बियावाली (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

‘‘येक आईक माह्या येडीधडीचं...येक येळ तुव्हा ल्योक तुला दगा दिईन; पर जे झाड तू लावशीन का न्हाई, त्ये तुला दगा देनार न्हाई! तुला आज ना उंद्या ह्येची परचीती यिईल. आपल्याला काय देत न्हाई झाड? ऊन लागलं तं सावली देतं, भूक लागली तं फळं देतं, निवारा देतं, येवढंच कह्याला, आगं मेल्यावं बी झाडंच कामी येतय मान्साच्या.’’

तिनं जिथं बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हातगुण होता की झाडा-पेडावरची तिची माया? मी तिला माझ्या लहान वयापासून पाहत आलो. ती सतत बिया गोळा करायची अन् जागा दिसेल तिथं पेरत राहायची. बाभळीच्या बियांना ‘दामोके’/‘दामुखे’ असं म्हणतात अन् चिंचेच्या बियांना ‘चिंचोके’ असं म्हणतात. हे मी पाठ्यपुस्तकात शिकलेलो नाही. तिनंच मला ही माहिती दिली. तिनं पेरलेल्या बियांतून किती झाडं उगवली याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं आली! ज्या झाडाकडे बोट दाखवलं जायचं ते झाड बियावाल्या बाईनंच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तेव्हा उगवून आलेल्या एकूण एक झाडावर तिची मालकी होती; पण तिनं तशी मालकी कुठल्याच झाडावर कधी सांगितली नाही. तिचा तो स्वभावच नव्हता. न केलेली कामं आपल्या नावावर बेमालूमपणे खपवणाऱ्या जमातीत म्हणूनच ती वेगळी ठरायची.

खरं तर त्या लहान वयात ब्रह्मांडाविषयी सांगितलं जायचं! त्याचंही अप्रूप वाटायचंच; पण त्याहीपेक्षा जास्त अप्रूप मला या बियावाल्या बाईचं वाटायचं. जेव्हा उन्हाळ्यात ऊन्ह अंगाला भाजून काढू लागायचं, अंगाची लाही लाही व्हायची, झळांचा कोण कहर सुरू व्हायचा, तेव्हा जो तो पसाभर सावली धुंडाळत असायचा. अशा वेळी धापा टाकत कुणीतरी सावलीला यायचं अन् म्हणायचं :
‘‘हे बियावाल्या बाईचे उपकार, न्हाई तर उन्हानं पार जीवच जात व्हता आता.’’
‘‘तर वो, या दिसात पसाभर सावली मोलाची ठरते. या बाईनं जागजागी सावल्यायची झाडं लावून ठिवलीत...’’ आधीच सावली पांघरून बसलेलं कुणी त्याच्या म्हणण्याला दुजोरा द्यायचं.
‘‘आरं, काय रिकाम्यारानी कवतिक करून ऱ्हायलाय तिचं? येडीय ती! ऊठ रे चिंधा अन् त्योच धंदा! पोर ना सोर, संसार देला मोकलून आन् बसते यडधुतळ्यागत बिया गोळा करत.’’
तिला वेडी ठरवणारी अशीही काही कडू माणसं होतीच. त्याही वयात मला बियावाली बाईच शहाणी वाटायची अन् लोक वेडे! लोक दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडायचे. बांधावरून मारामाऱ्या करायचे. घाव वर्मी बसला तर त्यातला एखादा मरायचाही. अशा लोकांना कसं शहाणं म्हणायचं? तसं बियावाल्या बाईनं कुणाचं मन शब्दानंही दुखावलं नाही. तिनं कुणाला दगड-गोटे मारले नाहीत. मग ती कशी काय बरं वेडी? थोडक्यात, तिला वेडं ठरवणारं जगच ठार वेडं होतं याची खात्री मला त्या लहान वयातही होती अन् आजही आहे.
बियावाल्या बाईला मूल-बाळ काही झालं नाही. त्याचंही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा माझी आई म्हणाली होती : ‘‘आत्याबाई, तुमास्नी मूल-बाळ झालं असतं तं आता नातूपंतू तुमच्या अंगा-खांद्यावं खेळले असते.’’
‘‘न्हाई झाले तेच बरं! न्हाई तं ही झाडा-पेडाची पोरं कुणी सांभाळली असती गं?’’
‘‘त्ये बी खरं हाय म्हनायचं!’’
‘‘आज्जे, तू थकत न्हाई का बिया गोळा करून करून?’’ मलाही हुक्की आलीच काहीतरी विचारायची म्हणून मग मीही दोघींच्या संभाषणात आगंतुक उडी घेतलीच.
‘‘लेका, सुर्व्याला कुनी इचारलं का तू थकतो का म्हून!’’
माझ्या तोंडावरून हात फिरवत बियावाली म्हणाली.
‘‘तो बी थकत आसनंच नं; म्हून तं रातीचा निजून जातो! तू तं थकतंच न्हाईस. जव्हा पाव्हा तव्हा तुजं काम चालूच असतंय.’’
‘‘जग का इवलूसंय का पोरा? ते लई मोठं हाय...’’
‘‘म्हंजी, तू समद्या जगात झाडं लावनार?’’
‘‘म्या जगात झाडं लावनार का न्हाई म्हाईत न्हाई. पर ह्या कुडीत जीव असंपत्तूर जिथं जिथं मोकळी जागा असंल तिथं तिथं मातूर म्या झाडं लावनार. हां, आता ती जगाच्या मोजमापड्यात चतकूर व्हईल का आर्धी हे न्हाई सांगता यायाचं. माहं जे कामंय ते म्या करत जानार!’’
तेवढ्यात आई रागावली माझ्यावर...‘‘व्हय व्हय...रं. शाळंत निंग आता तू. नगं लई ग्यान पाजळू!’’
‘‘का म्हून गप करते गं त्याला? इच्यारू दे की. समदंच साळंत थोडंच शिकिवत्या?’’
‘‘आत्याबाई, चाबराय त्यो, त्याचं काय आयकत्या?’’
‘‘काय चाबराबिबरा न्हाई! त्यानं जे इच्यारलं ते तू तरी कधी इचारललं का? खरं सांगू का, त्यो माझ्या कामाचं कौतुक करून ऱ्हायलाय, इंदू! मला कवतुकाची हाव न्हाई; पर मनात असतंच की गं!’’
मी दप्तर उचललं. पाठीवर टाकलं. बियावाल्या बाईच्या पायाचं दर्शन घेतल्यासारखं केलं तर तिनं मनभरून आशीर्वाद दिला : ‘‘पोरा लई शिक. शिकून लई लई मोठ्ठा व्हो, झाडायेवढा! तुह्या मायला सावली दी.’’

