सुखावह कशी होईल ‘सप्तपदी’

मानसशास्त्र या विषयातील उच्चविद्याविभूषित, मानसिक समुपदेशन या विषयातील अधिकारी डॉ. मेधा कुमठेकर
उच्चविद्याविभूषित
उच्चविद्याविभूषितsakal

मानसशास्त्र या विषयातील उच्चविद्याविभूषित, मानसिक समुपदेशन या विषयातील अधिकारी डॉ. मेधा कुमठेकर यांचं ‘राग-रंग समतोल वैवाहिक जीवनाचे’ हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत, वाचनीय तर आहेच; पण वैवाहिक जीवनात बनाव-बेबनाव घडतात कसे व त्यावर काय करावं, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं आहे व म्हणून संग्राह्यसुद्धा आहे.

या पुस्तकात कुठले मुद्दे मुख्य करून चर्चा केले गेले असतील याची कल्पना यावी म्हणून चार विधानं मांडलेली आहेत : विवाह ठरण्यापूर्वी, विवाह झाला तरी, रिक्त शिंपल्यांची घरे आणि दुरून डोंगर साजरे. म्हणजे एकंदरच सर्व वैवाहिक जीवनाच्या बऱ्या-वाईट मुद्द्यांची चर्चा आता प्रस्तुत आहे असा अंदाज येतो.

या पुस्तकात विषय मांडण्यासाठी व्यक्तिवृत्तांत (केस स्टडी) या पद्धतीचा उपयोग केला आहे. यात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्ती नॉर्मल आहेत, तरी त्यांना समस्या येत आहेत, त्या दूर करण्यासाठी काय करावं असा प्रश्न विचारून, त्यासाठीची शास्त्रीय तंत्रं या पुस्तकात सांगितली आहेत, अशी आश्वासक माहिती दिली आहे.

सर्वजण सुखाच्या आशेनेच लग्न करतात. मग त्यामधील काहीजण सुखाच्या सोपानाने वर चढत जाण्याऐवजी असे मजल दर मजल खाली उतरत कोरड्याठाक खडकापर्यंत का येतात? आणि, काही जण तो मार्गच का सोडून देतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात खरीखुरी उदाहरणं घेऊन दिलेली आहेत. त्यामुळे त्यातील मजकूर प्रत्ययकारी वाटतो. तसं पाहिलं तर अशा प्रकारचं दुःखाचं किंवा अडचणींचं निवेदन नकोसं वाटणं शक्य आहे. पण कुमठेकर यांचं विषय मांडणीचं कौशल्य सफाईदार व तर्कसंगत आहे, भाषा सरळ व सोपी आहे आणि शैली प्रवाही आहे, त्यामुळे वाचक त्या कथेत (म्हणजे त्या जोडप्याच्या उदाहरणात) गुंतून राहतो.

विवाहाच्या सुखाच्या आशेने सुरू झालेला प्रवास असा रखरखीत कोरड्या तळापर्यंत का पोहोचतो, याचं सकारण तर्कसंगत उत्तर लेखिकेने प्रत्येक उदाहरणात परिणामकारकरीत्या साध्या भाषेत दिलं आहे. अर्थात, सर्व विवेचन मानसशास्त्राच्या अंगाने केलं आहे, त्यामध्ये आदर्शवाद किंवा कायद्याची क्लिष्टता आणलेली नाही. मनं जुळतात म्हणून शरीरं जुळतात, मनं दुभंगतात म्हणून नाती तुटतात, यामागील मानसिकता यथातथ्य वर्णिली आहे.

आता दोन गोष्टी संभवतात. पहिली, त्या जोडप्याला आपलं एकमेकांत पटत नाही हे कळतं. जुळवून घेण्याच्या साध्या व्यावहारिक युक्त्या (उदा. वडील माणसांचा सल्ला वगैरे) त्यांनी वापरूनही पाहिलेल्या असतात. तरीदेखील जमत नाही ते नाहीच. आपण हळूहळू विसंवादाच्या चिखलात रुतत आहोत हे त्यांना कळतं. पुढे काय करायचं? इथे शास्त्रशुद्ध, मानसिक वैवाहिक समुपदेशनामुळे मदत होऊ शकते. हे समुपदेशन म्हणजे कोरडा उपदेश नसतो, शहाणपणाचे डोस पाजणे नसतं, तर मानसशास्त्रानुसार, बिनसलेलं नातं परत सुधारावं कसं याचं मार्गदर्शन असतं. समुपदेशक ते मार्गदर्शन वस्तुनिष्ठपणे, साध्या, स्पष्ट; पण खऱ्या शब्दांत करतो. तुमच्यापुढे (म्हणजे त्या जोडप्यापुढे) काय पर्याय आहेत ते मांडतो. प्रत्येक पर्यायाची अधिक व उणी बाजू समजावून सांगतो. कुठला पर्याय या जोडप्यासाठी लागू ठरू शकेल याची सूचनाही देतो; पण त्यामध्ये स्वतः न गुंतता तो बोलतो. पर्यायाची निवड मात्र त्या जोडप्याने किंवा व्यक्तीने स्वतः करायची असते. तिथे समुपदेशक स्वतःचं वजन खर्च करीत नाही. विशिष्ट पर्याय निवडल्यानंतर त्यानुसार कसं वागावं हेही समुपदेशक सांगतो; पण प्रत्यक्ष तसं वागणं मात्र समुपदेशीला (ते जोडपं किंवा व्यक्ती) स्वतः करावं लागतं. त्यात अडचणी आल्यास त्याचंही उत्तर मिळतं; पण वाटचाल मात्र ज्याची त्याला करावी लागते.

