बायको, नवरा अणि कोरोना (आनंद करंदीकर)

aanand karandikar
aanand karandikar

कोरोनाच्या गृहकैदेमुळे बायको-नवरा यांच्या संबंधांत गुणात्मक फरक घडण्याची काय शक्‍यता आहे? भांडणं मिटवण्यापासून विकृती निराकरणापर्यंत आणि जुन्या जखमांवर फुंकर घालण्यापासून सहजीवनाचा आनंद घेण्यापर्यंत कोणत्या गोष्टी घडू शकतात, घडायला हव्यात?...

कोरोनानं सर्वांना गृहकैदेची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा भोगताना नवरा-बायकोच्या संबंधांवर काय परिणाम होतो आहे? मी माझ्या पाहण्यातले, चाळिशीच्या पुढचे, स्वतंत्र राहणारे मध्यमवर्गीय मित्र- मैत्रिणी यांचे अनुभव, त्यांच्याशी चर्चा, माझे स्वत:चे अनुभव या आधारावर या लेखातले विचार मांडले आहेत. नव्यानं लग्न झालेल्यांना किंवा मोठ्या एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांना ते कदाचित लागू पडणार नाहीत.

अंकगणिती विचार : कामाच्या दिवशी नवरा-बायको सामान्यत: दिवसातून किती तास संवादासाठी एकत्र असतात? आठ तास झोपेचे, आठ तास कामावरचे, दोन तास प्रवासाचे, दोन तास प्रातर्विधी, निदान दोन तास वर्तमानपत्रं, टीव्ही, फोन, फेसबुक इत्यादी. राहिले दोन तास. त्यात कधी पाहुणे, कघी शेजारी, कधी बाजारहाट. एकमेकांशी संवाद करायला दिवसातून एक तास मिळाला तर नशीब. त्यात अचानक नोकरीवरचे आठ तास आणि प्रवासाचे दोन तास यांची भर पडली. कोरोनाच्या काळात या एका तासाचे अकरा तास झाले. (शिवाय पाहुणे नाहीत, बाजारहाट नाही!). "बरे झाले, दुसरा हनिमून बिनखर्चात घरीच मिळाला,' असं म्हणून काहींनी सुरवातीला आनंद मानण्याचा प्रयत्न केला; पण कसले काय? पंचवीस दिवस झाले तरी गृहकैद चालूच आणि कधी संपेल हेही माहिती नाही. संख्यात्मक बदल मोठे आणि सातत्याचे झाले, की ते काही वेळा गुणात्मक बदलात रूपांतरित होतात. (Quantity changes into Quality). उदाहरणार्थ, नदीत चार दगड टाकले, तर ते नदीतले गोटे बनतात, नदीत लक्षावधी दगड अल्पावधीत टाकले तर धरण बनतं, निसर्गाचं चित्रच पालटतं. कोरोनाच्या गृहकैदेमुळे बायको-नवरा यांच्या संबंधांत गुणात्मक फरक घडण्याची काय शक्‍यता आहे?

