फळ्यावरच्या माशाने घडवली किमया!

शिक्षण हे जसं जाणतेपणी घडतं, तसं ते अजाणतेपणीही घडतं. वर्गात शिक्षक म्हणतात, मुलांनो, इकडे लक्ष द्या आणि मग शिक्षक शिकवतात.
Fish
Fishsakal
Summary

शिक्षण हे जसं जाणतेपणी घडतं, तसं ते अजाणतेपणीही घडतं. वर्गात शिक्षक म्हणतात, मुलांनो, इकडे लक्ष द्या आणि मग शिक्षक शिकवतात.

शिक्षण हे जसं जाणतेपणी घडतं, तसं ते अजाणतेपणीही घडतं. वर्गात शिक्षक म्हणतात, मुलांनो, इकडे लक्ष द्या आणि मग शिक्षक शिकवतात. म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी मुलांनी प्रयत्न करावा, आपलं म्हणणं व्यवस्थित समजून घ्यावं, अशी शिक्षकांची अपेक्षा असते. हे झालं जाणतेपणाचे शिक्षण. तेवढेच शिक्षण अजाणतेपणीसुद्धा होतच असतं. अशाच अजाणतेपणाने होणाऱ्या शिक्षणाबद्दलची ही गोष्ट...

एका शिक्षण संस्थेतर्फे त्यांच्याच शाळेच्या शिक्षकांची संवाद कौशल्य कार्यशाळा मी घेतली होती. कार्यशाळा पार पडली. सर्व शिक्षक खूष झाले. मुलांबरोबर संवादाचे वेगवेगळे प्रयोग समजावून दिले. मी परत जायला निघणार तेवढ्यात संचालकांनी विचारले, की तुमची गाडी रात्रीची आहे. भरपूर वेळ आहे. मधल्या वेळेत आपण आमच्या शाळेला भेट द्याल का? सर्व वर्गांमधून थोडा फेरफटका माराल का? मला ही कल्पना आवडली. कारण वर्गांवर फेरफटका मारताना शिक्षकांशी आणि मुलांशी थोडाफार संवाद साधता येतो. मुलांच्या क्षमता नीट समजतात. शिक्षक आणि मुलांमधला संवाद कसा आहे, हे प्रत्यक्ष अनुभवताही येतं.

मी वर्गात फिरू लागलो. लहान मुलांच्या वर्गातून जाताना मला शिक्षकाने फळ्यावर रेखाटलेला मासा दिसला. मुलांनी आपल्या परीने आपल्या वहीत तसाच मासा रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. फळ्यावरचा तो मासा पाहून मला शिक्षकांची, शिक्षणाची आणि समोर बसलेल्या मुलांची दयाच आली...

मी शिक्षकांना विचारलं की

‘तुम्ही कधी मासा प्रत्यक्ष पाहिला आहे का?’

शिक्षक गोंधळात पडले आणि कसंनुसं म्हणाले, ‘‘हो! मी मासा पाहिला आहे...’

‘मासा ही फळ्यावर दाखवण्याची गोष्ट आहे, की प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं?’ माझ्या प्रश्नावर ते पुन्हा गोंधळात पडले.

‘मासे पाण्यात समूहाने फिरतात. त्यांचे नाना प्रकारचे रंग असतात. आकार असतात. माशांची लय, त्यांचे कल्ले, पंख, त्यांचं पोहणं, पाण्यात वर-खाली उसळी मारणं... यामध्ये एक गंमत आहे. ही गंमत तुम्ही दाखवलेल्या फळ्यावरच्या माशात कशी येणार तुम्हीच सांगा?’

माझ्या प्रश्नावर ते थोडे हसले. त्यांना माझं म्हणणं मान्य झालेलं दिसलं.

