esakal | देखना है जो़र कितना बाज़ू-ए-कातिल में है... (डॉ. यशवंत थोरात)
sakal

बोलून बातमी शोधा

dr yashwant thorat

आपल्या भारताची संस्कृती प्राचीन आहे. आजवर आपल्यावर अनेक संकटं आली आणि गेली. आता हे नवं संकट आलं आहे; पण खात्री बाळगा, तेही जाईल. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की हे नवं संकट आपल्याला नैतिकदृष्ट्या सबळ बनवणार की दुर्बल?

देखना है जो़र कितना बाज़ू-ए-कातिल में है... (डॉ. यशवंत थोरात)

sakal_logo
By
डॉ. यशवंत थोरात

आपल्या भारताची संस्कृती प्राचीन आहे. आजवर आपल्यावर अनेक संकटं आली आणि गेली. आता हे नवं संकट आलं आहे; पण खात्री बाळगा, तेही जाईल. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की हे नवं संकट आपल्याला नैतिकदृष्ट्या सबळ बनवणार की दुर्बल?

‘राजीव गांधी ट्रस्ट’च्या महिला सबलीकरणाच्या प्रमुख प्रकल्पाच्या पाहणीसाठी ते अमेठीला आले होते. ‘कुटुंबा’शी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते आणि त्यांचा हा दौरा खासगी होता. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाला काय मदत होऊ शकते हे पाहणं हा या दौऱ्याचा उद्देश होता.
आम्ही बसलो होतो ती खोली थोडी अंधारीच होती. एसी पूर्ण क्षमतेनं सुरू असला तरी त्याचा परिणाम फारसा जाणवत नव्हता. पाहुणे आणि राहुल एका सोफ्यावर बसले होते. बाकी आम्ही सगळे जागा मिळेल तिथं बसलो होतो. या प्रकल्पाविषयीच्या शंका दूर करण्याची त्यांच्या टीमला ही अखेरची संधी होती. या मीटिंगनंतर टीम त्यांच्याबरोबर मायदेशी परतणार होती.

दौऱ्याची सुरुवात दुर्दैवीच झाली.

पहिली गोष्ट म्हणजे, ते अगदी भर उन्हाळ्यात अमेठीला आले होते. त्या दिवशी तारीख होती १० मे २०१०.
दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षा अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली होती. ही व्यवस्था बरोबर नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ‘आम्हाला आमची जबाबदारी कळत नाही का?’ इथपासून ते ‘आम्हाला सांगणारे ते कोण?’ इथपर्यंत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आमची प्रतिष्ठा आणि परंपरागत अगत्य यावर हा ठपका होता. कुठलीच बाजू माघार घ्यायला तयार नव्हती. पोलिस अधीक्षकांनी ट्रस्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्यानं माझा सल्ला मागितला.
‘‘सुरक्षेची दोन कडी ठेवायला काय हरकत आहे?’’ मी सुचवलं : ‘‘एक कडं परदेशी पोलिसांचं, तर दुसरं कडं उत्तर प्रदेश पोलिसांचं असावं.’’
‘‘लाजवाब, सर. एक्स्पीरिअन्स इस को कहते है. साप भी मर गया और लाठी भी नही टूटी!’’ पोलिस अधीक्षक म्हणाले.
अमेठीत उतरल्याबरोबर त्यांनी सगळे सोपस्कार बाजूला ठेवले आणि राहुल यांना विचारलं : ‘‘तुमचा चीफ ऑफ स्टाफ कोण आहे?’’ माझी त्यांच्याशी औपचारिक ओळख करून देण्यात आली.
‘‘सर्व तयारी झालीय का?’’ त्यांनी विचारलं.
‘‘हो,’’ मी म्हणालो.
‘‘मग ते रद्द करून टाका,’’ ते म्हणाले.
‘‘जिथं भेटीची रंगीत तालीम झालेली आहे अशा ठिकाणी जाण्यात काय अर्थ आहे?’’
हे ठरवणारे ते कोण, असं मनातल्या मनात म्हणत मी त्यांच्या समोरच्या टेबलावर हातातले कागद पसरले व मी म्हणालो : ‘‘हवं ते गाव निवडा. आम्ही ज्या गावांत काम करतो ती सगळी गावं सारखीच आहेत. आणि माफ करा सर, आम्हाला रंगीत तालीम करण्याची सवय नाही!’’
त्यांच्या डोळ्यांत आदराची भावना झळकली. त्यांनी ते कागद उलटेपालटे करून पाहिले. गावांच्या नावांवरून नजर फिरवली आणि यादीतल्या एका नावावर बोट ठेवून ते म्हणाले : ‘‘थोरात, आपण या गावी जाऊ या.’’
आम्ही त्या गावाला निघालो.
* * *

