कधी येणार हे मरण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

माझा मित्र सचिन पाठक याचा त्यादिवशी रात्री फोन आला. म्हणाला, बाबा गेले, उद्या अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार आहेत. सचिनचा निरोप ऐकून माझ्या मनात धस्स झालं.

कधी येणार हे मरण!

माझा मित्र सचिन पाठक याचा त्यादिवशी रात्री फोन आला. म्हणाला, बाबा गेले, उद्या अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार आहेत. सचिनचा निरोप ऐकून माझ्या मनात धस्स झालं. सचिन माझा औरंगाबादमध्ये शिकायला असतानाचा मित्र. आम्ही दोघेजण त्या वेळी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय होतो. सचिनच्या अमरावतीमधल्या घरी माझं नेहमी येणं-जाणं असायचं. मी दुसऱ्या दिवशी अमरावतीला पोहोचलो. सचिनच्या कुटुंबीयांत रडून-रडून प्राण शिल्लक नव्हता. सगळं घर एकदम शांत होतं. मला पाहताक्षणी सर्वांनीच पुन्हा हंबरडा फोडला. मलाही त्या घरातले काकांसोबतचे सर्व जुने दिवस आठवले. घराबाहेर बसलेली शहाणीसुरती माणसं, ‘चला चला आता खूप उशीर झाला,’ म्हणून स्मशानभूमीत जाण्यासाठी गडबड करत होती. आम्ही निघालो. खूप जवळची माणसं त्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाली होती. सर्वांत समोर एक छोटा मुलगा पुंगी वाजवत होता; आणि त्याच मुलासोबत एक अत्यंत म्हातारी व्यक्ती डफडं वाजवत होती.

सगळी माणसं शांत होती, पण त्या डफडं आणि पुंगीचा आवाज मनाला सांगून जात होता, ‘‘बापा ज्या माणसानं आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवलं, त्या माणसाची अंतिम यात्रा कशी ‘प्रसन्न’ सुरांनी सजली पाहिजे.’’

अंत्यसंस्कार आटोपले. माणसं घराकडं निघाली. घरी गेल्यावर काही विधी असतात, म्हणून सचिन आणि त्याचं कुटुंब पुढे लवकर घरी गेलं, मी मागेच होतो. अमरावतीचे माझे मित्र संतोष देशमुख, अजय पाटील हे दोन्ही मित्र माझ्यासोबत होते. त्या स्मशानाच्या गेटवर तो डफडं वाजवणारा म्हातारा माणूस, घरी जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मालक पैसे द्या ना, असं म्हणत विनवणी करत होता. माझ्यासोबत असणारा देशमुख म्हणाला, ‘घरधनीच निघून गेला, आता बाकीची माणसं यांना पैसे देणार.’ बिचारा तो म्हातारा एका हाताने घाम पुसत होता आणि दुसऱ्या हाताने मला माझे पैसे द्या म्हणून विनंती करत होता. मी त्या व्यक्तीच्या समोर जाऊन उभा राहत त्या व्यक्तीला म्हणालो, ‘किती झाले तुमचे पैसे?’ त्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत असणारा छोटासा मुलगा म्हणाला, ‘साहेब, अशा वेळी इतकेच पैसे द्या, म्हणून कोणी पैसे मागतं का? जे द्यायचं ते द्या.’ एवढ्याशा पोराला एवढी अक्कल कशी काय आली असेल, असं माझं मलाच वाटत होतं. मी खिशामध्ये हात घातला, दोघांच्याही हातावर पैसे ठेवले. दोघांचेही चेहरे एकदम फुलले. पैसे घेऊन ते दोघे गेले. म्हणतात ना, माणूस मेल्यावर त्याची किंमत कळते, तसंच झालं काकांसोबत. सचिन स्मशानभूमीकडे येतानाच मला सांगत होता, ‘बाबाला वाटलं, मला तिन्ही मुली झाल्यात, अजून एखादा मुलगा होऊ द्यावा. मला त्यांचं ऐकायचं होतं; पण बायको ऐकेना. अमरावतीमध्ये असणारी माझी नोकरीही तिने मला सोडायला लावली. घरी रोज वाद होऊ लागले. म्हणून मी पुण्याला गेलो होतो. चारच महिने झाले होते.

