जबाबदारीचं ओझं

आम्ही रात्री मुंबईमधली काम आटोपली आणि जेवणाचा बेत केला. काळा घोडा इथं अनेक हॉटेल होती. त्या हॉटेलची खासियत होती... रस्त्यावर उभे राहत, गाडीवर ताट ठेवून जेवायचं.
Burden of responsibility
Burden of responsibilitysakal

आम्ही रात्री मुंबईमधली काम आटोपली आणि जेवणाचा बेत केला. काळा घोडा इथं अनेक हॉटेल होती. त्या हॉटेलची खासियत होती... रस्त्यावर उभे राहत, गाडीवर ताट ठेवून जेवायचं. माझा सहकारी भीमेशनी ऑर्डर दिली आणि संजूभाई कधी ऑर्डर येईल याची वाट पाहत होते. माझे फोन सुरू होते. जेवणाचा घास घेणार इतक्यात एक मुलगा आला आणि भीमेशला म्हणाला, काका, हे स्टिकर घ्या ना, तुमच्या मुलाला कामाला येतील. भीमेशनं माझ्याकडं पाहिलं.

खिशामध्ये हात घातला आणि त्या मुलाला पैसे दिले. ते पैसे त्या मुलांनी खिशात टाकले. त्या मुलाच्या हातामध्ये असलेलं शाळेला मदत करण्याचं आवाहनपर पत्र त्यांनी आमच्या समोर ठेवलं. तो मुलगा म्हणाला, आमच्या शाळेला मदतीची गरज आहे. शाळेची माहिती असलेलं एक पत्रक त्या मुलांनी आमच्या हातावर ठेवलं. तो मुलगा कोण, तो काय शिकतो. त्याच्या शाळेसाठी त्याला का मदत हवी असं वाटतं, रात्री अकरा वाजले तरी तो अजून स्टिकर विकण्याचं काम का करतो, आज दिवसभरात त्याला किती पैसे मिळाले अशा अनेक प्रश्नांचा गुंता उलगडत आमच्या गप्पा रंगल्या.

तो मुलगा आत्मविश्वासानं बोलत होता. अवघा सहावीतला मुलगा, त्याचं वय किती आणि त्याला समज केवढी. तो मुलगा, त्याची शिक्षणाबद्दलची आस्था, परिस्थितीची जाणीव असलेल्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारा होता. तो त्याचे अनुभव आम्हाला सांगत होता. मी म्हणालो, हे शाळेच्या मदतीचं काय ? तो म्हणाला, आमच्या शाळेची फार वाईट अवस्था आहे. ही शाळा महानगरपालिकेची आहे. आम्ही काही मुलांनी ठरवलं, की आपण आपल्या शाळेसाठी काही करू.

आम्ही दर महिन्याला थोडे पैसे शाळेला मिळवून देतो. आमच्या पैशातून शाळेत हळूहळू बदल होत आहेत. त्याचे बोलणे एकूण आमच्या भुवया उंच झाल्या. आमचं जेवण झालं आणि आम्ही घरी निघालो. तो मुलगाही घरी निघाला. मी गाडी घेतली, आता पुढं जाणार तितक्यात जेवताना जो मुलगा भेटला होता, तो मुलगा पाठीवर एका चिमुकलीला घेऊन जाताना मला दिसला. मी त्याला म्हणालो, अरे तू ? ही मुलगी कोण आहे ? चल, मी सोडतो तुला. तो माझ्या गाडीत बसला.

रस्त्याने जाताना त्या मुलीने एका आइस्क्रीमच्या दुकानाकडे भावाला बोट केले. तो नाही म्हणाला. ती गप्प बसली. मी गाडी बाजूला घेतली आणि आइस्क्रीम खाण्यासाठी गेलो. आइस्क्रीम घेतले. मी त्याला विचारलं, तुम्ही आइस्क्रीमसाठी इकडे नेहमी येता का ? तो मुलगा म्हणाला, रोज नाही. महिन्यातून एक वेळा बाबा आम्हाला या आइस्क्रीमच्या दुकानावर आइस्क्रीम खाण्यासाठी घेऊन येतात. माझ्या बहिणीला आइस्क्रीम खूप आवडते. त्या मुलांची माहिती अगोदर मी विचारलीच होती. आता त्याच्या बोलण्यामध्ये सखोल माहिती मिळत होती.

कोरोना महासाथीमुळं अनेकांना वाईट दिवस आणले. त्याचेच उदाहरण हा मुलगा आणि त्याची बहीण होती. मी ज्या मुलाशी बोलत होतो, त्याचं नाव सारंग वाडकर. त्याची बहीण गीतांजली पहिलीला आहे. सारंगचे वडील सोमेश कोरोना महासाथीच्या पूर्वी पुण्यात एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सारंगची आई गीतांजली पुण्यातल्या वाकड भागामध्येच लहान मुलांचा क्लास घ्यायची. कोरोनाच्या काळात क्लासही बंद झाला आणि हॉटेलही. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.

