तमाशातील पाटलीण... (संदीप काळे)

तमाशातील पाटलीण... (संदीप काळे)

पारंपरिक लावणी जोपर्यंत गावातल्या माणसाला कळणार नाही तोपर्यंत लावणीला खरा 'साज' चढणार नाही आणि हाच 'साज' चढवण्याचा वसा स्मृती बडदे आणि ऐश्वर्या बडदे या दोघी बहिणींनी घेतला आहे. लावणीकडं त्या 'एक चळवळ' या दृष्टिकोनातून पाहतात...

'गोदावरी महोत्सवा'च्या वेळी आम्हाला लावणीचा कार्यक्रम ठेवायचा होता. अनेक मोठमोठी नावं डोळ्यांपुढं होती; पण ज्यांनी लावणीत मोठं योगदान दिलं आहे, ज्यांनी एक चळवळ म्हणून लावणी जपली आहे, अशांनाच निमंत्रित करावं असा विचार होता. सुरेखा पुणेकर यांच्यानंतर जर कुणी लावणीच्या क्षेत्रात योगदान दिलं असेल तर ते मुंबईतल्या स्मृती बडदे आणि ऐश्‍वर्या बडदे या बहिणींनी! 

दोन वर्षांपूर्वी अधिवेशनादरम्यान त्यांचा एक शासकीय कार्यक्रम झाला होता; त्या कार्यक्रमाला मी श्रोता म्हणून उपस्थित होतो. तिथून या दोघींच्या आई माधुरी तुकाराम बडदे यांचा संपर्कक्रमांक मी मिळवला. मग आम्ही नांदेडला आयोजिलेला त्यांचा कार्यक्रम सुपरहिट झाला. साधारणत: 10 हजार महिला त्या कार्यक्रमाला आल्या असाव्यात. या दोन्ही बहिणींनी सादर केलेली पारंपरिक लावणी पाहून त्या सगळ्या महिला अवाक्‌ झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे तीन तासांचे पाच तास कसे झाले कळलं नाही. तिथं कार्यक्रमाच्या धबडग्यात मला त्या दोघींशी आणि त्यांच्या आईशी फार बोलता आलं नव्हतं. 

दोघींनी सादर केलेल्या कलेत कमालीची जादू होती. लावण्याचे कितीतरी कार्यक्रम मी पाहिले; पण या दोघी बहिणींच्या लावणीसारखा कार्यक्रम कधीच पाहिला नव्हता. मुंबईला आल्यावर मी या दोघींविषयी खूप माहिती गोळा केली. त्यांच्या एकूण प्रवासाविषयी अनेकांशी बोललो. त्यांच्या लावणीविषयीच्या योगदानाबाबतही मी अनेकांकडून ऐकलं. त्यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी केवळ लावणी केली असं नव्हे, तर त्यांनी लावणी जगवली, असंच म्हणता येईल. त्या दोघींचे गुरू राजेश गमरे यांच्यापासून मी सुरवात केली. त्यांच्याकडून मला अनेक विषय समजून घेता आले. या दोघींनी लावणीची कला जोपासण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. लावणी सादर करणं, लावणी शिकवणं, लावणीच्या कलाकारांसाठी वेळोवेळी लढा देणं असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. या दोघींनी मिळून काय करायचं याची सगळी रूपरेषा त्यांची आई माधुरी या आखत असतात. 

नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात या दोन्ही बहिणी राहतात. ठरलेल्या वेळेनुसार मी त्यांच्या घरी पोचलो. छान स्वागत झालं. तोडकंमोडकं घर...पण घरपण असलेलं. सगळ्या घरात जिकडं पाहावं तिकडं पारितोषिकं आणि सन्मानचिन्हं. मी थक्क झालो. दोघीजणी माझ्या बाजूला बसल्या होत्या. त्यांचे आई-बाबा आणि भाऊ माझ्यासमोर बसले होते. आईनं सुरवातीपासूनचा प्रवास सांगितला. दोघींचे बाबा आणि भाऊ लावणीच्या कार्यक्रमांतून आलेले अनुभव गप्पांच्या मधून मधून मला सांगत होते. 

