पावसाचा मुक्काम (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

नुसत्या विचारांनीच पोटात भीतीचा गोळा आला. ढासळलेल्या भिंतीतून सळंगदार पाऊस दिसू लागला. विजेचा उजेड घरात गप्पकन् येऊ लागला. वादळाला तोंड फुटलं. ते भिंतीच्या खिंडारातून जिभल्या दाखवू लागलं. त्याचं अक्राळविक्राळ रूप घराला आणखीच ढुसण्या देऊ लागलं.
तायडीला मात्र त्या खिंडाराचं भलतंच कुतूहल! ती त्यातून डोकावून पाहू लागली...

पावसाचीसुद्धा आवडीची घरं ठरलेली असतात! दर पावसाळ्यात तो त्या घरांत हमखास मुक्काम करतो. आमच्याही घरी पाऊस मुक्काम करून गेलाय. आता या गोष्टीला खूप वर्षं उलटून गेलीत; पण मला अजूनही आठवतं...माझी आई, थोरली बहीण आक्का, तिच्याहून लहान आणि माझ्याहून मोठी बहीण तायडी आणि तायडीनंतरची पमी अन् सर्वात धाकटा मी...आम्ही केला होता पावसाचा पाहुणचार. त्याचीच ही गोष्ट!

पाणकळ्याच्या दिवसांत घर गळायचं. खूप पाऊस. जागोजागी मांडून घरातली भांडी-बासनंसुद्धा संपून जायची. पाऊस स्वत:त साठवून ठेवू शकणारी अशी कुठलीच वस्तू घरात उरायची नाही. अगदी माझ्या आवडीचा उंदीरकाना चहाचा कपही कुठं तरी आपली आवडीची जागा पटकावून बसलेला असायचा...थेंब न् थेंब टिपायचा...तोंडोतोंड भरला की तोही मग रडत राहायचा भुईभर! माझ्या शाळेच्या दप्तरावरही तो यायचा. पुस्तकांत बसायचा लपून. दप्तर ठेवायचं कुठं त्याच्यापासून! कारण, त्यानं कुठलीच जागा सोडलेली नसायची. तो माझ्या कवितांच्या वहीवरही यायचा. म्हणून पोटाच्या बाजूनं मी खोचायचो वही इजारीत. उरलीसुरली भाकरी करायची काटवटही अक्का ठेवायची चुलीवर; चूल ओली होऊ नये म्हणून.
तायडी म्हणायची : ‘‘काटवटीला वाईट वाटत आसंल, की भाकरी करायचं सोडून आपुन आपल्यात पानी साठून ठिवतोय!’’
‘‘मनकवड्यापना नगं करूस! काटवटीला का बोलता येतं का?’’
‘‘पमे, येतं बरं! तुह्यागत समदीच ढ न्हाईतं. व्हय का न्हाई रं, भावड्या?’’
‘‘हा. बरं का पमे, माहा चहाचा कप बी रडून ऱ्हायलाय! म्या त्याला गप करायला गेलो तं म्हनतो कसा, ‘भावड्या भो, हे रं काय, माह्यात चहा वतायचा सोडून मला तू थेंबांचा मार दिऊन ऱ्हायलाय?’ ’’
तायडीच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला. आता तरी तायडीनं गप्प राहावं ना, तर नाहीच!
‘‘कढई म्हनते कशी, म्या कालवन करायचं सोडून बसले माह्यात पानी तुंबवीत!’’ तायडी म्हणाली.
‘‘तुहं डोस्कं! मनचंदी कुढची! जा, भाईरच्या गवऱ्या आन. पोरांना काई बी सांगून ऱ्हायली!’’असं म्हणत आईनं तिच्या पाठीत धपाटा घातला.
‘‘न्हायतर काय! तिला तं कशात बी खेळच सुचंतो,’’ आक्का म्हणाली.
‘‘ऱ्हाव दे बरं का शाने!’’ आक्काला तोंड वेंगाडून तायडी म्हणाली.
‘‘तुह्या तं यकच ठिवून दिईल! जा, त्या गवऱ्या आन!’’ आक्का तायडीवर डाफरली.
‘‘तूच आन. मला यवढं सांगून ऱ्हायली तं!’’
‘‘तायडे, जास्त झालं का तुला?’’ आई म्हणाली.
‘‘ती पाह्य नं मंग, तिचं न्हाई दिसत आई तुला...तायडीच सोप्पीय जिथं तिथं!’’
‘‘तिच्या बोलण्यानं तुला काई भोकं पडली न्हाईत!’’
तायडीलाच बोलणी खायला लागल्यामुळे ती रागानं थयथय पाय आपटत गोवऱ्या आणायला गेली.
* * *

