मंत्र आणि तंत्र ‘स्टार्टअप’चं

माध्यमं बदलली, त्या माध्यमांचा वापर करण्याचं तंत्रही बदललं. गेल्या काही दिवसांपासून आपण जर भोवताली चाणाक्ष नजरेने पाहिलं तर तो बदल कशाप्रकारे घडतो आहे, हे आपल्या लक्षात येईल.
Book Startupvishayi sarv kahi
Book Startupvishayi sarv kahisakal
Summary

माध्यमं बदलली, त्या माध्यमांचा वापर करण्याचं तंत्रही बदललं. गेल्या काही दिवसांपासून आपण जर भोवताली चाणाक्ष नजरेने पाहिलं तर तो बदल कशाप्रकारे घडतो आहे, हे आपल्या लक्षात येईल.

माध्यमं बदलली, त्या माध्यमांचा वापर करण्याचं तंत्रही बदललं. गेल्या काही दिवसांपासून आपण जर भोवताली चाणाक्ष नजरेने पाहिलं तर तो बदल कशाप्रकारे घडतो आहे, हे आपल्या लक्षात येईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रांत भराऱ्या घेतल्या आहेत. सध्याचा काळ सर्जनशीलतेचा आहे, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो. क्रिएटिव्ह माइंड, क्रिएटिव्ह आयडियाज श्रीमंत करणाऱ्या आहेत; पण ते होणं प्रत्येकाला शक्य नाही. ते जमावं यासाठी सध्या ‘स्टार्टअप’ नावाची प्रयोगशीलता आजच्या तरुणांमध्ये वाढत आहे. मागील दोन वर्षांच्या काळात हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल. काहींनी त्याचा अनुभवही घेतला असेल. नव्या काळाची गरज म्हणजे हा स्टार्टअपचा नवा उद्योग आहे.

डॉ. अनंत सरदेशमुख यांनी लिहिलेलं ‘स्टार्टअपविषयी सर्व काही’ नवोदित उद्योजकांसाठी आगळीवेगळी मेजवानी म्हणावी लागेल. ज्यांना कुणाला नवा व्यवसाय सुरू करण्यासंबंधी अडचणी, शंका, प्रश्न असतील, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे मोठा ‘सोर्स’ आहे हे आवर्जून सांगावं लागेल. अतिशय साध्या सोप्या भाषेत सरदेशमुख यांनी ज्यांना कुणाला ‘स्टार्टअप’ सुरू करायचा आहे, त्यांना मार्गदर्शन केलं आहे. यापूर्वी केवळ गुगलच्या माध्यमातून या नवसंकल्पनेचा शोध घेण्याचं काम नवउद्योजक करत होते; पण मुळातच ‘स्टार्टअप’ म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती मोठी आहे, या संकल्पनेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, त्यांचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या उद्योगासाठी जी माहिती हवी असते ती कशी शोधावी, आपण करीत असलेल्या उत्पादनाचं मार्केटिंग... या साऱ्या प्रश्नांना सोप्या भाषेत समजावून सांगणारं ‘ स्टार्टअपविषयी सर्व काही’ हे पुस्तक आहे.

पुस्तकामध्ये एकूण १० प्रकरणं आहेत. वानगीदाखल काही नावं सांगायची झाल्यास, स्टार्टअप किस चिडिया का नाम है, उद्योजकता, उद्योजकांच्या गुणांचा समुच्चय, स्टार्टअप संघटन आणि अभिक्षमता या साऱ्या प्रकरणांतून आपल्यासमोर हा नवीन प्रकार उलगडत जातो. ज्या प्रश्नांनी आपल्याला गेल्या कित्येक दिवसांपासून भंडावून सोडलेलं होतं त्यांची उत्तरं इथं मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, केवळ व्याख्या, आकृत्या, थिअरी यांच्या अनुषंगाने लेखकाने आपल्याला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न न करता वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणांतून ती संकल्पना कशी समजेल याकडे लक्ष दिलं आहे, त्यामुळे पुस्तक वाचनीय झालं आहे.

ज्यांना कुणाला स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी, जे त्यात उतरले आहेत त्यांच्यासाठी, ज्यांनी सुरू करून पुन्हा आणखी नव्या स्टार्टअपचा प्लॅन केला आहे त्यांच्यासाठी... अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला हे पुस्तक मदत करणारं ठरेल. बाजारात याविषयावर विपुल पुस्तकं आहेत. मात्र, त्यात परदेशी संकल्पना, अनोळखी उदाहरणं, रटाळ भाषा आणि क्लिष्ट मांडणी यामुळे मुख्य विषय सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहचत नाही. ‘स्टार्टअपविषयी सर्वकाही’च्याबाबत बोलायचं झाल्यास त्यात असं काही होत नाही. हे पुस्तक थेट तुमच्याशी संवाद साधतं. तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं देत लेखकाने मोठ्या कौशल्याने एखाद्या नवउद्योजकाला कोणते प्रश्न पडू शकतात, त्याने त्याला कशाप्रकारे सामोरं गेलं पाहिजे याचा विचार करून पुस्तकाचं लेखन केलं आहे, जे त्यांच्यासाठी ‘नवनीत’च म्हणावं लागेल.

पुस्तकाचं नाव - ‘स्टार्टअपविषयी सर्व काही’

लेखक - डॉ. अनंत सरदेशमुख

प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे (०२० - २४४७३४५९)

पृष्ठं - २३७,

मूल्य - ३०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com