aishwarya patekar
aishwarya patekar

अंगठ्यावरची शाई (ऐश्वर्य पाटेकर)

सावजीनं खाडकन् परसरामच्या मुस्काटात मारली. सावजीचा आपल्या बायकोवर विश्वास होता. ती असं काही वागणार नाही अशी पक्की खात्रीच त्याला होती. परसरामला आपल्या या मित्राचा राग यायच्या ऐवजी कीवच आली.

रेशनदुकानाच्या कोपऱ्यावर फेकलेल्या कचऱ्यात मला शाईचं पॅड सापडलं. खूप मोठी दौलत सापडल्यासारखी एकदम झडप टाकून, दुसरं कुणी पाहायच्या आत ते मी हस्तगत केलं. हे शाईचं पॅड मिळवण्यासाठी मी कोण वणवण केली होती. ते इतक्या सहजी सापडावं! तुम्ही म्हणाल, शाईचं पॅड ही काही न मिळती वस्तू थोडीच आहे? तुमचा तसा विचार असेलही; पण माझ्यासाठी मात्र ते पॅड लाखमोलाचं आहे. त्याच्या बदल्यात एखाद्यानं अंगावरचा सदरा काढून मागितला असता तरी मी तो तिथल्या तिथं काढून दिला असता! अशा या शाईच्या पॅडची मोठीच हकीकत आहे. ती मला तुम्हाला निचितीनं सांगावीच लागेल.

रेशन घ्यायला आलेल्या लोकांचा डाव्या हाताचा अंगठा रेशन दुकानदार नरहरशेठ शाईच्या पॅडमध्ये दाबायचा. अंगठ्याला शाई लागली की नाही याची शहानिशा करून तसाच धरून त्याच्या मस्टरवर जोरानं टेकवायचा. लोकांच्या अंगठ्याचं निळंभोर जंगल त्याच्या मस्टरभर उमटत जायचं. आईबरोबर मी रेशन आणायला गेलो की मी अंगठ्याच्या ठशाच्या उमटाउमटीचा हा खेळ खूप वेळ पाहत बसायचो. मला तो विशेष आवडायचा. त्यामुळे मी आईचं रेशन भरून झालं तरी घटकाभर रेंगाळायचोच. आईचा ओरडा खावा लागायचा.
‘‘चाल ना नडघा, उचल पिशी. का दुकानातच ऱ्हातो? नरारीशेठ याला घ्या ठिवून तुम्च्या दुकानात!’’
‘‘त्याला ठिऊन घिऊन काय करू? तो करील लाखाचे बारा हजार!’’
मी गुमान पिशवी उचलून आईच्या मागं मागं निघायचो; पण शाईचं पॅड काही नजरेसमोरून जायचं नाही. माणसाच्या अंगठ्याचा ठसा उमटवणारं अद्भुत काहीतरी ते आहे असं मला वाटायचं. असं शाईचं पॅड आपणही मिळवायचंच असा ध्यासच मी घेतला. तो तडीला जावा असं काही होत नव्हतं. गावातल्या कुठल्याच दुकानात ते विकायला ठेवलेलं नव्हतं. थोडक्यात, शाईचं पॅड घ्यायचं तर मला आधी त्यासाठी लागणारे पैसे जमा केले पाहिजे होते. खरोखर तशी तजवीज करून ठेवायला कारण ठरला माझा पंढरीमामा. त्यानं मला दोन रुपये दिले होते. ते मी तसेच पॅडसाठी जपून ठेवले. पॅड कुठं कुठं मिळू शकतं याची चाचपणी यार-दोस्तांकडे केल्यावर पहिल्याझूट पोरं म्हणाली : ‘‘रविवारच्या लासलगावच्या बाजारात.’’

