गंधा! (शांभवी जोशी)

shambhavi joshi
shambhavi joshi

सारं आवरून श्रेयस शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती. वाचता वाचता श्रेयसचा डोळा लागला अन्...अचानक त्याला तो दरवळ जाणवला. खास दरवळ...त्याच्या लाडक्या ‘गंधा’चा दरवळ!

ट्रेन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग दिल्लीला झालं. सहा महिने अजिबात रजा घेता आली नव्हती. आता, कधी एकदा गंधाला भेटतोय असं त्याला झालं होतं. तिला भेटण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता. ‘उद्या येतोय’ असं त्यानं कुणालाच कळवलं नव्हतं. तीन-चार दिवसांत कामाच्या व्यापात फोन झालाच नव्हता. तिचाही आला नव्हता हे पथ्यावरच होतं. आपल्याला समोर पाहून गंधाला कसा सुखद धक्का बसेल हे श्रेयसला डोळ्यासमोर दिसत होतं. तिचा चेहरा कसा फुलून येईल...ती कशी मोहरून येईल...आणि आधी का कळवलं नाही म्हणून कशी रागावेल...तिच्या डोळ्यांत पाणीपण येईल...मग आपण तिची कशी समजूत काढू याच सुखस्वप्नात तो रंगून गेला.
ती मात्र तिच्या खास स्टाईलनं कट्टी फू करेल...जीभ काढून दाखवेल...अन् आपल्या काळजाचं पाणी पाणी होईल.

हा ऽ य... गंधा-गंधा-गंधा! वेडं केलं होतं गंधानं श्रेयसला. अगदी लहानपणापासूनच! दोघांची घरं शेजारीशेजारीच होती. दोघांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, सख्य होतं. कुणीही त्यांच्याकडं पाहताना त्यांना शुभाशीर्वाद द्यायचे. जणू परमेश्वरानं दोघांना ‘एकमेकांसाठी’च जन्माला घातलं होतं. त्यांच्यात कधी ‘ताई-दादा’ झालं नाही! नकळत्या वयापासून दोघं एकमेकांशी प्रेमानं वागत. धट्टाकट्टा श्रेयस लहानग्या गंधाला उचलून फिरवायचा. तिला घेऊन झोक्यावर बसायचा. तिला उष्टं चॉकलेट भरवायचा. वय वाढत गेलं, तसतसं दोघांमधले प्रेमाचे बंध अधिकच दृढ होत गेले. तारुण्यात हे प्रेम अधिकच गहिरं झालं. दोघांमध्ये आकर्षण वाढलं. एकमेकांशिवाय जग शून्य वाटू लागलं. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या होत्या.
श्रेयस रजा घेऊन आला की साखरपुडा करून घ्यायचा...नंतर लवकरच लग्न, असं वडीलधाऱ्यांनी ठरवलं होतं. साऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच दोघं एवढे दिवस एकमेकांना सोडून राहिले होते. आता श्रेयस सहा महिने भेटणार नाही या विचारानं गंधाच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. श्रेयस वरवर तिला चिडवत होता. मात्र, तोही फार दुःखी झाला होता तिच्यापासून दूर जाताना...आता सहा महिन्यांचा दुरावा संपला होता. उद्या...! उद्याच! गंधा आपल्या मिठीत असेल या विचारानंच तो अधीर झाला होता. फक्त काही तास...! हो, पण गंधा ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा जीव तळमळत राहणार होता. घरी पोचला तरी! आई-बाबा नव्हतेच अपेक्षेप्रमाणे. आईची सकाळची शाळा. बाबांचा शनिवारचा दौरा...