उत्तर प्रदेशातल्या पूर्व भागातला उन्हाळा अगदी जीवघेणा असतो; पण त्यांच्या वातानुकूलित, बुलेटप्रूफ लँडरोव्हरमध्ये तंत्रज्ञानानं निसर्गाचे नियम बदलले होते. माझा रक्तदाब हळूहळू स्थिरावायला लागला. ग्रामीण भागातल्या रस्त्यावरून आमची गाडी जात होती. मी सहजच त्यांच्याकडे बघितलं. उंच आणि सडपातळ. पोरगेलेसे म्हणता येतील असे. डोळ्यांत कुतूहल आणि कपाळावर रुळणारे केस 'मेरे महबूब'मधल्या साधनाची आठवण देणारे! त्यांनी अनेक प्रश्न विचारले. काही मला, तर काही राहुल यांना...‘या भागात तुम्ही ३ लाख ४२ हजार कुटुंबांपर्यंत कसे पोचलात? महिलागट तयार करण्याची तुमची पद्धत कोणती? बांधलेले महिला बचतगट पक्के आहेत की नाहीत? त्यांच्याकडून बचत केली जाते का? बँकांकडून त्यांना कर्ज मिळतंय का? बँका या योजनेत सहभागी होत आहेत का? या भागातली आरोग्याची व शिक्षणाची स्थिती कशी आहे? तुम्हाला ज्या बाबतीत आर्थिक मदतीची गरज भासू शकेल अशा तिथं आणखी काय काय कमतरता आहेत...?’
* * *

आम्ही तिथं पोचलो तेव्हा दुपार कलली होती. अपेक्षेप्रमाणे गावात कमालीची शांतता होती.
‘‘त्यांना ग्रामसभेत लोकांशी बोलायचं आहे,’’ असं त्यांच्या दुभाषी बाईंनी अमेरिकी हिंदीत मला सांगितलं.
कदाचित मी इंग्लिश बोलू शकेन की नाही अशी शंका त्यांना माझ्या भारतीय पोशाखामुळे आली असावी.
‘‘त्याला वेळ लागेल. त्यांना थोडा आराम करायला सांगा,’’ मी अस्खलित इंग्लिशमध्ये बाईंना सांगितलं.
त्यांनी भुवया उंचावल्या.
‘‘इथं किती उकडतंय,’’ बाई म्हणाल्या.
‘‘उकडतंय? मला नाही तसं वाटत,’’ मी म्हणालो.
सामना भारताच्या बाजूनं झुकला होता!
* * *

