‘अंजान’यात्री

औरंगाबादमध्ये ऐश्वर्या शिंदे, मीरा ढास, अश्विनी मोरे, किशोर महाजन यांचा पाहुणचार घेऊन मी शिर्डीमार्गे नाशिकला निघालो.
Anjanabai Lonar
Anjanabai LonarSakal

औरंगाबादमध्ये ऐश्वर्या शिंदे, मीरा ढास, अश्विनी मोरे, किशोर महाजन यांचा पाहुणचार घेऊन मी शिर्डीमार्गे नाशिकला निघालो. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था खूपच वाईट होती. मी शिर्डीच्या बसस्थानकाजवळ आलो. मला फोन आला. मी गाडी कडेला थांबवली. फोनवर बोलत गाडीबाहेर आलो.

तेवढ्यात एक आजी माझ्या पुढं येऊन ‘बाबा, काही तरी दे ना,’ म्हणू लागल्या. हातात काठी, चेहऱ्यावर तकाकी, मुखातून ‘साईबाबा, साईबाबा’ असा जप...फोनवरचं माझं बोलणं संपायची वाट पाहत आजी तिथच घुटमळल्या. माझं बोलणं संपलं. आजींनी हात जोडून पुन्हा पैशासाठी हात पुढं केला. मी काही पैसे दिले. आजी आभार मानू लागल्या, तेवढ्यात एक अपंग व्यक्ती तिथं येऊन आजींना म्हणाली : ‘‘अहो माऊली, चला ना, सगळे जण जमले आहेत.’’

आजी बसस्थानकात मोकळ्या असलेल्या ठिकाणी लगबगीनं गेल्या व तिथं आधीपासूनच असलेल्या लोकांत जाऊन बसल्या.

पायी शिर्डी येतो साईनाथा

तुम्ही दर्शन द्यावे आता।।

तुमच्या नादानं मी पाहिली

पाहिली तुमची शिर्डी।।

पायी शिर्डी येतो साईनाथा

आजींचं भजन तल्लीनतेनं सुरू झालं. बसस्थानकात असणारे सर्व भिकारी आजींच्या अवतीभवती येऊन बसले होते. मीही आजींच्या अगदी शेजारी जाऊन बसलो. गाण्यांवर गाणी म्हटली जात होती. थोड्या वेळानं आजींची माझ्याकडे नजर गेली.

‘बाबा, तुम्ही असे खाली का बसलात?’’ आजींनी मला विचारलं आणि स्वतःच्या अंगावरची शाल काढत त्या म्हणाल्या : ‘‘हिच्यावर बसा.’’

आसपासचे सर्व भिकारी माझ्याकडे कौतुकानं पाहू लागले. दीडेक तासानं गाण्यांची, भजनांची मैफल संपली. तिथल्या तिथंच सगळ्यांची पांगापांग झाली आणि आपापल्याकडचं जे काही रुखंसुकं असेल ते काढून सगळे जण खाऊ लागले. काही जणांकडे काहीच नव्हतं. ज्यांच्याकडे होतं त्यांनी आपल्याकडचं अन्न त्यांना दिलं. अभावग्रस्त स्थितीतही त्या सगळ्या भिकाऱ्यांच्या चेहऱ्यार काय आनंद होता! ना कोरोनाची चिंता...ना पाऊसपाण्याची...ना महागाईची...ना सरकार काय करतंय याच्याशी त्यांना काही देणं-घेणं....पोटाला चार घास खाल्ल्यानंतर त्यांच्यातले काहीजण तिथंच लवंडले. झोपी गेले.

आजींनीही त्यांच्याकडचा भाकरतुकडा काढला आणि तो खाता खाता मला विचारलं :‘‘बाबा, तुम्ही जेवलात?’’

मी ‘होय’ म्हणालो. आजींचं जेवण झालं. तुम्ही कुठून आलात, कधीपासून इथं आहात...अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या.

मी ज्या आजींशी बोलत होतो त्यांचं नाव अंजनाबाई लहानू लोणार (८४४६६४६१५५). आजींचं गाव नाशिक जिल्ह्यातलं वणी. वय ६५. साईबाबांची भक्ती त्या लहानपणापासूनच करू लागल्या होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि आजवर व्यवस्थितपणे सुरू असलेलं असलेलं जगणं काळवंडून गेलं.

‘आपल्याला साईबाबाच बरे करतील,’ या श्रद्धेपोटी आजींनी शिर्डी गाठली. तिथंच राहू लागल्या. ज्या दिवशी मंदिराच्या समोर जेवण मिळत नाही त्या दिवशी कुणाकडं तरी मागून खायचं आणि रात्री शिर्डीच्या बसस्थानकात येऊन झोपायचं असा दिनक्रम. ‘कुठलाही इलाज करून घेता आजार आता पूर्णपणे बरा झाला आहे’ असं आजी मला वारंवार सांगत होत्या. ही आजींची श्रद्धा त्यांच्या मुखातून बोलत होती.