सारं आवरून श्रेयस शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती. वाचता वाचता श्रेयसचा डोळा लागला अन्...अचानक त्याला तो दरवळ जाणवला. खास दरवळ! त्याच्या लाडक्या ‘गंधा’चा दरवळ! तो टक्क जागा झाला. त्याचा विश्वासच बसेना. होय. निशिगंधाच आली होती. चक्क. त्याच्या अगदी समीप! नाजूक, निमुळत्या बोटांच्या ओंजळीतून त्याच्या चेहऱ्यावर मोगऱ्याची फुलं ओतत होती. तिच्या दाट, लांबसडक वेणीतही मोगऱ्याचा गजरा होताच नेहमीप्रमाणे. त्या त्या ऋतूतल्या फुलांचा गजरा तिच्या केसात असाचयाच. तिची आजी रोज म्हणजे रोज लाडक्या निशूसाठी गजरा करायची. बागेतल्या फुलांचा. त्यामुळेच निशीभोवती कुठला न् कुठला सुगंध कायम दरवळत असायचा, म्हणून तर श्रेयस तिला ‘गंधा’ म्हणायचा! गंधाही त्याच्या मनात सारखी दरवळत असायची. तिचा दरवळ कायम त्याला वेढून असायचा. आताही ती त्याच्या मनातूनच जणू त्याच्या समोर येऊन उभी होती. अगदी समीप! खरं तर तो तिला सरप्राईज देणार होता; पण प्रत्यक्षात तिनंच इथं येऊन त्याला धक्का दिला होता; तोही असा सुगंधी... सुंदर! त्याची आवडती आकाशी रंगाची, बारीक काठांची म्हैसूर सिल्कची साडी नेसून ती आली होती. सुंदर काळ्याभोर केसांमध्ये माळलेला मोगऱ्याचा गजरा, बदामी डोळे, रेखीव भुवया, केतकी वर्ण, लालचुटुक ओठांचं धनुष्य. नितळ गळा, कमनीय बांधा...किती पाहू...पाहत राहू असं त्याला झालं होतं. तेवढ्यात गंधानं तिचा केसांचा पुढं आलेला शेपटा मागं टाकला. तिच्या केसांचा स्पर्श श्रेयसच्या चेहऱ्याला जाणवला. मोगऱ्याच्या गंधानं तो रोमांचित झाला. त्यानं चटकन् तिला पकडण्यासाठी हात पुढं केला. ती चटकन् एक गिरकी घेऊन मागं गेली. तिच्या पदलालित्यानं श्रेयस वेडावून गेला. तिच्याकडं आसुसून पाहत पाहत तो पुढं पुढं गेला. ती मागं जात जात भिंतीला टेकली. त्यानं दोन्ही बाजूंनी हात भिंतीला टेकवले. तिला हलताच येईना. ‘कैद’ झाली ती! त्याची जवळीक... जीवघेणी.