प्रामुख्यानं दलित वस्ती असलेलं ते गाव होतं. स्वच्छ; पण गरीब. बहुतेक लोक कामावर गेलेले होते. गावातल्या महिला आणि मुलं लिंबाच्या एका झाडाखाली जमली होती. राहुल यांना पाहताच सरपंच लगबगीनं उठले. त्यांनी माईक ताब्यात घेतला.
‘‘थांबा, मीच त्यांची ओळख करून देते,’’ दुभाषी बाई म्हणाल्या. सरपंच खाली बसले. राहुल यांनी स्वागत केलं आणि बाईंनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
‘आपले पाहुणे म्हणजे जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आहेत’ असं त्या म्हणाल्या असत्या तर लोकांना अर्थ स्पष्ट समजला असता; पण संस्कृतप्रचुर हिंदीत त्यांनी बिल गेट्स यांचं कार्यकर्तृत्व सांगितलं. भाषण लोकांच्या डोक्यावरून गेलं. बायका जांभया देत होत्या. माश्या घोंघावत होत्या. मुलं कंटाळून रडत होती. त्यांच्या चेहऱ्यांवर कंटाळा स्पष्ट दिसत होता; पण ती दुभाषी बाई आपली हार मानायला तयार नव्हत्या. त्यांचं सुरूच होतं...‘तुम्ही यांच्याविषयी ऐकलंच असेल...’
समोरच्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नव्हती.
ज्या फाउंडेशनकडून मदतनिधी मिळवायचा आहे त्या फाउंडेशनच्या कार्यक्रमाची सुरुवातच जर अशी झाली तर त्याची सांगता कशा प्रकारची असेल या काळजीत मी पडलो!
दुभाषी बाईंचं भाषण संपण्यापूर्वी बिल गेट्स माझ्याकडे पाहत मला म्हणाले : ‘‘मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हे त्या महिलांना विचारा...’’
मी उठलो आणि त्या महिलांना संबोधित करत म्हणालो : ‘‘ये जानना चाहते है की आप लोगों को किस तरह की सुविधाएँ चाहिए? आप के लिए ये क्या कर सकते है?’’
समोरच्या बायकांचे चेहरे एकदम हलले, डोळे लकाकले. फाटके कपडे घातलेली एक मध्यमवयीन महिला छोट्या मुलाला कडेवर घेऊन उठून उभी राहिली आणि सुस्पष्ट आवाजात म्हणाली : ‘‘आमच्या मुलांना इंग्लिशचं चांगलं शिक्षण मिळेल अशी सुविधा द्या असं त्यांना सांगा.’’
तिच्या आवाजात आत्मविश्वास होता. तिचं ते वाक्य बिल गेट्स यांच्या मनाला स्पर्शून गेलं असावं.
* * *