बियावाली बाई नितनेम बिया गोळा करत राहिली. जागा सापडेल तिथं आळं करून बी जमिनीत लावत राहिली. तिचं काम ती मन लावून करत राहिली. मूल-बाळ नसल्याची खंत करत राहिली नाही. उन्हाळ्या-पाणकळ्याचा मोसम तिला रोखू शकला नाही. तिच्या कामात खंड पडला नाही किंवा तिनं पडू दिला नाही. नंतर तिचा नवराही कुठल्याशा आजाराचं निमित्त होऊन वारला. मग तर तिला कुठलेच पाश राहिले नाहीत. राहतं घर मोकललं. त्यात ती कधी राहिली नाही. झाडच तिचं घर झालं. दिवसभर बिया गोळा करत त्या कुठं कुठं लावत राहायच्या हेच ती करत राहिली. भूक लागली की कुणाच्याही घरी जाऊन त्यांना बिया अन् चार-दोन रोपटी द्यायची. त्याच्या बदल्यात दिला तो भाकरतुकडा ती खायची. भाकरीपेक्षाही तिच्या बियांचं मोल जास्त असायचं; पण हे काही लोकांना कळायचं नाही. तिनं दिलेल्या बिया ते केराच्या टोपलीत फेकून द्यायचे. त्यांना वाटायचं, हे काही आपलं काम नाही. त्यासाठी बियावाली आहे की. तिनं लावावीत झाडं!
‘‘काय गं हौशे, म्या दिल्याल्या ब्या उकांड्यावं फेकल्या त्वा...’’
‘‘आत्याबाई, झाडता झाडता नदरचुकीनं गेल्या जनू केरात!’’
‘‘हौशे, लई उन्हाळं-पानकळं पाह्यल्यात बाई म्या. माह्याशी तरी नगं खोटं बोलू.’’
‘‘माहं चुकलंच आत्याबाई.’’
‘‘येक आईक माह्या येडीधडीचं...येक येळ तुव्हा ल्योक तुला दगा दिईन; पर जे झाड तू लावशीन का न्हाई, त्ये तुला दगा देनार न्हाई! तुला आज ना उंद्या ह्येची परचीती यिईल. आपल्याला काय देत न्हाई झाड? ऊन लागलं तं सावली देतं, भूक लागली तं फळं देतं, निवारा देतं, यवढंच कह्याला, आगं मेल्यावं बी झाडंच कामी येतंय मान्साच्या.’’
बियावाल्या बाईला कधीच स्वत:ची चिंता नसायची. मात्र, लोकांना तिची चिंता असायची. तसा माझ्या आईलाही तिचा कळवळा होताच. एक दिवस भाकरी करता करता आई तिला म्हणाली : ‘‘कसा जलम जावा आत्याबाई, तुमचा?’’
‘‘जसा तुहा भाकरी थापता थापता जानार, तसा माहा झाडं लावता लावता. हां, आता मला सांग, तुह्या भाकरी कुनी मोजिल्यात का? माही झाडं मातुर मोजित्यात लोक. तुला सांगऽऽते इंदू, स्वोतासाठी मानूस मस करीतो; पर दुसऱ्यासाठी काहीच करीत न्हाई. आन् मेल्यावं हे समदं संग तर न्हाई नेता येत...’’

