व्यथा अंधाऱ्या जगातल्या...

ऑफिसवरून मी घरी पोहोचलो. आता जेवायला बसणार, तितक्यात माझा मित्र सूरज पाटीलचा फोन आला. सूरज म्हणाला, ‘संदीप, माझ्या गाडीला अपघात झाला आहे. दोन माणसे गंभीर जखमी आहेत.
women harassment
women harassmentsakal

ऑफिसवरून मी घरी पोहोचलो. आता जेवायला बसणार, तितक्यात माझा मित्र सूरज पाटीलचा फोन आला. सूरज म्हणाला, ‘संदीप, माझ्या गाडीला अपघात झाला आहे. दोन माणसे गंभीर जखमी आहेत. एकाच्या तर पायावरून गाडी गेली. आता मी कसातरी पोलिस ठाण्यामध्ये आलोय.

तू लवकर ये.’ मी म्हणालो, ‘कोणते पोलिस ठाणे.’ त्यावर सूरज म्हणाला, ‘कामाठीपुरा.’ मी लगेच सूरजला म्हणालो, ‘तू तिकडे कशाला गेलास.’ त्यावर सूरज म्हणाला, ‘अपघात झाला, तो भाग कामाठीपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, म्हणून मला या लोकांनी येथे आणले.’ ‘ठीक आहे’ म्हणत मी फोन ठेवला.

त्यानंतर मी कामाठीपुरा पोलिस ठाण्यात पोहचलो. मला पाहून सूरजच्या जिवात जीव आला. पोलिसांनी सांगितले ‘चूक सूरजची होती.’ गुन्हा दाखल करायचा की हे प्रकरण पीडितांना मदत करून तडजोड करायची यावर चर्चा सुरू होती. शेवटी गुन्हा दाखल न करताच तडजोड करायची असे ठरले.

तडजोड कशी करायची यावर निर्णय घेणारा माणूस पेशंटसोबत दवाखान्यात गेला होता. तो आल्यावर सर्व निर्णय होणार होता. आता वाट पाहिल्याशिवाय काही पर्याय नव्हता. ते पोलिस ठाणे किती भयानक होते, काय सांगावे? दर अर्ध्या तासाला तिथे तक्रारी येत होत्या.

देहविक्री करणाऱ्या महिला, महिलांना ग्राहक मिळवून देणारे दलाल, दारू विक्रेते, तिथे असणाऱ्या छोट्या- छोट्या मुली, त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांना होणारा त्रास, भांडण, बापरे ! आपण जिथे आहोत तिथे एखादा भयानक चित्रपट सुरू आहे, की काय हेच कळत नव्हते.

एक पोलिस हवालदार शांतपणे पोलिस डायरी लिहीत होते. ते वारकरी आहेत, असे वाटत होते. त्यांचं नाव अशोक पवार. मी त्यांच्यासमोर बसलो. ‘हे असे लोक रोज येतात का?, का आजच जास्त आलेत?’ त्यांनी शांतपणे माझ्याकडे पाहत उत्तर दिले. विठ्ठलाच्या कृपेने आज कमी आलेत, नाही तर रोज जत्रेसारखी गर्दी असते.

आमचं बोलणं सुरू झालं. एक महिला तक्रार घेऊन आली, त्या महिलेचं आणि पवार यांचं संभाषण सुरू होतं. ती महिला सांगत होती, ‘माझी मुलगी पाच दिवसांपासून बेपत्ता आहे.’ दुसरा एक पोलिस मागून आला आणि त्या महिलेला म्हणाला, ‘मागच्या महिन्यात तूच तुझी मुलगी भेटत नाही म्हणून तक्रार केली होती ना?’ ती बाई म्हणाली ‘हो’ मागच्या वेळी ती आली होती. आता परत गेली. पाच दिवस झाले, तिचा पत्ता नाही. काय माहिती, कुठं गेली,

समोर बसलेले पवार म्हणत होते, ‘मागच्या वेळी कुठे गेली आणि कशी परत आली?’ ती बाई सांगत होती, ‘साहेब कसे आहे, मुलीला बाहेर पाठवले तर चार पैसे जास्त मिळतात. ज्या माणसासोबत ती दोन रात्र गेली त्याने तिला कोंडून ठेवले. एवढेच नाही तर त्याचे दुसरे मित्रही तिथे आले. मुलीवर अत्याचार केले. माझ्या पोरीचे त्यांनी खूप हाल केले. ती घरी आली तेव्हा तिची अवस्था मेल्यागत झाली होती. तिला आम्ही चार दिवस दवाखान्यात ठेवले, तेव्हा कुठे ती परत कामाला लागली.’

ते दुसरे पोलिस जोरात ओरडले, आता अजून कोणासोबत पाठवले होते. ज्यांच्या सोबत पाठवतेस ते कोण आहेत, कुठले आहेत याची एकदा खात्री करायची होतीस ना? का तुझ्या मुलीला शोधून देण्याशिवाय आम्हाला दुसरे धंदे नाहीत. तुझ्यासारख्या रोज अनेक केस इथे येतात. कोणा कोणाला मदत करायची.

