संक्रांत ते व्हॅलेन्टाईन... एक 'उत्तरा'यण

संक्रांत ते व्हॅलेन्टाईन... एक 'उत्तरा'यण
संक्रांत ते व्हॅलेन्टाईन... एक 'उत्तरा'यण

गेल्या दोन महिन्यांपासून बॅंका नि एटीएमसमोर लागलेल्या रांगा आता काहीशा आक्रसल्या आहेत... एटीएममधून दोन-अडीच हजारांऐवजी चार-साडेचार हजार रुपये मिळू लागल्यानं गर्दी बऱ्यापैकी घटलीय... आठ नोव्हेंबरच्या रात्रीनंतर आपल्याच जुन्या नोटांना दूर सारण्याचं अन्‌ त्यांच्या बदल्यात नव्या नोटांना आपलसं करण्यासाठी जो तो झटत होता... थंडीतल्या दुपारीही घामानं निथळलेल्या अवस्थेत प्रत्येक जण स्वतःच्या मताचे अन्‌ देशाच्या हिताचे 'अर्थ' नि 'कारण' शोधत राहिला... कालच्या नोटा नकोशा झाल्या होत्या, नव्या हाताशी येतही नव्हत्या... ही जीवघेणी घालमेल ज्याच्या वाट्याला आली नाही, असा 'नोटवाला' सांप्रत देशी सापडणार नाही. नव्या नोटेच्या गुलाबी स्वप्नाची ही वाट तशी काटेरी, तरी प्रत्येकासाठी अटळ होती. बॅंका, एटीएमच्या रांगांतून हाती लागलेली एखादी गुलाबी नोट शर्टाच्या खिशात अलगद ठेवून पुढं निघालेल्या तमाम मराठी जनांच्या दृष्टीला एका नव्या सिनेमाचं पोस्टर पडलं नि गुलाबी खिशाखालच्या हृदयाचे कप्पे उगाच धडधडू लागले... जणू काहीतरी प्रचंड वेगानं बाहेर येऊ पाहत होतं अन्‌ काहीतरी त्याला तेवढ्याच जोमानं रोखत होतं... समोरचं पोस्टर विचारंत होतं, "ती' सध्या काय करते..? अन्‌ इकडे दिलाचं प्रत्येक कंपन त्याचं उत्तर मागत होतं... जुन्या नोटांचं दुःस्वप्न मोठ्या निकरानं पिटाळून लावत नव्या, गुलाबी नोटांच्या स्वप्नपूर्तीत रमलेल्या जीवांचा आता दुसऱ्याच गुलाबी स्वप्नानं पाठलाग सुरू केला होता...

सुखाच्या झोपेचं स्वप्न पाहावं, इतकी जर ती दुर्मिळ झाली असेल, तर झोपेत पडणाऱ्या सुखस्वप्नांचा विचारच न केलेला बरा..! दुनियादारीत पिचलेल्या प्रत्येक जीवाला आधार असतो, तो अशा सुखस्वप्नांचा. आणि अशा स्वप्नांनीच त्याच्या भावविश्‍वाभोवती फेर धरलेला असतो. हा फेर त्याला जगण्याच्या रहाटगाडग्यातून सोडवत असतो नि कळत- नकळत गुंतवतही राहतो. भूतकाळातल्या कटू आठवणींना तो स्वप्नात येऊ देत नाही नि सुखद स्मृतींना काही केल्या जाऊ देत नाही. अर्थात हा अवखळ खेळ त्याचं मन खेळंत असतं. बहिणाबाईंनी त्याला "वढाळ वढाळ' संबोधत, कितीही हाकललं तरी फिरुन फिरुन उभ्या पिकात शिरणाऱ्या गुराची उपमा दिली. पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टीकडं ओढ घेण्याची त्याची खोड काही जात नाही. या चंचल मनानं दिसाउजेडी वा गाढ झोपेत पाहिलेली स्वप्नं ही कित्येकांच्या भावविश्‍वाला समृद्ध करीत असतात. आयुष्यात "सेटल' झालेल्या, होऊ लागलेल्या नि चाळशी ते पन्नास-पंचावन्नच्या मधल्या वयात रेंगाळणाऱ्यांना तर अशा सुखस्वप्नांची जणू आसच लागलेली असते. कामाच्या ठिकाणी वाढलेला ताणतणाव, सार्वजनिक वातावरणातली कमालीची दांभिकता नि बेबनाव अन्‌ घरात अपेक्षा, मागण्या-गाऱ्हाण्यांचा जमाव... या अटळ वाटेवर कधीतरी अवचित एक पोस्टर समोर उभं राहतं नि गूढ हसत विचारतं... "ती' सध्या काय करते? ते पाहणाऱ्यापैकी कित्येकांच्या हृदयाची उगाच क्षणभर धडधड होते... अन्‌ आयुष्याच्या सिनेमाचा फ्लॅशबॅक सुरू होतो...

