काशी, विहीर अन् आंब्याचं झाड (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

काशी मुलाला म्हणाला : ‘‘रमा, मला ठावं हाय की तुला तरास हुतोय...तुला तरास व्हऊ न्हाई ह्ये मला बी मस वाटतं; पर ज्येन्ला मळा इकला त्येन्ला काळीजच न्हाई आसं दिसतंय! मला वाटलं, माहा मळा पुन्हा हिरवा व्हईल....त्येच्यासाठी मन हिरवं लागतं रं; पर त्येंची मनं लाकडागत वाळून गेलीयात. लई निकरट मानसं हायेत ती! आपुन मानसं पारखून घ्याया पाह्यजे व्हती...’’

‘‘दादा, हे चांगलं दिसतं का?’’
‘‘काय रं गड्या, मला तं काई तुह्या बोलण्याचा उमज झाला न्हाई.’’
‘‘तुम्ही असं मळ्यात जाऊन बसता; त्या लोकांना नाही आवडत ते.’’
‘‘आरं, म्या काय त्येंच्या कामात खो घातलाय का काय?’’
‘‘आता आपण विकलाय नं आपला मळा त्यांना; मग आता आपला काही अधिकार राहिलाय का त्याच्यावर?’’
‘‘कळतंय मला, रमा. समदं कळतंय. चिमन्यापाखरांचं मन उमगून घेनारा मानूसंय मी. म्याच इकायला लावला तुला मळा; पर भावनांचं काय, त्या गुतून पडल्यात रं इहिरीशी आन् आंब्याच्या झाडाशी.’’
‘‘त्या भावनाच जरा कमी करा. जग समजून घेणार नाही.’’
‘‘आरं, इतक्या सहजी शक्य हाये का ते? मानूस तटकनी तोडतंय मानसाला; पर निसर्गाचं तसं नस्तंय रमा. त्येची माया हुर्द्यात टाका टाकून बसती. त्यो टाका असा सहजी उसवून न्हाई टाकता येत!’’
‘‘चला दादा, माझी शाळेत जायची वेळ झाली. मी निघतो. मात्र, तुम्ही आता जाऊ नका मळ्यात पुन्हा!’’

काशीनं लहान मुलासारखी मान हलवली. खरं तर काशीला आपल्या पोराचा- रमाचा- बिलकूल राग आला नव्हता.
काशी विचारांत हरवून गेला...‘रमाचा मला कशापायी राग येईन? त्येनं इकल्यालाच न्हाई मळा. ‘मळा ईक, मळा ईक’ आसा लकडा म्याच त्येच्यामागं लावला हुता. झालं आसत्यान उनंपुरं पंधरा दिस. पर त्येच्या आंधी आपल्याला येवढी वढ कंधी वाटली नव्हती. आता जरा जास्तच वढ वाटतीया. इहिरीशी आन् आंब्याच्या झाडाशी आपलं काय नातं हाय ते रमाला कसं कळावा...!’

खरं तर काशीची आई त्याला आठवत नाही. कशी आठवेल? तो सहा महिन्यांचा असतानाच ती वारली. पुढं जरा कळता होऊन तो शाळेत जाऊ लागला तेव्हा त्याला आईची उणीव भासली.
शाळेतली मुलं म्हणायची :
‘‘काशीला आई न्हाई बरं का.’’
‘‘ठावं हाये आम्हास्नी, त्यो बिनमायचा हाये.’’
‘‘त्याची आई देवाघरी गेलीया.’’
घरी आल्यावर काशीनं वडिलांना विचारलं :
‘‘अण्णा, माही आई कुढं गेलीया?’’
‘‘का रं बाबा? आज कशी काय तुला आईची आठवन आली?’’
‘‘अण्णा, कुढंय माही आई? देवाघरी गेलीया ना?’’
‘‘आरं, कोन म्हनतं?’’
‘‘शाळंतली पोरं म्हनत व्हती...’’
‘‘आरं, ही इहीर हाये तुझी आई!’’
‘‘इहीर?’’
‘‘हां. हिनंच जतवलंय तुला!’’
काशीलाही ते खरंच वाटलं की विहीर म्हणजेच आपली आई! का वाटणार नाही? या विहिरीच्या जिवावरच त्याचा मळा फुलला. त्याचा संसार सुखाचा झाला. मळ्यानं काशीला कधीच उपाशी राहू दिलं नाही. दुष्काळात आसपासच्या विहिरींचं पाणी आटायचं; पण आपल्या विहिरीचं पाणी कधीच आटलं नाही. काशी जरा कळता झाला तेव्हा त्याचा बाप गेला अन् मग आंब्याच्या झाडालाच त्यानं बाप ठरवून टाकलं! दुपारचा नांगर सोडून जेव्हा आंब्याच्या सावलीत काशी अंग टाकायचा तेव्हा त्याचा सारा थकवा दूर व्हायचा. जणू त्याचा बाप त्यानं केलेल्या कामाची दखल घेऊन त्याला शाबासकी द्यायचा...जणू मायेनं पाठीवरून हात फिरवायचा!
हे आंब्याचं झाड काशीच्या चुलत्याच्या वाटणीला गेलं होतं तेव्हा त्यानं आंब्याच्या बदल्यात चुलत्याला बिघाभर वावर दिलं! शेजारपाजारच्या लोकांनी अन् नात्यागोत्यातल्यांनी यामुळं काशीला वेड्यात काढलं होतं...
‘‘आरं, यडा का खुळा तू? आसा आतबट्ट्याचा येव्हार करून ऱ्हायला...’’
‘‘काशी, बावळा हायेस गड्या तू...चुलत्यानं गंडवलं बघ तुला...’’
‘‘काशी, आसं काय हाये रं त्या आंब्याच्या झाडात?’’
आंब्याच्या झाडात काय आहे हे काशी तेव्हाही लोकांना सांगू शकला नाही अन् आजही नाही. त्यानं जर ते सांगितलंच असतं तर त्या जगानं त्याला आणखीच खुळ्यात काढलं असतं. ते फक्त आंब्याचं झाड नव्हतं. ते त्याचा बाप होतं! बाप दुसऱ्याच्या वाटणीला कुणी जाऊ देईल का? काशीनं ते होऊ दिलं नाही.