परतताना त्यांनी आमच्या प्रकल्पाविषयी खूप उत्सुकता दाखवली.
‘बचतगटाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा सुधारेल का? ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्याच्या सोई कशा आणि किती आहेत? या भागात साथीचे आणि सर्वसाधारण आजार कुठले आहेत? मुलांना नियमितपणे लसटोचणी होते का? माध्यान्हभोजन देण्याचा कार्यक्रम ठीक चालला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न
त्यांनी विचारले.
आमच्या कामामुळे या भागात सावकारी कर्जाचं प्रमाण कमी झालं होतं आणि पंचायतींवर निवडून आलेल्या महिलांची संख्या वाढली होती
हे ऐकून ते खूप प्रभावित झाले.
आमची मोटार एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या जवळून चालली होती. माझं लक्ष तिकडे वेधत त्यांनी विचारलं : ‘‘डॉ. थोरात, ही ग्रामीण बँक आहे का?’’
‘‘होय. एका मोठ्या बँकेची शाखा आहे,’’ मी म्हणालो.
‘‘आपल्याला ही बँक पाहता येईल का?’’ त्यांनी विचारलं.
‘‘तुम्ही सुरक्षारक्षकांची परवानगी घेतली आहे का?’’ मी म्हणालो.
त्यावर गमतीदार शेरेबाजी करत ते प्रसन्नपणे हसले.
आमच्या मोटारींचा ताफा बँकेजवळ थांबला.
सुरक्षारक्षकांनी बँकेला गराडा घालत पोझिशन्स घेतल्या. काहीतरी घडलंय असं वाटून बघ्यांनी गर्दी केली.
आम्ही दोघं आणि एक अधिकारी असे तिघं आत गेलो. बँक मॅनेजर फायलीत डोकं खुपसून बसले होते. बाहेर काय चाललंय किंवा कुणी मोठा परदेशी पाहुणा आपल्याला भेटायला आलाय याचा त्यांना पत्ताच नव्हता. एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात व्हाउचर्स घेऊन ते लेजरमधल्या नोंदी तपासत होते.
त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी ‘माफ कीजिए’ असं म्हणत बोलायला सुरुवात केली. मानही वर न करता त्यांनी आम्हाला बसण्याची खूण हातानंच केली. मी पुन्हा म्हणालो, ‘माफ कीजिए...’ त्याच सुरात सूर मिसळून वर न बघता ते म्हणाले, ‘कर दिया माफ. बैठिए’.
हतबल होऊन मी शांत बसलो. दोन-चार मिनिटं अशीच गेली. नंतर फायलीतून डोकं वर काढत आणि शांतपणे आमच्याकडे बघत सफाईदार उर्दूत मॅनेजरसाहेब म्हणाले : ‘‘फर्माईए, मै आप की क्या खिदमत कर सकता हूँ? अकाउंट खोलना है क्या?’’
‘‘नही, नही’’ मी गडबडीनं म्हणालो.
बिल गेट्स यांच्याकडे निर्देश करत मी म्हटलं : ‘‘मै आप की मुलाकात इन से करवाना चाहता हूँ. ये बिल गेट्स
है.’’
‘‘तो फिर आप कौन है?’’ असं विचारत त्यांनी माझी फिरकीच घेतली!
‘‘जी, मेरा नाम डॉ. थोरात है. मैं रिझर्व्ह बँक में और ‘नाबार्ड’ में हुआ करता था.’’
‘‘बहुत खूब, बहुत खूब...पहले क्यूँ नही बताया? कैसा चल रहा है रिझर्व्ह बैंक? आप पान का शौक फर्माते है?’’ प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी विचारलं.
‘‘जी नही,’’ मी ओशाळत पुन्हा म्हटलं : ‘‘ये जनाब बिल गेट्स है.’’
‘‘रिझर्व्ह बैंक में काम करते है?’’ मॅनेजरसाहेबांनी विचारलं!
परिस्थिती झपाट्यानं हाताबाहेर चालली होती! बिल गेट्स यांचा ‘स्व’ त्या खेड्यातल्या कार्यक्रमात दुखावला गेल्याचं मला जाणवलं होतं. इथंही त्याचीच पुनरावृत्ती झाली तर आमच्या संस्थेला मदतीची अपेक्षा सोडावी लागणार अशी भीती मला वाटू लागली...
मॅनेजरमहोदयांच्या टेबलावरच्या कॉम्प्युटरकडे बघून मला अचानक एक कल्पना सुचली. मी म्हणालो : ‘‘आप के कॉम्प्युटर में जो सॉफ्टवेअर है ना, वो इन्हो ने बनाया है.’’
मॅनेजरसाहेबांच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हताच.
‘‘तो बेचना चाहते है?’’ त्यांनी त्याच गुमानीत प्रश्न केला.
‘‘काय म्हणत आहेत ते?’’ बिल गेट्स यांनी मला विचारलं.
‘‘तुमच्यासारखी व्यक्ती भेटल्यामुळे त्यांना खूप आनंद झालाय,’’ मी बिनदिक्कतपणे सांगितलं!
बिल गेट्स थोडेसे रिलॅक्स झाले.
‘‘या सॉफ्टवेअरबद्दल त्यांचं काय मत आहे असं त्यांना विचारा,’’ बिल गेट्स म्हणाले.
मी भाषांतर करून मॅनेजरना प्रश्न सांगितला. त्यावर त्यांनी काही क्षण विचार केला आणि खानदानी उर्दूत मॅनेजरसाहेब म्हणाले : ‘‘देखिए, बात कुछ ऐसी है कि ये तनिक इस्लो है. सुधारना पडेगा. रफ्तार बढानी पडेगी इस की...’’
‘‘ते काय म्हणत आहेत?’’ बिल गेट्स यांनी पुन्हा विचारलं.
प्रसंग बाका होता!
पण ‘उद्दिष्टावरची नजर कधीही ढळू द्यायची नाही’ हे तत्त्व मला माहीत होतं. बिल गेट्स यांच्या डोळ्यात रोखून बघत मी म्हणालो : ‘‘अभिनंदन! ते म्हणत आहेत की सॉफ्टवेअर अतिशय उत्तम आहे. इथं फारशी कनेक्टिव्हिटी नसतानाही ते विजेच्या वेगानं चालतंय.’’
बिल गेट्स यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं.
* * *

