विशाल मनाचं विज्ञान (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 23 एप्रिल 2017

भारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जीवित कसं राहिलं? आज आपल्याला  ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे? याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल! बगदादमधल्या ‘बैत अल्‌ हिक्‍मा’या ‘थिंक टॅंक’च्या संचालकांनी या संशोधनाच्या भाषांतराचा - मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा - प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता.ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक!

भारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जीवित कसं राहिलं? आज आपल्याला  ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे? याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल! बगदादमधल्या ‘बैत अल्‌ हिक्‍मा’या ‘थिंक टॅंक’च्या संचालकांनी या संशोधनाच्या भाषांतराचा - मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा - प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता.ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक!

आल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विविध शोधांमुळं विज्ञानाला एक वेगळी दिशा मिळाली हे सगळ्यांना माहीत आहे; पण त्यांचं संशोधन जगात सर्वत्र पोचवलं कुणी व कसं?
आईनस्टाईन यांनी १९१५ मध्ये जर्मनीतल्या शास्त्रज्ञांच्या मंडळासमोर एक व्याख्यान दिलं व आपल्या सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला. त्यांचं भाषण जर्मन भाषेत होतं. लेखनही जर्मन भाषेत होते. त्या वेळी पहिल्या महायुद्धानं युरोप पेटला होता. जर्मनीचा प्रमुख शत्रू ब्रिटन हे राष्ट्र होतं. ब्रिटनच्या व जर्मनीच्या सैन्यांनी एकमेकांना संपूर्ण पराभूत करण्याचा चंग बांधला होता. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. लाखो लोक लुळे-पांगळे व निर्वासित झाले होते.

अशा परिस्थितीत ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी आईनस्टाईनच्या संशोधनाचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. त्याची चाचणी सुरू केली व आईनस्टाईन यांचं संशोधन प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी प्रयोग सुरू केले त्यात सर आर्थर एडिंग्टन हे शास्त्रज्ञ पुढे होते. त्यांना सापेक्षतावादाचं गणित तपासायचं होतं. त्यासाठी ते सूर्यग्रहणाची वाट पाहत होते. असं सूर्यग्रहण १९१९ मध्ये आफ्रिकेच्या किनारपट्टीवर दिसेल म्हणून ते तिथं गेले. त्या वेळी पहिलं महायुद्ध संपून जेमतेम सहा महिने झाले होते, तरीही ब्रिटनच्या सरकारनं एडिंग्टन यांचा प्रवासखर्च केला. इतकंच नव्हे तर, त्याआधी महायुद्ध सुरू असताना एडिंग्टन यांना आईनस्टाईन यांचं काम पुढं नेण्यासाठी सूटही दिली. या कामात एडिंग्टन यांना ब्रिटनच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी सहकार्य केलं.
एडिंग्टन यांनी आफ्रिकेतल्या त्यांच्या प्रयोगानंतर जेव्हा निष्कर्ष जाहीर केले, तेव्हा इंग्लंडच्या प्रमुख वर्तमानपत्रांनी ‘आईनस्टाईन यांचा विजय’ अशा अर्थाचा मथळा छापला व विज्ञानाच्या प्रगतीतला एक नवीन अध्याय सुरू झाला.
जर महायुद्धाच्या कामात इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी ‘आईनस्टाईन हे शत्रुपक्षाचे आहेत; आम्हाला नाही बुवा त्याचं काही ऐकायचं!’ किंवा ‘ आम्ही एवढे मोठे आणि काय तो धूळधाण होणारा जर्मनी देश शास्त्रज्ञांना जन्म देणार?’ अशा वल्गना केल्या असत्या किंवा राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारत शत्रुराष्ट्राच्या विज्ञानाकडं दुर्लक्ष केलं असतं, तर आईनस्टाईन यांचं संशोधन जगापुढं येण्यासाठी काही दशकांचा उशीर झाला असता व अनेक क्षेत्रांत मानवानं आज जी प्रगती केली आहे, ती सन २१००-२२०० च्या दरम्यान झाली असती.

शत्रुपक्षानं असं संशोधन पुढं आणून संपूर्ण मानवी संस्कृतीला पुढं नेण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता.
जगाच्या इतिहासात सर्वांत प्रथम विज्ञान भारत व ग्रीस या दोन देशांनी जोपासलं. हे सुमारे इसवीसनापूर्वी ५ ते ७ ते इसवी सनानंतर सहावं शतक या १०० वर्षांत झालं. या काळात भारतात सुश्रुत, चरक, आर्यभट्ट व ब्रह्मगुप्त यांनी मूलभूत संशोधन केलं. ग्रीसमध्ये , प्लूटो, पायथॅगोरस, युक्‍लिड यांनी मूलभूत संशोधन केलं. उल्लेख केलेल्या या नावांशिवाय भारतात व ग्रीसमध्ये इतरही शास्त्रज्ञ होऊन गेले. भारतात; तसंच ग्रीसच्या जागी आलेल्या रोमन साम्राज्यात सुमारे एक हजार वर्षं या संशोधनाची जाण होती; पण दोन्ही राष्ट्रं सहाव्या-सातव्या शतकानंतर अधोगतीच्या मार्गाला लागले. भारतातल्या सुवर्णकाळावर काळं सावट पसरलं. रोमच्या साम्राज्याचा लय झाला.
भारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जागृत कसं राहिलं? आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे? याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल!