गेल्या दहा-पंधरा दिवसांत मराठीजनांच्या भावविश्‍वाला "ती' सध्या काय करते? या एकाच प्रश्‍नानं कवेत घेतलंय. सोशल मीडियात हा प्रश्‍न हॅशटॅग करुन वा अगदी सहज विचारुन त्यावर आपापल्या पद्धतीनं उत्तरं देणाऱ्यांच्या नि शोधणाऱ्यांच्या प्रतिभेला खरं तर सलामच केला पाहिजे. सिनेमाच्या दिग्दर्शन वा अभिनयातून कदाचित जे व्यक्त झालं नसेल, ते ते सारं केवळ कल्पनाविलासाने सांगण्याऱ्या, मांडण्याऱ्या, चितारणाऱ्या पोस्ट पाच-सहा इंचांच्या स्क्रीनवरुन बोटाबोटाने पुढं सरकताहेत. त्यातही शाळेत जायला नको म्हणणाऱ्या आपल्या गुबगुबीत "पेढ्या'ला घेऊन स्कूल बसची वाट पाहत थांबलेली "ती'... बसमधून कुण्या "बर्फी'ने या पेढ्याला हाक मारताच तो डोळे पुसत तिकडे धावतो अन्‌ आपल्या या सुपुत्राकडे "ती' माऊली अचंबितपणे पाहत राहते... ही सात-आठ ओळींची गोष्टही दोन पिढ्यातल्या बदलत्या भावविश्‍वाचं नेमकं वर्णन करणारी... कुठून सुचतं हे सगळं सोशल मीडियात वावरणाऱ्यांना, हेही नवं कोडं! अनेक जण "ती' सध्या काय करते, यापेक्षा "ही' सध्या काय करते, हे जास्त महत्वाचं असल्याचं काहीशा उपरोधिक, पण सावध शैलीत सांगत आहेत. आपला मोबाईल "अंडर व्हिजिलन्स' असण्याच्या धास्तीतून आलेली असुरक्षितताही त्याला कारणीभूत असावी! त्यातच "ही'च्या आग्रहामुळं हा सिनेमा बघायला जायची एखाद्यावर वेळ आली अन्‌ तो संपेपर्यंत "ही' पडद्यापेक्षा सारखं त्याच्याकडंच बघत असेल, तर आपण "त्या' गावचेच नाही, अशा स्थितप्रज्ञपणे बसून राहण्यासाठी जे उच्चप्रतीचं कौशल्य लागतं, ते साधनेशिवाय लाभणं केवळ अशक्‍य! ज्यांच्या नॉस्टॅल्जियात अशी कुणी "ती' रुंजी घालत असेल अन्‌ तरीही जे निर्विकार असतील, त्यांनी एक तर अशी साधना साधली असेल अथवा ते "ही'च्याशी सर्वार्थाने एकरुप झाले असतील... या दोन्ही गोष्टी तशा असामान्यत्वाची झलक दाखवणाऱ्या...