काशी गतकाळातल्या आठवणींतून बाहेर आला आणि वर्तमानातल्या विचारांत हरवला...‘मळा इकन्याचा निर्नय माहाच हुता. आपल्या बापाची मळ्यावं लई मया हाये ह्ये रमा जानून असल्यानं माह्या हयातीत तरी रमानं ह्यो मळा इकला नसता. म्याच लई लकडा लावला त्येच्यामागं तव्हा कुढं त्यो राजी झाला. ह्यो निर्नय म्या तरी कुटं सुखासुखी घेतला हुता? रमा मास्तर झाला. अक्षरांमधी रमला. अक्षरांची शेती करू लागला म्हना ना! तशी बी त्येला शेतीवाडीची आवड नव्हतीच. तो कुनाकडून शेती करून घिईल आसं वाटलं, तर त्ये बी त्येनं केल न्हाई, म्हून म्याच त्येला म्हनलं, टाक बाबा जिमीन इकून. पडीत जिमीन बघून काळीज तीळ तीळ तुटायचं माहं...’

दोन दिवस गेले असतील. परत एकदा रमा तणफणत आला.
‘‘दादा, आता मात्र तुम्ही हद्द केली हद्द...’’
‘‘काय झालं, रमा?’’
‘‘तुम्ही परत गेला होतात मळ्यात?’’
‘‘हां. इहिरीनं बोलीवलं होतं मला आन् आंब्याला बी काही सांगायचं व्हतं, मग जावं लागलं लगबगीनं!’’
‘‘हेच! ते लोक म्हणाले, ‘खूळ लागलंय तुमच्या बापाला.’ मला खरं वाटलं नव्हतं ते; पण हा असा पुरावाच मिळाला म्हटल्यावर काय बोलणार?’’
‘‘म्हना गड्याय वो काही बी! रांगलो म्या त्या मातीत. जल्माला आलोया तसा म्या ह्यो माहा मळाच पघत आलोय. मानसांनी दगा दिला आसंल; पर माह्या या इहिरीनं, आंब्याच्या झाडानं जपलं मला. मानसांपेक्षा हजार गुंज भरोसा हाये माहा त्यांच्यावं! जीव गुतून पडलाय रं त्येंच्यात माहा. त्यो येवढ्या लवकर बाजूला व्हईल का? आरं, भावना कशा न्हाईत त्या लोकायला?’’
‘‘मी समजू शकतो तुमच्या भावना! पण त्या लोकांना नाही कळत तुमच्या भावना, त्याला आपण काय करणार?’’
‘‘आरं, पायातला काटा उपटून फेकता येतो, रमा. तशा भावना सहजी उपटून फेकता येत्यात का?’’
‘‘माझं डोकं बंद पडलंय, दादा!’’
‘‘रमा, मला ठावं हाय की तुला तरास हुतोय त्यो. तुला तरास व्हऊ न्हाई ह्ये मला बी मस वाटतं; पर ज्येन्ला मळा इकला त्येन्ला काळीजच न्हाई आसं दिसतंय! मला वाटलं, माहा मळा पुन्हा हिरवा व्हईल...त्येच्यासाठी मन हिरवं लागतं रं; पर त्येंची मनं लाकडागत वाळून गेलीयात. लई निकरट मानसं हायेत ती! आपुन मानसं पारखून घ्याया पाह्यजे व्हती...’’
पण हे सारं ऐकायला रमा कुठं तिथं उभा होता? तो तर केव्हाच पायात चपला सरकवून घराबाहेरही पडला होता.
आपल्याला मळ्याच जायाचंच नव्हतं...तशी मनाची तयारी बी केली हुती; पर इहिरीनं पोटातून हाक घातली, ती न्हाई टाळता आली...
काशी काही रमाला हे पटवून देऊ शकत नव्हता.
मात्र, म्हातारा काशी जेव्हा धावत-पळत मळ्यात गेला; तेव्हा त्याला विहिरीनं सांगितलं : ‘या लोकायला माही काही गरज न्हाई. ते बुजवून टाकनार हायेत मला. त्येन्ला इथं कारखाना उभारायचा हाये. माझी मोठी अडचन झालीया त्येन्ला! ल्येका, मला इकडून घिऊन चल!’
पण असं काही करता येणार नाही हे काशीनं विहीरमायला सांगितलं!
