पालकांनी सोडवावं असं महत्त्वाचं कोडं!

पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर दूध आहे आणि तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध आहे. सर्वाधिक दूध कशात आहे, असा प्रश्‍न पालकांना केला. शांतता पसरली.
Parents
ParentsSakal
Summary

पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर दूध आहे आणि तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध आहे. सर्वाधिक दूध कशात आहे, असा प्रश्‍न पालकांना केला. शांतता पसरली.

पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर दूध आहे आणि तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध आहे. सर्वाधिक दूध कशात आहे, असा प्रश्‍न पालकांना केला. शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात काही तरी उत्तर तयार झालं असणार; पण आपण प्रथम कसं बोलायचं, या शंकेने बहुतेक सर्वच पालक गप्प राहिले होते. काही पालक विचारात पडले... हे कोडं पालकांनी सोडवल्याची गोष्ट...

पालकांच्या कार्यशाळेला खच्चून गर्दी झाली होती. सर्व पालक जागा करून कसेबसे बसले होते. काही पालक उशिरा आल्यामुळे त्यांनी कुठे बसायचं, या प्रश्नामुळे थोडा गोंधळ उडाला होता. त्यांचं आपापसात बोलणं सुरू होतं. ही परिस्थिती लवकर आटोक्यात येण्यासारखी नव्हती, हे ओळखून मी हस्तक्षेप केला. मी माइकमध्ये म्हटलं,

‘मला तुम्हाला एक कोडं घालायचं आहे... तुम्ही माझं कोडं ऐकणार का?’

अनेक पालक हे मुलांसारखंच वागतात. फक्त मुलं समोर असली, की ते पालकांसारखं वागण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं हे मला पक्क ठाऊक असल्यामुळे ‘मी कोडं घालतो’ असं सांगून सुरुवात केली. माझ्या या घोषणेकडे सर्व पालकांनी कान टवकारले आणि साहजिकच हॉलमध्ये शांतता पसरली.

मी पालकांना सांगितलं, की ‘मी जे कोडं तुम्हाला घालणार आहे, त्याचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे! बघू या तुम्हाला कोडं सोडवता येतं का?’

मी त्यांना माझं कोडं सांगू लागलो.

‘आपल्यासमोर एकूण दोन भांडी आहेत. एक भांडं हे पाच लिटर क्षमतेचं आहे; तर दुसरं भांडं तीन लिटर क्षमतेचं आहे.’

एवढं बोलून मी या दोन्ही गोष्टी त्यांना पुन्हा एकदा सांगितल्या.

‘समजलं का?’ असं मी विचारताच सगळ्यांनी होकार दिला. काही उत्साही पालक लिहून घेऊ लागले.

‘पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर दूध आहे आणि तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध आहे. आता मला सांगा सर्वाधिक दूध कशात आहे,’ माझ्या या प्रश्नावर पालकांमध्ये शांतता पसरली.

मला याची कल्पना होती, की प्रत्येकाच्या मनात काही तरी उत्तर तयार झालं असणार; पण आपण प्रथम कसं बोलायचं, या शंकेने बहुतेक सर्वच पालक गप्प राहिले. काही पालक विचारात पडले. काही आपसात बोलू लागले. मग मीच म्हटलं,’ तुम्ही हवं तर पाच मिनिटे विचार करा आणि नंतर मला सांगा, की सर्वाधिक दूध कशात आहे?’ पण एकच मिनिटात एक पालक उठल्या आणि म्हणाल्या, ‘ज्यात तीन लिटर दूध आहे, त्यातच सर्वाधिक दूध आहे, हे उघड आहे... म्हणजे पाच लिटरच्या भांड्यात स्वाभाविकच सर्वाधिक दूध आहे.’

त्यांच्या उत्तरामध्ये अनेकांनी ‘हो’ मिसळला आणि पाच लिटरच्या भांड्यात सर्वाधिक दूध आहे, असा निष्कर्ष काढला. अर्थात काही पालक मात्र अजूनही गोंधळात होते. त्यांना हे कळत होतं, की पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर म्हणजे सर्वाधिक दूध आहे. पण तीन लिटरच्या भांड्यात अडीच लिटर दूध असलं, तरी तेही कमी नाही, असं काही पालकांना वाटत होतं. म्हणजेच दोन्ही भांड्यांमध्ये, भांड्यांच्या क्षमतेमध्ये आणि प्रत्यक्ष दुधामध्ये फरक वाटत असला तरी या कोड्यात काही तरी वेगळी गंमत आहे, असे वाटून ते विचार करू लागले.

काही पालकांनी वहीमध्ये चक्क दोन भांड्यांचं चित्र काढलं, त्यात दूध आहे अशी कल्पना केली आणि पुन्हा पुन्हा ते विचार करू लागले.

एका पालकांनी आत्मविश्वासाने हात वर केला.

मी त्यांना बोलायला सांगितलं. त्या बोलू लागल्या.

‘सर, तीन लिटरच्या भांड्यात जास्त दूध आहे!’

‘कसं काय?’, त्यांचं कार्यकारण जाणून घेण्यासाठी मी विचारलं.

‘सर, तुम्ही इथे तुलना मांडली आहे आणि संख्येच्या नव्हे, तर तुलनेच्या आधारावर जास्त दूध कशात आहे, हे बघायचं आहे. पाच लिटरच्या भांड्यात तीन लिटर, म्हणजे पाच लिटर क्षमतेच्या फक्त ६० टक्के दूध आहे.’’