भांड्यामागून भांडं पाण्यानं भरलं की पाणी घराबाहेर फेकायचं. घरातला आख्खा पाऊस उपसून फेकण्याची जशी काही आम्ही शपथ घेतलेली. तरी त्याचा घरातला मुक्काम हलायचा नाही. हटवादीपणानं तो भरून असायचाच बासनांमध्ये. घरभरही पाणीच पाणी. जेवढं उपसायचो तेवढंच पुन्हा भरून यायचं. सगळ्यांनीच हे काम शिरावर घेतलं. पावसाच्या पाण्यानं भरलेलं एकामागून एक भांडं आम्ही फेकू लागलो. सारेच हात मदतीला येऊनही पाणी आहेच! अक्का कावली : ‘‘आई, ह्या घरात राहन्यापरास भाईर ऱ्हायलेलं बरं. तिथं तरी झाडाझुडाचा आडुसा करता येतो.’’
‘‘न्हायतर काय! नुसतंच यडधुतळ्यासारखं पानी उपशीत ऱ्हायाचं!’’ तायडी म्हणाली.
‘‘पाऊसच न्हाई यायला पाह्यजे!’’ पमी म्हणाली.
‘‘काय गं, काळतोंडे? पाऊस न्हाई आला तर खाशीन काय?’’ आई पमीवर रागावली.
आता पाऊस कमी होईल; मग पाऊस कमी होईल...पण तो काही कमी व्हायचं नाव घेईना. थोडी तरी विश्रांती घेऊ द्यावी ना; पण नाहीच!
भरीला भर ढग गडगडायचे. विजा कडकडायच्या. पावसाची अवकाळी रात. पमी घाबरून जायची. मीही भ्यायचो. आम्ही सगळे भित्र्या सशाचे होऊन जायचो! आक्का मात्र धीराची; आमचे कान दाबायची, कानात फुंकर मारायची. एवढ्यात एकाएकी काहीतरी धपकन् पडल्याचा आवाज झाला..
‘‘मेल्या-मुडद्यांनो, भिताड ढासाळलंय वाटतं!’’ आई म्हणाली.
‘‘व्हय गं आई, खिंडार पडलंय भितीला...’’ पमी म्हणाली.
सारं घरच पडून जाईल की काय? घर पडलं तर एवढ्या मोठ्या दुनियेत जायचं कुठं? राहायचं कुठं? उघडेच पडू आपण सगळे सगळ्या बाजूंनी...आधीच उघडं आयुष्य. त्यात घर पडलं तर? अशा विचारांनीच पोटात भीतीचा गोळा आला. ढासळलेल्या भिंतीतून सळंगदार पाऊस दिसू लागला. विजेचा उजेड घरात गप्पकन् येऊ लागला. वादळाला तोंड फुटलं. ते भिंतीच्या खिंडारातून जिभल्या दाखवू लागलं. त्याचं अक्राळविक्राळ रूप घराला आणखीच ढुसण्या देऊ लागलं. तायडीला मात्र त्या खिंडाराचं भलतंच कुतूहल! ती त्यातून डोकावून पाहू लागली...
अन् एखादं काहीतरी अद्भुत गवसल्यासारखं ती म्हणाली : ‘‘पमे, पमे...भावड्या, ये भावड्या...’’
‘‘काय गं, काये, तायडे?’’ आम्ही दोघंही तिच्याकडे जात एकदम म्हणालो.
‘‘आरं पाऊस तं पाहा कसा कोसळू ऱ्हायलाय...मधीच ईज चमाकली नं त लई भारी दिसतं!’’
‘‘तुहं मढं बशीवलं...कुढचा पाऊस घिऊन बसली गं? इथं घर कोसळतंया!’’ आई तिला जोरात रागावली.
‘‘माह्या अंगावं तोलू काय मंग? पडलं त पडलं!’’ तायडीनंही रागातच उत्तर दिलं.
आईनं ओल्या हाताची चापट तायडीच्या गालावर उमटवली. तायडी बोलायला आत्रब! तिला लहान-मोठं असं काही कळायचं नाही. ती कुणालाही उलटून बोलायची. असं काही झालं की आई तिला म्हणायची : ‘वडील नं धाकलं, कारं शिदड मातलं!’
* * *