चहाच्या कपातली वादळं : घरकामाची मोलकरीण येणं बंद झालं आणि घरी बसवलेल्या काही नवऱ्यांनी घरातली काही कामं करायला सुरवात केली. काही "मान्यवर' नवऱ्यांनी अशी कामं करतानाचे स्वत:चे फोटोही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. त्यामागे स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा उद्देश नव्हता, तर इतर आळशी नवऱ्यांना घरकामाला प्रवृत्त करण्याचा स्तुत्य प्रयत्नच होता, हे मान्य; पण मग "तुम्ही घासलेल्या चहाच्या भांड्याला अजून चहापत्ती चिकटून आहे, जरा नीट घासा,' असं तिनं म्हटल्यावर उठून परत भांडे धुणार नवरा विरळाच. "तिला माझ्या आईनं असं म्हटलं, तेव्हा तिला काय वाटले असेल?' असं चिंतन करून भावुक बनणारा तर अजूनच विरळा. "मग, त्यात काय? धुवून टाक. मी वाचतो आहे, दिसत नाही का?' अशा प्रकारचं अंग झटकून टाकणारं उत्तर देणारे नवरेच बहुसंख्य. "बिघडलं कुठं? पत्ती म्हणजे काय कोरोनाचे जंतू आहेत? पुढच्या वेळी पत्ती थोडी कमी घालू' अशी दीडशहाणी, तेरी उपर मेरी अक्कल दाखवणारे नवरेही कमी नाहीत. मग तिनं चहाचं भांडं घासताना थोडंसं आदळलं, की याची दादागिरी सुरू. "भांड्याला भाडे लागलं, की आवाज होणारच' असं माझी आई समजूतदारपणे म्हणायची आणि गप्प बसायची. हे भान शहाण्या नवऱ्यांनी ठेवण्याची गरज आहे. एवढी साधी कामं नीट करता येत नाहीत याबद्दल तिला चीड येणं स्वाभाविक आहे. इतर वेळी असं काही घडलं, तर नवरा लवकरच कामाला जातो आणि तो विषय मागे पडतो; पण आता ती शक्‍यता नाही, गृहकैद आहे. शब्दानं शब्द वाढत जातात, चहाच्या कपातलं वादळ बघता बघता घर डोक्‍यावर घेऊ शकतं. तेव्हा नवऱ्यांनी आणि बायकांनी तोंडावर वेळीच लागम घालण्याचं भान ठेवणं, कोरोना काळात, विशेष महत्त्वाचं आहे. आपली बायको आपल्याशी भांडण करणारी आहे हे पांडुरंगानं आपल्यावर केलेले उपकार आहेत याची जाण धार्मिक वृत्तीच्या नवऱ्यानं ठेवली तर त्याला मन:शांती मिळेल. जगद्‌गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे ः
देव भक्तालागीं करूं नेदी संसार। अंगें वारावार करोनि ठेवी ।।1।।×
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा। म्हणोनि करंटा करोनि ठेवी।।ध्रु.।।×
स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा। यालागीं कर्कशा पाठी लावी ।।2।।×
तुका म्हणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ।।3।।×

भाषांतर (मराठी येत नसल्यास)
देव आपल्या भक्तांना संसार करू देत नाही. त्याच्या संसाराची स्वतः निरवानिरव करून ठेवतो. भक्ताला लौकिकातलं भाग्य दिलं, तर त्याच्या अंगात अभिमानाचा ताठा शिरेल, म्हणून भक्ताला तो करंटा करून ठेवतो. गुणी बायको त्याला दिली, तर तिच्या आशेत तो गुंतून पडेल म्हणून तो कर्कशा स्त्रीशी त्याची गाठ घालतो. तुकाराम महाराज म्हणतात, "पाहा, हे मी सांगत आहे त्याचा मला स्वतःला अनुभव आला आहे. मग इतरांना मी काय सांगू?'
पांडुरंगाचे आभार मानायची हीच वेळ आहे!!

