शकीरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शकीरा
शकीरा

शकीरा

त्या दिवशी सुनीता नागरे यांचा मला फोन आला. त्या म्हणाल्या, ‘उद्या पुण्यामध्ये भाऊबिजेच्या एका कार्यक्रमासाठी तुरुंगात जायचे आहे, मी तुम्हाला मागेच सांगितलं होते.’

मला आठवले. सुनीता यांनी ‘अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थे’च्या माध्यमातून आदिवासी पाड्यावर जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. तुरुंगामधील कैदी, पीडित महिला, अनाथ मुलांचे शिक्षण यासाठी सुनीता नागरे यांनी मोठे काम केले आहे. दरवर्षी सुनीता दिवाळीला तुरुंगामधील कैदी महिलांना घेऊन भाऊबीज साजरी करीत असतात. आम्ही दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या तुरुंगामध्ये गेलो. सुनीता नागरे (७९७७८६८६१८) यांच्यासोबत काही महिला स्वयंसेविकाही होत्या. प्रशासकीय पातळीवर भेटीबाबत अगोदरच ठरले होते. आतमध्ये गेल्यावर सुनीता यांना पाहून अनेक कैदी महिला हातातील काम सोडून सुनीता यांना भेटायला धावून आल्या. त्या भेटीवरून वाटत होते, सुनीता अनेक वेळा यापूर्वीही तिथे आल्या असणार. तुरुंगामधले अनेक अधिकारी आमच्यासोबत होते. या महिला इथं का आल्या, इथपासून ते त्यांच्यासोबत असणाऱ्या लहान लहान मुलांच्या भवितव्यापर्यंत आम्ही त्या महिला कैद्यांशी बोलत होतो. काय परिस्थिती होती बापरे ! छोट्या-छोट्या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या त्या सगळ्या जणी आयुष्याच्या एका काळकोठडीमध्ये बंद होत्या. अनेकींच्या बाबतीमध्ये चार-चार वर्षे झालेली गुन्हे घडून; पण अजून खटले सुरू झाले नाहीत.

काय म्हणायचे या व्यवस्थेला ! अनेक जणी अशा आहेत, त्यांची सुटका झाली आहे; पण जामिनासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अनेकजणी अशाही आहेत, ज्यांना बाहेर जाऊन गुन्हेगार- गुन्हेगार म्हणून समाजातून होणारी अवहेलना ऐकून घ्यायची नाही. सुनीता नागरे आणि त्या स्वयंसेविका भाऊबीजेच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागल्या. काही ठरावीक महिला कैदी मला ओवाळत होत्या. ओवाळताना अनेक महिलांचे अश्रू दिव्याच्या तेलामध्ये पडत होते. त्यातून तड-तड असा दिव्याचा आवाज येत होता. कुणाला भावाची आठवण येत होती, कुणाला घरच्यांची. ओवाळणी टाकताना मनामध्ये एक विचार येत होता, या महिलांना आपण काही तरी मदत केली पाहिजे. हीच त्यांना दिलेली भाऊबिजेची खरी भेट ठरेल. सासू-सुनेच्या वादातून दोन कुटुंबात पडलेली ठिणगी, हा विषय जवळजवळ सर्व महिलांचा होता.

रत्नागिरीच्या शकीरा शेख (मूळ नाव बदलले आहे) हिच्याशी मी बोललो. शकीरा हिच्यावर सासूला जाळून मारले, असा खुनाचा आरोप आहे. सासूला वाचवताना शकीराचा नवरा अनिमचा मृत्यू झाला. सकिना आणि सबिना या दोन्ही मुलीही भाजून निघाल्या. त्यामध्ये लहान सबिनाचे दवाखान्यात उपचार घेताना निधन झाले.

शकीराही भाजली होती. या गुन्ह्यात शकीरा अडकली. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शकीरा जेलमध्ये आली. शकीरा सांगत होती, ‘आम्ही भरलेल्या घरात सगळे जण आनंदात होतो. मी आणि माझा नवरा दोघेही उच्चशिक्षित. एका छोट्या कंपनीत नोकरी करत होतो. लग्नाच्या दोन नणंद घरामध्ये होत्या. तिसरीचे लग्न आम्हीच लावून दिलं होतं. छोट्या छोट्या कारणावरून सासूसोबत वाद खूप व्हायचे. त्या दिवशी भांडणात सासू आतमधल्या रूममध्ये गेली, तिने आतून दरवाजा लावला. रॉकेल अंगावर टाकून पेटवून घेतले. ती तर गेली; पण तिच्या एका काडीने आमच्या अनेकांचे आयुष्य होरपळून निघाले. नातेवाईकांसह सगळ्यांना वाटतं सासूला मीच जाळून मारले.’ माझ्याशी बोलताना ती हुंदके देत रडत होती.

