esakal | कसोटीची परंपरा आणि वादंगाचे रंग
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

अल्याड-पल्याड
ख्रिसमसला जोडून येणाऱ्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर जशी ‘बॉक्सिंग डे कसोटी’ असते, त्याच धर्तीवर नववर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्यांचा लाभ उठवण्यासाठी क्रिकेटजगतात सध्या कसोटी सामने सुरू आहेत. ही अशी सांगड घालण्यामागं अर्थातच आर्थिक गणितही असतंच.

कसोटीची परंपरा आणि वादंगाचे रंग

sakal_logo
By
संजय घारपुरे saptrang@esakal.com

ख्रिसमसला जोडून येणाऱ्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर जशी ‘बॉक्सिंग डे कसोटी’ असते, त्याच धर्तीवर नववर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्यांचा लाभ उठवण्यासाठी क्रिकेटजगतात सध्या कसोटी सामने सुरू आहेत. ही अशी सांगड घालण्यामागं अर्थातच आर्थिक गणितही असतंच.

नवं आव्हान
मेलबर्नची ‘बॉक्सिंग डे कसोटी’ आणि सिडनीची ‘नववर्ष कसोटी’ हा ऑस्ट्रेलियाचा मानबिंदू असल्याचं चित्र निर्माण केलं जातं; पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. पर्थनंही यापैकी एका कसोटीसाठी कंबर कसली आहे. मेलबर्नचं एमसीजी आणि सिडनीचं एससीसीजी यांनी याबाबत करार केला आहे. एससीजीचा करार सन २०२२ पर्यंत आहे, तर एमसीसीजीचा करारही अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत पर्थ यांपैकी एका कसोटीसाठी उत्सुक आहे. त्यांनी एक अब्ज ६० कोटी डॉलर खर्च करून उभारलेल्या ऑप्टस स्टेडियमच्या उद्घाटनाच्या वेळी हे घडलं.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोंगल कसोटी हे स्वप्नच
मेलबर्नच्या आणि सिडनीच्या कसोटीला लाभलेली ओळख पाहून भारतातही या प्रकारचे प्रयत्न झाले. तमिळनाडूत अर्थात्‌ चेन्नईत पोंगल कसोटीसाठीची योजना पुढं आली. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पोंगलची सुटी साधून ही कसोटी घेण्याचे प्रयत्न झाले; पण त्यात यश आलं नाही, त्यामुळे सन १९८८ पासून पोंगलच्या उत्साहात, तेव्हाचं मद्रास असो वा आताची चेन्नई, इथं कसोटी झाली नाही आणि यंदाही होणार नाही.

सायमंड्स- हरभजनचं ‘मंकी गेट’
‘नववर्ष कसोटी’ कदाचित प्रत्येक भारतीयांच्या लक्षात नसेल; पण २००७ मध्ये याच कसोटीतल्या घडलेल्या ‘मंकी गेट’ प्रकरणाचा विसर क्रीडाप्रेमींना पडणं शक्य नाही. या प्रकरणानं आणि त्यानंतरच्या  वादग्रस्त निर्णयानं त्या कसोटीतला थरार झाकोळला गेला होता. तो सामना निकालापेक्षा गाजला तो हरभजननं सायमंड्सला उद्देशून केलेल्या ‘मंकी’ या वांशिक टिप्पणीनं. सामनाधिकारी प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन कसोटींची बंदी घातली. कसोटी गमावलेल्या भारतानं मैदानाबाहेरचा संघर्ष जिंकला. हरभजनवरची बंदी रद्द करण्यास भाग पाडलं.

अकमलचं ‘फिक्सिंग’
पाकिस्तानच्या कसोटीत कधीही कुणीही काहीही करू शकतं याचं प्रत्यंतर २००९-१० च्या ‘नववर्ष कसोटी’नं दिलं. ऑस्ट्रेलिया पहिला डाव ११०, पाकिस्तान पहिला डाव २ बाद २०५; पण निकाल? पाकिस्तानची ३६ धावांनी हार! पाकिस्ताननं हे कसं केलं हे बघणं लक्षवेधक होतं. त्यांचा डाव २ बाद २०५ वरून ३३३ धावांत संपला. झेल सोडण्यात आपण माहीर असल्याचं कामरान अकमलनं दाखवून दिलं! त्यानं एका डावात चार झेल सोडले. मायकेल हसीनं दुसऱ्या डावात केलेल्या फलंदाजीपेक्षा अकमलच्या खराब यष्टिरक्षणानं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. निकालनिश्चितीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा या कसोटीचा उल्लेख होतोच.

‘नववर्ष कसोटी’त भारतासाठी बदल
भारताची सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली तिसरी कसोटी सिडनीत ता. सात जानेवारीपासून ठरली आहे. आता ही ‘नववर्ष कसोटी कशी,’ अशी विचारणा अॅलन बोर्डर यांनी केली आहे. ‘ता. दोन अथवा तीन जानेवारीला होणारी ही कसोटी सात जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली ती भारतीय संघाला झुकतं माप देण्यासाठीच,’ असा त्यांचा आरोप आहे. भारताची जागतिक क्रिकेटमधली आर्थिक ताकद लक्षात घेऊन हे केलं असल्याचा आरोप बोर्डर यांनी केला आहे; परंतु याच सिडनीत सन २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली सिडनीची कसोटी सहा जानेवारीपासून सुरू झाली होती, याचा मात्र त्यांना विसर पडला.

भारताची सिडनीतली ‘नववर्ष कसोटी’
पहिला दिवस                             निकाल

सात जानेवारी १९७८       भारताचा एक डाव आणि दोन धावांनी विजय
दोन जानेवारी १९८१       ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि चार धावांनी विजय
दोन जानेवारी १९८६       कसोटी अनिर्णित
दोन जानेवारी १९९२       कसोटी अनिर्णित
दोन जानेवारी २०००       ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १४१ धावांनी विजय
दोन जानेवारी २००४       कसोटी अनिर्णित
दोन जानेवारी २००८       ऑस्ट्रेलियाचा १२२ धावांनी विजय
तीन जानेवारी २०१२       ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि ६८ धावांनी विजय
सहा जानेवारी २०१५       कसोटी अनिर्णित
तीन जानेवारी २०१९       कसोटी अनिर्णित

Edited By - Prashant Patil

loading image