बूमरॅंग (संजय सागडे)

संजय सागडे
रविवार, 6 मे 2018

त्या मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.
जगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला. मुलगा एका दमात दुकानाच्या दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे मजूर वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं "बजेट'च कोसळलं होतं.

त्या मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.
जगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला. मुलगा एका दमात दुकानाच्या दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे मजूर वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं "बजेट'च कोसळलं होतं.

"नाही दादा, इतके कमी होत नाहीत पैसे, अडीचशेमधून पन्नास कमी केले की. आता आणखी कमी होणार नाहीत. मलापण पोट आहे...'' एअरकूलरचा वेग वाढवत राजा म्हणाला. राजा हा स्टेशनरी दुकानदार. माझा वर्गमित्र. मोठेपणी मी नोकरीला लागलो आणि त्यानं वडिलोपार्जित स्टेशनरी दुकानाचा व्यवसाय सांभाळला. तालुक्‍याला आल्यावर त्याच्या दुकानात माझी ऊठ-बस असायची. आज तालुक्‍याचा आठवडी बाजार. मजूर वाटावा असा एक मध्यम वयाचा माणूस, त्याच्या 11-12 वर्षांच्या मुलाला घेऊन राजाच्या दुकानात आला होता. मुलगा "बूमरॅंग'चं खेळणं घेण्याचा हट्ट करत होता. हे खेळणं हवेत फेकल्यानंतर पुन्हा फिरून, फेकणाऱ्या व्यक्तीकडंच येतं म्हणून त्याचं नाव बूमरॅंग. राजानं त्याची किंमत दोनशे रुपये सांगितली होती. वास्तविक पाहता, त्याची किंमत फारतर पन्नास रुपयांपर्यंत असावी. मात्र, राजानं अडीचशे रुपये सांगून त्यातून पन्नास रुपये कमी केले होते. त्या बिचाऱ्या मजुराला मिळालेल्या मजुरीतल्या पैशाच्या वाटा आधीच ठरल्या होत्या. आठवड्याचं किराणा सामान, तेल, औषधपाणी, आणखी काय काय... पैसे आणि गरजा यांचा मेळ बसवताना त्याची उडणारी तारांबळ दिसून येत होती. दाढी वाढलेली, मळका पायजमा, खांद्यावर उसवलेला सदरा, फाटक्‍या टोपीतून काळे-पांढरे केस गवत उगवल्यासारखे वर आलेले. चेहऱ्यावर अगतिकता. त्यात पोरगा बूमरॅंगसाठी अडून बसलेला. त्यानं पोराला आधी समजावून सांगितलं आणि नंतर रागावून दोन शिव्या दिल्या. "जिलबी घेऊन देतो,' असं आमिषही दाखवलं. मात्र, पोरगा हट्टालाच पेटला होता. ""दादा, बूमरॅंगच पायजे. घे ना. मी परत कायपन मागनार नाय,'' पोरगा अगदी काकुळतीला आला होता. मलाही ते दृश्‍य पाहवेना. आपणच त्याला ते बूमरॅंग घेऊन द्यावं का? आपल्या लेकरांनी एखादी गोष्ट मागण्याचा अवकाश की आपण लगेच देतो. हेपण लेकरूच आहे...माझ्या मनात विचार तरळला.ं राजाला कापऱ्या आवाजात पुन्हा विनवणी केली ः ""बघा शेटजी, आमची दिसाची मजुरीच दीडशे रुपय असतीया. आमच्यासारक्‍यान्ला कसं परवडनार असलं म्हागडं खेळनं. त्या एका शिरिमंत बाबाच्या नातवाकडं हाय...आन्‌ त्ये बगून, ह्योबी म्हैनाभर झालं माह्या मागं लागलाया... भूमरॅंग का काय ती घी म्हून... आज हट धरून माह्यासंगं बाजारलाच आलाया... शंबर रुपयापत्तूर द्येत असला तर घितलं असतं. बघा, काय तरी करा, लेकराचं मन मोडवनाय...''

