झुंजणाऱ्या बहिणींचा वसा...

वर्षा सध्या नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी येथे ‘हमर थ्रो’ (हातोडा फेक)चा सराव करीत आहे.
झुंजणाऱ्या बहिणींचा वसा...
Summary

वर्षा सध्या नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी येथे ‘हमर थ्रो’ (हातोडा फेक)चा सराव करीत आहे.

- संदीप काळे

ना शिकला गेलो की, हल्ली माझा मुक्काम, माझा धाकटा भाऊ परमेश्वर काळे यांच्याकडं असतो. मागच्या पंधरा दिवसांमध्ये पुणे, सातारासह राज्यातल्या अनेक भागांमध्ये मी फिरतोय. सगळीकडे थंडी होती, पण नाशिकएवढी कडाक्याची थंडी अजिबात नव्हती. संध्याकाळी जेवण झालं. मी जरा फेरफटका मारावा या हेतूनं बाहेर निघालो.

थोडा वेळ चालल्यानंतर गरम होण्याऐवजी थंडीची हुडहुडी कमालीची भरायला लागली. पुढे पाहिले तर काही अंतरावर एक शेकोटी पेटलेली मला दिसली. कुणीतरी व्यक्ती त्या शेकोटीच्या जवळ बसलेली होती. मी शेकोटीच्या जवळ गेलो. हात एकदम गरम झाले. मी पुढे पाहिले तर एक मुलगी शेकोटीजवळ होती. आजूबाजूला कोणी नाही. सगळीकडे अंधार पसरलेला. खांबावरचा दिवा नावालाच होता.

अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती मुलगी धाडस करून अभ्यासाला बसली होती. तिच्याशी बोलावं, तर तिला काय वाटेल. खूप अंधार आहे. आजूबाजूला कोणी नाही, मनामध्ये धाकधूक व्हायला लागली. त्या मुलीचे लक्ष माझ्याकडे बिलकूल नव्हतं. ती एकीकडे पुस्तक वाचत होती आणि दुसरीकडे वाजणाऱ्या थंडीला हाताच्या माध्यमातून ‘ऊब’ घेत होती. मी आल्याचा कानोसा तिला लागला होता, पण तिने माझ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. अनेक जण ये-जा करत त्या शेकोटीपाशी ऊब घेत होते. मी एकदम हळू आवाजात म्हणालो, ‘‘ताई, एवढ्या रात्री एकट्याच असे का बसलात?’’ पुस्तक वाचण्यामध्ये दंग झालेल्या त्या मुलीने डोके वर केले आणि माझ्याकडे पाहिले? ती अजिबात घाबरली नाही. अगदी शांत स्वरात ती मला म्हणाली, ‘‘काही नाही, थंडी वाजते म्हणून शेकोटीला बसले.’’ तिचे शांत उत्तर ऐकून मीही एकदम शांत झालो.

मी पुन्हा म्हणालो, ‘‘स्पर्धा परीक्षेची तयारी करता काय तुम्ही?’’ तिने ‘नाही’ म्हणून मान हलवली. मी विचार करत होतो, एवढ्या अंधाऱ्‍या रात्री ही मुलगी येथे एकटी अभ्यास करत बसलेली आहे. तिची जिद्द, तिची हिंमत, तिच्यामध्ये असलेला निडरपणा याची दाद द्यावीच लागेल. अभ्यास करता करता तिचे गुंग झालेले मन एकदम भानावर आले. तिने शांतपणे माझ्याकडं पाहिलं. ती मला म्हणाली, ‘‘दादा, तुम्हाला मला काही बोलायचे आहे का? तुम्हाला रस्ता सापडत नाही का? काय पाहिजे तुम्हाला? सांगा एकदाच मला. तुम्ही वारंवार माझ्याशी बोलायचा प्रयत्न करता आणि मी डिस्टर्ब होते.’’

मी म्हणालो, ‘‘काही नाही. तुम्ही इतक्या भयाण रात्री एकट्या इथे बसलात याचं मला कौतुक वाटतं. अलीकडे मुली इतक्या निडर असू शकतात, हे पाहायला मिळत नाही.’’ ती मुलगी पुस्तक बाजूला ठेवत मला म्हणाली, ‘‘अहो दादा, परिस्थिती तुम्हाला सगळं करायला भाग पाडते. आपण काय एक छोटी कठपुतली आहोत, ही वेळ प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वागायला भाग पाडते.’’ तिच्या बोलण्यातून वेळ, परिस्थिती या दोन्ही विषयांवर तिचा राग आहे असं जाणवत होतं. मी म्हणालो, ‘‘ते सगळं ठीक आहे, पण तुमच्यासारखं शांतपणे वाईट वेळेला कुणी सामोरे जात नाही. तुम्ही अभ्यास करताय. तुम्ही शांतता शोधताय. तुम्ही एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताय, हे पण महत्त्वाचं आहे नाही का?’’ माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एकदम शांतता पसरली. त्यानंतर ती बोलायची आणि मी ऐकायचो. मी बोलायचो ती ऐकायची. हा आमचा संवाद असाच सुरू झाला.

