काळी माय का विकली जातेय?

मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर या रस्त्याने मी प्रवास करत होतो. त्या प्रवासादरम्यान एक विषय समोर येत होता. तो विषय म्हणजे रस्त्यावरच्या ‘शेती विकणे आहे’ असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या.
Agriculture Land Selling
Agriculture Land Sellingsakal

मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर या रस्त्याने मी प्रवास करत होतो. त्या प्रवासादरम्यान एक विषय समोर येत होता. तो विषय म्हणजे रस्त्यावरच्या ‘शेती विकणे आहे’ असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या. बऱ्याच अंतरावर मी माझी गाडी थांबवायला सांगितली.

‘शेती विकणे आहे’ अशा एका पाटीसमोर गेलो. तिथे थांबून मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होतो, इथून शहर खूप दूर आहे. इथं कुठली वस्ती होणं शक्य नाही. मग हा शेतकरी जमीन का विकतोय. आसपास पाहिलं तर कोणी नव्हतं.

आता मी तिथून परत निघणार, तितक्यात मला एका माणसाने आवाज दिला. तो माणूस तिकडं दूरवरून मला म्हणाला, ‘काय अडचण आहे, कोणाला भेटायचे आहे. शेती घेण्यासंदर्भात काही बोलायचे काय?’ मी म्हणालो, ‘तुम्हालाच भेटायचं आहे.’ तो अजून माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ‘मी आपल्याला ओळखलं नाही.’ मी म्हणालो, ‘ओळखणार कसे काय? मी पहिल्यांदाच इथं आलोय. मी हा माहिती फलक वाचून थांबलोय. तुम्ही जमीन विकत आहात का?’ त्या माणसाने जमिनीकडे बघितलं आणि होकाराची मान हलवली.

त्याला वाटलं मी शेतीचा भाव विचारतो, पैसे कसे द्यायचे, जमीन वादाची नाही ना असे विचारतो काय असे त्याला अपेक्षित होते. पण मी त्याला म्हणालो, ‘का विकता एवढी चांगली जमीन?’ त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की मी जमीन घेण्यासाठी आलो नाही. तरी जमीन का विकतोय हे विचारण्यासाठी थांबलोय.

मी थांबलोय हे पाहून आजूबाजूचे तीन शेतकरी आले. त्या प्रत्येकाला उत्सुकता होती, ही जमीन काय भावाने जाणार, मी काय भाव म्हणतो. त्या सगळ्यांनी माझी चौकशी सुरू केली. मी कुठून आलोय. मी कोण आहे. मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना लक्षात आलं, की मी जमीन घ्यायला आलेलो नाही.

शहरापासून जवळच्या जमिनीवर ‘शेतजमीन विकणे आहे’ असे फलक लागतात, ते आपण समजू शकतो, पण शहरापासून खूप दूर दूर अंतरावर असणाऱ्या अनेक भागांमध्ये शेत विकणे आहे, या स्वरूपाचे फलक चारी बाजूला लागल्याचे पाहायला मिळत होते. एखादा माणूस अडचण आहे म्हणून जमीन विकत असेल तर ठीक आहे, पण सर्वांनाच अडचणी कशा, हा प्रश्न मला पडला होता. मी आजूबाजूला थांबलेल्या शेतकऱ्यांना माझी ओळख सांगितली आणि त्यांना बोलते केले. त्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती.

सचिन पाटील, मकरंद जाधव, समीर वानखेडे, प्रभू गायकवाड... ही सारी शेतकरी मंडळी. या सर्वांचा वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय. जमीन का विकली जात आहे आणि त्यामागे कारण काय, हे मी सारे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ‘जमीन विकणे आहे’ या तीन शब्दांमागे खूप मोठी कारणे आणि लांबलचक इतिहास होता. तो सारा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकताना मी चकित होत होतो. त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा त्यांना काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते.

सचिन पाटील यांची साठ एकर जमीन, मागच्या तीन वर्षांपासून कधी पाऊस जास्त, तर कधी पाऊस नाही, या कात्रीमध्ये सचिन यांची शेती अडकली. दोन मुलींची लग्न केली. दर दिवसाचा मोठा खर्च, सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज. त्या कर्जाच्या व्याजावर लागलेले व्याज, यातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर शेती विकणे हाच पर्याय सचिनसमोर होता, असे तो सांगतो.