त्या पालकांच्या चेहऱ्यावर उत्तर सापडल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

मी मनातल्या मनात खूष झालो. कारण या पालक नेमक्या उत्तराच्या दिशेने प्रवास करू लागल्या होत्या. इतर अनेक पालकांच्या चेहऱ्यावर उत्कंठा दाटली होती, कारण त्यांना तीन लिटर हे जास्त वाटत होतं आणि इथे या पालक अडीच लिटर जास्त आहे असं सांगत होत्या.

‘पाच लिटरच्या भांड्यापेक्षा तीन लिटरचं भांडं कमी आहे हे मान्य! पण त्यात अडीच लिटर दूध म्हणजेच सुमारे ८३ टक्के दूध आहे. टक्केवारीत पाहिलं तर पाच लिटरच्या भांड्यामधली तीन लिटर दुधाची टक्केवारी ६० टक्के भरते. तुलना करायची झाली तर अडीच लिटर दूध हे तीन लिटर दुधापेक्षा जास्त आहे, कारण त्याने भांड्याचा अधिकाधिक भाग व्यापला आहे! त्यामुळे अशी तुलना करताच येणार नाही, सर!’

त्या पालकांनी कोड्याचं नेमकं उत्तर खूप सहजपणे सांगितलं आणि आपलं म्हणणंसुद्धा मांडलं.

मी त्यांच्या उत्तरावर खूष होऊन टाळ्या वाजवल्या. माझ्या मागोमाग इतर पालकांनी टाळ्या वाजवल्या...

‘आपण आज एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो आहोत’ माझ्या म्हणण्याकडे सर्व पालक लक्ष देऊन ऐकू लागले.

‘ही महत्त्वाची गोष्ट अशी, की सरसकट कुठलीही तुलना कशाशीही न करता प्रत्येक गोष्टीची तुलना ही त्याच्या मूळ क्षमतेबरोबर करायची असते. दोन भांड्यांमध्ये तुलना करणं जसं चुकीचं आहे, तसं दोन पाल्यांमध्ये तुलना करणंही चुकीचंच आहे. तीन लिटरच्या भांड्यात ८३ टक्के दूध आहे, म्हणजे त्यात जास्त दूध आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण आपल्या मुलांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष का करतो? आपल्याला हेही माहिती आहे, की सर्व मुलांची क्षमता सारखी नसते. मुलांची क्षमता ही विषय, कौशल्य, आवड, अभ्यासू वृत्ती, विशिष्ट विषयातील गती, कल, आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वभाव, पालकांकडून झालेले संस्कार, संगत यानुसार बदलत असते. मग दोन विद्यार्थ्यांची तुलना आपण एकमेकांशी का करतो? ते राहू दे! आपण दोन सख्ख्या भावंडांची तुलनाही करतो! तोही मोह आपल्याला आवरत नाही... असं आपण का करतो? प्रत्येकाची कामगिरी ही त्याच्या क्षमतेनुसार तपासली जावी, हे आपल्याला दुधाच्या बाबतीत कळतं... पातेल्याच्या बाबतीत कळतं... मग आपल्या मुलांच्या बाबतीत का कळत नाही? आपलं मूल जर ८० टक्के मार्क मिळवण्याच्या क्षमतेचं असेल आणि त्यानं ७५ टक्के मार्क मिळवले, तर आपण तो आनंद साजरा करायला पाहिजे! आणि ९९ टक्के क्षमता असूनसुद्धा त्या मुलाला समजा ८० टक्के मार्क पडले, तर त्याच्या आई-वडिलांनी आपल्या पाल्याला न दुखावता किंवा नकारात्मक प्रतिक्रिया न देता आत्मपरीक्षण करायला पाहिजे. माझं म्हणणं तुम्हाला पटतंय ना,’ माझ्या प्रश्नावर पालकांचा कोरसमध्ये ‘हो’ आला.

‘प्रश्न मूळ क्षमतेला पूर्ण न्याय देण्याचा असतो! आपल्या मुलांनी आपल्यातील क्षमतेला आधी पूर्ण न्याय द्यावा यासाठी पालकांनी प्रयत्न करायचे असतात. एकदा स्वयंप्रेरणा जागी झाली, की मुलं आपली क्षमता वाढवण्याच्या आणि आपल्या कक्षा रुंदावण्याच्या मागे स्वतःहून लागतात... त्या प्रयत्नाऐवजी अनेक पालक तुलना करून मुलांमधली मूळ क्षमता मारून टाकतात आणि त्यांचा आत्मविश्वास खच्ची करतात. मुलांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असतं. मार्गदर्शन आवश्यक असतं. समजून घेणंही आवश्यक असतं. जशी दोन भांड्यांची तुलना होऊ शकत नाही, तशीच दोन विद्यार्थ्यांचीही तुलना होऊ शकत नाही, एवढं आपण लक्षात घेऊ आणि मुलांची क्षमता, मुलांमधली उत्तमता वाढावी यासाठी प्रयत्न करू... एवढंच आश्वासन मी आज तुमच्याकडून मागतो आहे... तुम्ही सगळे यासाठी तयार आहात ना,’ मी विचारलं.

सर्व पालकांनी पुन्हा आनंदाने ‘हो’ असं म्हणून आपला होकार नोंदवला!

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com