दुसऱ्या प्रकारात : आपलं अजिबात पटणार नाही अशी त्या जोडप्याची खात्री झाली आहे. आता काय करता येईल? सोपं उत्तर म्हणजे घटस्फोट. हा शब्द उच्चारायला सोपा आहे; पण तो वापरता येईलच असं नाही. इथे समुपदेशक मदत करतो. घटस्फोटच घ्यायचा असेल, तर त्याची नीट पद्धत काय, ते दाखवून देतो आणि घटस्फोट शक्य नसेल, तर एकमेकांना कमीत कमी त्रास होईल किंवा त्यातल्या त्यात सुख होईल यासाठी वागावं कसं, त्यामागील विचार कसा करावा हे सांगतो.

एकंदर चौदा व्यक्तिवृत्तं (केसेस) मांडलेली आहेत. भाषा सोपी, वाक्यरचना आटोपशीर आणि शैली वर्णनात्मक आहे. हे पुस्तक ललित लेखनाचं नसून शास्त्रीय विवेचनाचं आहे, याचं भान पूर्णपणे राखलं आहे. मुद्देसूद पद्धतशीरपणाची शिस्त काटेकोरपणे पाळली आहे. प्रत्येक उदाहरण सांगताना पार्श्र्वभूमी, समस्या, समस्येची उकल, समुपदेशन, फलित अशा पाच मुद्द्यांना धरून मांडणी केली आहे. त्यामुळे वाचक नेहमी ‘वाचावं आणि समजावून घ्यावं’ या रुळावर राहतो, गोंधळून जात नाही. निष्कर्षाला पोहोचेपर्यंत ‘आपण काही तरी शिकलो बरं का!’ असा उद्‌गार वाचकाच्या ओठांशी येतो.

एक गोष्ट लक्षात घ्यावी, हे पुस्तक म्हणजे नवविवाहितांसाठी लिहिलेली चटपटीत ‘विवाह हस्तपुस्तिका’ (मॅरेज मॅन्युअल) नसून, एकंदर सबंध वैवाहिक जीवनाचा आढावा घेणारं मानसशास्त्रीय लेखन आहे. यामध्ये तरुणवयाची व्यक्तिवृत्तं तर आहेतच; पण लग्न होऊन चांगली तीस-चाळीस वर्षं झाली आहेत, अशांच्या वैवाहिक जीवनाचीही चर्चा केली आहे.

इथे एका प्रकरणात केवळ पाच पानांच्या मर्यादेमध्ये, समुपदेशन म्हणजे काय आहे व काय नाही हे सांगितलं आहे. ‘व्यावसायिक समुपदेशक काय काय कामं करतो’ या शीर्षकाखाली दिलेला मजकूर वाचकाला नेमकी माहिती मोजक्या शब्दांमध्ये देतो. समुपदेशकाकडून काय अपेक्षा ठेवायच्या व खुद्द समुपदेशनामुळे आपल्याला (समुपदेशी व्यक्तीला) काय मिळणार आहे, ही गोष्ट नीट लक्षात येते. समुपदेशनाचा हेतू किंवा मुख्य फायदा म्हणजे समुपदेशीला आपली समस्या काय आहे, तिची लक्षणं काय, ती का निर्माण झाली आणि ती कशी सोडवावी (त्यापासून मुक्त कसं व्हावं) हे नीटपणे खोलवर समजतं. याला अंतर्दृष्टी (इनसाइट) तयार होणं असं म्हणतात. ही अंतर्दृष्टी एकदा मिळाली, की ती व्यक्ती आयुष्यात पुढे तशा प्रकारच्या अडचणी स्वतःहून हाताळू शकते, हा फायदा मोठा आहे. पुस्तक वाचनीय तर आहेच; पण संग्रही ठेवावं असं आहे. मानसशास्त्र, समुपदेशन, मानसोपचार या विषयांमधील तज्ज्ञांना ते हाताशी असलेले सोयीचं पुस्तक (हॅन्डी बुक) ठरेल. याच विषयांचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना ते वस्तुनिष्ठ, यथातथ्य नेमकी माहिती अगदी थोड्या शब्दांत मुद्देसूद रीतीने देईल. विवाह या विषयामागची मानसिकता जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य वाचकांना हे पुस्तक बिनचूक शास्त्रीय माहिती थोडक्यात व सोप्या भाषेत देतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com