मी म्हणालो, ‘तुमचे आई- बाबा यासाठी परवानगी देतात का?’ सचिन थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले, ‘त्यांच्या परवानगीने तर शक्य नाही. मी इंजिनिअर आहे. बायकोही उच्च शिक्षित आहे. आम्ही रस्त्याची काही खासगी कामे घेऊन ती करायचो. एका प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप अडचणीत आलो. तिथे आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली.

हे आजारी असलेल्या माझ्या वडिलांना कळले आणि वडिलांनी तीन दिवसांत प्राण सोडला. वडील का गेले हे कुणालाच कळले नाही. तेरावे झाल्यावर आईने एकदम रडून आक्रोश करीत सांगितले, ‘ तू बापाच्या काळजाचा तुकडा असलेली काळी माय विकली म्हणून तुझ्या बापाने प्राण सोडला.’ आईचे मला हे ऐकून फार वाईट वाटले. बरेच दिवस मीच माझ्या बापाला मारले, असे मला वाटत होते. ’

आमच्या मराठवाड्यात काहीही झाले तरी जमीन विकत नाहीत. ही जमीन, काळी आई म्हणजे आपल्या पूर्वजांची, वडिलांची आई आहे, असे समजले जाते. आता त्या माईला आपण विकले नाही तर स्वतः मरावे लागेल, अशी अवस्था आहे. त्याला कारणेही अनेक आहेत.

आता आई फार थकली आणि तितकेच माझे कर्जही थकले. आता कर्जमुक्त व्हायचे असेल, तर दहा एकर जमीन विकावी लागेल. नाहीतर दर वर्षी व्याजावर एक एकर जमीन विकावी लागेल. सचिन एकीकडे सांगत होता आणि दुसरीकडे डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. मी ज्या दुसऱ्या शेतकऱ्याशी बोलत होतो त्याचे नाव मकरंद जाधव. मकरंदची शेती सचिनच्या शेताजवळच आहे.

मकरंद म्हणाला, ‘माझ्याकडे तीस एकर जमीन आहे. पाण्याची कमी नाही, नापिकीचा फटका बसत नाही, कारण जमीन उंचावर आहे. सोने पिकावी अशी जमीन आहे, पण ती जमीन कशी कसायची, हा प्रश्न आहे. स्थानिक मजूर येत नाहीत. बाहेरचे मजूर येतात आणि चोरी करून पळून जातात. गेल्या दोन वर्षांपासून दहा एकर जमीन पडीक आहे. कुणी बटाईने पण करायला तयार नाही.’ मी म्हणालो, ‘तुम्ही इतरांपेक्षा मजुरी कमी देता का?’ मकरंद म्हणाले, ‘नाही, मजुरी योग्य तीच देतो. नेण्या-आणण्यासाठी वाहन आहे, पण मजूर येत नाहीत.’

सचिन, मकरंद, समीर, प्रभू सारे जण मजुराला घेऊन एक एक किस्से सांगत होते. ते मला जे सांगत होते ते माझ्यासाठी सारे काही नवीन होते. मजूर नाममात्र दरावर मिळणारे धान्य बाजारात नेऊन कसा रविवार साजरा करतात हेही ते मला सांगत होते. मी म्हणालो, ‘मग तुम्ही शेती कसायला कुणी भेटत नाही म्हणून शेती विकताय तर..., मग शेती विकून भेटलेल्या पैशांचे काय करणार?’ मकरंद म्हणाले, ‘मला शेती विकून कर्जमुक्त व्हायचे आहे. मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे.’ मी म्हणालो, ‘मग परदेशात शिकून तो पुढे काय करेल.’