या दोघींचं गाव सासवडजवळचं. त्या गावाचं नाव कोडीत. गावात बडदे कुटुंबीयांची पाटीलकी. वेगळाच मान-मरातब. आपल्या पाटील कुटुंबातल्या मुली लावणी करतात, लावणीवर नाचतात हे त्यांना सहन होणारं नव्हतं. 

पाटील म्हणजे लावणी सुरू असताना फेटे उडवणारे, शिट्ट्या मारणारे असंच चित्र आपण सर्रास पाहिलेलं असतं. आपली मुलगी चार माणसांसमोर नाचते हे 

आजही गावातल्या कोणत्याही पाटलाला कधीच पटणार नाही. आपल्याकडचं वातावरणच तसं आहे. लावणी सादर केली जाण्यादरम्यानचं चित्र या दोघी बहिणींच्या माध्यमातून सर्व नातेवाइकांच्या डोळ्यासमोर येत असेल. त्यातून त्यांच्या मनाचा भडका उडत असेल. असाच अनुभव या दोघी बहिणींच्या आईला अनेक वेळा आला. आपल्या मुली तमाशात नाचतात म्हणून आपले नातेवाईक आपल्यापासून दुरावले हे सर्वांच्या वागण्यातून लक्षात येत होतं; पण करणार काय? या दोघींनी लावणी ही एक चळवळ म्हणून स्वीकारली आहे. पारंपरिक लावणीची संस्कृती जपली पाहिजे, यासाठी त्यांचा प्रवास कधीच सुरूही झाला आहे. फक्त पारंपरिक लावणीचे 'शो' करणं, त्यातून किती रुपये मिळतात यापेक्षा आपली लावणी किती लोकांपर्यंत जाते हेच या दोघींनी नेहमी पाहिलं. सर्व वयोगटांतल्या मुलींना लावणी शिकवणं, शासनाकडं, पारंपरिक लावणीची परिभाषा कायम राहावी आणि ती पुढच्या पिढीकडं जावी, यासाठी राज्यातल्या विद्यापीठांकडं नेहमी आग्रही राहणं अशी कामं या दोघी बहिणी गेल्या 12 वर्षांपासून करतात. 

लावणीला बदनाम करणाऱ्या यादीत असणाऱ्या अनेक वाकड्या नजरा त्यांच्यावर पडल्या होत्या. अनेक कार्यक्रमांदरम्यान या दोघींना वाईट घटनांचा सामना करावा लागला. त्यातून आपलं आणि आपल्या संस्कृतीचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही सतत करत राहणार, असा निर्धार या दोघींच्या आई माधुरी यांनी बोलून दाखवला. त्या म्हणाल्या : ''वाईट अनुभव आल्यावर आपल्या भरवशाच्या माणसाच्या मध्यस्थीनं कार्यक्रम घ्यायचे हेच पुढं मी करत गेले. चार कार्यक्रम कमी झाले तरी चालतील; पण चांगल्या ठिकाणी आपल्या मुली घेऊन जायच्या हे मी अनुभवातून शिकले. माझ्या मुली जेव्हा नाचतात तेव्हा लोकांचे श्वास थांबतात! काठापदराच्या साडीत त्यांच्या सौंदर्याच्या छटा पाहून डोळे दिपून जातात. कदाचित आम्ही लावणी करताना आमच्यातली पाटील संस्कृती कायम जपली जात असेल म्हणूनच स्वत:चं घरकुल घेण्यासाठी आम्हाला एवढा वेळ लागत असेल. आमचा स्वाभिमान शाबूत आहे म्हणून जगण्यातही खूप मजा येते...'' 

माधुरी म्हणाल्या : ''सुरवातीला थोरली मुलगी स्मृती हिला घेऊन 'नखरेल कैरी लाडाची' या बॅनरखाली राज्यात खूप कार्यक्रम केले. तेव्हा ऐश्वर्या 'साईड नर्तिका' म्हणून नाचत असे. जेव्हा ती पूर्ण शिकून नाचायला लागली तेव्हा तिची कला दाद द्यावी अशीच होती. मग आम्ही 'करते तुम्हा मुजरा' असा दोघींचा मिळून कार्यक्रम सुरू केला.'' 

