माउलीची सावली...!

वांद्र्यामध्ये ‘ग्रंथाली’ चे सुदेश हिंगलासपूरकर यांना भेटून मी वांद्रे ईस्टमध्ये खेरवाडी नावाचा भाग आहे, तिथं माझा ज्ञानेश्वर प्रधान नावाचा चित्रकार मित्र राहतो, त्याच्याकडे मी गेलो.
Seema Singh
Seema Singhsakal

वांद्र्यामध्ये ‘ग्रंथाली’ चे सुदेश हिंगलासपूरकर यांना भेटून मी वांद्रे ईस्टमध्ये खेरवाडी नावाचा भाग आहे, तिथं माझा ज्ञानेश्वर प्रधान नावाचा चित्रकार मित्र राहतो, त्याच्याकडे मी गेलो. आम्ही बसलो होतो. ज्ञानेश्वर मध्येच उठले आणि म्हणाले, ‘चला, आपण थोडासा फेरफटका मारू.’ आम्ही बाहेर पडलो.

थोडं पुढं गेल्यावर आम्ही पाहत होतो - एका ठिकाणी एक महिला व पाच-सहा लोकांची टीम तिथं असलेल्या गरीब वस्तीमधील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, खाऊ, ड्रेसवाटप करण्याचं काम करत होती. मी ज्ञानेश्वर यांना म्हणालो, ‘बघा, अजून या जगामध्ये चांगुलपणा कायम आहे.’ ज्ञानेश्वर म्हणाले, ‘बरोबर आहे.’

आम्ही बराच वेळ तिथं असणाऱ्या बागेमध्ये बसलो. पुन्हा रस्त्यानं चालायला लागलो. पुढं गेल्यावर पाहतो तर काय, तीच टीम पुढंही शाळेतील मुलांना कपडे, शालेय साहित्य, छत्र्यावाटप करत होती. जी महिला त्या ग्रुपमध्ये होती, तिच्या अंगाखांद्यावर मुलं खेळत होती. ते चित्र पाहून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला.

आम्ही एका हॉटेलमध्ये थोडंसं काहीतरी खाल्लं आणि पुढं निघालो. एका गल्लीमध्ये एक स्टेज उभा केला होता. त्या स्टेजच्या बॅनरमागे लिहिलं होतं - ‘मोफत कॅन्सर तपासणी आणि औषध उपचार, ‘मेघाश्रेय फाउंडेशन’च्या वतीनं आपलं स्वागत आहे.’ थोड्या वेळापूर्वी ज्या महिलेच्या अंगाखांद्यावर मुलं खेळत होती, तीच महिला तिथं भाषणाला उभी होती. त्या महिलेचं भाषण सुरू होतं - ‘मला महाराष्ट्र कॅन्सरमुक्त करायचा आहे, यासाठी मी घराच्या बाहेर पडले.

तुम्ही माझ्या टीममध्ये सहभागी व्हा, आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्या महिलांना तपासणीसाठी आपल्या कॅम्पमध्ये घेऊन या,’ असं आवाहन ती महिला करत होती. तिथं शालेय साहित्यवाटपाचं काम, औषधवाटपाचं काम, तपासणीचं काम, मागणी केलेल्या पालकांना त्यांच्या पाल्याची फी देण्याचं काम सुरू होतं. ते सगळं चित्र निःस्वार्थीपणे काम सुरू आहे, असंच होतं.

मी ज्ञानेश्वरना म्हणालो, ‘चला, ही मंडळी नेमकं काय करताहेत, हे आपण पाहू या. त्यांचं काम समजून घेऊ या.’ ज्ञानेश्वर अत्यंत मुडी, ते म्हणाले, ‘मला सकाळी हाती घेतलेलं चित्र काढण्याचं काम पूर्ण करायचं आहे. मी जातो. तुम्ही मागून या.’ असं म्हणून ज्ञानेश्वर गेले. थोडा वेळ बोलून आपणही निघावं, या उद्देशानं मी तिथं गेलो.

