गुरुजींना पेन्शनचं टेन्शन..!

मी विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली भागात आलो. सांगलीमध्येही मराठवाडा, विदर्भासारख्या झळा कायम होत्या. सांगली जिल्ह्यातल्या ‘आटपाडी’ या ठिकाणी एक कार्यक्रम होता.
Teacher Agitation for Pension
Teacher Agitation for Pensionsakal

मी विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली भागात आलो. सांगलीमध्येही मराठवाडा, विदर्भासारख्या झळा कायम होत्या. सांगली जिल्ह्यातल्या ‘आटपाडी’ या ठिकाणी एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटोपून मी आणि माझा मित्र संजीव शिंदे आम्ही दोघेजण संजीवच्या आजारी असलेल्या आत्याला भेटायला ‘झरेगाव’ या ठिकाणी गेलो. छोटंसं पत्र्याचं घर, प्रचंड उकडायला लागलं. आजारी आत्याला इतर कोणी नातेवाईक नाहीत. तिची थोडीशी शेती व बाकी सगळा व्यवहार संजीवच पाहतो.

आत्याच्या शेतासंदर्भातला काही व्यवहार सुरू होता. थोडा वेळ लागणार असं दिसत होतं. त्या जुन्या गावात जरा फेरफटका मारावा म्हणून मी निघालो. प्रचंड उन्हाच्या रखरखीमध्ये त्या गावात बांधकाम सुरू होतं. बांधकामावरचा ठेकेदार काम करणाऱ्या माणसाला जोरजोराने ओरडत होता, ‘‘तुम्हाला होत नाही तर कामाला येता कशाला?’’ मी पाहत होतो. एक कामगार बिचारा काम करीत होता; पण त्याला काम होत नव्हतं. थोड्या वेळाने सगळेजण भाकरी खायला एका झाडाखाली गेले; पण तो शिव्या खाणारा माणूस बिचारा तिथंच सिमेंटमध्ये भिजलेले पाय घेऊन तसाच उभा होता.

मी त्या व्यक्तीच्या जवळ गेलो आणि म्हणालो, ‘का हो काका, तुम्हाला जेवायचं नाही का?’ तो म्हणाला ‘नाही.’ पलीकडे बसलेल्या एका माणसाने त्या व्यक्तीला आवाज दिला, ‘‘अहो, वाघमारे सर, या! आजही तुमचा डबा येणार नाही असं दिसतंय. आमच्यामधलं थोडंसं खाऊन घ्या.’ सर म्हणाल्या म्हणाल्या माझे कान एकदम टवकारले. मी त्या माणसाला म्हणालो, ‘‘तुम्ही शिक्षक आहात काय?’’ ती व्यक्ती काही बोलायच्या आतच मी पुन्हा म्हणालो, ‘‘चांगलं आहे. नाहीतरी हल्ली शिक्षकांकडून सेवा देण्यात बोंब असते.’’ माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच समोरच्या व्यक्तीला संताप आला. तो म्हणाला, ‘‘असं काही नाही हो, शिक्षकांना बदनाम करण्याचे हे उद्योग आहेत.’’

मी बाजूला असलेल्या झाडाखाली फोनवर बोलत बसलो. सर्वजण गप्पा करत जेवत होते. माझ्याशी जो माणूस बोलत होता, त्याने आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं. आज त्याच शिक्षकाच्या घरी एकवेळ जेवायची व्यवस्था नाही, असं त्या चर्चेमधून मला ऐकायला मिळत होतं. मी काही न बोलताच थेट त्या माणसांमध्ये जवळ जाऊन बसलो. मी स्वतःच माझी ओळख करून दिली. मी मुंबईचा आहे, असं सांगितल्यानंतर माझ्याशी बोलणारे ते शिक्षक म्हणाले, ‘‘मी कालच मुंबईहून आलो.

आझाद मैदानावर आमचं उपोषण सुरू आहे. माझ्या घरी उद्या खाण्याची काही व्यवस्था नाही. म्हणून मी परत आलो.’ आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्या शिक्षकाचा एकूण प्रवास, त्यांची शासनाच्या जाचक अटींमुळे अडकलेली पेन्शन, त्यांच्यासारखाच अठ्ठावीस हजार शिक्षकांवर आयुष्य जगायचं की मरायचं, हा निर्माण झालेला प्रश्न... असे अनेक विषय आमच्या चर्चेत होते. आमचं बोलणं सुरू असताना बाकी कामगार आमच्या तोंडाकडे पाहत होते.