आता आपल्याला ते खेळणं मिळणार या आशेनं त्याच्या मुलाचे डोळे आनंदानं चमकू लागले होते. राजा दोनशे रुपयांच्या खाली येत नव्हता. शेवटी, त्या मजुरानं मुलाला फरफटत बाहेर नेलं. तो मुलगा ओक्‍साबोक्‍शी रडत होता...
""राजा, अरे देऊन टाक ते बूमरॅंग. तसं बघितलं तर पन्नास रुपये किंमत आणि तू चक्क दोनशे रुपये सांगितलेस?'' मी म्हणालो. तसं फ्रिजमधून कोल्ड्रिंक्‍स काढून माझ्या हाती देत राजा म्हणाला ः ""साहेब, हीच तर धंद्यातली "ग्यानबाची मेख' आहे! नफा कमावण्याचं आमचं एक गुपित असतं. आम्ही ते सहसा कुणाला सांगत नाही; पण तुम्हाला म्हणून सांगतो...तुम्ही आमचे मित्र पडले ना! एक म्हणजे, एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाली, की तीच संधी समजून ती वस्तू चढ्या भावानं विकणं, नाहीतर ग्राहकाची गरज पाहून वस्तूची किंमत वाढवणं. मी बूमरॅंगबाबत दुसरा पर्याय निवडला आहे! त्या मुलाचा हट्ट ही ग्राहकाची गरज. तो माणूस फिरून येतो की नाही बघा...'' ""अरे, मुलाचा हट्ट ही त्या बिचाऱ्याची गरज नसून अगतिकता आहे,'' मी त्याच्या लक्षात आणून दिलं. ""तुमचं बरोबर आहे साहेब; पण मी पडलो व्यापारी. माझ्या दृष्टीनं ती ग्राहकाची गरजच आहे आणि ग्राहकाची ही गरज व्यापाऱ्यानं "कॅश' करायची नाही तर कुणी...?'' राजानं त्याच्या भूमिकेचं पुन्हा समर्थन केलं.
""अरे पण, सचोटीनंसुद्धा पैसा कमावता येतोच की... कितीतरी लोक आहेत असे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे,'' मी म्हणालो.
""हो आहेत ना! ते बसलेत विटकं काउंटर आणि फुटके डबे सांभाळत!'' राजा उपहासाच्या आणि तुच्छतेच्या स्वरात म्हणाला.
***

आमचं असं बोलणं सुरू असताना थोड्याच वेळात तो मजूर खरोखरच परत आला होता आला. घामानं डबडबलेल्या त्याच्या चेहऱ्यावर व्याकुळता दिसत होती. नाइलाजानं, जड हातानं त्यानं दोनशे रुपये काढून राजाला दिले... मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.
जगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला.
मुलगा एका दमात दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं "बजेट'च कोसळलं होतं. मला उगाचच अपराध्यासारखं वाटू लागलं. मी थोडासा नर्व्हस झालेला पाहून राजा म्हणाला ः ""साहेब, तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती; पण आपल्यालाही संसार, मुलं-बाळ आहेतच की. आपलीही मुलं असा हट्ट करतातच ना? पण आपल्या मुलांचे हट्ट असले किरकोळ नसतात. आता हेच बघा ना, आमचे चिरंजीव अमोलदादांनी नवीन आलेली ती स्पोर्टसची बाईक घेण्याचा हट्ट धरला...मग पतसंस्थेचं कर्ज काढलं. मासिक हप्ताही जास्त नाही. "एक ऐंशी' किंमत आहे त्या गाडीची! आता इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं म्हटल्यावर, म्हटलं घे बाबा! गाडीवर बसल्यावर कसं हवेत उडल्यासारखंच वाटतं आणि पोरांचे असले महागडे हट्ट पुरवायचे म्हणजे हे असं काहीतरी करावंच लागतं...'' राजानं त्याच्या वागण्याचं पुन्हा एकदा समर्थन केलं.
***

रस्त्यावर ऊन्ह मी म्हणत होतं. दुकानातला कूलरसुद्धा गरम झळा सोडत होता. किरकोळ विक्रेते आठवडी बाजारात भर उन्हात घसा ताणून आपापल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत होते. बाहेरच्या धगीपुढं पोटातली भुकेची आग मोठी होती आणि त्याच अगतिकतेतून प्रत्येकाची जगण्याची धडपड सुरू होती...
""राजा, समोरचे हे लोक बघ...तेपण छोटे का असेनात व्यापारीच आहेत ना? पण ते त्यांच्या मालाची तुझ्याइतकी अव्वाच्या सव्वा किंमत लावत नाहीत. गरीब असले तरी ते सचोटीनं धंदा करताहेत,''
मी राजाला म्हणालो.
""साहेब, बरोबर आहे तुमचं; पण हे लोक एक लाख ऐंशी हजार रुपयांची स्पोर्टस बाईक त्यांच्या मुलांना नाही ना घेऊन देऊ शकत! माझ्याकडं असलेल्या वस्तू जास्तीत जास्त किमतीला ग्राहकाला विकणं हे माझं कौशल्य आहे आणि याच कौशल्याचा मोबदला मी घेतला म्हणून कुठं बिघडलं?'' राजा अगदी वकिली थाटात त्याच्या मताचं समर्थन करत होता.
""अरे पण, आपण जे कमावतो ते प्रामाणिकपणे कमावलेलं असावं. खऱ्या कमाईतूनच खरं समाधान मिळतं...'' मी थोडं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. ""साहेब, हे असलं तत्त्वज्ञान व्हॉट्‌सऍपवर वाचायला आणि दुसऱ्याला फॉरवर्ड करायला बरं असतं! पण व्यवहारात तसं वागून चालत नाही. खरंतर, झटपट मोठं व्हायचं असेल तर तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांचा कधीच मेळ बसत नाही,'' राजानं पुन्हा त्याचं स्वार्थी तत्त्वज्ञान पुढं रेटलं.
मी काही किरकोळ स्टेशनरी घेतली आणि राजाचा निरोप घेऊन दुकानाबाहेर पडलो. मात्र तो अगतिक बाप, त्याचा तो मुलगा आणि ते बूमरॅंग माझ्या मनातून काही केल्या जाता जात नव्हतं. खरंच आपल्या लेखी किरकोळ असणारी एखादी गोष्ट काही लोकांसाठी किती मोलाची असते! त्या दिवशी दोनशे रुपयांचं ते खेळणं घेतल्यावर त्या अगतिक पित्याला किती तडजोडी कराव्या लागल्या असतील... त्याच्या फाटक्‍या टोपीतून केस डोकावत होते, त्याला नवी टोपी घ्यावीशी वाटली नसेल का? बाजारातून न्यायच्या रोजच्या अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये त्याला नाइलाजानं काटछाट करावी लागली असेल...लेकराच्या हट्टापायी हे सगळं त्याला करावं लागलं असणार.
***