तिथं गेल्यावर दोन स्वयंसेवकांना गाठण्याचा मी प्रयत्न केला; पण त्यांच्या कामापुढं त्यांना बोलायला वेळ नव्हता. खूप वेळ झाला. आता ती भाषण करणारी महिला एका रिकाम्या खुर्चीवर येऊन बसली. मी त्यांच्या बाजूला गेलो, त्यांना नमस्कार केला.

माझी ओळख देत त्यांच्या सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांना मी शुभेच्छा दिल्या. आमचं बोलणं सुरू असताना, त्यांच्या टीममध्ये काम करणारा सिद्धेश त्या महिलेला पुढचं शेड्यूल समजावून सांगत होता. एक कॅम्प, एका बचत गटाच्या स्टॉलचं उद्‍घाटन, एका खासगी शाळेस खोल्या बांधून दिल्यात, तिथं उद्‍घाटन, असे वेगवेगळे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालणारे होते. सिद्धेशच्या बोलण्यातून कळलं की, या शहरातून त्या शहरात, या राज्यातून त्या राज्यात ती महिला आणि त्यांची टीम सारखी फिरत राहते.

संशोधन करणारी टीम, सामानाची ने-आण करणारी टीम त्यांच्या सोबत असते. ती महिला कोण आहे हे सिद्धेश यांच्या बोलण्यावरून मला पुसटसं समजलं होतं. मी त्या महिलेला विनंती केली की, मला तुमच्याशी बोलण्यासाठी थोडासा वेळ हवा आहे. त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला माझ्यासोबत गाडीत यावं लागेल, आज ट्राफिक जास्त दिसतं, गाडीतच आपलं बोलणं होईल.’ खेरवाडीचा कार्यक्रम संपला.

आम्ही भारतनगरच्या दिशेनं निघालो. त्या महिला कोण, त्या हे सगळं काम का करतात आणि पुढं त्यांना हे काम कुठपर्यंत घेऊन जायचं आहे... अशा सगळ्या चर्चा आमच्यात झाल्या. कुणाकुणाचं काम असं असतं की ते ऐकून आपण अवाक् होतो, तसं काम त्या महिलेचं होतं. त्या गाडीमध्ये बसून, मी ज्या महिलेशी बोलत होतो, त्यांचं नाव सीमा सिंग!

सीमा सिंग यांचं पूर्ण शिक्षण पटनामध्ये झालंय. सीमा सिंग यांचे वडील सतदेव नारायण शर्मा हे प्रोफेसर होते. घरी पूर्वीपासून श्रीमंती. सीमा सिंग यांच्या आई दमयंती शर्मा गृहिणी होत्या; पण त्यांचा दानधर्मावर, लोकांना मदत करण्यावर प्रचंड विश्वास होता. पूजापाठ आणि उपास-तपासामध्येही त्या प्रचंड रुची ठेवायच्या. आपल्या मुलींनी आपला वारसा पुढं चालवावा, असं सीमा सिंग यांच्या आई- वडिलांना वाटायचं.

शिक्षण सुरू असताना सीमा सिंग यांनी पटना इथंच सेवाभावी कार्याला सुरुवात केली. पुढं सीमा यांचा मुंबई येथील उद्योजक मृत्युंजय वासुदेव सिंग यांच्याबरोबर विवाह झाला. मुंबईत आल्यावर सीमा सिंग यांच्या सेवाभावी कार्याला अधिक वाव मिळाला, तो त्यांची सासू रेखा, सासरे वासुदेव सिंग आणि पती मृत्युंजय यांच्यामुळे. सीमा सिंग ज्या वरळी भागामध्ये राहतात, तिथून या कामाला सुरुवात झाली. अगोदर मुंबई, मग मुंबई विभाग, राज्यातील प्रत्येक शहर आणि पुन्हा वेगवेगळी राज्यं असं करत करत अवघ्या देशामध्ये सीमा सिंग यांचं काम पोहोचलं.

