ज्ञान आणि माणुसकीचा धर्म !

औरंगाबादमधून मी लातूरला निघालो होतो. परळीमध्ये माझे मित्र अभिजित देशमुख यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन पुढं निघालो.
SB Kale and Acharya Satyendra
SB Kale and Acharya SatyendraSakal
Summary

औरंगाबादमधून मी लातूरला निघालो होतो. परळीमध्ये माझे मित्र अभिजित देशमुख यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन पुढं निघालो.

औरंगाबादमधून मी लातूरला निघालो होतो. परळीमध्ये माझे मित्र अभिजित देशमुख यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन पुढं निघालो. परळीच्या त्या रस्त्यानं पुढं जाताना रामनगर भागात थोडे पाय मोकळे करायला मी गाडीच्याखाली उतरलो. ऐन उन्हाच्या वेळेला जोरजोराने हंबरणाऱ्या गाईंचा आवाज कानावर पडला. एखादी गाय ओरडणं ठीक आहे; पण एवढ्या सर्व गाई एकाच वेळी का ओरडतात, असा प्रश्न मला पडला. रस्त्याच्या कडेला एका उंच जागेवर एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या शेजारी एक गोशाला होती. मी थोडं वर गेलो. पाहतो तर काय, अनेक छोटी-छोटी मुलं मंत्र आणि वेदांचा अभ्यास करीत होती. बाजूला एक यज्ञही सुरू होता. बाहेर एक बोर्ड लावलेला होता. त्यावर लिहिलं होतं, ‘स्वामी श्रद्धानंद गुरुकुल, परळी-वैजनाथ.’ १९९६ ला हे गुरुकुल स्थापन झालं, अशीही नोंद त्या बोर्डवर होती.

मी त्या गुरुकुलाच्या दिशेने निघालो. यज्ञाच्या बाजूला बसून अनेक लहान-लहान मुलं मंत्रोच्चार करीत होती. मी तिथं जाऊन थांबलो, तरी माझ्याकडं कुणाचं लक्ष जाईना. यज्ञ होईपर्यंत आपण एक फेरफटका मारून यावा, या हेतूने मी पुढं निघालो. जवळपास शंभर साधू झाडाला पाणी घालत होते. मी त्या साधूंच्या पाया पडलो, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यातून मी सर्व जुन्या रूढी-परंपरा ऐकत होतो.

मी ज्या आजोबांशी बोलत होतो, त्यांचं पूर्वीचं नाव विठ्ठलराव घुनर गुरुजी, आताचं नाव आर्य मुनीजी. घुनर हे शिक्षक होते. सेवानिवृत्तीनंतर गुरुजींनी वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश करीत पूर्णवेळ याच आश्रमामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गुरुजींसारखे अनेक आजोबा तिथं होते. कुणाचं वय एकशे पाच आहे, तर कुणाचं एकशे दहा. प्रत्येकाने गुरुकुलमधील कामं वाटून घेतली आहेत. गुरुजींनी मला बाकी साधूंचीही ओळख करून दिली. घरची प्रचंड श्रीमंती आणि नात्याला बाजूला सारत ही मंडळी इथं अहोरात्र काम करतात. संस्कृती, कर्तव्य, जबाबदारी, पुढच्या पिढीला घडवण्याचं काम अशा कितीतरी भूमिकांत हे साधू होते. आर्य मुनीजी यांच्याबरोबर मी गोशालेत गेलो. गोशालेमधल्या गाई माझ्याकडं मोठ्या आशेने पाहत होत्या.

मी आर्य मुनीजींना विचारलं, या गाई अशा का पाहतात? आर्य मुनीजी गाईच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, ‘‘काय सांगावं, आता गोमाता मुकी असली म्हणून काय झालं, तिलाही पोटाला पाहिजे तेव्हढं मिळालं पाहिजे ना? पूर्वी लोक मदत करायचे, आता ते फार कमी झालं. त्यात जी थोडीफार मदत मिळायची, तीही कोरोनापासून बंद झाली.’’ मी बाजूला असलेल्या चाऱ्याच्या ढिगाऱ्यामधून थोडासा चारा काढणार, इतक्यात एक जण धावत आला आणि म्हणाला, ‘‘अहो नका टाकू चारा, एवढाच आहे. संध्याकाळी लागेल.’