आम्ही निघालो. परतीच्या प्रवासात वातावरण बरंच निवळलं होतं. विमानतळावर पोचलो तेव्हा मला आणि राहुल यांना एका बाजूला घेऊन बिल गेट्स म्हणाले : ‘‘त्या महिलेनं तो प्रश्न विचारून मला धक्काच दिला; पण तिला अपेक्षित असलेलं शिक्षण तिच्या मुलाला मिळू शकेल का याची मला काळजी वाटतेय.’’
‘‘का नाही मिळणार?’’ राहुल यांनी विचारलं.
‘‘ते मिळावं असं तुम्हाला नि मला वाटतंय; पण तिथल्या परिस्थितीत ते शक्य होईल का?’’ बिल गेट्स यांनी शंका उपस्थित केली.
‘‘का? भारत आहे म्हणून?’’ मी हस्तक्षेप करत म्हणालो.
‘‘तसं नाही,’’ बिल गेट्स म्हणाले : ‘‘आपण निसर्गावर मात केलीय हा माणसाचा फार मोठा भ्रम आहे. एका लहानशा विषाणूमुळे त्या निष्पाप मुलाचा जीव जाऊ शकतो.’’
ते ठामपणे म्हणाले : ‘‘जे मुलाला लागू होतं ते सगळ्या जगाला लागू होतं. जागतिक विनाशाबद्दलचं आपलं ज्ञान अणुस्फोटानंतर निर्माण झालेल्या धुळीच्या ढगावरच आधारित आहे अजून! म्हणून, आजवर आम्ही फक्त अणुबाँबला प्रतिरोध कसा करायचा यावरच उपाय शोधत बसलो; पण खरा धोका कुठून आहे याचा अंदाजच आपल्याला नाही.’’
‘‘कुठून धोका आहे?’’ राहुल यांनी विचारलं.
‘‘निसर्गाकडून. राक्षसी विषाणूकडून. सध्याच्या काळात जागतिक स्तरावर थैमान घालणारा एखादा विषाणू अवतरेल याच्यावर जगातल्या कोणत्याही देशांच्या सरकारचा विश्वासच नाही ही मोठ्या दुःखाची बाब आहे. मात्र, असला विषाणू अवतरू शकतो ही वस्तुस्थिती आहे. तो कमालीच्या वेगानं जगभरात पसरून मानवजातीचा फार मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतो. कितीतरी देशांच्या नेत्यांच्या निदर्शनास मी हे आणलं आहे. सर्वजण ‘हो’ म्हणतात; पण करत मात्र कुणीच काही नाही.’’
मला वाटलं की ते त्या वेळी आमच्याशी केवळ बोलत नव्हते, तर दूरवर शून्यात बघत ते केवळ त्यांनाच दिसेल असं विनाशाचं चित्र पाहत होते.
ते पुढं म्हणाले : ‘‘याविषयीच्या संशोधनासाठी मी मदत करतोय; पण ती पुरेशी नाही. ती कधीही पुरेशी होऊ शकणार नाही...जगातले सगळे देश आपापल्या बजेटमधून या कामासाठी जोपर्यंत मोठी रक्कम बाजूला काढत नाहीत तोपर्यंत. मानवतेच्या सर्वनाशाला एक अणुबाँब नव्हे तर एक सूक्ष्म विषाणू पुरेसा आहे, हे जोपर्यंत जगाला पटत नाही तोपर्यंत हा धोका कायम राहणार आहे.’’
‘‘हे घडेल असं तुम्हाला खरंच वाटतं का?’’ मी विचारलं.
‘‘होय,’’ ते गंभीरपणे म्हणाले : ‘‘कडेवर मूल घेऊन उभ्या असलेल्या महिलेची काळजी मला त्यामुळेच वाटतेय. मघापासून मी तिचाच विचार करतोय.’’
* * *