मुंबईतल्या कुलाबा भागामध्ये सारंगचे मामा राहतात. मामाच्या छोट्याशा घरामध्ये सारंग त्याचे आई-वडील-बहीण असे चौघे जण राहतात. सारंगचे वडील दिवसभर पार्किंगमध्ये वाहन सांभाळायचं काम करतात. अनेक वेळा त्यांना रात्रपाळी करावे लागते. त्या माध्यमातून कुटुंबाच्या वाढलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यातून चार पैशांची मदत होते. सारंगची आई दिवसभर कुलाबाच्या सिग्नलवर गजरा विकण्याचे काम करते.

आई आणि वडील या दोघांचेही आर्थिक गणित अनेक वेळा चुकते. त्याचा परिणाम कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होतो. म्हणून सारंगही त्याची शाळा दुपारपर्यंत संपली, की आपल्या बहिणीला सांभाळत, रात्री उशिरापर्यंत स्टिकर विकण्याचे काम करतो. मी सारंगला म्हणालो, आमच्याशी तू जेव्हा भेटला तेव्हा तुझी बहीण सोबत नव्हती. तिला कुठे सोडलं होतं? सारंग म्हणाला, तिथेच कोपऱ्यावर शिवाजी इस्त्रीवाला काका आहे. तिथेच मी बहिणीला रोज ठेवतो.

तिला एक अभ्यास करायला दिला, की ती चारपाच तास एका जाग्यावर बसून अभ्यास करते. मी पुन्हा त्याला म्हणालो, स्टिकर विकून तुला दर दिवशी किती पैसे मिळतात? तो म्हणाला, तसं नक्की सांगता येत नाही. मी म्हणालो, तू बहिणीला बरोबर का ठेवत नाहीस? तो म्हणाला, लोकांना वाटतं मी लहान मुलगी दाखवून नाटक करतो म्हणून मी माझ्या बहिणीला सोबत ठेवत नाही.

कुलाब्यात सारंग जिथं राहतो, त्या झोपडपट्टीमध्ये आम्ही गेलो. बराच वेळ गेल्यावर सारंगच्या मामाचं घर आलं. दरवाजामध्ये हात घालून बाहेरूनच सारंगनी दरवाजा उघडला. आम्ही आतमध्ये गेलो. एकजण खाटेवर झोपलेलो होते. सारंग म्हणाला, हे माझे मामा. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळं ते गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणावरच आहेत. सारंगनं मी कोण आहे, मी कुठं भेटलो, त्याला घरापर्यंत कसं आणून सोडलं, हे सगळं सांगितलं.

सारंगच्या मामाला काहीही बोलता येत नव्हतं. आम्ही बोलत असताना एक महिला आतमध्ये आली, मला वाटलं सारंगची आई असेल. पण ती सारंगची मामी होती. माझ्याकडे बघत ती मामी म्हणाली, आता हे कोण? सारंग म्हणाला, हे साहेब आहेत, आम्हाला घरी सोडायला आलेत. माझ्या लक्षात आलं, सारंगची मामी सारंगला टोचून बोलत होती.

मी त्या घरावरून नजर फिरवली. ते घर कसलं जनावराच्या गोठ्यासारखी त्याची अवस्था होती. आजूबाजूला वाहणाऱ्या नाल्या, घरात कोपऱ्यामध्ये असलेला संडास, सगळीकडून फिरणाऱ्या माशा. ते बहीण भाऊ माझ्याशी बोलताना त्यांचा अभ्यास गिरवत होते. सारंग म्हणाला, आई आणि बाबा दोघे जण येऊन रात्री किती उशीर झाला तरी आमचा अभ्यास घेतात. ज्या दिवशी आम्ही अभ्यास केला नाही, त्या दिवशी ते जेवतही नाहीत. त्या दोघांच्याही मी वह्या पाहत होतो. सुंदर अक्षर, सगळा अभ्यास करून ठेवलेला. दोनतीन फाटकी तुटकी पुस्तकं. तीही त्या दोघांनाही पाठ होती.

मनपाच्या शाळेत शिकत झोपडपट्टीमध्ये राहणारा, एखादा सारंग स्वतःच कुटुंबाचं ओझे आपल्या पाठीवर घेऊन फिरतो. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला आपली जबाबदारी काय आहे, आपण ती पूर्ण केली पाहिजे हे माहिती असते, आहे ना कमाल.

मी निघताना सारंगच्या बहिणीनं माझा हात पकडला आणि म्हणाली, काका तुमच्या मुलासाठी माझ्याकडून हे स्टिकर. त्याला सांगा, हे स्टिकर मी त्याला भेट दिलं म्हणून. माझी आई मला रोज मला विचारते आज तू कोणाला मदत केली? आज मी माझ्या आईला नक्की सांगेन, मी काकांच्या मुलांसाठी काकाला एक स्टिकर दिलं. त्या चिमुकलीचं बोलणं ऐकून मी थक्क झालो.

मुलांवर संस्कार किती महत्त्वाचे असतात. मुलांमध्ये आत्मविश्वास कसा असला पाहिजे याचं ते दोघे बहीणभाऊ उदाहरण होते. मी त्या घरातून बाहेर पडलो आणि माझ्या घराच्या दिशेने निघालो. माझ्या मनात अनेक विचार येत होते. या मुलांना किती मोठं व्हायचं आहे. संस्कार असतील तर चमत्कार घडेल हेच मला सारंग, गीतांजलीकडून शिकायला मिळालं. बरोबर ना..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com