मी त्याला न जुमानता माझ्या हातातला चारा आर्य मुनीजी ज्या गाईच्या पाठीवरून हात फिरवत होते, त्या गाईसमोर टाकला. एका मिनिटात त्या गाईने तो चारा फस्त केला. ती गाय चारा खाताना आर्य मुनीजी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी माझ्या लहानपणात गेलो. लहानपणी मला आई म्हणायची, ‘‘गाईला चारा खाऊ घाल, गाईच्या पाया पड, पुण्य लागेल.’’ मीही आईने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ते करायचो, तेव्हा आईला आनंद व्हायचा. तो आनंद मी आज आर्य मुनीजींच्या चेहऱ्यावर पाहत होतो.

त्या गुरुकुलाचे प्रमुख असणारे आचार्य सत्येंद्र यांची आर्य मुनीजींनी ओळख करून दिली. आर्य मुनीजींसह बाकी सर्व साधू आपापल्या कामाला लागले. आचार्य सत्येंद्र यांच्याशी बोलताना तिथं सुरू असलेलं काम मी त्यांच्याकडून ऐकत होतो. मी ज्या आचार्य सत्येंद्र आर्य (९१५८४४५२८०) यांच्याशी बोलत होतो, ते मराठवाड्यातील मूळचे उदगीरचे. आचार्य सत्येंद्र यांच्या घरात चार पिढ्यांपासून आर्य समाजाचं वातावरण होतं. लहानपणापासून आचार्य सत्येंद्र गुरुकुल पद्धतीत शिकले. आपलं आयुष्य सेवा, वेद, शास्त्र यासाठी द्यायचं असं त्यांनी ठरवलं. आचार्य सत्येंद्र यांच्या आई दमयंती खंदाडे दिल्लीमधल्या गुरुकुलमध्ये शिकल्या, त्यामुळे घरात गुरुकुलाचं वातावरण होतं. आचार्य सत्येंद्र यांच्या पत्नी रेखा त्याच्याबरोबरच या गुरुकुलमध्ये शिक्षिका आहेत. आचार्य सत्येंद्र हे एक एक अनुभव मला सांगत होते. हे गुरुकुल लोकांच्या सहकार्यातून चालतं; पण सध्या मदत ठप्प झाल्यामुळे हे गुरुकुल, इथला वारसा पुढं चालवायचा कसा? राज्याच्या अनेक आंदोलनांत क्रांतिकारक उपक्रमांत आर्य समाजाचा सहभाग राहिला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात आर्य समाजाचं काम सर्वांना माहिती आहे. आर्य समाजाचं काम सर्वत्र जावं, या विचारातून प्रा. सुग्रीव बळिराम काळे यांनी मोठ्या कष्टातून हे गुरुकुल, आश्रम उभा केला.

आता सुग्रीव यांचं या आश्रमात ब्रह्ममुनी असं नाव आहे. एक काळ असा होता, की इथं खूप मोठ्या प्रमाणात मुलं होती आणि गाईसुद्धा खूप होत्या; पण आता ते कमी होत आहे. त्याला आर्थिक पाठबळाचा अभाव हे मुख्य कारण आहे. गुरुकुल चालवायचं कसं, सर्व आचार्यांचे पगार द्यायचे कसे, असे एक नाही तर अनेक प्रश्न या इथं आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक या राज्यांतील मुलं इथं शिकत आहेत. अठ्ठावीस एकरांमध्ये सुंदर अशा टेकडीवर असणाऱ्या त्या गुरुकुलाच्या प्रत्येक झाडाला शंभरी पार केलेल्या साधूंनी डोक्यावरून पाणी नेऊन घातलं आणि त्या वाळवंटाचं नंदनवन केलं आहे.

