पानवाली बेगम

Panwali Begum
Panwali Begumsakal media

कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात होतो. रात्री राजेश निंबाळकर यांच्या घरचा पाहुणचार घेऊन सातारा येथे मुक्कामी राहिलो. सकाळी सहा वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीवर आपलं डोकं ठेवायचं या विचाराने रात्री डोळे मिटले.

सकाळी कमालीच्या गारठ्याने जाग आली. आवरून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबलो. किल्ल्यावर चढताना जागोजागी इतिहासाच्या पाऊलखुणा नोंदवल्या होत्या. अजिंक्यतारा हा मराठ्यांच्या हाती १६७३ मध्ये आला. शिवाजी महाराज हे या गडावर जवळपास साठ दिवस वास्तव्यास होते. या किल्ल्याला कोणी ‘सातारचा किल्ला’ म्हणतो; तर कोणी अजिंक्यतारा. तेवढ्या थंडीमध्ये किल्ल्यावर असलेल्या मंदिराच्या समोर भगवा फेटा, भगवा तिलक लावलेला एक व्यक्ती जप करीत बसला होता.

तो मोठ्या आवाजात जगदंब जगदंब म्हणत असलेले शब्द माझ्या कानी पडत होते. खालून वरपर्यंत येईपर्यंत तेवढ्या थंडीतही मी घामाघूम झालो होतो. गडावरून खाली शहराकडे बघताना माझ्या कानापासून जाणारी हवा थेट काळजाशी संवाद करत होती. निसर्गाचे इतकं सौंदर्य, अवतीभवती दरवळणारा फुलांचा सुगंध. मला सहा मिनिटांमध्ये तिथल्या वातावरणाने मोहिनी घातली होती. कदाचित या वातावरणामुळेच साठ दिवस छत्रपती शिवाजी महाराज अजिंक्यतारा या किल्ल्यावर थांबले असतील, असे मला वाटत होते.

मी निसर्गाशी एकरूप झालो. महाराज कुठे फिरले असतील. महाराज कोणत्या भागात गेले असतील. माझ्या मनात राजांना घेऊन अनेक भावना येत होत्या. मी परवाच पावनखिंड चित्रपट पाहिला होता. माझ्या महाराजांप्रतीच्या भावना अगदी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या झाल्या होत्या. तितक्यात बाजूला जगदंब, जगदंब जप करत असणाऱ्या त्या माणसाचा मोठ्याने आवाजा आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. त्याच्या आवाजाने समोरच्या झाडावर बसलेले पक्षी एका क्षणात उडाले.

त्या जप करणाऱ्या माणसाला किल्ल्याच्या इतिहासाबदल काहीतरी बोलावं, हा विचार माझ्या मनात आला. मी त्याच्याकडे बघत होतो आणि तो माझ्याकडे. आपल्या बाटलीचे झाकण काढत त्या व्यक्तीने मला मोठ्या आवाजात विचारलं, आम्ही आपणास विचारतो पाणी घेणार का? शिवाजी महाराजांची पत्र ज्या भाषेत होती त्या भाषेमध्ये तो माणूस मला बोलत होता. मला तहान नसताना मी होकाराची मान हलवली. पाणी पिल्यावर आमचे बोलणे सुरू झाले. मी त्या व्यक्तीला विचारलं, आपण कट्टर शिवभक्त दिसता? तो म्हणाला, ‘हो‘ काही शंकाच नाही. इथल्या मुस्लिमांनी आमच्यावर खूप अत्याचार केले ?

म्हणून महाराजांना पुढाकार घ्यावा लागला. महाराज गेले, पण ती मुस्लिम विचाराची छबी आजही आमच्या समाजावर धोक्याचे सावट घेऊन कायम आहे. आता मोदींचे राज्य आहे, म्हणून थोडेतरी ठीक आहे. त्या व्यक्तीचे आपले बोलणे सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम जमात कशी संपवली हेच तो मला सांगत होता. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचे नाव संताजी डहाके. मी संताजी यांचे सगळे मुद्दे खोडले, तरी ते माझेच बरोबर आहे असे म्हणत होते. वरतून सूर्याची किरणे तापत होती. आम्ही दोघं बोलत- बोलत गडाच्या पायथ्याशी आलो. समोर कंपाळावर कुंकू नसलेली महिला काही तरी विकत बसली होती.