राजाचं त्या दिवशीचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं. पन्नास रुपयांची वस्तू त्यानं दोनशे रुपयांना विकली होती. गावाकडच्या एका गरीब, अगतिक आणि अडाणी माणसाला त्यानं लुबाडलं होतं.
त्या दिवशी माझी ऑफिसमध्ये जाण्याची गडबड सुरू होती. कंपनी पाहण्यासाठी काही पाहुणे येणार होते. त्याचं नियोजन माझ्याकडं असल्यानं आज जरा मी लवकर निघालो होतो. इतक्‍यात मोबाईल वाजला. बहुतेक कंपनीतल्या साहेबांचाच फोन असणार... मी फोन पटकन घेतला. मात्र, फोन राजाचा होता. राजाचा फोन आणि या वेळी? जरा आश्‍चर्य वाटलं. फोन घेत मी म्हणालो ः ""राजाभाऊ, आज सकाळीच आमची आठवण आली...'' तसा रडवेल्या स्वरात राजा म्हणाला ः ""साहेब, ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या. आल्यावर सांगतो.'' मला धक्काच बसला, काय झालं असेल या काळजीनं माझ्या पायांतलं अवसानच गळालं. मी गडबडीनं सिटी हॉस्पिटल गाठलं. मला पाहताच राजाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याची बायको रडत होती; मुलगीही खाली मान घालून डोळे गाळत होती. त्याच्या मुलाचा म्हणजे अमोलचा अपघात झाला होता. मेंदूला मार लागला होता. शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
भूलतज्ज्ञ...न्यूरोसर्जन...मेडिसिन्स...दोन बाटल्या रक्त...आणखी कसले कसले चार्जेस मिळून ताबडतोब तीन लाख सोळा हजार रुपये भरावे लागणार होते. भरघाव जाणाऱ्या ट्रकची अमोलच्या स्पोर्टस बाईकला धडक बसली होती. अपघात मोठा होता. राजा काही तसा फार बडा दुकानदार नव्हता. त्याच्या मानानं तीन लाख रुपये जास्तच होते. वास्तविक पाहता, एवढ्या मोठ्या रकमेची डॉक्‍टरनाही ताबडतोब गरज होती असं नाही. मात्र, घाबरून-धास्तावून गेलेल्या राजाची अडवणूक केली जात होती. तशी राजाची भावना झाली होती. पैसे भरल्याशिवाय शस्त्रक्रिया केली जाणार नव्हती. राजाच्याच भाषेत सांगायचं तर, मुलाविषयी राजाला वाटणारी काळजी आणि भीती डॉक्‍टर "कॅश' करत होते! तीन लाख रुपयांची जुळणी करणं ही फार मोठी समस्या राजासमोर उभी होती. "अडवणूक चालली आहे. वैद्यकीय सेवा आता "सेवा' राहिली नाही. असल्या डॉक्‍टरांचा हा धंदाच झाला आहे....' पुनःपुन्हा येणारा अश्रूंचा कढ आवरत राजा बडबडत होता. मी त्याला सावरत, पैसे उभे करण्याचं आश्‍वासन देऊन त्याला धीर देत होतो. पैशांची तजवीज करावी लागणारच होती...
***

मला त्या दिवशीचा तो मुलासाठी "बूमरॅंग' घेणारा गरीब मजूर माणूस आठवला.
आज त्या गरीब मजुराच्या जागी राजा होता...आणि राजाच्या जागी डॉक्‍टर! त्या दिवशीची त्या मजुराची अगतिकता, ती व्याकुळता आज वेगळ्या संदर्भात राजाच्या बाबतीत मला दिसत होती. पृथ्वी गोल आहे...आणि गोलात फिरणारी वस्तू कधीतरी फिरत फिरत जिथून निघाली, तिथंच येते, अगदी त्या बूमरॅंगसारखी! आपण केलेल्या कर्माच्या बाबतीत हे असंच होत असेल का? आपणच केलेली कर्मं फिरून आपल्यासमोर उभी राहत असतील का? याबाबत निश्‍चित असं काहीच सांगता येत नाही, सांगता येणारही नाही...राजाचं त्या दिवशीचं ते वर्तन की कर्म - जे काही असेल ते - खरोखरच बूमरॅंग होऊन त्याच्यावर आदळलं होतं का, असा प्रश्‍न माझ्या मनात पुनःपुन्हा येत राहिला...

Web Title: sanjay sagade write article in saptarang