सन ८३२ मध्ये बगदादमध्ये ‘बैत अल्‌ हिक्‍मा’ हा जगातला पहिला ‘थिंक टॅंक’ स्थापन करण्यात आला. त्या वेळी बगदादमध्ये मामून अब्बासिद यांचं राज्य होतं. इस्लाम धर्मावर आधारित असं ते राज्य होतं. अब्बासिद स्वतःला राजा म्हणवून घेत नसत, तर तर ‘धर्मावर आधारित राजा’ अर्थात ‘खलिफा’ असं म्हणवून घेत असत. त्यांची इतर इस्लामी राज्यांशी व विशेषतः शेजारीच असलेल्या ‘बायझंटाईन’ या ख्रिश्‍चन राज्याशी सतत युद्ध होत असत. धर्मयुद्ध अद्याप सुरू झालेली नव्हती, ती दीडशे वर्षांनी सुरू झाली; पण जगाची वाटचाल धर्मयुद्धाच्या दिशेनं एकंदरीत सुरू झाली होती. अशा वातावरणात ‘बैत अल हिक्‍मा’ या अरबी थिंक टॅंकच्या धुरिणांनी भारतात व ग्रीसमध्ये पूर्वी झालेलं संशोधन जगासमोर आणायचं ठरवलं. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बायझंटाईन या शत्रुराष्ट्रातल्या ख्रिश्‍चन व ज्यू धर्माच्या विद्वानांना बगदादला आमंत्रित केलं. त्यांचा सन्मान केला. त्यांना खूप मोठा आर्थिक मोबदला दिला व त्यांच्या मदतीनं प्राचीन भाषांमधल्या ग्रंथांचं अरबी भाषेत भाषांतर सुरू केलं. तिथं संस्कृत पंडित काम करत असल्याची नोंद नाही; पण भारतीय व्यापाऱ्यांच्या मदतीनं प्राचीन भारतातले संशोधनाचे कागद प्राप्त केल्याची नोंद आहे. हे सगळं करण्यासाठी खलिफा मामून अब्बासिद यांनी सरकारी तिजोरीतून मोठा खर्च केला व भारत आणि ग्रीस इथल्या संशोधनाचं पुनरुज्जीवन केलं.

ऍरिस्टॉटल ग्रंथ ग्रीक ते सीरियन ते अरबी ते लॅटिन ते इंग्लिश असा भाषांतराचा प्रवास करून आपल्याकडं पोचले आहेत. प्राचीन भारतातलं विज्ञान आपल्याकडं भारत ते बगदाद ते भारत आणि भारत ते बगदाद ते युरोप ते भारत असा प्रवास करून आपल्याकडं पोचलं आहे.

भारत आणि ग्रीस इथल्या संशोधनाचं भाषांतर करताना बगदाद इथल्या विद्वानांना विज्ञानाची गोडी लागली. त्यातून त्यांनी अनेक शोध लावले. पुढच्या काळात अरबराष्ट्रांची धूळधाण उडाल्यावर ते जगासमोर कसं आलं?
हॉर्वर्ड या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध विद्यापीठानं अविसेन्ना या पर्शियातल्या शास्त्रज्ञाचं संशोधन आपल्या वैद्यकीय विभागात अभ्यासाचा विषय म्हणून ठेवलं. ऑक्‍सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांनीही अरब प्रदेशात लागलेल्या संशोधनावर पुढं काम केलं.
जर ‘बैत अल्‌ हिक्‍मा’च्या संचालकांनी मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता. ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक!

आजची मानवी संस्कृती ही विशाल मनाच्या विज्ञानाची फलश्रुती आहे. जगातल्या काही व्यक्तींनी ‘मी’, ‘माझं’, ‘आमचं’ ही मानसिकता सोडून व्यापक विचार केला म्हणून मानवतेची प्रगती झाली. विज्ञानाचा दुरुपयोग काही सत्तांध व स्वयंकेंद्रित राज्यकर्त्यांनी केला म्हणून संहारक शस्त्रांमध्ये वाढ झाली. येत्या काही वर्षांत प्रगती होईल की संहार होऊन मानवी संस्कृती संपूर्ण नष्ट होईल, याचं उत्तर व्यापक व सर्वसमावेशक वैचारिक प्रवाह व स्वयंकेंद्रित आणि सत्ताकेंद्रित वैचारिक प्रवाह या दोन परस्परविरोधी विचारसरणींच्या पुढच्या मार्गक्रमणात मिळेल.

Web Title: sandeep wasalekar writes about science