मकरंद शांतपणे म्हणाले, ‘मी मुलाला सांगितले, बाबा, तिकडेच राहा. तिकडेच मोठा हो. इकडे नको येऊ. इकडे सारा गोंधळ आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. मला माझ्या आई-बापाच्या मोहापायी घर सोडता आले नाही. तू घरी येऊन मोहात नको अडकू. आता गावातल्या मुलासोबत तो एक दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला होता. मी तेव्हाच ठरवले, एकदा का तो तिकडे गेला की परत इकडे नकोच.’आम्ही बोलत बोलत सचिनच्या आखाड्यावर गेलो. तिथे सचिनच्या वडिलांची समाधी होती. त्या समाधीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले.

सचिनचा सालगडी काम सोडून झोपला होता. सचिन म्हणाला, ‘पाहा, आपण सोबत असलो तर मजूर शेतात काम करतात. नाही तर झोपा घेतात. त्या सर्वांनी तो काळा चहा प्यायला. मी त्या विहिरीचे नितळ पाणी प्यायलो. मी पाणी पिताना सचिन म्हणाला, ‘माझ्या बापाने भर उन्हाळ्यात ही विहीर खंदली, बापाने जिवाचे रान केले, म्हणून या विहिरीचे पाणी इतके चवदार आहे.’ मी समीरशी बोलत होतो, समीर म्हणाला, ‘मला दहा एकर शेती आहे.

मला कुणीतरी असा खमका माणूस पाहिजे जो माझी पूर्ण जमीन विकत घेईल.’ मी म्हणालो, ‘काही भांडणे झाली का? काही वाद आहे का?’ समीर म्हणाले, ‘हो,’मी म्हणालो,‘भावा-भावाचा वाद आहे का?’ समीर म्हणाले, ‘नाही नाही, माझा आणि माझ्या बहिणीचा वाद आहे. तिला माझी अर्धी जमीन पाहिजे. या वादातून पाच वर्षांपासून जमीन पेरली नाही. ’

मी म्हणालो, ‘आता बहिणीला हिस्सा कायद्याप्रमाणे द्यायचा आहे ना.’ तो म्हणाला,‘छे हो, कशाचा कायदा, आमच्या पूर्वजांनी जे ठरवले ते महत्त्वाचे आहे. बरं बहीण, मेव्हणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनाही चाळीस एकर शेती आहे.’ प्रभू यांचे जमीन विकायचे कारण वेगळे होते, प्रभू म्हणाला, ‘माझी दोन मुले अपघातात वारली. खूप वर्षांनंतर मला मुलगा झाला. तो खूप लाडका असल्यामुळे शिकला नाही.

मित्राच्या संगतीने पुण्याला गेला आणि वॉचमन झाला. त्याला आता दोन छोटी मुले आहेत. माझी बायको सारखी म्हणते, माझी वारलेली ती दोन्ही मुले पुन्हा जन्माला आली आहेत. मला आता मुलासोबत जाऊन पुण्याला राहायचे आहे. माझी पाच एकर जमीन आहे. मागच्या चार वर्षांत मी जे काही पेरले ते कधी उगवले नाही. जेव्हा उगवले तेव्हा बाजारात कवडीमोल विकले गेले.

नापिकीत जमिनीच्या जमिनी मोजून नेल्या. नेते फोटो काढत शेतात आले आणि बँकेत जमा होणारे पैसे अजून जमा होतच आहेत. या सरकारवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर माझा जराही विश्वास नाही.’ ते सारे जण एक एक करून आम्ही आमची जमीन का विकतोय याची कारणे सांगत होते.

गावकी, भावकी आणि निसर्गाचे सतत वाईट फिरणारे चक्र आणि या चक्राचे हे सारे झालेले शिकार. शेतीसंदर्भात असणारे चुकीचे कायदे, हे सारे यामागे आहे. या साऱ्यांची कहाणी एकदम वेगळी होती. ही कहाणी या चार जणांची नाही तर राज्यात, देशात काळ्या माईची सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची आहे. ज्याला आपल्या काळ्या मायचा तुकडा काळजाचा वाटतो, पण त्या काळजाच्या तुकड्याला विकल्याशिवाय पर्याय नाही. बरं, यात शंभर एकर आणि एक एकर जमीन असणाऱ्यांची गत सारखीच झालेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com