जुन्या जखमा : काही जुन्या जखमांवर काळाच्या ओघात खपल्या धरलेल्या असतात, दुखत नाहीत. पण वेळ आहे म्हणून त्याया खाजवू नयेत. खपली निघाली तर जखम परत वाहू लागते, वेदनादायक बनते. एक उदाहरण बघा :
ती : "चांगली नोकरी होती. प्रमोशन पण जवळ होतं. सासूबाई नेमक्‍या तेव्हाच आजरी पडल्या, सुनीलची दहावी होती. तुम्ही म्हणाला आणि आई म्हणाल्या म्हणून नोकरी सोडली. आई गेल्या, सुनील अमेरिकेमध्ये, मी घरी कुजते आहे. देवा, आता तुम्हीही घरी. कायरे देवा.
तो : काय फायदा झाला? म्हणे तू सुनीलचा अभ्यास घेतला, आयआयटीला नाही ना सिलेक्‍ट झाला? त्या खासगी इंजिनिअरिंग कॉलेजला दोन लाख मोजावे लागले आणि आई गेली तेव्हा तू नोकरी करीत होतीस. आई गेली तेव्हा पाणी द्यायलासुद्धा घरी कोणी नव्हतं. आणि...
ती : सुनीलला गणितात कमी मार्क मिळाले. गणित माझा विषय नाही, गणित तू शिकवलंस, तुझंही कच्चेच आहे म्हणून तू शिकवलं नाहीस. आणि आईंची तब्येत बिघडली आहे, काळजी घ्यायला ठेवलेली बाई आलेली नाही, मला क्‍लोजिंग असल्यानं जाणंच भाग आहे हे माहीत असूनही तू रजा काढून स्वत:च्या आईसाठी घरी राहिला नाहीस...
तो : हे बघ...
जुन्या जखमा खूप खाजवल्या म्हणून बऱ्या होत नाहीत, चिघळतात. त्या विसरताही येत नाहीत.
आता तिला परत करिअर सुरू करता येईल का? तिला घरी संगणकावर काम करता येईल का? सुनीलला, त्याच्या बायकोला बालसंगोपनात मार्गदर्शनाची गरज आहे का? त्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करून मार्ग काढण्याची गरज आहे. त्यासाठी माहिती नभोमंडळावर शोध घेऊन चांगला संवाद करण्यासाठी कोरोनाच्या गृहकैदेनं अवकाश उपलब्ध करून दिला आहे, हे दोघांनी लक्षात घेण्याची गरज आहे. जुन्या भेडसावणाऱ्या प्रश्नांवर नवी प्रभावी उत्तरं शोधण्यासाठीचा हाच अवसर आहे.
विकृती निराकरण : बायकोचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यातच आनंद मानणारे काही नवरे असतात. असे पुरुष कमी आहेत, पण आहेत. त्यांना बायको जितकी जास्त वेळ मिळेल तितके त्या बायकोचे अधिक हाल होणार हे उघड आहे. मग ते हाल, बायको नको म्हणत असताना घेतलेलं जबरी शरीरसुख असेल, मारहाण असेल नाहीतर तोंडाला येतील ते आरोप करून, शिव्या देऊन दिलेले मानसिक क्‍लेश असतील. कोरोनाच्या काळात कौटुंबिक अत्याचारांचं प्रमाण दखलपात्र प्रमाणात वाढलं आहे, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. या राक्षसांच्या ताब्यात बायको दसपट जास्त वेळ सापडली तर तिचे हाल हाल होणार. अशा राक्षस पीडीत स्त्रियांनी तक्रार करावी, त्या नवऱ्यांना क्वारंटाइन केलं जाईल, असं सरकारनं आणि स्थानिक प्रशासनानं जाहीर केलं आहे, ही फार चांगली, स्वागतार्ह गोष्ट आहे. पीडित स्त्रियांना बोलकं करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. दहा नवरे क्वारंटाइन मध्ये गेले, ते जाहीर झाले, की इतर घाबरतील. या निमित्तानं राक्षसी नवऱ्यांना शासन झालं, त्याना जरब बसली, तर तो कोरोनानं आपल्याला झालेला फायदा असेल.
आणि हो, माझी "असूर्यस्पर्शा' बायको "नेहमी घरातच असते' असं अभिमानाने सांगणाऱ्या काही "मर्दांना' घरीच बंदिवासात राहण्याचा अनुभव घेतल्यावर आपल्या बायकोला नियमित सूर्यदर्शन घडावं असं वाटलं, तर ते कोरोनाचे आपल्यावरचे मोठेच उपकार असतील.

सहजीवनाचा आनंद : मला असे अनेक नवरा-बायको माहीत आहेत, की ज्यांनी कधीच एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांना सुख आणि आनंद देण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. त्यांना वेळ मिळाला नाही! त्यांच्यासाठी शय्यासोबत हीसुद्धा घाईघाईनं उरकण्याची कृती राहिली आहे, मग कला आस्वाद, एकत्र काम करण्यातला आनंद याबद्दल तर विचारायलाच नको. हीच संधी आहे. वेळ आहे. एकमेकांना शारीरिक सुख द्यायला, त्यासाठी प्रयोग करायला अवसर आहे. एकत्र गाणी ऐकायला, सिनेमे पाहून त्यावर चर्चा करायला, एकमेकांच्या आवडीच्या पाककृती करायला वेळच वेळ आहे.
माझी तर अशी इच्छा आहे, की करोना गेल्यावरसुद्धा माझ्यासाठीची गृहकैद काही काळ चालूच राहावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com