त्या महिलेकडे बघताच माझ्यासोबत असणाऱ्या संताजी डहाके यांचा पारा चढला. नाक मुरडत तो म्हणाला, मुगलाच्या आवलादीचे सकाळी सकाळी दर्शन झाले. मला काही कळेच ना! तितक्यात माझा फोन वाजला. मी फोनवर बोलायला लागलो. माझ्यासोबत असणारे संताजी मला हात दाखवत निघून गेले. माझे फोनवर बोलणे संपले आणि मी त्या समोर असणाऱ्या महिलेला विचारलं. माझ्या सोबत असणारे व्यक्ती तुम्हाला का बोलत होते. ती बाई हसली, अत्यंत नम्रपणे मला म्हणाली, जाऊ द्या जी, दादा बोलणारे बोलतात, आपल्याला काय करायचं? मी म्हणालो, कशी दिली पाने. दहा रुपयांची पंधरा.

मी खिशात हात घातला तर पाकीट सोबत नव्हतं. ती बाई मला म्हणाली, ही पाने घेऊन जा. पुन्हा जेव्हा- केव्हा याल, तेव्हा मला पैसे द्या. मी रोज सकाळी इकडे चक्कर मारतेच. मी म्हणालो, मावशी तुम्ही खाली किती वेळात येता, खाली मी पैसे दिले असते. नाहीतर तुम्हाला वेळ असेल तर मग चौकामध्ये आमच्या ‘सकाळ'चे ऑफिस आहे तिथे या, आपले पैसे देतो. ती परत म्हणाली, जाऊ द्या ना दादा, तुम्ही पुन्हा याल ना तेव्हा द्या.. माझे पान घेणे एक बहाणा होते. मला त्या महिलेशी बोलायचे होते.

मी त्या महिलेला म्हणालो, तुम्ही रोज येता का इकडे. ती म्हणाली, हो. मी पुन्हा म्हणालो, इथं फारसे लोक येत नाहीत, तरी तुम्ही पाने विकायला येथे येता. ती बाई एका क्षणात बोलून गेली. पाने विकायला इथे कोण येते दादा, मी तर महाराजांच्या दर्शनासाठी इथे येते. माझा थकलेला चेहरा त्या बाईच्या एका वाक्याने एकदम प्रफुल्लित झाला. मी म्हणालो, अगदी खरं आहे. आमच्या दोघांचाही संवाद खुलला. त्या महिला कोण आहेत, राहतात कुठं, त्यांचा व्यवसाय, कुटुंब, हे सर्व काही त्यांच्या बोलण्यातून पुढे आलं. त्यांचे सारे बोलणे ऐकूण अवाक होण्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीही नव्हतं.

मी ज्या महिलेशी बोलत होतो, तिचे नाव जरीना बेगम. सगळे जण तिला ‘बेगम पानवाली’ म्हणूनच ओळखतात. शेतकऱ्याकडून नागेलीची पाने घ्यायची आणि ती स्टॉलवर, डोक्यावर घरोघरी जसे जमेल तसे विकायची. नेहमीचे ठरलेले ग्राहक, आपल्या व्यवसायाची प्रचंड श्रद्धा आणि शिवाजी महाराजांची भक्ती हे सगळं माझ्याशी बोलताना त्या महिलेने विशेषकरून अधोरेखित केलं होतं.

मी म्हणालो, तुमची शिवभक्ती मला फार आवडली. त्यामागे काही कारण आहे का, बेगम म्हणाल्या, आमची आजी सांगायची शिवाजी महाराजांच्या खास जवळच्या व्यक्तींमध्ये आमच्या खानदानामधील व्यक्ती होती. महाराजांच्या दरबारामध्ये आमच्या खानदानमधल्या त्या व्यक्तीला खास मान, सन्मान होता. त्यांची स्वामीनिष्ठा पाहून त्यांना पद देखील बहाल करण्यात आलं होतं. तेव्हापासून आमच्या घरात एकीकडे मस्जिदचा फोटो, तर दुसरीकडे आमचे कुलदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे.

