ऊर्जासंवर्धन ही काळाची गरज

संजय खोत
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

१४ डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ऊर्जासंवर्धन दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी आपण संपूर्ण देशात विविध ठिकाणी चर्चासत्रे, प्रदर्शने व वादविवाद स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करतो; पण हे वर्षातून एकच दिवशी न करता प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिटाला आपण ऊर्जासंवर्धन करणे गरजेचे आहे.

राजधानी दिल्लीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून त्याची गणना जगामधील अतिप्रदूषित अशा शहरामध्ये होऊ लागली आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागही त्या दिशेने जात आहेत. खरे तर भारत सरकारने ऊर्जा बचत विधेयक २००१ ला मंजूर केले. त्या पद्धतीने ऊर्जा संवर्धन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्याला आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे सूचित केले. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर ऊर्जा संवर्धनासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रानेही राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ जाहीर केले असून पुढील पाच वर्षांमध्ये १००० मेगावॉट ऊर्जेची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवून यासाठी स्वतंत्र धोरण राबविण्यात आले आहे.

सध्या भारताची विद्युत निर्मितीची क्षमता ३३१ गेगावॉट इतकी असून महाराष्ट्र राज्याची १३.८२ गेगावॉट इतकी आहे. यापैकी ६३ टक्के वीज निर्मिती औष्णिक (प्रामुख्याने कोळसा) पद्धतीने होत असल्याने हरितगृह वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. ह्याचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खनिज इंधनाचे साठे मर्यादित असल्याने व त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यात त्याची टंचाई निर्माण होऊ शकते. या सर्वांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपलब्ध खनिज इंधनाचा वापर अधिक काटकसरीने, कार्यक्षमतेने करणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाने ऊर्जा बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन ऊर्जा संवर्धन कायदा २००१ मंजूर केला आहे. बीईई, नवी दिल्ली यांच्या अभ्यासानुसार विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनासाठी वाव आहे.
पथदिवे व पाणीपुरवठा ः २०, घरगुती क्षेत्र ः २०, व्यावसायिक क्षेत्र ः ३०, उद्योग क्षेत्र ः २५, कृषी क्षेत्र ः ३० टक्के इतकी वीज संवर्धनासाठी वाव आहे.

महाऊर्जाने केलेल्या परीक्षणानुसार महाराष्ट्रात अंदाजे ३७०० मेगावॉट वीज उत्पादन क्षमता वाढ वाचविणे शक्‍य आहे. तसेच कोळसा, खनिजतेल गॅस या खनिज इंधनाच्या वापरापैकी २० टक्‍के ते ३० टक्‍के इंधन वाचविणे शक्‍य आहे.

आपण वर्षाला किती कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जन करतो व त्यामुळे किती हरितगृह वायूचे उत्सर्जन होते, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. तसेच इंधनाच्या वापराने सल्फर ऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साईडचे उत्सर्जन होते. या सर्वांमुळे आम्ल वर्षा होते. याचा परिणाम तळे, नदी, जमीन, झाडेझुडपे, प्राणी, त्वचा व डोक्‍याचे विकार तसेच इमारतीवरही होतो. ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षम साहित्याचा जास्तीतजास्त उपयोग करणे, तसेच अपारंपरिक स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.

ऊर्जासंवर्धन
ऊर्जा संवर्धन करणे खूपच सोपे असून ऊर्जेचा वापर गरजेपुरता करून ऊर्जेची बचत करता येते. यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नैसर्गिक वायूविजन, हवा याचा वापर करावा. ऊर्जा संवर्धन ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही करता येते.

ऊर्जा कार्यक्षमता 
विजेच्या/ऊर्जाची सध्या वापरात असलेल्या उपकरणांची कार्यक्षमता ही कमी असल्याने विजेच्या/ऊर्जेचा अपव्यय होतो. विजेच्या/ऊर्जेच्या कार्यक्षम वापराने तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत असून ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. यामुळे वीज/ऊर्जा बचत हा ऊर्जेचा कायमस्वरूपी स्त्रोत म्हणून अस्तित्वात राहणार नाही. यामध्ये जुनी उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षमता असलेली उदा. एलईडी दिवे, स्टारांकित उत्पादने इत्यादी.

महाराष्ट्रामध्ये असलेल्या सुमारे ५ लाख अतिलघू, लघू व मध्यम उद्योग यांनाही ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता वाढीस प्रवृत्त केले जाणार असून उद्योगातील तंत्रज्ञस्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी व अभियंत्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता विषयावर आधारित विशेष प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे. 
कृषी क्षेत्रासाठी कृषी पंप जोडणी देताना ५ स्टार मानांकित पंप बसविणे बंधनकारक आहे. २०२२ पर्यंत १७५ गेगावॉट ही ऊर्जा सौर (सोलार), वायू, बायोमास या स्त्रोतांमार्फत तयार करावे लागणार आहे. त्यात सौरऊर्जा निर्मिती १०० गेगावॉट इतका तर ४० गेगावॉट इतकी ऊर्जा इमारतीच्या छतावरून निर्माण करण्यात येणार आहे.

Web Title: Sanjay Khot article