बाबाला छातीत दुखायला लागलं म्हणून तीन दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केलं. आम्ही पोहोचलो, सगळेजण भेटलो. मुलींसोबत हसत हसत बापाने जीव सोडला. आई म्हणत होती, मुलींची आठवण काढतच बाप सगळा खंगून गेला होता.’

माझ्या मनात प्रश्न येत होता, कशाला मुलं शिकवून मोठी करायची? ज्या काळात म्हाताऱ्या आई-वडिलांना कुणाची तरी गरज असते, त्या काळात तुम्ही त्यांना सोडून द्यावं म्हणून काय? माझ्या मनात सारखे तेच तेच विचार येत होते. दोन्ही मित्रांसह मी घराकडे जायला निघालो. काही अंतर गाडीने गेल्यावर तो म्हातारा माणूस आणि तो मुलगा पायी-पायी आपल्या घरी जात असल्याचं दिसलं. मी त्यांच्या जवळ येऊन गाडी थांबवली. मी गाडीतून ओरडलो, ‘‘पायी का चाललात, कुठं राहता, रिक्षाने जा ना, अजून पैसे देऊ का?’ पोरगा म्हणाला, ‘अण्णा भाऊ साठे समाजमंदिर आहे ना, त्याच्या बाजूच्या गल्लीत आम्ही राहतो.’ त्या दोघांना घेऊन आम्ही निघालो. मी त्या आजोबांना विचारलं, ‘तुमचं नाव काय?’ ते म्हणाले, ‘जळबाजी ताडेराव.’ ते आजोबा एकदम शांत होते. शेवटी माझ्या प्रश्नांची सरबत्ती ऐकल्यावर तो मुलगा मला हळू आवाजात म्हणाला, ‘आजोबांची पत्नी घरी आजारी असते.’ मी पुन्हा म्हणालो, ‘काय झालं आजोबा?’ भानावर येऊन ते म्हणाले, ‘काही नाही पिकलं पान आहे, गळून पडावं असं वाटतं, पण पडतच नाही. बघा ना! ज्याला न्यायचं नाही, त्याला देव नेतो. तिच्या मनात सतत काळजी असते. त्या काळजीच्या पोटी ती ‘मला कधी मरण येणार’ असं म्हणत असते.’’

देशमुख त्या मुलाला म्हणाले, ‘काय रे बेटा, शाळेत जातो का?

तो म्हणाला, ‘नाही.’ ते आजोबा मध्येच म्हणाले, ‘त्याचा बाप त्याला म्हणतो, तू जन्मलास आणि तुझ्या माईला गिळून बसलास. आता शिकून काय मास्तरला गिळतोस का? एक बाई आणून ठेवली घरी, पाण्याऐवजी दारू पिणारा याचा बाप माणसाची औलाद आहे काय?’’ आजोबा एकदम चिडले. त्यांचं घर आलं. आजोबा खाली उतरले. आम्हीही खाली उतरलो.

मी म्हणालो, ‘चला, आजीला भेटू.’ मी आजोबांच्या पुढे निघालो. आमच्या पायांचा आवाज ऐकताच त्या आजींनी आवाज दिला. ‘आले का डॉक्टर?’ आम्ही कुणीच काही बोललो नाही. आजी पुन्हा म्हणाली, ‘डॉक्टर, मला जगण्यासाठी औषध नका देऊ, मरण्यासाठी औषध द्या, खूप अंगाची आग होते.’’ आजोबा एकदम म्हणाले, ‘साहेब आलेत, डॉक्टर नाहीत.’ आजी एकदम शांत झाली.