तो पोलिस अजून भडकणार, इतक्यात पवार त्या पोलिसाला म्हणाले, ‘अरे शांत बस, ती बिचारी काय करणार? खाणार काय? जाणार कुठे? तिचे वय तर बघ.’’ तो पोलिस शांत बसला. ती महिला ज्या शब्दांत सांगत होती त्या, त्या शब्दांमध्ये पवार त्या महिलेची तक्रार नोंद करत होते.

पवार उठले आणि बाहेर गेले. मी त्या महिलेला म्हणालो, ‘तुम्ही असे कोणत्याही अनोळखी माणसासोबत मुलीला पाठवता.’ ती म्हणाली, ‘काय करणार, आमचा धंदा आहे. अनोळखी नाही, मध्यस्थीने पाठवले होते. याच्यापूर्वी अनेक ठिकाणांवरून ती जाऊन आली होती. काही धोका झाला नव्हता. काही ठिकाणी मीही सोबत जायची.

आता घरी मी दत्तक घेतलेला माझा मुलगा आजारी असतो. तो पोलिओचा पेशंट आहे. त्यामुळे मला हलता आले नाही. आता मुलगी कुठे आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे काय माहिती?’ असे म्हणत ती रडायला लागली. देहविक्री करणारी ती महिला असली तरी ती शेवटी आई होती.

बाहेरून आलेले पवार खुर्चीवर बसताच त्यांची वाट पहात बसलेल्या चार बायका पवार यांना म्हणाल्या, ‘मोठ्या साहेबांनी तुमच्याकडे येऊन केस दाखल करायला सांगितले.’ पवार म्हणाले, ‘कशाची केस, काय काम आहे.’ त्या महिलांनी पवारांना जे सांगितले ते धक्कादायक होते. या चारही महिला देहव्यापार करणाऱ्या.

तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला मोठा पगार मिळणार आहे. आणि तो पगार मिळवण्यासाठी कागदपत्र द्यावी लागतील. त्या कागदपत्रांसाठी एका महिलेला दहा हजार रुपये खर्च येईल. असे म्हणून एका व्यक्तीने या चारही महिलांकडून प्रत्येकी १० हजार रुपये नेले. तो माणूस आज येईल. उद्या येईल याची वाट पाहून या महिला महिन्यानंतर शेवटी पोलिस स्टेशनला आल्या.

त्या चारही बोलत होत्या, त्यातली सर्वांत वयस्कर असलेली महिला म्हणाली, ‘मी तुम्हाला त्या माणसाच्या पहिल्या भेटीतच सांगितले होते, हा आपल्याला लुटणार. त्याच्या नजरांमध्ये दिसत होते, तो चोर आहे म्हणून.’’ पवार लिहीत होते आणि मी त्या महिलांशी बोलत होतो. त्या बोलत होत्या, आता म्हातारपणात आपले कोण आहे.

जेव्हा आयुष्याच्या शेवटाला जाऊ तेव्हा हेच पैसे कामाला येतील. सरकारी पगार उपयोगाला येईल म्हणून आम्ही हिंमत करून जवळ होते ते पैसे देऊन टाकले.

त्या चौघीजणी चार राज्यांतल्या. चौघींच्या घरी काहीही कमी नव्हती, पण म्हणतात ना जेव्हा माणसाकडे सगळे काही असते तेव्हा माणसाला आगाऊ आणि चुकीचे करायला सुचते. या चौघींच्या बाबतीमध्ये तेच झाले. कोणी प्रेमामध्ये पडले. कुणाला मुंबईत येऊन नोकरी करायची होती.

कुणाला मुंबईच राहायला आवडत होते. तर कुणाला नावीन्याचा शोध घ्यायचा होता म्हणून त्यांनी मुंबई गाठली. या चौघीजणी मुंबईत आल्या. शेवटी सर्व संपल्यावर जीव देण्यापेक्षा मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी कामाठीपुराचा रस्ता गाठला. त्या चारही महिलांचे विदारक आयुष्य त्या सांगत होत्या. त्यानं अस्वस्थ व्हायला झालं.

त्या रात्री मी असे अनेक प्रकार अनुभवले. सकाळचे पाच वाजले. माझी अवघी रात्र त्या कामाठीपुरा पोलिस स्टेशनमध्ये गेली होती. सूरजशी संबंधित ती व्यक्ती आला. पोलिस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला समजून सांगितले. सूरजला, त्या माणसालाही ते पटले. तडजोड करून आम्ही पोलिस स्टेशनच्या बाहेर पडलो.

सहा वाजले होते, तरी रस्त्यावर थांबलेल्या महिलांची, माणसांची वर्दळ कायम होती. पोलिस स्टेशनमध्ये रात्रभर जे जे काही घडले ते माझ्या डोळ्यांसमोर वारंवार येत होतं. अशा फार कमी रात्री असतात जिथे ‘माणुसकीचा दुष्काळ’ पाहायला मिळतो. त्यात ती कामाठीपुरामध्ये गेलेली रात्र एक होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com