घरभर पाण्याचा राडा. वरून असल्या कुरबुरी पावसाची जोरकस सर यावी तशा मध्येच येऊन जात होत्या अन् आपसूक शांत होत होत्या. पाऊस मात्र शांत होत नव्हता. त्याचा थयथयाट सुरूच. त्याचा मुक्काम हलेल असंही चिन्ह नव्हतं. कुत्र्याच्या पाठीत काठीचा तडाखा देऊन त्याला हुसकावता येतं. तसं पावसाचं थोडंच आहे! तो आमच्या घरात पाहुणचार घेण्यासाठी ठाण मांडूनच बसलेला.
घराची मेढ मोडल्याचा कडाड् आवाज अचानक झाला. आईनं अंगावर रेलून येणारं छप्पर वरच्या वर तिच्या दोन्ही हातांनी तोललं. तेवढ्याही धांदलीत आई आम्हाला सावध करायला विसरली नाही.
‘‘पळा, नानाच्या घरी. थांबू नका इथं. घर अंगावं यिईल!’’
‘‘आमी न्हाई जानार,’’ अक्का म्हणाली
‘‘अशानं मरशाल! नका उशीर करू. निघा बरं तुमी!’’
‘‘तुला यकटीला मरायला सोडून जायचं का आमी?’’
अक्काच्या मताशी एकमत होत आम्ही सारेच आडून बसलो. आईला एकटीला संकटात सोडून जायला आम्ही तयार नव्हतो. आई जायला सांगत होती. आम्ही मात्र मोडू पाहणाऱ्या घराची सोबत करायला थांबून राहिलो. कृष्णानं गोवर्धन पर्वताचं ओझं त्याच्या करंगळीवर जसं तोलून धरलं होतं तसं आईनं कोसळणारं छप्पर आपल्या दोन्ही हातांवर तोलून धरलं. आई कृष्ण झाली...आई खांब झाली...!
अक्का पाणी उपसायच्या कामाला लागली. मीही. पमीही. तायडीही. आख्खी रात डोक्यावर घेत आम्ही त्या पावसाशी झुंजलो. तो आमच्याशी! अशी न्यारीच झुंज...घरात गाळच गाळ. गाळात रुतून आमचं जिणं गाळ गाळ. आणखी रुतत आणखी रुतत चिखल चिखल झालं!
आईनं पुन्हा एकदा आम्हाला गळ घातली.
‘‘लेकरांनो, तुमी तुमचा जीव वाचवा. कुढं तरी आसऱ्याला पळा!’’
‘‘कुढं पळणार?’’
‘‘कुढं बी जा. म्या काई मरत न्हाई!’’
‘‘आई, म्या तायडीच्या खांद्यावं बसून तुला मदत करते, म्हंजी तुह्या हाताला कळ लागनार न्हाई!’’
पमी तायडीच्या खांद्यावर बसली. छपराला रेटा देऊ लागली. अंगावर रेलून येणारं संकट तिनं तिच्या पिन्हुल्या हातांनी तोलून धरलं.
‘आता कसं छप्पर पडंतंय, बघते मी. ते हाये न् मी हाये,’ पमी जोशात आली होती.
आई, पमी, तायडी या एकाच कामात गुंतल्या. अक्का आणि मी नेटानं गाळ उपसू लागलो. तो काही केल्या संपेना. अक्का मात्र झपाटल्यागत उपसतच राहिली. वादळाचा जोर वाढला. आधीच ‘दुखणेकरी’ झालेला कुडाचा दरवाजा तुटून पडला. आधी भिंत, मग मेढ अन् आता दरवाजा. असे एकेक करत घराचे ‘अवयव’ गळून पडू लागले. आम्ही त्याचे ‘अवयव’ होऊन त्याला शाबूत ठेवण्यासाठी झटू लागलो. आता अक्कानंही पिठाचा डबा पालथा घातला अन् त्यावर उभी राहून तीही छप्पर तोलू लागली. आईला म्हणाली : ‘‘आई, तू सोड, तुह्या हातायला कळा लागून राह्यल्या आस्त्याल. म्या तोलंते.’’
‘‘माह्या बबडे, न्हाई तोलायचा भार तुमच्यानं!’’
‘‘अशी किती येळ कळ सोसशीन आई?’’
‘‘म्या तं कव्हाची सांगून ऱ्हायले; पर तुमी पोरं घर सोडायला तयार न्हाई.’’
‘‘जे काय व्हायाचं ते सगळ्यायचं व्हईल; तुला मरायला सोडून आमी जीव घिऊन पळायचं का आई?’’
अक्का आईला मदत करते नं करते तोच, यसुंताबाबाच्या घराकडल्या भिंतीनं धपकन् अंग टाकलं अन् बोळातून वाहणारं पाणी घरात शिरलं.
आई म्हणाली : ‘‘अक्के. तू सोड. म्या धरलंय पक्कं लावून, आदुगर फावडं घिऊन भरावा घाल. न्हायी तं घरात बी उभं ऱ्हाता येनार न्हाई. समदंच पाणजंजाळ व्हईल.’’
अक्कानं फावडं घेतलं अन् ती बांध घालू लागली. तायडीही तिच्या मदतीला गेली. पमीही. मीही...
***

पाऊस थांबला तेव्हा पहाट झाली होती. ओलीकिच्च पहाट. आईच्या हाताला मरणाच्या कळा लागल्या होत्या. तिनं अंदाज घेत घेत छप्पर सोडलं. त्याला आमची कीव आली की काय कुणास ठाऊक; पण ते पडलं नाही. आई रात्रभर अवघडून उभी होती. चिखलात पाय रोवून. खांबासारखी खांब होऊन. जागची हलली नाही की चालली नाही. लेकरांचा जीव वाचावा म्हणून...

अक्कानं ओली चूल पेटवली. ओली गोवरी धुपत होती. अक्कानं फुंकणीनं फुंकत फुंकत जाळ केला. गवती चहा उकळला. आम्ही गोणपाटावर बसून चहा प्यायलो. चहा पिऊन अंगात तरतरी आली. पुन्हा नव्या संकटाशी झुंजण्यासाठी. पावसात मोडून पडू पाहणारं घर तोलून धरण्यासाठी...फाटत जाणारं आभाळ टाका टाका घालून शिवण्यासाठी... भिंतीचं खिंडार लिंपण्यासाठी...घराची मेढ होण्यासाठी...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com