माझी आजी नेहमी सांगायची व्यवसायामध्ये जर कधीकधी भरभराट व्हावी असे वाटत असेल तर दिवसातून एकदा ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याची धूळ आपल्या डोक्याला लावली पाहिजे, जिथून शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाची ऊर्जा थेट मिळेल. आमची आजी, तिची आजी आणि आता मी, माझी मुलगी, आम्ही सगळेजण याच श्रद्धेवर आयुष्यात सुखाचे दिवस काढतो. आपल्या कामाची सुरुवात करायची असेल तर अजिंक्यताराच्या पायथ्याची धूळ कपाळाला लावली पाहिजे. हे आता आयुष्याचा भाग बनले आहे. बोलता बोलता बेगम यांनी आपली पिशवी काढली, पिशवीमध्ये मोठा बॉक्स होता. त्यामध्ये कात चुना होता.

बॉक्सच्या कव्हरवर शिवाजी महाराज यांचा जुना फोटो होता. बेगम म्हणाल्या, तुमच्या नावाचं पान बनवू का? मी म्हणालो बनवा. बेगम पुन्हा-पुन्हा आजीने सांगितलेल्या गोष्टी मला सांगत होत्या. हे महाराजांचे राज्य आहे. परिस्थितीमुळे आर्थिक दारिद्र्य कितीही आलं तरी आम्ही कधीही खचलो नाही. कारण विचारांची शिदोरी महाराजांच्या संस्कारामधून आमच्या कुटुंबात आली होती. बेगमचे एकएक वाक्य मनाला स्पर्श करून जात होते. बेगम म्हणाली, आता काय राज्य आलं बघा, माझी मोठी मुलगी मालेगावला दिली होती. मालेगावच्या दंगलीमध्ये ती मारली गेली. तिच्या नवऱ्याचे दोन्ही पाय निकामी झाले.

तुमच्या रक्तामध्ये महाराजांप्रती असलेली श्रद्धा पिढ्यानपिढ्या कायम असेल त्या रक्ताला मुस्लिम रक्त म्हणून तुम्ही उभ्या माणसाला कापू कसे शकता? असा प्रतिसवाल बेगम यांनी मला विचारला. एकीकडे बेगम यांनी दिलेले पान तोंडात रंगले होते, तर दुसरीकडे आमच्या भावनिक गप्पाही रंगल्या होत्या. आपल्या मुलीच्या आठवणीमध्ये रडणारी बेगम स्वतःला सावरत, आता खूप उशीर झालाय, मला निघावे लागेल म्हणत माझ्यासोबतच बोलत-बोलत खाली येत होती. एक तुम्ही सांगितलेच नाही तो माणूस, जो माझ्याबरोबर होता तो तुम्हाला शिव्या का घालत होता. बेगम म्हणाल्या, त्या व्यक्तीला वाटते, मी मुस्लिम आहे, म्हणजे मी देशद्रोही आहे. आम्ही सगळे मुस्लिम समाजासाठी लागलेला कलंक आहोत. असे अनेक जण भेटतात दादा, शिवाजी महाराज यांच्यावर मक्तेदारी सांगणारे. आम्ही त्याच्या तोंडाला लागत नाही. आमच्या रक्तात महाराजांचे संस्कार आहेत.

बेगम निघाल्या आणि मीही निघालो. कुठे तो जगदंब जगदंब म्हणत दाखवण्यासाठी शिवभक्ती करणारा संताजी डहाके हा व्यक्ती आणि कुठे ही अडाणी ‘पानवाली बेगम’, जिच्या प्रत्येक श्वासात शिवभक्ती दिसत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींमधले अंतर मी मोजत होतो. बराच वेळ पुढे गेल्यावर मी माझा सारथी प्रकाश मोहिते याला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली. मी गाडीच्या खाली उतरलो, मागे वळून पाहिले तर, बेगम गर्दीमध्ये नाहीशा झाल्या होत्या. बेगम पानवालीच्या रूपाने मला अजिंक्यताऱ्यावर शिवाजी महाराज भेटले असं वाटत होतं. तसेच असे अनेक शिवाजी महाराज आम्हाला पावलोपावली भेटत असतात आणि ते कायम म्हणत असतात छत्रपतींच्या नावाचा वापर चांगुलपणासाठी करा, बरोबर ना....!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com