धावणं आणि कार्डिओमुळं ताण हलका (संदीप साळवे)

sandeep salwe
sandeep salwe

मला कामाचा ताण असेल, किंवा मी कोणत्या विचारात अथवा टेन्शनमध्ये असलो, की धावायला जातो. त्यातून एक वेगळीच मनःशांती मिळते. कार्डिओसुद्धा करतो. धावणं आणि कार्डिओ माझ्यासाठी "स्ट्रेसबस्टर' आहेत. मी या माझ्या आवडत्या गोष्टी करतो, तेव्हा मी वेगळ्याच दुनियेत असतो. विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. फक्त शरीरानं फिट असूनही चालत नाही. मन फिट असेल, तर तुम्हाला नवं काम करतानाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. शरीरानं आणि मनानं फिट ठेवण्यास मला वर्कआऊटच मदत करतो.

नियमित व्यायाम आणि वर्कआऊट केलं तरच आपण मनानं आणि शरीरानं फिट राहतो, असं माझं मत आहे. मी माझ्या फिटनेसकडं फार बारकाईनं लक्ष देतो. माझ्या दिवसाची सुरवातच वर्कआऊटनं होते. गेली बारा वर्षं मी वर्कआऊट करतोय. शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला, तेव्हा माझं वजन अगदी चाळीस किलो होतं. अगदी हडकुळा होतो. आपण कसं दिसलं पाहिजे, हे शेवटी आपल्याच हातात असतं. महाविद्यालयातच शिकत असताना आपण बदललं पाहिजे, फक्त वजन वाढवून चालणार नाही तर पर्सनॅलिटीवरही अधिक भर दिला पाहिजे, म्हणून मी वर्कआऊट करण्यास सुरवात केली. इतरांनी सांगून किंवा इतरांचं बघून मी फिटनेसकडं लक्ष द्यायला लागलो असं अजिबात नाही. मनापासून काहीतरी करावंसं वाटलं म्हणून माझी पावलं जीमकडे वळली आणि आता तर वर्कआऊट म्हणजे माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे.

वर्षभर मेहनत
माझा आगामी "रॉकी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी जवळपास एक वर्ष तरी मला मेहनत घ्यावी लागली; पण वर्कआऊट हा माझा आवडीचा विषय असल्यानं यामध्ये मला कंटाळवाणं असं काहीच वाटलं नाही. "रॉकी'साठी मी एका वेगळ्याच भूमिकेत दिसणं अपेक्षित होतं. त्यासाठी मस्क्‍युलर लूकही हवा होता. त्याचप्रमाणं मी तयारी करण्यास सुरवात केली. या चित्रपटाची तयारी करताना खास असं काही डाएट नव्हतं; पण वर्कआऊटवर जास्त भर दिला. मी कार्डिओ खूप करायचो. शरीरातले फॅट्‌स कमी करावे लागले. हा ऍक्‍शनपट असल्यानं चित्रीकरणादरम्यान शारीरिक मेहनतही तितकीच महत्त्वाची होती. ऍक्‍शन सीन्स करताना बॉडीडबलचा उपयोग मी या चित्रपटात केला नाही. त्यामुळं शरीर कसं फिट ठेवता येईल याकडं माझा जास्त भर होता. "रॉकी'साठी मी तयारी करत होतो, तेव्हा मी दिवसातून चार तास तरी वर्कआऊट करायचो. मार्शल आर्टचंही मी ट्रेनिंग घेतलं आहे. आता चित्रीकरण आटोपलं असलं, तरीही मी चार तास वर्कआऊट करतोच. मला आता ती सवय झाली आहे. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास मी व्यायाम करतोच.