माझ्याशी बोलत असलेल्या त्या शिक्षकांचं नाव सूर्यकांत पांडुरंग वाघमारे (९५०३८८६२९३). गरिबीतून शिकून कष्टाने त्यांनी डीएड केलं. माध्यमिक अण्णासाहेब विद्यामंदिर (तिचंगी, ता. पंढरपूर) इथं सहशिक्षक म्हणून ते रुजू झाले. तिचंगी इथून वाघमारे यांची जानूबाई विद्यालय (विरळी, ता. माण) इथं बदली झाली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे वाघमारे हे सेवानिवृत्त झाले. वाघमारे सर यांनी त्यांच्या कार्यकाळात दोन्ही शाळांमध्ये जे विद्यार्थी घडवले, ते आज देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करीत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर वाघमारे यांनी पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केला. वाघमारे यांना शासनाकडून निरोप आला की, तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाहीत. २०१० ला शासनाने काढलेल्या जीआरनुसार ज्या शिक्षकाला २००५ पूर्वी शंभर टक्के पगार नव्हता, ते शिक्षक पेन्शनसाठी पात्र राहणार नाहीत आणि तुम्हालाही शंभर टक्के पगार नव्हता.

वाघमारे म्हणाले, राज्यातल्या अठ्ठावीस हजार शिक्षकांची माझ्यासारखीच परिस्थिती आहे. त्यांतले काही सेवानिवृत्त झालेत, काही सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. जेव्हापासून हा जीआर निघाला, तेव्हापासून आंदोलनं, पायी दिंडी, उपोषणं, विनंत्या, मंत्रालयासमोर आंदोलन हे सातत्याने सुरू आहे, तरीही सरकार आमच्या सगळ्या शिक्षकांची परीक्षा घेतं.’’ मी म्हणालो, ‘‘अठ्ठावीस हजार शिक्षकांना पेन्शन दिली तर सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार आणि सरकार सरकार म्हणजे कोण, तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या करामधून हा पैसा जमा होतो.’

वाघमारे म्हणाले, ‘‘नाही नाही, असं काही नाही. आमचा महाराष्ट्र जुनी पेन्शन समन्वय संघ आहे, त्याचं नेतृत्व करणारे दत्तात्रेय सावंत, समाधान घाडगे (९९२२५४४९२६) आहेत. मी त्यांचं आणि तुमचं बोलणं करून देतो.’’ असे म्हणत वाघमारे यांनी घाडगे यांना फोन लावला. घाडगे आणि माझं बराच वेळ बोलणं झाले. तो तिजोरीवर भार पडणारा प्रश्न मी घाडगे यांना विचारला, तेव्हा घाडगे म्हणाले, ‘‘अहो, एक शिक्षक सेवानिवृत्त झाला. अर्धा पगार त्याला पेन्शन म्हणून मिळेल असं आपण गृहीत धरू.

दुसरा त्याच्या बदल्यात जो कोणी शिक्षक भरती केला जाणार, त्याला सुरुवातीला वीस हजारांच्या आत पगार दिला जाईल. शासनाने सगळ्यांची पेन्शन सुरू केली, तरी शासनाच्या तिजोरीवर भार पडणार नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, बाकी काही नाही. आजही आमचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे. आमच्याशी बोलायला कोणी तयार नाही. कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केली. कुटुंबंच्या कुटुंबं उद्‍ध्वस्त झालीत, तरी सरकारला जाग येत नाही.’’ तिकडून घाडगे सर फोनवर अत्यंत तळमळीने माझ्याशी बोलत होते.

आमचं बोलणं सुरू असताना, तो काम करणारा ठेकेदार मागे येऊन थांबला. आमचं सगळं बोलणं त्याने ऐकलं. ‘त्या’ शिक्षकासमोर हात जोडत तो म्हणाला; ‘‘सर, मला माफ करा. मला माहिती नव्हतं की तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही सांगायचं तरी मला. मी कामावरून तुम्हाला खूप बोललो. आता ऊन खूप झालं आहे. तुम्ही सगळेजण घरी जा आणि उद्या लवकर कामाला लागा,’’ असं सांगत तो ठेकेदार तिथून निघून गेला.