आजी म्हणाल्या : ‘‘गावी दोन दिवस गेले की पुन्हा अंग दुखायला लागतं; मग मी पुन्हा लगेच तिसऱ्या दिवशी शिर्डीची वाट धरते. सगळा आनंदीआनंद आहे. गोरख, भगवान, बाळासाहेब, मीराबाई, यमुना अशी पाच अपत्यं, जावई, सुना असं मोठं कुटुंब आहे माझं. सगळे माझ्यावर जिवापाड प्रेम करतात; पण माझं प्रेम साईबाबांवर आहे...’’

आजींशी गप्पा सुरू असतानाच गस्त घालणारे पोलिस येतात. एक पोलिस आजींच्या समोर येऊन चौकशी करू लागतो : ‘‘काय आजी, झालं का भजन? आज काही खायला होतं ना?’’

हात जोडून आजींनी होकारदर्शक मान हलवली व पुन्हा माझ्याकडे वळून मला विचारलं : ‘‘बाबा, तू साईबाबांचं दर्शन घेतलंस का?’’

मी म्हणालो : ‘‘नाही.’’

आजी म्हणाल्या : ‘‘कधी घेणार?’’

‘मी नास्तिक आहे,’’ मी म्हणालो. आजी एकदम प्रसन्न मुद्रेनं म्हणाल्या : ‘‘बाबा, जो आपला कामधंदा सोडून माझ्यासारख्या फाटक्या बाईशी चार चार तास बोलतो, त्याला मंदिरात जाण्याची गरज काय? बाबा, देव मानण्यावर आहे रे... मी मंदिरातल्या त्या साईबाबांच्या मूर्तीवर प्रेम करते. माझी श्रद्धा आहे. साईंविषयी थोडी सबुरी ठेवली ना, तर जे पाहिजे ते मिळतंच, बाबा!’’

शिक्षणाबाबत आजी अडाणी होत्या; पण त्यांचं बोलणं एखाद्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखंच मला वाटलं.माझ्याशी गप्पा मारताना पतीच्या, नातवांच्या आठवणींनी आजी काहीशा हळव्या झाल्या.

‘साईबाबांच्या मंदिरातले अनुभव तुम्ही मला सांगितलेत, तसे काही अनुभव बसस्थानकातलेही आहेत का?’’ मी आजींना विचारलं.

आजी म्हणाल्या : ‘‘बाबा, काय सांगू? बसस्थानक म्हणजे निवारा नसलेल्यांचं घर. परवा एक बाई नवऱ्याशी भांडून माहेरी निघाली. शेवटची बस हुकली. मुलांची आठवण येते म्हणून एकटीच रडत बसली होती. मी तिची समजूत काढली. माझं अंथरूण-पांघरूण तिला देत रात्रभर तिच्या भोवती पहारा देत बसले होते मी! सकाळी तिचा नवरा आला आणि तिला घेऊन गेला. राग आणि मीपणा चांगल्या आयुष्याचा सत्यानाश करतो...’’

आजी बोलता बोलता पुनःपुन्हा ‘संत अंजना’बाईंच्या भूमिकेमध्ये जात होत्या. बसस्थानकात शेवटच्या बसचा पुकारा सुरू होता...‘प्रवाशांनो लक्ष द्या. फलाट क्रमांक तीनवर लागलेली अकरा वाजून पाच मिनिटांची बस नगरला जाणारी शेवटची बस आहे.’ यात्री, अर्थात् प्रवासी, येत होते-जात होते. त्या शिर्डीच्या बसस्थानकाला ते ‘अंजान’ प्रवासी तसे नेहमीचे होते. ते ‘यात्री’ आपल्या ठराविक ठिकाणी जात होते. साईबाबांच्या भक्तीशी एकरूप झालेल्या अंजान आजींनी मात्र शिर्डीच्या त्या बसस्थानकाचं जणू ‘मातृत्व’च स्वीकारलं होतं! आई कुठंही जरी गेली तरी रात्री परत आपल्या बाळाकडेच येते, तसं आजींचं त्या बसस्थानकाशी नातं होतं...मला वाटून गेलं. मी माझा फोन पाहिला. अनेकांचे कॉल होते. सर्वात जास्त कॉल प्रा. सुरेश पुरी सरांचे होते.

‘नाशिकला पोहोचलो की फोन करतो,’’ असं मी त्यांना सांगितलं होतं. तसा मी सात वाजताच नाशिकला पोहोचणार होतो; पण आता साडेअकरा वाजले होते. मी माझ्या प्रवासाला निघालो...आजींनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. कडाकडा बोटं मोडली. ‘‘ये रे बाबा, पुन्हा मला भेटायला,’’ म्हणत आजी भावुक झाल्या.

‘थांब बाबा,’’ म्हणत मीच दिलेले पैसे आजींनी माझ्या हातावर ठेवले आणि म्हणाल्या : ‘‘तू हे पैसे घेतलेच पाहिजेस. माझ्या नातवाला, म्हणजे तुझ्या मुलाला, या पैशांचा खाऊ घेऊन जा...’’

आजींनी मला ‘हो-नाही’ म्हणूच दिलं नाही.

मी ते पैसे चुपचाप स्वीकारले. एकीकडे हृदयापासूनची भक्ती आणि दुसरीकडे मनस्वी जीव लावणं, अशी त्या आजींची ओळख त्या सर्वात आनंदी, मनानं श्रीमंत असणाऱ्या तिथल्या त्या भिकारी-समुदायाला असावी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com