दोघींचे वडील तुकाराम बडदे म्हणाले : ''आज महिलांसाठी 'शो' करायचे असतील तर या दोघींनाच निमंत्रण दिलं जातं. माझ्या मुलींचा मला आभिमान आहे. त्यांनी खूप मेहनत करून हे सगळं उभं केलं आहे. लोक काही नावं ठेवत असतील तर त्यानं मला आणि माझ्या कुटुंबाला काहीही फरक पडत नाही.'' मुलींचं कौतुक करताना वडिलांचा ऊर भरून आला होता. 

ज्या ज्या स्पर्धांमध्ये या दोघींनी भाग घेतला त्या त्या स्पर्धांमध्ये त्यांचा पहिला नंबर येतोच येतो. अकलूज, ढोलकीच्या तालावर, शासनाचे नियोजित लावणी महोत्सव, अन्य स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये दोघींचा पहिला नंबर आला आहे. कार्यक्रमासाठी सर्व लोकांची टीम जमवणं आणि ती कायम टिकवणं हे काम सोपं नव्हतं. इथं केवळ पैसा आणि सन्मानच मिळतो असं नाही तर कलेच्या चळवळीलाही आपल्याकडून हातभार लागत आहे, हे सोबतच्या सर्व कलाकारांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सर्वजण एका कुटुंबासारखे एकत्रितपणे कामात अधिक रस घेऊन उतरले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्यांची कलाकारांची सर्व टीम एकत्रितपणे काम करते. दोघी बहिणींत स्मृती थोरल्या. त्या म्हणाल्या : ''मी सात वर्षांची असताना पहिली लावणी शाळेत सादर केली. लावणी सादर करताना दाद देणारे डोळे खऱ्या अर्थानं लावणीत शृंगाररस भरत असतात. जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी अधिक चांगली लावणी करू शकले. कॉलेजच्या काळात लावणीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही शिकून घेतला. माणसं वाचायला शिकले. लावणी समजून घेतल्यावर मग ठरवलं की जगायचं तर लावणी मोठी करण्यासाठीच. तो प्रवास अजून कायम आहे. माझ्या धाकट्या बहिणीनं माझ्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे. आता लावणी हा आम्हा दोघींच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.'' 

या दोघींच्या प्रवासाविषयी ऐकताना 'नटरंग' हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर येत होता. 

ऐश्वर्या यांच्या अदा लावणी सादर करताना किती भाव खाऊन जातात हे लावणीचे अभ्यासक खूप चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. प्रत्येक स्पर्धेत ऐश्वर्या यांना पहिला नंबर द्यायला त्यांच्या या अदांमुळेच कदाचित परीक्षकांना भाग पडत असावं. ''सुरेखा पुणेकर यांनी लावणी सातासमुद्रापार नेली आणि या दोघी बहिणींनी ती मराठी माणसाच्या मनात रुजवली,'' असं या दोघींविषयीची माहिती गोळा करत असतानाच्या काळात मला लावणीतल्या अनेक बुजुर्गांनी सांगितलं. पारंपरिक लावणी जोपर्यंत गावातल्या माणसाला कळणार नाही तोपर्यंत लावणीला खरा 'साज' चढणार नाही आणि हाच 'साज' चढवण्याचा वसा या दोघींनी घेतला आहे. त्यांच्या घरातली काही जुने आल्बम मला पाहायला मिळाले. दोघींच्या लावणीतल्या चढत्या आलेखाच्या सर्व आठवणी त्यांच्या आई माधुरी यांनी खूप मेहनतीनं जपून ठेवल्या आहेत असं ते आल्बम पाहून जाणवलं. 