वडिलांकडून आलेली जमा पुंजी, यजमानांच्या सहकार्यातून मिळणारे पैसे यांतून सीमा सिंग यांनी हे सगळं सामाजिक काम उभं केलं. कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही, उद्देश एकच आहे की, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं. मुंबईसह राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये असणारी मुलं, जी शिक्षणापासून वंचित आहेत. वाडी-वस्त्यांवरची मुलं, ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचा गंधही पोहोचलेला नाही. अशा तीन हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून पालक म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारणं, हे मोठं काम गेल्या दहा वर्षांमध्ये सीमा सिंग यांनी उभं केलं आहे.

गाडीत आम्ही बोलत असताना सिद्धेशने माझ्या हातामध्ये ‘मेघाश्रेय फाउंडेशन’ने केलेल्या कामाचा आढावा घेणारी माहिती समोर ठेवली. तीन हजार मुलांचा सगळा डेटा, त्यांचे फोटो आणि त्या मुलांच्या चेहऱ्यांवर फुललेल्या हास्याचे अनेक व्हिडीओ मला सिद्धेश धाउसकर (९३२४७१९३७९) यांनी दाखवले. ते सगळं काम पाहून मी अवाक् झालो. आपल्या अवतीभोवती अशी खूप मोठी माणसं आहेत, की जी समाजासाठी जबाबदारी म्हणून एक काम उभं करतात.

त्या माणसांची ओळख कुणालाही नाही. त्यांनी जे काम उभं केलं, त्याचा एक वेगळा इतिहास निर्माण झालेला असतो. त्यांपैकीच सीमा सिंग एक होत्या. मी सिंधूताई सपकाळ (माई) यांना जवळून अनुभवलं, त्यांचं काम जवळून पाहिलं. सीमा सिंग यांनीसुद्धा सर्वत्र खूप मोठं सामाजिक काम वाढवलंय. सिंधूताईंच्या पावलांवर पाऊल टाकणाऱ्या, गरिबांची सावली होऊ पाहणाऱ्या सीमा सिंग सर्वसामान्यांची माउली झाल्यात.

सीमा सिंग यांनी आयोजित केलेल्या शिबिरात आम्ही पोहोचलो. तिथंही सीमा सिंग उत्साहात कामाला लागल्या. एक मुलगी गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घालून होती. तिने सीमा सिंग यांना पाहताच ती त्यांच्याकडे धावत येऊन सीमा सिंग यांच्या गळ्यात पडली. सगळेजण येऊन सीमा सिंग यांना भेटत होते. एक मुलगा आला आणि तोही सीमा सिंग यांच्या गळ्यात पडला. सुरुवातीला सीमा सिंग यांच्या गळ्यात येऊन पडलेल्या मुलीकडे आणि त्या मुलाकडे बोट दाखवत सीमा सिंग मला म्हणाल्या, ‘ती डॉ. मेघा माझी मुलगी आहे, हा श्रेय माझा मुलगा आहे, दोघांनाही सामाजिक कार्यात प्रचंड रुची आहे.’

या दोन्ही मुलांच्या नावांवरून सीमा सिंग यांनी त्यांच्या फाउंडेशनचं नाव ‘मेघाश्रेय’ असं ठेवलंय. सीमा सिंग यांची मुलगी डॉक्टर, जिथं जिथं आरोग्य शिबिरं असतात, तिथं तिथं त्यांचं पूर्ण नियोजन ती करते, असं सीमा सिंग सांगत होत्या.

सीमा सिंग मला कॅन्सरबद्दल सांगत होत्या, ‘‘आम्ही ही मोहीम देशभरामध्ये राबवतोय. आमच्या फॅक्टरीमध्ये असणारं औषध यासाठी उपयोगाला येतं.

आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅन्सरसंदर्भात महत्त्वाची भूमिका घेतली. या भूमिकेसाठी माझं ‘मेघाश्रेय फाउंडेशन’ देशभर काम करीत आहे. गेल्या तीन वर्षांत आम्ही साडेसहा हजार महिलांची मोफत तपासणी केली आहे.’’ त्या ठिकाणी महिलांची तपासणी, त्यांना औषध देणं सुरू होतं; तर दुसरीकडे त्या पीडित असणाऱ्या महिलांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना जवळ घेऊन मायेची ऊब देण्याचं कामही सीमा सिंग करत होत्या.