वाघमारे फाटकं शर्ट घालत आपल्या घराकडे जाऊ लागले. मी वाघमारे यांच्यासोबत बोलत बोलत निघालो. ‘‘दर दिवशी किती हजेरी मिळते तुम्हाला?’’ वाघमारे म्हणाले, ‘‘दीडशे रुपये.’’ वाघमारे यांना मला घरी न्यायचं नव्हतं. घरातलं दारिद्र्य कसं दाखवावं असं त्यांना वाटत असेल; पण मी बोलत बोलत त्यांच्या घरी गेलो. वाघमारे यांना पाहून त्यांची आई यशोदा पांडुरंग वाघमारे यांना एकदम धक्का बसला.

पोरगा काम न करताच घरी कसा काय आला, आता संध्याकाळची चूल पेटणार कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असावा. वाघमारे यांच्या मुलाला घरी पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, ‘‘हा माझा मुलगा आदर्श, गेल्या अनेक दिवसांपासून मित्रांसोबत कामाला पुण्याला जातो म्हणून गेला होता, तो आज परत आलाय.’’ मुलीची ओळख करून देताना सर म्हणाले, ‘‘ही माझी मुलगी श्रेया, दहावीला आहे.’’

वाघमारे म्हणाले, ‘‘आम्हा अडचणीत असणाऱ्या सगळ्या शिक्षकांचा सरकारप्रती कमालीचा रोष आहे. असं वाटतं, मंत्रालयाच्या समोर सगळं कुटुंब घेऊन जाऊन आत्महत्या करावी, पेटवून घ्यावं. पुन्हा वाटतं, शाळेत मीच मुलांना शिकवलं की, खचून जायचं नाही, रडायचं नाही, लढत राहायचं.’’ प्रचंड होत असलेले हाल, त्रास, आजार, निराशा सांगत वाघमारे रडत होते. त्यांची मुलगी, आई त्यांची समजूत काढत होत्या.

वाघमारे यांच्या आईला नीट बोलता येत नव्हतं, तरी त्या खोकत-खोकत बोलत होत्या. ‘‘काय माय हे सोंगाड्या सरकार. कुठं फेडेल हे पाप. पैसे नसल्यामुळे माझा नातू आदर्शचं शिक्षण सुटलं, माझ्या बाबूला नाना प्रकारचे आजार झाले. तो कामाला गेल्याशिवाय घरी चूल पेटत नाही.’’ एक नाही तर अनेक प्रकारच्या व्यथा वाघमारे यांच्या आई सांगत होत्या. या विषयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या अनेकांशी वाघमारे सर यांनी माझं बोलणं करून दिलं.

प्रत्येकाचे विषय वेगवेगळे होते; पण संबंध एकाच विषयाशी येऊन ठेपला होता, तो म्हणजे पेन्शन मिळत नाही. मी फोनवर ज्यांच्याशी बोलत होतो, ते सुनील भोर (९४२२९१७३०७) गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शन विषयाला घेऊन लढतात. ते स्वतः शिक्षक आहेत. ‘‘हा विषय कायद्याच्या चौकटीत गेला. बारा केसेस कोर्टात सुरू आहेत. दिल्लीला सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं; पण अजून काही झालं नाही. कित्येक जण लढून लढून मरण पावले, कित्येकांची कुटुंबं रस्त्यावर आली; पण पेन्शनसारखा लाभ या गरजूंना मिळालाच नाही.’

भोर अजून सांगत होते, ‘‘राज्य सरकारचा एकही विभाग असा नाही की, ज्यांचं सेवानिवृत्तीनंतर पेन्शन थकवलं, अपवाद शिक्षक वगळता. आम्ही उपोषणावर उपोषण करतोय, उपोषणाच्या ठिकाणी अनेकांना हार्ट अटॅक आलेले आहेत, तरी सरकार गांभीर्याने घेत नाही.’’ भोर सर यांचा प्रत्येक विषय अतिशय गंभीर होता. मी फोन ठेवला आणि संजीवकडे पाहिलं. आपल्याला निघायचं आहे, असं तो सांगत होता.

माझे गुरू प्रा. राजाराम वट्टमवार सर मला भेटल्यावर प्रत्येक वेळी सांगतात, की पेन्शन नसती, तर आम्हा म्हाताऱ्या माणसांचा कोणी सांभाळच केला नसता. पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी आहे. मला ते एकदम आठवलं. राज्यामधल्या ‘गुरुजींच्या पेन्शनचं टेन्शन’ फार गंभीर होऊन बसलं, हे वाघमारे, घाडगे, भोर यांच्याशी बोलून, ती कागदपत्रं पाहून माझ्या लक्षात आलं. आता ते सरकारच्या लक्षात कधी येईल, काय माहिती !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com