सामान्य-असामान्य : कायापालट

आज रामनवमी. मर्यादापुरुषोत्तम, धर्मशास्त्र पारंगत, अद्वितीय सेनानी, राज्यकुशल श्रीरामाला वंदन करण्याचा दिवस. तसेच रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांचे स्मरण करण्याचा दिवस.
Metamorphosis
Metamorphosissakal
Summary

आज रामनवमी. मर्यादापुरुषोत्तम, धर्मशास्त्र पारंगत, अद्वितीय सेनानी, राज्यकुशल श्रीरामाला वंदन करण्याचा दिवस. तसेच रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांचे स्मरण करण्याचा दिवस.

- डॉ. संजय वाटवे

आज रामनवमी. मर्यादापुरुषोत्तम, धर्मशास्त्र पारंगत, अद्वितीय सेनानी, राज्यकुशल श्रीरामाला वंदन करण्याचा दिवस. तसेच रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांचे स्मरण करण्याचा दिवस.

मनुष्य स्वभाव कधीच बदलत नाही. त्याचं वागणं, बोलणं, विचार, जीवनदृष्टी कायम ठाम असते. अशा सगळ्या गैरसमजुती समाजात दृढ आहेत. या समजुतीच्या विपरित अनुभव आमच्याकडे वारंवार येतो. काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’मध्ये ‘स्वभावाला औषध आहे’ अशी एक लेखमाला लिहिली होती. अनेक केसेस सादर करून सप्रमाण सिद्धही करून दाखविल्या होत्या.

अनिलभाऊ मारणे ही तशीच एक केस. अनिलभाऊ चाकणचा दादा. सगळीकडे दादागिरी करून स्वतःची दहशत माजवली होती. गावातले सगळे लोक टरकून असायचे. उंचापुरा, दांडगा, मोठ्ठा चेहरा, भव्य कपाळ, तरतरीत नाक, भेदक डोळे. मोठी गोलाकार दाढी. चालणं तरातरा, बोलणं भराभरा. आवाजात दम आणि अंगात रग. अनिलभाऊंच्या बुलेटचा आवाज ऐकला, की बाजारात पळापळ व्हायची. एकदा बाजारात त्याला पोलिसानं हटकलं होतं, तेव्हा त्या पोलिसाला मारत बाजारात फिरवलं होतं. तेव्हापासून पोलिसही त्याच्या नादाला लागत नसत.

दादागिरी आणि दहशतवाद हाच अनिलभाऊंचा धंदा बनला. अनिलभाऊविरुद्ध कोणी बोललं, की अनिलभाऊ त्याला अमानुष मारहाण करायचा. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. संघटित विरोध करायचा म्हटला, तर अनिलभाऊची गँगच संघटित होती. तसाही तो स्वतः दांडगा असल्यामुळे त्याला कोणाची गरज नव्हती. सुरुवातीला बुलेटमधे तलवार ठेवणारा अनिलभाऊ नंतर प्रगती करून शर्टच्या खिशात कट्टा पण ठेवायला लागला होता. त्याचं ‘ऑफिस’ पंचायत ऑफिसच्या शेजारी एका कट्ट्यावर भरायचं. ऑफिसच नावच होतं ‘अनिलभाऊंचा कट्टा!’ अनिलभाऊ कट्ट्यावर बसून ‘न्यायनिवाडे’ करायचा. कोणाला ‘समजावून सांगायचं असेल’ किंवा कोणाला घरी जाऊन ‘प्रेमानं पटवून द्यायचं असेल’ अशी कामं तो करायचा. अनिलभाऊंची मध्यस्थी घेऊन ‘समजावण्याचा’, ‘पटवण्याचा’ आणि ‘मिटवण्याचा’ धंदा जोरात चालला होता. यामुळे साम्राज्य आणि दामराज्य विस्तारलं होतं.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, असला दांडगोबा दादा माझ्याकडे कशाला येईल? तेही सगळं मस्तीत चाललेलं असताना. त्याचं असं झालं की, माणसाला अनेक लगाम असतात किंवा असले पाहिजेत. सध्याच्या बेबंद परिस्थितीत एकच लगाम उरलाय तो म्हणजे आजाराचा, अनारोग्याचा. शरीराच्या सिग्नलपुढे मान तुकवावीच लागते. जीवनपद्धती बदलावीच लागते. त्याशिवाय आजार जातच नाही. डॉक्टरची फी दिली, म्हणजे त्याला विकत घेतला या माजाची मात्रा आजारावर चालत नाही. आपली आजारावर सत्ता नाही. आजाराची आपल्यावर सत्ता चालते. डॉक्टरांना बुकलून काढून, काळं फासून, धिंगाणे करून किंवा थप्प्या फेकून आरोग्य विकत मिळत नाही.

अनिलभाऊंना मस्तकशूळ उठण्याचा आजार होता. त्याचबरोबर पोटात असह्य कळा यायच्या. अनेक डॉक्टर झाले, तपासण्या झाल्या, आजार वाढतच चालला. मस्तकशूळ उठला, की दिवस दिवस झोपून राहावे लागे. पेन किलर मूठमूठ खाऊनही फायदा होत नसे. पोटात कळ उठली, की खायचे वांदे व्हायला लागले.

शेवटी चाकणच्या एमडी डॉक्टरांनी माझ्याकडे केस पाठवली. अनिलभाऊ दांडगाहोताच; पण चौकसही होताच. ‘सगळ्या तपासण्या निगेटिव्ह येतात, मग मला झालंय तरी काय?’ मी अनिलभाऊंना सगळं समजावत गेलो. दोन-तीन भेटींनंतर माझ्यावर पूर्ण विश्वास बसायला लागला. शंका लिहून आणायला लागला. मी त्याला त्याची लाइफस्टाईल आणि त्यामुळे होणारी sympathetic over activity समजावून सांगितली. आश्चर्य म्हणजे फारसं शिक्षण नसताना त्याला सगळं कळलं. त्यानं योगा प्राणायाम सुरू केला. चार महिन्यांत दोन्ही आजार बरेचसे कमी झाले. अनिलभाऊंना सगळं पटलं असावं. त्यांनी हळूहळू आपली लाईन सोडून दिली. गावात व्यायामशाळा काढून आणि कबड्डी संघ काढून तरुणांना चांगलं वळण लावू लागला.

बरेच वर्षांनी चाकणची एक डोकेदुखीची केस माझ्याकडे डायरेक्ट आली. तो अनिलभाऊंच्या जुन्या लाईनीतला होता. अनिलभाऊंनी रेफर केला होता. त्याला सांगितलं होतं, ‘डॉक्टर कडक शिस्तीचे आहेत. तिथे डांगडिंग चालणार नाही. तुझ्यामुळे त्यांना त्रास झाला तर माझी इज्जत जाईल. मी तुला १०८ वेळा रामरक्षा म्हणायला लावीन. त्यामुळे तिथे शात बसायचं.’

मी विचारलं, ‘बरेच वर्षांत अनिलभाऊंची काही बातमी नाही. त्यांचं काय चाललंय? कसं चाललंय?’ तो पेशंट म्हणाला, ‘अनिलभाऊ नाही. ते अनिलबुवा आहेत. कीर्तनकार आहेत. कीर्तन, भजन, प्रवचनकार! त्यांची स्वतःची दिंडी पण आहे. दरवर्षी एकादशीला पंढरपूरला दिंडी नेतात.’’ मी ऐकतच राहिलो.

मित्रांनो, स्वभावाला औषध आहे; पण ज्याला हवंय त्यालाच आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com