गावातल्या सर्व मंडळींसाठी आणि नातेवाइकांसाठी माधुरी यांनी एकदा सासवडला 'खास शो' ठेवला होता. तेव्हा या दोघींची लावणी पाहून हे 'रसायन' वेगळं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. पाटीलकी आणि या दोघी बहिणींची लावणी यांच्यातली 'दीवार' त्या कार्यक्रमापासून तुटली. आपल्या पोरी चांगल्या कलाकार आहेत हे आपण स्वीकारलं पाहिजे, याची खूणगाठ सगळ्यांनी मनाशी बांधली. कला सदर करणाऱ्या तमाशातल्या या दोन पाटलीण बाईंना अनेक ठिकाणी चांगली संधी कशी मिळेल यासाठी याच पाटलांची - जे अगोदर दोघींचा तिरस्कार करायचे - अधिक धडपड आता पाहायला मिळते. 

अलीकडच्या तरुण मित्रांना 'पारंपरिक लावणी म्हणजे काय' हे सांगण्यापासून सुरवात करावी लागेल. लावणीत धांगडधिंगा पाहिजे एवढंच त्यांना माहीत. 

ऐश्वर्या या अलीकडच्या पिढीचं नेतृत्व करणाऱ्या आहेत. लावणीबरोबरच त्यांनी 10 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. काही चित्रपटांत त्यांनी सादर केलेली लावणी अनेकांना घायाळ करून गेली आहे. 

ऐश्‍वर्या म्हणाल्या : ''अलीकडंच एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिका देऊ करण्यासाठी मला मोठी 'किंमत' मागण्यात आली. तेव्हा ती भूमिका सपशेल नाकारून मी घरी आले. 'चित्रपटाची ऑफर' आली की माझ्या अंगावर तेव्हापासून शहारेच येतात. आता केवळ आम्ही आणि लावणी असं आमचं काम सुरू आहे.'' 

भविष्यात 'लावणी' म्हटलं की ऐश्वर्या बडदे हे नाव येईल. एवढी साधना ऐश्वर्या यांनी केली आहे. मन सुन्न करून टाकणारेही सुरवातीच्या प्रवासातले अनेक टप्पे त्यांनी सांगितले. 

''लावणीत नाचणारी बाई म्हणजे 'तशीच' असते असा घातलेला चष्मा माणसं काढणार की नाही?'' असा त्यांचा सवाल होता. 

काळ खूप आधुनिक झाला; पण हा घाणेरडा चष्मा अजून अनेकांच्या डोळ्यांवर कायम आहे, याचं त्यांना वाईट वाटतं. बडदे कुटुंबीयांनी लावणीसाठी केलेल्या कामाच्या विविध खुणा पाहता पाहता माझे त्यांच्या घरी पाच तास कसे गेले कळलं नाही. दोघींची आई माधुरी यांनी केलेल्या स्वंयपाकातही कमालीची कला होती. गावाकडच्या स्वयंपाकाचा स्वाद आणि सुगंध प्रत्येक पदार्थाला होता. मला रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडायला अवघं कुटुंब आलं होतं. मला निरोप द्यायला आलेली ही माणसं किती मोठी आहेत याचा अंदाज मला आला होताच. निघताना त्यांच्या जगण्यातलं-वागण्यातलं साधेपण मला व्यापून राहिलं... 

पारंपरिक लावणीसाठी या दोघींनी केलेल्या कामाची नोंद लावणीच्या इतिहासात हळूहळू का होईना होत आहे. या दोघींना अजूनही लावणीवर प्रेम करणाऱ्या त्या तमाम रसिकांच्या मनात राजमान्यता नाही मिळाली, हे चित्र सगळीकडं मला खोलवर माहिती घेताना दिसत होतं. या दोघींची कला आणि लावणीसाठी त्यांनी उभी केलेली चळवळ लोकमाध्यमांपासून एवढी दूर का आहे ते माहीत नाही; पण आज मराठी संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं या लावणी जगण्याच्या चळवळीत आपलं योगदान दिलं पाहिजे, असं मनापासून वाटतं. मराठी लावणी विकारी नजरांनी वेढलेली आहे. त्या नजरांतून तिला मुक्त करून तिला कलासक्त नजराचं लेणं मिळालं पाहिजे. जसं या दोघी बहिणींनी हे शिवधनुष्य उचललं आहे तशी लावणीला 'खानदानी अदब' प्राप्त करून देणं ही सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com