एकदा रविवारी आईबरोबर बाजाराचा हट्ट करून बाजारलाही गेलो. आख्खा बाजार पालथा घातला; पण बाजारात मला कुठंच पॅड आढळून आलं नाही. बाजारच कुचकामी ठरला. पीरसायबाच्या यात्रेत मिळेल अशीही अशा धरून होतो; पण तिथंही मिळालं नाही. मग सांगा, असं पॅड जर का मला रेशनदुकानाच्या बाहेर मिळालं तर माझ्या आनंदाला पारावार का राहणार नाही! रस्त्यातच गौत्या अन् आर्ज्या भेटला. मी मागच्या खिशात पॅड लपवलं.
गौत्या म्हणाला : ‘‘काये रं तुज्याकडं? काम्हून लपवीत चाल्लाय?’’
‘‘कुढं काय, कायीच तं न्हाई’’
‘‘ह्ये पऱ्या, कोन्ला उल्लू बनून ऱ्हायलाय?’’
‘‘दाखव काय ते’’
दोघांनी माझ्या अंगाशी झटत मागच्या खिशातून पॅड काढलं.
त्यासरशी आर्ज्या म्हणाला : ‘‘ये पऱ्या गौत्या, यानं पाह्य, ते अंगठ्याचं ठसा घ्यायचं खोकडं चोरून चालवलंय!’’
‘‘ये म्या चोरलं न्हाई. माला ते दुकानाम्होरं गवासलं हाये.’’
‘‘ये चोरट्या आण ते इकडं.’’
‘‘अय, म्या न्हाई देनार.’’
‘‘कसा देत न्हाई तेच म्या पघतो, माह्या चुलत्याचंय ते, तुह्या बापानं ठिवलं का?’’
मी त्यांच्या हातावर तुरी देऊन जी धूम ठोकली... खूप मोठं घबाड हाती लागल्यासारखी माझी अवस्था झाली होती. ज्या ऐटीत लोकांचे अंगठे आपल्या मस्टरवर नरहरीशेठ घेत असे, तसेच अंगठे मी आता कागदावर उमटवणार होतो. मी पॅड उघडलं. त्यात अंगठा दाबला; पण त्याला शाई लागलीच नाही, पुन्हा पुन्हा बळ करून दाबला तरी शाई लागली नाही. साऱ्या जगाचे अंगठे घेऊन घेऊन नरहरीशेठनं शाई संपवून टाकली होती व म्हणून तर त्यानं ते कचऱ्यात फेकलं होतं. मग मला माझी थोरली बहीण पमी हिची कंपासपेटी आठवली. ती शाळेत निघण्यासाठी आवराआवरच करत होती. मी तिच्या कंपासमधून हळूचकन् शाईचं पेन बाहेर काढलं. त्याचं टवळं उघडून सगळीच शाई पॅडच्या स्पंजावर ओतली. त्यात थोडं पाणी टाकलं अन् कागदावर ठसे उमटवू लागलो. पमी आली. तिनं पाहिलं, हात-पाय आपटत म्हणाली:
‘‘पाह्य गं आई, ह्या सोंगानं माह्या पेनातली शाई देली वतून, आता म्या पेपर कशानं ल्याहायचा?’’
‘‘काय रं घुबडा! काम्हून वतली शाई?’’ आई चिडून म्हणाली.
‘‘आई, माला यड लागलं का वतून द्यायला?’’
‘‘मग ती काम्हून म्हनून ऱ्हायली तसं?’’
‘‘म्या ह्या पॅडमधी टाकली शाई. ते कोरडं झालं व्हतं!’’
‘‘याचं काय करनार तू आता?’’
‘‘रेशन दुकानात जाऊन न्हाई का तू अंगठ्याचा ठसा देते, तसे म्या ठसे घेनार लोकायचे!’’
‘‘त्याचं का लोनचं घालनार का काय? शिप्तरा, अभ्यासात ठसा उमटव. चाल्ला ठसे घ्यायाला!’’
‘‘आई, माही चाचणी परीक्षाय. कुढल्या पेनानं लिहू? न्हाई तं शाई भराया पैसं दी!’’
आईला असा काही राग आला की तिनं मला बदडायला सुरुवात केली.
‘‘बाप तं गेला तुझा निघून. त्यानं काई घरादारावर, सौंसारावर ठसा उमटवला न्हाई! त्याचंच तू कारटं,’’ असं म्हणत आई मला पुन्हा मारायला लागली.
‘‘आगं, कशाला मारते त्याला? त्याला कुढं काय कळतंय? लहानचंय त्यो...’’ बरं झालं, माझे आजोबा दोन दिवसांकरता आमच्याकडे आले होते. नाहीतर आईनं माझाच ठसा करून टाकला असता! त्यांनी पमीच्या हातावर पाच पैसे ठेवले. ती शाई आणायला पळाली. आजोबांनी मला कुरवाळलं अन् म्हणाले :
‘‘काय रं? कशापायी वतली तू शाई ह्येच्यात?’’
‘‘दादा, मला कागदावर अंगठ्याचा ठसा उमटवायचाय.’’
‘‘असा रिकामा ठसा उमटवून काय उपेग?’’
‘‘कागदावर ठसा उमटवला की रेशन मिळतं.’’
‘‘फक्त रेशन मिळवण्यासाठी?’’
‘‘आणिक काय?’’
‘‘आरं बाबा, असले ठसे सगळेच उमटवतेत. त्यात काय नवल! खरा ठसा या जगाच्या कागदावर उमटवला पाह्यजे.’’
‘‘जगाचा कागद कुढं मिळतो?’’
‘‘तो मिळत न्हाई!’’
‘‘स्वोता तयार करावा लागतो!’’
‘‘दादा, कुढं त्येच्या नादी लागून ऱ्हायले? त्या सावजीसारखं येडंच व्हायचंय हे पोर ‘अंगठा घ्या, अंगठा’ म्हनत.’’