आम्ही तिथून चेंबूरमध्ये भरलेल्या बचत गटाच्या प्रदर्शनासाठी गेलो. गावकुसातल्या, आदिवासी पाड्यावरच्या अनेक महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू तिथं विकण्यासाठी आणल्या होत्या. त्या महिला अनेक उपक्रमांच्या दरम्यान सीमा सिंग यांना भेटल्या, त्यांची ओळख, मैत्री झाली. बचत गटाच्या माध्यमातून सीमा सिंग यांनी त्या महिलांना उभं केलं.

त्या महिला स्वतः बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेला माल एकेकाळी तालुक्यापर्यंत आणून विकायच्या, आता त्या महिला मला मुंबईपर्यंत आलेल्या दिसत होत्या.आम्ही गाडीतून उतरल्या उतरल्या सीमा सिंग यांच्या दिशेने अनेक महिला धावत येत होत्या. त्या येणाऱ्या महिला पाहून मला वाटत होतं, माणसावर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे! त्या प्रत्येक महिलेला सीमा सिंग यांना कडकडून मिठी मारायची होती.

त्या मिठी मारणाऱ्या अनेक आजीबाईंचा पदर डोक्यावर घेऊन सीमा सिंग त्यांच्याबरोबर फोटो काढत होत्या. त्या महिलांसाठी तो फोटो होता; पण सीमा सिंग यांच्यासाठी ती मायेची सावली होती. ‘त्या पदराच्या स्पर्शातून नसलेल्या बापाचं असलेपण नेहमी मला जाणवतं’ असं सीमा सिंग मला सांगत होत्या. हे सांगत असताना आपल्या हयात नसलेल्या वडिलांची आठवण काढून त्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या.

तिथं बचत गटाचे स्टॉल लावलेल्या अनेक आजीबाईंशी मी बोललो. त्या म्हणत होत्या, ‘‘ही महिला देव म्हणून आली. पूर्वी आमच्या चुलीचा धूर एकच वेळा निघायचा, आता दोन वेळा निघायला लागला. शिवाय, नवीन स्वप्नं उराशी घेऊन आम्ही पुढं येत आहोत.’’ त्या महिलांची चार वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये सीमा सिंग यांनी बांधलेला महत्त्वपूर्ण सामाजिक पूल फार महत्त्वाचा होता, असं त्या महिला मला सांगत होत्या.

रात्रीचे साडेबारा वाजले होते. आम्ही त्याच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेलं जेवण जेवलो. तिथून निघताना सीमा सिंग यांचा मी निरोप घेतला. सीमा सिंग यांनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दोन रुमाल घेतले आणि माझ्या हातात ठेवत सांगितलं की, ‘‘दादा ही बहिणीची भेट घेऊन जा.’’ मी ते दोन्ही रुमाल घेतले आणि माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो.

सीमा सिंग यांनी दिलेले दोन्ही रुमाल माझ्या डोक्यावर ‘सावली’ देणारे आधार होते. तसं तर सीमा सिंग यांनी अनेकांच्या आयुष्याची सावली बनून कित्येकांचं आयुष्य उजळून टाकलं होतं. सीमा सिंग यांनी शालेय मुलांसाठी केलेलं काम एक इतिहास होऊन बसलंय. आता त्यांचं कॅन्सरविषयी सुरू असलेलं काम त्याच इतिहासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

आपल्या अवतीभोवती अशी अनेक माणसं असतात, ज्यांना वाटतं, आपण आशीर्वाद घेण्यासाठीच काम करायचं, लोकांना मदत करायची, त्यातून एक वेगळा आनंद मिळवायचा. हेच ध्येय घेऊन जगणारी ही माणसं आहेत. सीमा सिंग या माउली म्हणून सावली देणाऱ्या मातेला सलाम करावा तेवढा कमीच होता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com