मी ज्या मुलीशी बोलत होतो तिचे नाव वर्षा हरी कानपुरे (७०५७८७९३७१). अमरावतीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये बी.पी.एड.च्या प्रथम वर्षाला आहे. वर्षा सध्या नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी येथे ‘हमर थ्रो’ (हातोडा फेक)चा सराव करीत आहे. वर्षा राज्यस्तरीय महिला खेळाडू आहे. ती कोणार्कनगर भागात एक दहा बाय दहाची रूम घेऊन भाड्याने तिची धाकटी बहीण अचल हिच्यासोबत राहते. अचल ‘नीट’ परीक्षेची तयारी करतेय. वर्षाचे वडील हरी यांनी वर्षा तीन वर्षांची असताना विष पिऊन आत्महत्या केली. वर्षाची आई चंदा या राजना-भंडारी, (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे आहेत. त्या छोटेसे किराणा दुकान चालवतात. मोठ्या तीन बहिणींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चंदा यांचे अवघे आयुष्य चालले आहे. वर्षाला खेळामध्ये प्रचंड रुची आहे. त्यामुळे तिने नाशिक गाठले. आता तिथे ती सराव करते. लहानपणापासून दारिद्र्याने तिचा पिच्छा कधी सोडला नाही. त्या दारिद्र्यावर मात करीत पुढे पुढे जात आहेत. वर्षाला ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी मेडल आणायचे आहे. तिला एन. आय. एस. करायचे आहे. तिला कोच होऊन अनेक वर्षा घडवायच्या आहेत.

सकाळी सहा वाजल्यापासून तिचा सराव सुरू असतो. अलीकडे वर्षावर तिची बहीण अचल आणि आई या दोघींच्या जबाबदारीचे ओझे आहे. बहिणीची फी कशी भरायची, आई सतत आजारी असते, तिचा इलाज करायचा आहे. तिची श्री शिवाजी कॉलेजची फी कशी भरायची, असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आहेत. ती इथे रात्री येऊन का बसली तर घरमालकीण भाडे द्या, म्हणून घरी येऊन बसत आहे. संध्याकाळी बहीण घरी आल्यावर घरी पीठ नाही, तिला जेवायला काय द्यायचे? असे एक नाही तर अनेक विषय आहेत. जे तिच्या आयुष्याला चिकटून बसले आहेत. तिच्यासोबत घडलेले एक एक किस्से जेव्हा ती मला सांगत होती, तेव्हा माझ्या अंगावर काटा येत होता.

आम्ही बोलत असताना, माझी गाडी आली. वर्षा अचलशी फोनवर बोलत होती. तिला तिने घरी बोलावले होते. मी वर्षाला विनंती केली, मी तुला घरी सोडतो म्हणून. आम्ही गाडीत बसलो. पुन्हा आमचे बोलणे सुरू झाले. वर्षा जिथल्या कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली, तिथे तिथे तिने यश खेचून आणले. अभ्यासात अव्वल नंबर, खेळात अव्वल नंबर, नम्रपणात अव्वल नंबर, एक गरिबी सोडता तिने सर्वांवर विजय मिळवलाय. वर्षा सांगत होती, घर चालवायला उद्यासाठी पैसे नाहीत. पोटाला चिमटा घेऊन आई चार पैसे पाठवते. ‘हमर थ्रो’चा शूज नाही.

पैसे नसल्यामुळे डायट करू शकत नाही. प्रवासासाठी, माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. असे अनेक विषय वर्षाच्या बोलण्यातून पुढे आले. आम्ही तीन तासांपासून बोलत होतो. तरीही वर्षाचे विषय काही संपत नव्हते. गरिबीमुळे काहीही थांबत नाही. तिला माझी स्थिती, गरिबी, आय.पी.एस. मनोजकुमार शर्मावर ‘ट्वेल्थ फेल’ नावाचं लिहिलेले पुस्तक असे अनेक उदाहरणे मी देत होतो. तीही ते सर्व समजून घेत होती.

वर्षाची रूम आली. आमची गाडी थांबण्याचा आवाज आला तर अनेक लोक बाहेर येऊन आमच्या तोंडाकडे पाहत होते. वर्षाने तिची बहीण अचलला बोलावले. माझी ओळख करून दिली. मी अचलला म्हणालो, ‘‘तुला काय व्हायचे आहे.’’ अचल म्हणाली, ‘‘एम.बी.बी.एस. करून मला डॉक्टर व्हायचे आहे. माझ्या आजूबाजूला, नातेवाइकांमध्ये उपचाराअभावी अनेक जण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. हे सर्व थांबण्यासाठी, लोकसेवा करण्यासाठी मला डॉक्टर व्हायचे आहे.’’ अचलही वर्षासारखी प्रचंड मेहनती आणि उत्साही होती. वर्षा म्हणाली, ‘‘मला माफ करा सर, मी तुम्हाला आतमध्ये या’’ असे म्हणूही शकत नाही. मी लगेच म्हणालो, ‘‘असे काही नाही, मी समजू शकतो.’’ आमचे बोलणे सुरू असताना वर्षाची घरमालकीण बाहेर येऊन थांबलीच होती.

मी त्या दोघींचा निरोप घेतला आणि निघालो. मी रस्त्याने जाताना विचार करत होतो, काहीही जवळ नसताना, कोणीही सोबत नसताना एवढी ऊर्जा येते कुठून काय माहिती? ज्यांच्याकडे सर्वकाही असते त्यांना किंमत नसते. ज्यांच्याकडे काहीच नसते ते खूप जोमाने काम करतात. त्यांना तुम्हा-आम्हासारखे अनेक जण मदत करतात. वर्षाला देशासाठी ऑलिंपिकमध्ये जाऊन मेडल आणायचे आहे. अचलला गरिबांची सेवा करायची आहे. त्यांच्या उत्साहाला कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्ही-आम्ही एक पाऊल माणुसकीच्या धर्मासाठी टाकून या दोघींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला तर निश्चितच तीही देशसेवा घडेल. तुमच्या मदतीच्या असलेल्या चांगुलपणाचा वारसा या दोन्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com