उड्डाणासाठी विमान सज्ज असल्याचं पायलटनं येऊन सांगितलं.
‘‘ठीक आहे...आपल्याला जे शक्य आहे ते आपण थोडं तरी करू या,’’ असं म्हणत बिल गेट्स उठले.
‘‘इथं येऊन मला खूप आनंद झाला,’’ असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे वळून गुड बाय केलं. जाताना मिष्किलपणे म्हणाले : ‘‘तुमच्या चीफ ऑफ स्टाफला सोडू नका.’’
* * *

काही वर्षांनी बिल गेट्स यांनी ‘इबोला’ या विषाणूच्या संदर्भातील ‘टेड टॉक्स’ भाषणात हीच भीती पुन्हा व्यक्त केली. विविध देशांच्या सरकारांनी हा धोका मान्य करून ही वस्तुस्थिती स्वीकारावी आणि तिचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी असंही आवाहन त्यांनी केलं.
बिल गेट्स यांच्या त्या दौऱ्याला आता एक दशक उलटून गेलं आहे.
आज एक विषाणू सगळ्या जगात थैमान घालत आहे.
या विषाणूनं हजारो जणांचे बळी घेतले आहेत आणि लाखो जणांना त्याची बाधा झाली आहे. आणखी किती जण या विषाणूच्या विळख्यात येतील याचा अंदाजच करता येत नाही. या साथीनं आता तिचं अत्युच्च शिखर गाठलंय का तेही अजून कळायला काही मार्ग नाही. शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत; पण कोणतंही औषध दृष्टिपथात आलेलं नाही.

दरम्यानच्या काळात तेलाच्या किमतींनी नीचांक गाठला आहे आणि शेअर बाजार आणि इतर सगळे बाजार कोसळत आहेत. चीनमधले अनेक कारखाने पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत आहेत असं ऐकतो; पण त्यांच्या मालाला मागणी कुठं आहे? मागणी नाही तोपर्यंत कारखाने कसे चालणार? कारखाने चालले नाहीत तर जागतिक अर्थव्यवस्थेचं काय होणार? आर्थिक विकास खुंटला की अनेक देशांत मंदीची लाट येईल असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. प्रोटेक्शनिझम डोकं वर काढत आहे. त्यातून लोकांची क्रयशक्ती कमी होईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा खीळ बसेल. एक पाऊल पुढं जाऊन जर व्यापारावर निर्बंध घातले तर मंदी दीर्घ काळ टिकण्याची भीती आहे. या विषाणूवर औषध सापडेपर्यंत हीच स्थिती कायम राहणार आहे.
‘कोविड-१९’ या विषाणूला कसलंही बंधन नाही. जागतिक सीमांचं बंधन नाही, सामाजिक बंधन नाही, राजकीय पद्धती किंवा सांस्कृतिक मूल्ये यांची तमा तो बाळगत नाही. हिंदू किंवा मुस्लिम अथवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव तो करत नाही. तो प्रत्येकावर सारख्याच कठोरपणे आघात करतो. त्यानं सगळं जग एका समान पातळीवर आणलं आहे.