"ती' असते कुठं, करते काय, असे प्रश्‍न पडणाऱ्या आजच्या प्रौढ पिढीच्या हाती "त्या' काळी ना मोबाईल होते, ना व्हाटस्‌ ऍप, फेसबुक... अनेकांना या गोष्टी तेव्हा नव्हत्या, याची खंतही असेल. "त्या' गरजेच्या वेळी असलं "माध्यम' असतं, तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं, असंही अनेकांना उगाच वाटू शकतं. अर्थात ही "माध्यमे' तेव्हा नव्हती, यात धन्यता मानणाऱ्यांचीही कमी नसेल अन्‌ त्यात अनेकांच्या "ती'चाही समावेश असू शकतो! पण, शालेय अथवा महाविद्यालयीन जीवन पंचवीस-तीस वर्ष मागे सोडलेली पिढी नव्या माध्यमांतही चांगलीच रमली आहे, हे जास्त महत्वाचं. कुठून कुठून मोबाईल नंबर मिळवून अनेक जुन्या मित्रांचे, शाळा- महाविद्यालयांचे, विशिष्ट वर्षाच्या बॅचचे व्हाटस्‌ ऍप ग्रूप तयार झाले आहेत. अनेकांच्या फेसबुक वॉलवरही जुन्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमलेला असतो. तिथं शुभेच्छा, गप्पा अन्‌ माहितीची देवाणघेवाणही सुरू असते. त्यातूनच मग शाळा- महाविद्यालयांमध्ये जुन्या वर्गांचे गेट टुगेदर होतात. त्या निमित्ताने काहींना सध्या "ती' काय करते, हेही बऱ्यापैकी कळतं. तरीही व्हाटस्‌ ऍप, फेसबुक अथवा अशा गेट टुगेदरमधून होणाऱ्या भेटीगाठींमध्ये अशा सगळ्यांनाच "ती' भेटते असंही नाही. संसाराच्या दुनियादारीशी इमानदारी राखंत अशांचं मन "ती'च्या ठावठिकाणाचा वा नुसतंच कुठंतरी सुखात असण्याचा ठाव घेत राहतं...

"ती'चा शोध ज्याला घ्यायचा त्यानं जरुर घ्यावा, पण त्यातून आपल्या नव्या पिढीच्या हाती निरपेक्ष नि कसदार संबंधांचा ठेवा देण्याची कलाही साधता आली पाहिजे. ज्यांची मुलं-मुली आता "त्या' वयात आली असतील, येत असतील अशांनी त्यांच्याशी वागता-बोलताना आपल्या तरुणपणातल्या मानसिक अवस्थेची आठवण ठेवली, तरी आई-बाप नि मुला-मुलींमध्ये मैत्रीचा नवा बंध निर्माण होईल. कारण "ती' सध्या काय करते? याच्या उत्तराचा शोध कदाचित क्षणात लागेलही अथवा तो आयुष्यभर सुरूही ठेवता येईल... प्रश्‍न आहे तो, या स्वप्नरंजनाच्या पलीकडं जावून खऱ्या आयुष्यात कुठं थांबायचं हे ओळखण्याचा. भूतकाळातल्या सुखस्मृतीत काही काळ रमलंही पाहिजे, अनेकदा त्यातून नवं काहीतरी हाती लागतं. फक्त तिथं रेंगाळायचं किती, हेही महत्वाचं. "तिचा' वा "त्याचा' शोध घ्यायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला कुणाची काही हरकत असण्याचं कारण नाही, पण त्यातून पुढं तयार होणाऱ्या नव्या नात्याला भावनिक नि वैचारिक परिपक्वतेची फळं लगडली, तर त्या शोधाला काही अर्थ आहे...

सकस विचारांच्या मातीत मनाची मशागत झाली की अशी फळं आपोआप हाती येतात. 'दिल-ए-नादॉं तुझे हुऑ क्‍या है...' असं विचारणाऱ्या गालिबपासून मन मोकाट मोकाट त्याच्या ठाई ठाई वाटा... असं मानणाऱ्या बहिणाबाईंपर्यंत अनेकांनी मनाला मेंदूवर स्वार होऊ देऊ नका, हेच तर सांगितलंय. या मनावर स्नेहाचा, गोडीचा संस्कार करणाऱ्या संक्रांतीपासून अदृश्‍य ओढीच्या व्हॅलेन्टाईनपर्यंत... "ती' सध्या काय करते? यांसारख्या आयुष्यात पडणाऱ्या साऱ्या प्रश्‍नांचे "उत्तरा'यण अशा विवेक-विचारांच्या प्रगल्भतेनेच पूर्ण होऊ शकते... आपल्याला गवसलेल्या शुभ्र वास्तवाच्या हातात हात घालून फुलांची वाट चालायची की आपल्यापासून दुरावलेल्या नि आभासी बनलेल्या गुलाबी स्वप्नाचा काटेरी पाठलाग सुरू ठेवायचा..? काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com