. रंजनबाबांनी त्याचं नामकरणही करून टाकलं...कालभैरव. देवीच्या नावानं चालणाऱ्या या डेऱ्यात शंकरदासला नाव मिळालं बाबा कालभैरव. डेऱ्यात गेल्यानंतर अन्य जगाशी आणि आई-वडिलांशी अजिबात संपर्क न ठेवता शंकरदासनं कालभैरवाचा वेश धारण करून 10 वर्षं काढली. 10 वर्षांनंतर त्याच्या लक्षात आलं की डेरा, स्वामी, भक्त यांच्या माध्यमातून जे काही सुरू आहे त्यातून आपल्याला आत्मिक आनंद काही मिळत नाही. आपला हेतू वेगळा आहे. मग आत्मिक आनंदाच्या शोधात शंकरदास ऊर्फ कालभैरव बाबांनी डेरा सोडून एकट्यानं स्वतंत्र भ्रमणाला सुरवात केली. खिशात एक पैसाही नसताना केवळ श्रद्धेच्या बळावर बाबांनी देशातल्या प्रमुख शहरांची दोन वर्षं परिक्रमा केली. जेवढी देवस्थानं आहेत ती सर्व पिंजून काढली. आता उतारवयात कालभैरवबाबांनी उज्जैन शहरच का निवडलंय आणि गेल्या दोन वर्षांपासून ते उज्जैन शहरातच का राहत आहेत, याचंही उत्तर मला मिळालं. 

मधल्या काळात नंदिताच्या पतीचा मृत्यू झाला होता. नंदिताला सहा पुत्र आणि दोन कन्या. सर्वात धाकटी कन्या उज्जैनमध्ये राहते आणि त्याच मुलीकडं नंदिताही राहायला आली आहे. नंदिताच्या पतीचा राजस्थानमधला सगळा व्यवसाय बुडाला, तिच्या पतीचं जे काही होतं ते विकून कर्जाची परतफेड करून ते सगळं कुटुंब देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत पोट भरण्यासाठी निघून गेलं. नंदिताच्या सगळ्या मुलांनी लग्न केलं; पण तिला सांभाळायला कुणी तयार नव्हतं. शेवटी ती धाकट्या मुलीकडं राहायला आली. 

इकडं कालभैरवबाबा आपल्या आई-वडिलांचा शोध घेत जेव्हा आपल्या गावाला गेले तेव्हा त्यांना कळलं, की आपल्या आई-वडिलांचं निधन होऊन खूप वर्षं लोटली आहेत. आई-वडिलांच्या, गावाच्या आठवणी कालभैरवबाबांच्या मनातून जाईनात. याच भेटीत ते नंदिताच्याही घरी गेले. नंदिताची सगळी वाईट परिस्थिती नंदिताच्या आईनं बाबांसमोर मांडली. नंदिताचे वडील केव्हाच वारले होते. नंदिताच्या आईनं फोनच्या माध्यमातून बाबांचं आणि नंदिताचं बोलणं घडवून आणलं. कित्येक वर्षांनंतरच्या त्या संवादाबद्दल कालभैरवबाबा भरभरून बोलत होते. तेव्हा जेवढं प्रेम त्यांचं नंदितावर होतं, तेवढंच प्रेम आजही असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. 'मी तुला भेटायला येतो', असं नंदिताला सांगतकालभैरवबाबांनी फोन ठेवून दिला आणि उज्जैन गाठलं. ते नंदिताला भेटले. आता नंदिता राहत असलेल्या उज्जैनमध्ये त्यांचं उरलेलं आयुष्य चाललंय. 

कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरत आहेत; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे. 

देवावर निष्ठा ठेवून मोक्षप्राप्तीसाठी फिरणारे अनेक तरुण महाराज, साधू होताना आपण पाहत असतो; पण या चेहऱ्यांमागंसुद्धा कितीतरी वेगळे चेहरे दडलेले असतात. या चेहऱ्यांना आपल्या खासगी गोष्टी इतरांना सांगायच्या असतात. त्यातले बहुतेक चेहरे हे असमाधानी, अतृप्त आणि सतत काहीतरी विसरल्यासारखं वागतात. धर्माच्या माध्यमातून तशी वेशभूषा परिधान करणाऱ्या आणि इतरांसाठी सतत काहीतरी करणाऱ्या लोकांबद्दल मला आदर नक्कीच आहे; पण असेही अनेक जण असतात, जे परमार्थाच्याही प्रांतात नसतात आणि प्रेमाच्याही. ते आई-वडिलांजवळही नसतात की देवा-धर्मातही त्यांचं मन रमत नसतं. अशांविषयी मनात कणव दाटून येते. 

ज्यांच्या जीवनाचा रस्ता चुकला आहे असे अनेक बाबा आपण आपल्या अवतीभवती पाहत असतो. अशा बाबांनी परमार्थ करावा की परमेश्वराला भजावं, यासाठी मार्ग दाखवणारी एकही संस्था आपल्याकडं नाही. कालभैरवबाबांना कदाचित धार्मिक थोतांडांचा साक्षात्कार झाला असावा म्हणूनच ते पुन्हा आई-वडिलांकडं गेले असावेत; पण अनेक जण बुवाबाजीचा पाश तोडून आपल्या आई-वडिलांकडंही जाऊ शकत नाहीत की मोक्षप्राप्तीकडंही! अशा सगळ्यांची केवळ चिंता करणं एवढंच आपल्या हाती असतं. त्यांची बुद्धी त्यांनी कशी चालवायची, हा त्यांचा प्रश्न! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com