सुनीता नागरे मला सांगत होत्या, ‘शकिराची केस तशी सोपी आहे. ज्यांनी ही केस टाकली, ते मागे घ्यायला तयार आहेत. त्यांना हे चुकीचे झाले, हे कळाले आहे. त्यामुळे तिची यातून काही दिवसांत का होईना, सुटका होऊ शकते.’ शकिरा लगेच म्हणाली, ‘दीदी, बाहर जाके क्या करू. मेरा तो सबकुछ सॉंसने लगाई हुई आग मे जल गया. बाहेर जाऊन रोज प्रत्येक क्षणाला मरण्यापेक्षा इथे जेलमध्ये बरं आहे ना. मी बाहेर गेल्यावर दोन कुटुंबं अजून एकमेकांची डोकी फोडून घेतील,’ असे म्हणत शकीरा सुनीता यांच्या खांद्यावर मान ठेवून रडत होती.

माझ्यासमोर एकदम ‘अकीरा’ चित्रपट आला. ‘अकीरा’ चित्रपटाची नायिका शेवटी म्हणते, मी समाजासाठी येशूसारखे स्वतःला खिळे मारून घेऊन स्वतःलाच लटकवले. इथे अशा नेक शकीरा होत्या ज्या अकीरा झाल्या होत्या. ज्यांनी सामाजिक स्वास्थ्यासाठी स्वतःला सुळावर चढवून घेतले. परळीची वैजंता जाधव अधिकारी होती. वैजंताची तीन वर्षापासून अजून केस सुरू झाली नाही. गुन्हा काय, तर सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

धुळ्याची जयश्री रानडे यांची शिक्षा संपली. काही पैसे भरण्याच्या कारणामुळे जामीन होऊनही तुरुंगामध्येच आहेत. बापरे ! प्रत्येकाची कहाणी थरकाप उडवणारी होती. अलीकडे तुरुंगामधील चित्र वेगळे झाले आहे. कैद्याला माणूस म्हणून इथे वागवले जात होते.

सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कारागृहात नियोजित सगळे ठरलेले असते. कारागृहाचे एक वरिष्ठ अधिकारी मला भेटले. त्यांना इतर कारागृहाचा चांगला अभ्यास होता. मी त्या अधिकाऱ्यांना विचारले, सुटका झाली आहे; पण थोडे-फार पैसे जमानतीसाठी नाहीत, अशांची संख्या किती असेल?

ते अधिकारी थोडे शांत होऊन म्हणाले, एक हजाराच्यावर असेल. मला एकदम धक्का बसला. माणुसकी शून्य झाली आहे असा हा विषय होता. आम्ही फिरून तिथलं वातावरण पाहत होतो. तिथे असणाऱ्या महिलांचे डोळे काहीतरी बोलत होते. आम्ही केलं ते निश्चितच चुकीचं आहे; पण आम्ही आता ते भोगले आणि दुसरं काही गुन्हा नसतानाही आम्हाला अडकवण्यात आले आहे.

मी बाहेर जाण्यासाठी निघालो, जातांना शकीराच्या मुलीला मी जवळ छातीशी घेतले. माझ्यासह अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आपण या सर्वांसाठी मिळून काही तरी करू, ही भावना मनामध्ये घेऊन मी तिथून निघालो. आम्ही बाहेर पडेपर्यंत अनेक महिला मोठ्या आशेने आमच्याकडे पाहत होत्या. तिथे असणाऱ्या परिस्थितीचा, दोष कुणाला द्यायचा. समाजव्यवस्थेला, व्यवस्थेला की अन्य कोणाला मला काही कळत नव्हते. सविता नागरेसारख्या अनेक जणी मदत करतात पण त्यांनाही आर्थिक अडचणीसह अनेक अडचणीला सामोरे जावे लागते, हे खरे होते.

या दिवाळीत भेटलेल्या त्या बहिणींचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. कारागृहात पडलेल्या हजारो बहिणी, भावांना तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. कराल ना तुम्ही मदत.

loading image
go to top