‘तुमच्यासमोर बसलेली बहुतेक मुलं ही टीव्ही चॅनेल्स बघणारी आहेत. ती मोबाईल बघतात. कम्प्युटरवर सर्फिंग करतात. त्यांनी समुद्राखालचं विश्व दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे पाहिलेलं असू शकतं. जलचर सृष्टीचा त्यांना या माध्यमातून पूर्वीच परिचय झालेला असू शकतो. अशावेळी तुम्ही फळ्यावर एक निर्जीव मासा कसाबसा रेखाटण्याने त्यांच्या प्रत्ययामध्ये, अनुभवात, ज्ञानात असा कोणता फरक घडणार आहे?’

त्या संस्थेचे संचालक आणि पदाधिकारी माझ्यासोबतच फेरफटका मारत होते. त्यांनी हस्तक्षेप करत मला म्हटलं की, ‘सर! आम्ही मुलांना मत्स्यालय दाखवायला नेतो ना वर्षातून एकदा... आमची तशी शैक्षणिक सहलच असते..!’

मला संचालकांचा किंवा शिक्षकांचा हिरमोड करायचा नव्हता. त्याच वेळी त्यांना व्यवस्थित संदेशही द्यायचा होता. मी म्हणालो, ‘तुम्ही मुलांना मत्स्यालय दाखवायला नेता हे खूपच छान करता; पण अशी कल्पना करा की मत्स्यालय आपण शाळेत आणलं तर?’ माझ्या प्रश्नावर सगळेच उपस्थित आश्चर्यचकित झाले. ‘तुमच्यापैकी कुणाला मासे पाळण्याची आवड आहे का?’ मी उपस्थितांकडे वळत प्रश्न केला. त्यावर एका शिक्षिकेने हात वर केला. त्या म्हणाल्या की, ‘मला मासे पाळण्याची खूप आवड आहे... आमच्याकडे घरात शोभिवंत माशांचा मोठा टँकच आहे!’

कार्यशाळेच्या निमित्ताने मी यातल्या अनेक शिक्षकांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे तोंडओळख झालीच होती. मी त्यांना म्हटलं की, ‘शाळेत आपण मुलांसाठी असा टँक आणला तर तुम्ही माशांची काळजी घ्यायला मुलांना शिकवाल का?’’ त्या आनंदाने तात्काळ ‘हो’ म्हणाल्या. आवडीचं काम मिळाल्याने माणूस किती हरखून जातो... आनंदी होतो हे मी प्रत्यक्ष पाहत होतो.

मी संचालकांकडे पाहिलं आणि म्हटलं की, ‘‘आपण शाळेत माशांचा टॅंक आणला तर मुलांना ते मासे रोज पाहता येतील आणि बारकाईने निरीक्षणही करता येईल. फळ्यावरच्या निर्जीव माशापेक्षा प्रत्यक्ष टॅंक आणून ठेवण्याने मुलांच्या अनुभव विश्वात खूपच भर पडेल.’’

‘किती खर्च येतो मॅडम?’, संचालकांनी थेट शिक्षिकेलाच विचारले. ‘सुरुवातीचा खर्च चार-पाच हजार होऊ शकेल. नंतर महिन्याला खाद्यापुरते चार-पाचशे पुरतात; पण खूप एन्जॉय करतात मुलं. मासे अंडी घालतात... त्यांची पिल्लं मोठी होतात.. मग त्यांना वेगळं काढावं लागतं.. हे सगळं खूप मजेशीर असतं. मुलांना नक्की आवडेल!’ मॅडम उत्साहाने बोलत होत्या. ‘बस! एवढाच खर्च?’ असं म्हणत संचालकांनी जागच्या जागी या प्रस्तावाला अनुमती देऊन टाकली. आश्चर्य म्हणजे, ते म्हणाले, ‘‘उशीर कशाला? आजच आणि आत्ताच माशांचा टॅंक आपल्याकडे बसवून टाका... मॅडम, तुम्ही जाऊन सगळं व्यवस्थित खरेदी करा आणि दोन तासांत... म्हणजे सर निघायच्या आत इथे टॅंकमध्ये मासे दिसले पाहिजेत... ज्या मुलांनी आज फळ्यावर निर्जीव मासे पाहिले... त्यांना आज आपण खरेखुरे जिवंत मासे दाखवू... मगच घरी पाठवू!’’ संचालकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. त्यांनी ताबडतोब व्हाऊचरवर सही करून मॅडमसह स्वतःची गाडी मासे आणि टॅंक आणण्यासाठी रवाना केलीसुद्धा!