आजीच्या दोन्ही डोळ्यांना काही दिसेना. अंगात लकवा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. काळजीने खोल गेलेले डोळे. दोन माणसं बसतील एवढं जेमतेम घर. घराच्या बाहेर तुंबलेली नाली. समोर एक खाटीक बोकड कापत बसला होता. एक बाई आजीला जेवायला घेऊन आली. मी आजीशी बोलत होतो, ‘किती मुलं-मुली आहेत, तुम्हाला काय आजार झालाय?’ आजी-आजोबा दोघंही एकदम शांत. ती जेवण घेऊन आलेली बाईच म्हणाली, ‘दोन मुलं आहेत - एक चंद्रपूरला असतो, एक सांगलीला. दोघंही शिक्षक आहेत.’ माझ्या पोटामध्ये एकदम संतापाचा गोळा आला. मी पुन्हा त्या बाईला म्हणालो, ‘कधी भेटायला येतात का मुलं?’

आजोबांकडं पाहत ती बाई एकदम शांत बसली. थोड्या वेळाने ती बाई पुन्हा म्हणाली, ‘‘कशाला ते येतात इथं... आता पंख फुटलेत त्यांना.’ त्या बाईचं बोलणं ऐकताच आजी एकदम चिडली. ‘चूप बस केरसुने, माझ्या पोरांची बदनामी करू नकोस.’’ आजोबा आजीवर एकदम चिडले. म्हणाले, ‘आली मोठी पोरांच्या काळजीची. तोंड बघायला तरी येतात का पोरं? पोरं बघायला येत नाहीत म्हणून तर मरण मागतेस!’

आजी एकदम शांत झाली. आमच्या बोलण्यामध्ये आणि गप्पांमध्ये आजी-आजोबा अधून-मधून रडत होते. काय परिस्थिती आहे बघा, ज्यांच्याकडे आहे त्याला किंमत नाही आणि ज्यांच्याकडे नाही, त्याला वाटतं हे कसं झालं. सचिन आणि हे आजी-आजोबा यांच्याविषयी मी विचार करत होतो. सचिनचे वडील सचिनला सोडून गेले. आता त्याचं सचिनला खूप वाईट वाटत होतं. तो पुंगी वाजवणारा पोरगा, त्याची आई बिचारी त्याला लहानपणी सोडून गेली. त्याला आता सावत्र आईमुळे आपल्या आईची किंमत कळते. या आजीची दोन्ही मुलं उच्चशिक्षित, चांगल्या नोकरीला आहेत. जिवंतपणी आजीला आपल्या नातवांचं, मुलांचं तोंड पाहायला तरसावं लागतं, त्या यातनेतून देवाला मरण मागावं लागतं. काय परिस्थिती होती, बाप रे!!

सचिनचे वडील जाण्याने मी जेवढा दुःखी होतो, त्यापेक्षा जास्त दुःखी मी या म्हाताऱ्या आई-वडिलांच्या यातना पाहून झालो. आयुष्यभर मयत आणि लग्नांमध्ये डफडं वाजून डफड्याचं आणि बापाच्या हाताचं कातडं दोन्ही अगदी सोलून निघालेत. बापाने मुलांना शिकवलं आणि मुलांनी बापालाच आपल्या वर्तणुकीतून सुनावलं, की तुम्ही आम्हाला का शिकवलं? एकीकडे मरण मागणारी आई ‘कधी येणार रे देवा मला मरण’, म्हणून देवाकडे विनंती करते, तर दुसरीकडे त्याच आजोबांसोबत तो पुंगी वाजवणारा मुलगा ‘माझ्या आईला का नेलं रे देवा’ असं म्हणतो.

आम्ही जड पावलांनी तिथून निघालो. खिशामध्ये हात घातला आणि आजी-आजोबांच्या हातावर काही पैसे ठेवले. कोणाला दोष द्यायचा? परिस्थितीला की या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या दैवाला? किती कठीण आहे ना... दुसऱ्याच्या आयुष्यात वाजंत्री वाजवून आनंद देणाऱ्यांच्या जगण्याला असा उदासपणाचा सूर लागत असेल तर?

Web Title: Sandip Kale Writes Death Funeral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..