हा विषाणू आता भारतात आलाच आहे. त्यामुळे आतापर्यंत काय घडलं यापेक्षा आपण आज त्याचा मुकाबला कसा करणार आहोत हे महत्त्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, बाधित व्यक्ती सुरुवातीला २.६ व्यक्तींमध्ये हा विषाणू पसरवते. पाच-सहा दिवसांत याची सुमारे दहा आवर्तं होतात आणि सुमारे ३५०० लोकांना याची बाधा होते.

चीनपासून धडा घेऊन आपण संसर्गसाखळी वेळीच रोखण्यासाठी पावलं उचलली आहेतच. आता आपण धैर्यानं या स्थितीचा सामना केला पाहिजे. चीननं जेव्हा विलगीकरणाचे उपाय अवलंबिले तेव्हा आपण ‘हुकूमशाहीचा अतिरेक’ असं म्हणून त्याची संभावना केली; पण त्यांनी त्याचा पाठपुरावा करून या विषाणूवर काबू मिळवला. संचारबंदी आणि अन्य उपायांबरोबरच आपल्या सरकारनं लॉकडाऊनसारख्या उपायांचाही अवलंब केला आहे. धोका जर मोठा असेल तर त्यावरचा उपायही तितकाच कठोर असावा लागतो. लॉकडाऊनमुळे आपल्या स्वातंत्र्यावर काहीसा घाला घातला गेल्यासारखं आपल्याला वाटेल; पण सर्वांच्या सुरक्षेसाठी हे आपण सहन केलंच पाहिजे.
लॉकडाऊन हा योग्य उपाय आहे. आपण अधिकाऱ्यांना थोडी उसंत देणार आहोत आणि विषाणूचा प्रसार रोखणार आहोत. हे लॉकडाऊन आपण स्वयंस्फूर्तीनं स्वीकारलं पाहिजे. तसं ते आपण स्वीकारलं आहेच. स्वतःपेक्षा आपला देश मोठा आहे. आवश्यक असेल तेवढे दिवस स्वतःला घरात कोंडून घेण्याचं साहस, विवेक आणि क्षमता आमच्यात आहे हे जगाला दाखवून देण्याची हीच संधी आहे.
भारत या संकटावर मात करेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही; पण आपण एक सामाजिक कर्तव्य म्हणून स्वतःला इतरांपासून दूर ठेवलं तरच हे शक्य होईल.

७० वर्षांपूर्वी आपण आपली राज्यघटना संमत केली. आज या राज्यघटनेत एक दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे.
‘अमेरिकेनं तुमच्यासाठी काय केलं हे विचारण्यापेक्षा तुम्ही अमेरिकेसाठी काय करणार आहात ते सांगा’ हे जे त्या देशाच्या एका नेत्याचं इतिहासप्रसिद्ध वाक्य आहे त्या वाक्यातला आशय आपल्याही या दुरुस्तीत यायला हवा. ‘तुम्ही भारतासाठी काय करताय?’ हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारू या आणि त्याचं निःसंदिग्ध उत्तर जगाला देऊ या.
आपण नवं राष्ट्र असलो तरी आपली संस्कृती प्राचीन आहे. आपला प्रवास पाच हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. यादरम्यान अनेक संकटं आली आणि गेली. आता हे नवं संकट आलं आहे; पण खात्री बाळगा, तेही जाईल. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की हे नवं संकट आपल्याला नैतिकदृष्ट्या सबळ बनवणार की दुर्बल?
प्रसिद्ध कवी बिस्मिल अज़ीमाबादी यांचं गाजलेलं स्वातंत्र्यगीत आठवण्याची आजची हीच वेळ आहे :

वक़्त आने पर बता देंगे तुझे, ऐ आसमाँ
हम अभी से क्या बताएँ, क्या हमारे दिल में है?

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है...

loading image