वर्गांवर फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही चहा प्यायला बसलो. संचालकांची विनोद बुद्धी तीक्ष्ण होती. ते म्हणाले, ‘साहेब, तुमच्या म्हणण्याखातर माशांचा टॅंक आणि मासे आणतो आहे... पण उद्या वाघाचा पिंजरा बसवायला सांगू नका किंवा हत्ती मुलांना प्रत्यक्ष दाखवा, असं म्हणू नका... नाहीतर आमचं दिवाळं निघायचं!’’ त्यांच्या म्हणण्यावर मीही हसून दाद दिली. त्यांचे सहकारी आणि शिक्षकही मनमुराद हसले.

मी काही सांगू लागलो, ‘शिक्षण हे जसं जाणतेपणी घडतं, तसंच ते अजाणतेपणीही घडतं. वर्गात बघा. शिक्षक म्हणतात, मुलांनो, इकडे लक्ष द्या आणि मग शिक्षक शिकवतात. म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी मुलांनी प्रयत्न करावा, आपल्याकडे नीट लक्ष द्यावं, आपलं म्हणणं व्यवस्थित समजून घ्यावं, अशी शिक्षकांची अपेक्षा असते. हे झालं जाणतेपणाचे शिक्षण. तेवढेच शिक्षण अजाणतेपणीसुद्धा होतच असतं. म्हणजे समजा तुम्ही हा माशांचा टॅंक अशा ठिकाणी ठेवला, जिथे तो मुलांना येता-जाता सहज दिसेल... तर मुलं मधल्या सुट्टीत किंवा त्यांच्या मोकळ्या वेळेत तो बघतील. निरीक्षण करतील. मनात काहीतरी नोंद घेतील. स्वतःचे काहीतरी निष्कर्ष काढतील. आकार पाहतील, रंग पाहतील. हे सगळं आपोआप घडत राहील. हे झालं अजाणतेपणाचे शिक्षण. म्हणजे ते स्वतःहून शिकतात. नकळत शिकतात. हे जे अजाणता घडलेलं शिक्षण आहे, ते आपण शाळा म्हणून आणि घरात पालक म्हणून मुलांना द्यायचं असतं. अगदी सहज!’’

संचालकांनी माझ्या उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे मधल्या रिकाम्या वेळेत त्यांनी काही पालकांना बोलावलं होतं. त्या पालकांबरोबर माझा संवाद घडवून आणला. तेही छोटंस सेशन छान झालं. ते संपता संपता मला निरोप आला, की माशांचा टॅंक आला आहे. मी पालकांना शाळेत आता माशांचा टॅंक आल्याची खुशखबर दिली. पालकांना ती मनोमन आवडली. काही पालक तर म्हणालेच, की मुलं खूप आग्रह करतात घरी मासे आणू म्हणून, पण कोण करणार त्यांचं! म्हणून आम्ही काही आणले नाहीत. आता शाळेत त्यांना मासे बघायला मिळतील हे बरं आहे...

आम्ही बाहेर आलो तेव्हा मोठ्या संख्येने मुलं, शिक्षक असे सगळे जमले होते. माझ्या हस्ते फीत कापून टॅंकचं रितसर उद्‌घाटन करण्यात आलं. कार्यक्रम संपला. पांगापांग झाली. थोड्या वेळाने मी निघालो, तेव्हा पाहिलं... जवळपास आठ-दहा लहान मुलं त्या टॅंकला चिकटली होती. त्यांचं कुतूहल जागं झालं होतं आणि अजाणतेपणाचं त्यांचं शिक्षण सुरू झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com