सहा ते सात "मील'
डाएटच्या दृष्टीनं माझे दिवसाचे सहा ते सात "मील' ठरलेले असतात. त्यामध्ये प्रोटिन आणि इतर पदार्थांचा समावेश असतो. इंडियन; तसंच रशियन फूडचा माझा जेवणात समावेश असतो. लो कॅलरीज, प्रोटीनच्या दृष्टीनं माझं डाएट असतं. माझ्या शरीराला आता काय सूट होतं हे मला आणि माझ्या ट्रेनरलाही माहीत झालं आहे. प्रोटीनच्या गरजेनुसार माझ्या डाएट प्लॅनमध्ये बदल होतात. शक्‍यतो घरगुती पदार्थ खाणंच मी पसंत करतो. वजन कमी करायचं आहे म्हणून मी खाणं कधीच सोडलं नाही. तशी गरजच कधी भासली नाही. मी बाहेरचे जरी पदार्थ खाल्ले, तरी माझं माझ्या खाण्यावर नियंत्रण आहे. दिवसाला दहा किलोमीटर तरी माझं कार्डिओ होतो. बॉडी बनवणं किंवा मस्क्‍युलर लूक करणं याला फिटनेस नाही म्हणत. तुमचं शरीर तितकंच लवचिक हवं. स्टॅमिना सर्वांत महत्त्वाचा आहे. जो तुम्हाला व्यायाम, योगा करून मिळतो. नेहमीच माझा जीमकडं कल राहिला आहे. त्यामुळं योगासनांकडं मी वळलो नाही; पण निरोगी शरीर आणि मन फिट राहण्यासाठी योगासनही तितकंच महत्त्वाची आहेत. जंकफूड, स्ट्रीटफूड, पॅकेटबंद पदार्थ खाणं टाळलं तर अधिक उत्तम. हे शरीरासाठी हानिकारक पदार्थ आहेत. आरोग्यविषक प्रत्येक गोष्ट करताना आपल आपल्यावर बंधन हवं. तुम्ही जीममध्ये जाऊन वर्कआऊट, व्यायाम कितीही केला तरी डाएट तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या मते 90 टक्के डाएट आणि 10 टक्के वर्कआऊट असतं. एकदा तोंडावर नियंत्रण ठेवता आलं, की वर्कआऊट केलेलंही शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
माझा मस्क्‍युलर लूक, बॉडी पाहून बरेच जण मला डाएटबाबात प्रश्‍न विचारतात. "फिटनेससाठी तू खाण्यातल्या कोणत्या गोष्टी सोडल्यास,' हा सगळ्यांचा प्रश्‍न मला असतो; पण या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, की मी खाण्यापैकी कोणत्याच गोष्टी सोडल्या नाहीत. मी शाकाहारी, मांसाहारी सगळे पदार्थ खातो; पण त्याच जोडीला व्यायाम असल्यामुळं कॅलरीज बर्न होऊन जातात.

मी "रॉकी'चं चित्रीकरण करत होतो, तेव्हा काही सीनसाठी माझं वजन 78 किलो होतं. काही सीनसाठी मला वजन 70 किलोंपर्यंत कमी करावं लागलं. शरीरामध्ये हे बदल होत गेले. हे सगळं करत असताना फार काही त्रास सहन करावा लागला नाही. डाएट प्लॅनमध्ये बदल होत जातात; पण भूमिकेनुसार स्वतःला बदलावं लागतं हेही तितकच खर आहे. कामाचा ताण असेल किंवा चिडचिड होत असेल, तर बरेच लोक मेडिटेशन हा पर्याय निवडतात. मेडिटेशनही उत्तम उपाय आहे यात काही वाद नाही; पण माझं काही वेगळंच आहे. मला कामाचा ताण असेल, मी कोणत्या विचारात अथवा टेन्शनमध्ये असलो, की धावायला जातो. त्यातून एक वेगळीच मनःशांती मिळते. कार्डिओसुद्धा करतो. धावणं आणि कार्डिओ माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहेत. मी या माझ्या आवडत्या गोष्टी करतो, तेव्हा मी वेगळ्याच दुनियेत असतो. विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. फक्त शरीरानं फिट असूनही चालत नाही. मन फिट असेल, तर तुम्हाला नवं काम करतानाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. शरीरानं आणि मनानं फिट ठेवण्यास मला वर्कआऊटच मदत करतो. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, शरीर फिट ठेवणं हे आपल्याच हातात आहे. व्यायाम अथवा इतर काही करण्यास सुरवात केली तर त्यात नियमितपणा हवा. डाएट निरोगी शरीर ठेवण्यास अधिक मदत करतं. त्यासाठी डाएटकडंही पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे. फक्त व्यायाम आणि इतर गोष्टी करून तुम्ही शरीराने कधीच फिट राहू शकत नाही. मी जगाच्या पाठीवर कुठंही असलो, तरी मला व्यायाम हा हवाच. हे माझ्याच नव्हे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात असलं पाहिजे. टवटवीत चेहरा, निरोशी शरीर आणि फिट मन हवं असेल तर एकमेव उपाय म्हणजे व्यायामच.

(शब्दांकन ः काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com