आंब्याचं बापझाडंही रडलं. काशीला म्हणालं : ‘ल्येका, कुऱ्हाड पडंल माह्यावं बी आसं दिसतंय. आरं, चांगली न्हाईत रं ही मानसं. तू आमाला कुनाच्या हवाली केलंया?’
आपल्या या ‘माय-बापां’चं दु:ख काशी कुणाला सांगू शकणार होता का? माणसांच्या जगात हे खरं तरी वाटू शकेल काय? एक वेळ शेळ्या-बकऱ्यांवरची माया माणूस समजून घेईल; पण झाडा-विहिरीवरची नाहीच समजून घेऊ शकणार! काशी खूप मोठ्या पेचप्रसंगात सापडला होता. हतबल झाला होता.
आपल्या भावनांचं मोलच नाहीये त्या लोकांना. आता त्या मळ्यात पाय ठेवायचा नाही, असं काशीनं काळजावर दगड ठेवून ठरवलं आणि मग विहिरीशी अन् आंब्याशी जाऊन त्यानं अखेरचं रडून घेतलं...
खूप दिवस मध्ये निघून गेले असतील. रमाचा राग विस्तव झाला होता. तो काशीवर चिडला होता.
‘‘दादा, आता मात्र तुम्ही मला खाली पाहायला लावत आहात.’’
‘‘मनाला लई समजावलं गड्या! पर न्हाई रोखू शकलो.’’
‘‘एवढीच जर माया आहे तुमची विहिरीवर अन् त्या आंब्याच्या झाडावर तर त्यांना कवटाळून मरा तरी एकदाचे!’’
काशी सुन्न झाला. मटकन् खाली बसला. भिंतीला टेकून. भिंतही पाठीत दणके घालू लागली, जणू! काळजात कळ उठली. मरतो की काय? पण ते कुठलं बापडं लगेच झडप घालील!


रमाच्या तोंडून निघून गेलं खरं; पण त्याचं त्यालाच खूप वाईट वाटलं. आपल्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. आई वारल्यानंतर त्यांनी परत लग्न केलं नाही, आपल्या पोराला सावत्रपणाची वागणूक नको म्हणून. वडीलच आपली आईही झाले. आईची उणीव त्यांनी कधी भासू दिली नाही. एवढं शिकवलं. कधी कुणापुढं हात पसरू दिला नाही अन् आज आपण असं बोललो त्यांना...तो स्वत:च्याच तोंडात मारून घ्यायला लागला. काशीनं सावरलं त्याला : ‘‘रमा, नगं वाईट वाटून घिऊ...तुही मया ठावं हाये मला. खरं सांगतो, तुझ्या बोलन्याचा मला बिलकूल राग आला न्हाई.’’
‘‘दादा, मला माफ करा. मी चुकीचं बोललो...’’
‘‘रमा, मला तुझी अवस्था कळती रं लेकरा... तुही काहीच चूक न्हाई.’’
‘‘कशी चूक नाही, दादा? पण त्या लोकांनी डोकं फिरवलं ओ माझं. ज्या वडिलांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं त्यांनाच असा अपशब्द!’’ तो पुन्हा स्वत:च्या तोंडात मारून घेऊ लागला.
हा प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची घटना...
‘तुझे वडील आंब्याच्या झाडाखाली मरून पडलेत...’ कुणीतरी लगबगीनं येऊन रमाला सांगितलं. वडिलांच्या मृत्यूचं दुःख रमाला अनावर झालं. तो त्यांच्या मृतदेहावर झुकून रडू लागला. लोक जमा झाले. काशीचा मृतदेह गाडीत ठेवण्यात आला. गाडी निघाली...
लोकांच्या नाही; पण रमाच्या लक्षात आलं, की अर्धवट बुजवलेल्या विहिरीच्या डोळ्यांत पाणी होतं अन् तोडलेल्या आंब्याच्या झाडालाही हुंदका फुटला होता...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com