ती अस्वस्थ...स्तब्ध! लाजेनं तिच्या पापण्या जडावल्या. दोघांचे श्वास एकमेकांत अडकले. ती चटकन् खाली बसली अन् सुळकन् बाहेर निसटली. तो निराश होऊन वळला. त्यानं टेबलावरची डबी घेतली. तीमधली अंगठी काढून तिच्या समोर धरली. खुणेनंच तिला जवळ बोलावलं. ती आली. तिच्या बोटात तो अंगठी घालणार एवढ्यात बाहेर आईचा आवाज आला. दोघांचीही भावसमाधी भंगली. तो चटकन् बाहेर आला. हे काय? आई-बाबा दोघंही इथं कसे? शाळा...ऑफिस सोडून? त्याला आश्चर्य वाटलं.
श्रेयसही नेमका आजच असा न कळवता, अचानक कसा काय आला याचं आईलाही आश्चर्य वाटलं. आई जवळ आली, तर आईचा नेहमीचा प्रसन्न चेहरा खूप सुकलेला होता. डोळेही रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याला काही कळेना. त्याला पाहून तर आई त्याच्या कुशीतच कोसळली. हुंदक्यांनी तिचं सारं शरीर गदगदत होतं. तिच्या मागोमाग बाबाही आत आले. तेही गंभीर होते. श्रेयसच्या काळजात चर्रर्र झालं. तो आईला घेऊन हॉलमध्ये आला. ते तिघंही सोफ्यावर बसले. मघाशी त्याच्याजवळ बसलेली गंधा त्याला दिसली नाही. तो हाका मारू लागला. ‘आई, गंधा कुठं गेली? गंधा, ए गंधा, अगं कुठं गेलीस? आई बघ का रडतेय... इकडं ये ना...’
तो जो जो गंधाला हाका मारू लागला तो तो आई जोरजोरात रडू लागली.
श्रेयस बाहेर येऊन म्हणाला : ‘‘बापू, गंधा गेली का? आत्ता आली होती ना?’’
बापूनं डोळे विस्फारले अन् तोंडावर हात ठेवला. त्याला काही कळेना.
बाबा उठले. त्याच्याजवळ आले न् म्हणाले : ‘‘श्रेयस, आत ये.’’
‘‘काय झालं, बाबा? अहो, गंधा काही वेळापूर्वी आली होती. इथं माझ्याजवळच बसली होती ती कितीतरी वेळ...खरंच. कुठं गेली अशी न सांगता?’’ श्रेयसनं विचारलं.
बाबा म्हणाले : ‘‘अरे, कशी येईल ती? शक्यच नाही.’’
‘‘का? का नाही येणार? अहो, खरंच आली होती. इथंच माझ्याजवळ बसली होती.’’
आता तर आई खूपच रडायला लागली. रडता रडता म्हणाली : ‘‘अरे, कशी येईल ती? आता कधीच नाही येणार.’’
‘‘का पण? असं का म्हणतेस, आई? काही भांडण झालं का? सांग ना...’’
एव्हाना बापू, शांताबाई दोघंही खोलीत येऊन उभे होते. तेही रडत होते. दोन-तीन मिनिटं तशीच गेली. कुणी काहीच बोलेना. त्याला ती
दोन-तीन मिनिटं दोन-तीन वर्षांसारखी वाटली!
मग आई म्हणाली : ‘‘अहो, सांगता का त्याला? कसं सांगायचं पण? तुम्हीच सांगा.’’
कसंबसं बोलून ती पुन्हा रडायला लागली.
‘‘काय सांगायचंय? बोला ना’’
श्रेयसची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती. शेवटी त्याचे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले : ‘‘श्रेया, गंधा गेली सोडून आपल्याला. आत्ताच सकाळी आठ वाजता. तिकडंच होतो आम्ही. तीन-चार दिवस ताप आल्याचं निमित्त झालं अन् आज सकाळी...’’ असं म्हणून ते डोळे पुसू लागले.
‘‘क्‍का ऽ य? क्काऽ य सांगता, बाबा? काहीही काय बोलताय? अहो, मी आठ वाजता घरात होतो. विचारा बापूला. माझं सगळं आवरून इथंच बसलो होतो मी पेपर वाचत. तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती. चांगला अर्धा तास इथंच बसली होती,’’ हे बोलताना श्रेयसचा आवाज फाटला होता.

‘‘अरे, कसं शक्य आहे, बाळा? ती गेली रे राजा, गेली...’’ बाबा स्फुंदतच म्हणाले : ‘‘खूप तपासण्या झाल्या. मेंदूत काही इन्फेक्शन झालंय, असं डॉक्टर म्हणाले. पण...म्हणून असं काही होईल असं अजिबात वाटलं नव्हतं रे. आता...आता सगळंच संपलंय. सगळंच...’’
‘‘अहो, काहीही बोलताय तुम्ही. हे बघा, हे बघा, तिनं आणलेली मोगऱ्याची फुलं. ही बघा इथंच आहेत, ही बघा. इथं सोफ्यावरच आहेत. मी खोटं सांगतोय का?’’
खरंच तिथं मोगऱ्याची फुलं पडलेली होती. शुभ्र, ताजी, सुगंधित!
आई-बाबा, बापू-शांताबाई सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. फुलं खरंच होती तिथं! काय बोलावं कुणालाच काही सुचेना. श्रेयसनं ती फुलं घेतली गोळा करून. म्हणाला : ‘‘चला, तुम्हाला दाखवतो. गंधा तिकडं असेल तिच्या घरी.’’
मनानं ढासळलेले, शिणलेले बाबा त्याच्या बरोबर गेले. पाय ओढत. घरात गेल्या गेल्या निशिगंधाचं पार्थिव समोरच दिसलं.
‘‘गंधाऽऽ’’ श्रेयसनं टाहो फोडला...त्याबरोबर ती फुलं तिच्या पार्थिवावर पडली अन् तोही कोसळला.
मोगऱ्याचा गंध दरवळतच राहिला...त्यानं आणलेली अंगठी...तिच्या पार्थिवाजवळ पडली होती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com