‘‘आत्याबाई, तुमचं मस खरं हाय, पर पाठी-पोटी यखांदं असाया पाह्यजी का नगं?’’
‘‘तुला काय वाटलं, मला मुला-बाळाची आस न्हवती? तसं न्हाई, मस व्हती गं. म्या झुरणीला लागले हुते. येक दिस माही आत्या आली माझ्याकं आन् त्या येळंला तिनं मला येक ‘बी’ देल्ही. म्हन्ली, आपली कूस आपुन न्हाई उजवू शकत, मातूर मातीची तं उजवू शकतो नं? आत्यानं देल्हेली ‘बी’ जव्हा म्या आळ्यात लावली तं चौथ्या-पाचव्या दिशी मातीच्या वर आल्याला हिरवा पोपटी कोंम बघून म्या अशी काय हराकले. जनू म्याच बाळंत झाले व्हते! मंग नादच लागला. झाले बरं मंग मी त्यायची आई. माह्या समद्या झाडा-पेडांची आई. माह्याच खुशीनं!’’
आईच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागलं तेव्हा बियावाल्या बाईनं तिच्या पदरानं आईची आसवं पुसली.
‘‘का म्हून रडते, इंदू?’’
‘‘न्हाई तं’’ आई सावरून घेत म्हणाली.
‘‘इंदू, काळानं जे दिस समोर ठिवले ते बघून येक कळतं का जे व्हतं ते बऱ्यासाठीच व्हतं. तुह्यापून काय लपूनंय का माहं? पोरा-बाळांच्या कितीतरी माह्या जोडीदारनी आज एकट्याच उरल्याता. त्याह्यचे ल्योक मोकलून गेले त्याह्यला. शेवंताईला गंज चार ल्योक; पर पानी द्येयाला येक तरी उरला का गं? बेवारश्याचं मरान म्येली बिचारी. म्या तरी माह्या झाडांसोबत हाये. माह्या लेकरा-बाळान्ला पाय न्हाईत म्हून त्ये मला सोडून जाऊ शकत न्हाईत...!’’
आई ऐकत राहिली बियावाल्या बाईचा एकन्‌एक शब्द. ती एवढी तल्लीन झाली होती की चुल्ह्यातला जाळ सावरायची विसरली आणि त्यामुळे तव्यावरची भाकरी कच्चीच राहिली. बियावाली बाई तर जेवण करून निघून गेली; पण आई कितीतरी वेळ विचारात बुडाली.
की आत्मभान आल्यानं आपलंच आयुष्य ती वाचू लागली होती की काय? माहीत नाही. दुसऱ्या दिवशी आईनं मळ्याच्या बांधाखोरावर झाडं लावण्याचा सपाटाच सुरू केला.
शेजारची दुर्गावहिनी आईला म्हणाली :‘‘आत्याबाई, येक बियावाली का कमी व्हती? आनिक येक पैदा झाली का काय?’’
‘‘दुर्गा, खरंच तिनं जागं केलं मला! नगं ते जतन करून ठिवत आले म्या. पर येवढी साधी गोष्ट ध्यानात यिऊ ने माह्या? तिनं आरसा दावला येवढं खरं!’’
‘‘आई, म्या काय सोडून जानार न्हाई तुला!’’
‘‘तू तं माझं झाडंच हाये रे, तू मनात आनलं तरी बी मला सोडून जाऊ शकत न्हाईस तू. तुह्या मुळ्या मातीत खोलवर रुतल्याय!’’

मी लहान होतो तेव्हाच बियावाली बाई वारली. तिच्या मृतदेहाचं दहन जिथं केलं गेलं होतं तिथं आम्ही पोरांनी आळं करून एक ‘बी’ लावलं. आता त्या बीचं मोठं झाड झालं आहे. लोक म्हणतात, ‘या झाडाखाली बसलं की बियावाली बाई बोलते आपल्याशी.’
असं वाटणं ही अंधश्रद्धाच असेल; पण तशीही बियावाली बाई मला या झाडाच्या पाना-फुलांतून भेटत असते. हे खरं तर आजपर्यंत कुठल्याच जवळच्या किंवा जिव्हाळ्याच्या माणसांना मी सांगितलं नव्हतं. मात्र, तुम्हाला सांगितलं. का ते माहीत नाही! आणि हेही मी कुणालाच सांगितलं नव्हतं की तिनं मलाही काही बिया दिल्या होत्या...त्या मी शब्दांच्या वावरात पेरल्या आहेत...‘बियावाली बाई मेली’ असं लोक म्हणतात. मी तसं म्हणत नाही. कारण, ती नितरोज उगवून येते आहे...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com