आचार्य सत्येंद्र म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण उज्जैनमध्ये शिकले होते, तसंच हे गुरुकुल आहे. महाराष्ट्र शालेय बोर्ड, महर्षी एम. डी. विद्यापीठ रोहटक, हरियानाच्या माध्यमातून इथं शिकवण्यात येणारी शिक्षणप्रणाली आहे. गीता, उपनिषद, वेद, रामायण, महाभारत, चाणक्यनीती, संस्कृत, हिंदी हे विषय इथं शिकवले जातात.’’ आम्ही बोलत असताना दोन मुलं आचार्य यांच्या जवळ आली. त्यांनी हात जोडून पुढचं नियोजन काय आहे, हे आचार्य सत्येंद्र यांना सांगितलं. छोटी छोटी ती मुलं अंगावर पांढरा पंचा घालून प्रचंड नम्रपणे आमच्यासमोर उभी होती. असं वाटत होतं, मी चाणक्य मालिकेच्या सेटवर आहे. आचार्य सत्येंद्र यांनी त्या दोन्ही मुलांची मला ओळख करून दिली. निशांत रामचंद्र चौरसिया दिल्लीचा होता, दुसरा सृजल संभाजी यादगिरे उदगीरचा होता. त्या दोघांनाही वडील नाहीत. निशांत आणि सृजल यांच्याशी बोलताना त्यांच्यामध्ये असलेला कमालीचा आत्मविश्वास मला जाणवत होता. शास्त्रामध्ये त्या दोघांना काहीही विचारा, गीतेचे श्लोक पाठ, वेदांचा अर्थ विचारा, शास्त्र आणि संस्कृती या दोन्हींचाही मिलाफ करून या दोघांमध्येही तो अगदी ठासून भरला होता. वडील नसणाऱ्या या दोघांच्या डोक्यावर वडिलांची सावली देण्याचं काम हे गुरुकुल करतं. या दोघांनीही आचार्य होऊनच संस्कृतीसाठी, आर्य समाजासाठी काम करायचं, हे ठरवलं आहे. सात वर्षांपासून हे दोघे जण इथं राहतात. वर्षांतून फक्त तीन दिवस गावी जायचं. या दोघांसारखीच अनेक मुलं त्या गुरुकुलाचा भाग होऊन काही तरी वेगळं करण्यासाठी बाहेर पडतात.

आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यांत असे चार-दोनच गुरुकुल असतील, जिथं शास्त्र, पुराण यांचा अभ्यास करून ते वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या जीवनामध्ये कसं आणता येईल, याची शिकवण दिली जाते. यज्ञाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व, खाद्यसंस्कृतीचं निसर्गाशी - आपल्या शरीराशी असलेलं नातं, असं एक नाही, तर अनेक स्वरूपाची शिकवण या पिढीला इथं देण्याचं काम मी डोळ्यांनी पाहत होतो. धर्मामधला कट्टरपणा, कोणाला तरी त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून देण्यात येणारी शिकवण, याचा लवलेशही इथं नव्हता. माणुसकी जपली जाईल आणि त्या माणुसकीमधून चांगलं काहीतरी घडेल, हाच भाव या आश्रमामध्ये मला पाहायला मिळत होता. सगळ्या जाती-धर्मांचे लोक इथं गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांना फक्त एकच धर्म माहीत होता, तो म्हणजे माणुसकीचा. नयन कुमार माधवराव आचार्य, वीरेंद्र शास्त्री यांसारखी अनेक मंडळी इथं ध्येयाने पेटून काम करीत होती, त्यांच्याशी मी अनेक विषयांवर बोललो.

इथं काम करण्यासाठी जे काही यावं लागतं, ते आतमधून यावं लागतं, हे मला इथल्या प्रत्येकाला भेटल्यावर जाणवत होतं. मला करिअर करायचं आहे, मला पैसा मिळवायचा आहे, यासाठी इथं कोणी काम करत नव्हतं. इथं काम होतं पुढची पिढी घडवण्याचं आणि त्यामध्ये संस्कृती आणि संस्कार रुजविण्याचं, हे तिथं असणाऱ्या प्रत्येकाशी मी बोलत असताना मला जाणवत होतं. मी त्या गुरुकुलमधून निघालो. तिथं असणारी सगळी मुलं, आचार्य, शिक्षक मला सोडण्यासाठी बाहेर आले. मी निघालो. मनात अनेक विचार होते. देवपूजा, कर्मकांड, पुरोहित या पलीकडं जाऊन या आश्रमातून केले जाणारे संस्कार निश्चितच उत्तम पंडित निर्माण करणारे होते. आजकालचं शिक्षण आणि त्यातून निर्माण होणारी मुलं स्वतःसाठी, फार-फार तर आपल्या कुटुंबासाठी एवढ्यावरच थांबतात. आमच्याकडे शास्त्र, पुराण, वेद यांच्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही आमच्यामध्ये घेणार आहोत की नाही? अनेक जण हिंदुत्वाचा बुरखा घालून शास्त्र, पुराण यांच्याकडं पाहतात, त्यांनाही मला सांगायचंय, एकदा जाऊन परळीच्या त्या गुरुकुलाला भेट द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल संस्कृतीचा, धर्माचा, माणुसकीचा विचार कसा केला जातो ! शेवटी धर्म ही अफूची गोळी आहे आणि माणुसकी ही शाश्‍वत राहणारी गोष्ट. त्या माणुसकीसाठी आपण पुढं येऊ. अशा संस्था जगल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. संस्कारांच्या पलीकडचं काम जिथं जिथं चाललंय, त्या कामालाही बळ मिळालं पाहिजे, बरोबर ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com