आईनं मध्येच येऊन विषय बंद केला अन् सावजीला दिलं माझ्या पुढं ठेवून.
खरंतर सावजीची गोष्ट मला तुम्हाला सांगायचीच होती. विषय अंगठ्याच्या ठशाचा होता. त्याचं वेड मलाही होतं; म्हणून माझीच गोष्ट सांगत बसलो. सावजी डोक्यातून बाद झाला. सावजी व्यंकट काणे. याला मीही विसरू शकत नाही आणि आमचं गावही. सावजी वेडा झाला होता. त्याच्या मोठ्या भावानं सावजीला फसवून अंगठा घेतला होता व त्याच्या नावची शेती आपल्या नावावर करून घेतली होती. तरीही सावजी आपला झालेला विश्वासघात पचवून शहाण्या माणसासारखा जगत होता. मोलमजुरीच्या कामाला जाऊन आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता. एक दिवस त्याला परसरामनं येऊन खबर दिली.
‘‘ऐ सावज्या, येडा का खुळा! बायकोला कुढल्या कागदावर अंगठा देला तू?’’
‘‘काय कानू...ती म्हन्ली, अंगठा टेकवा. तिथं म्या टेकवला.’’
‘‘आरं, लईच भोळा ऱ्हायला बाबा तू. तिकडं तुह्या भावानं तुही बायकू त्येच्या नावावर करून घेतली!’’
सावजीनं खाडकन् परसरामच्या मुस्काटात मारली. सावजीचा आपल्या बायकोवर विश्वास होता. ती असं काही वागणार नाही अशी पक्की खात्रीच त्याला होती. परसरामला आपल्या या मित्राचा राग यायच्या ऐवजी कीवच आली.
तो म्हणाला : ‘‘दोस्ता, येळेनं तुज्याच अशी काही मुस्काटात मारलीया! कुढलीच संधी घेऊ देली न्हाई तुला. तू बसला इथं ईटभट्टीवर येऊन. तिकडं तुह्या भावानं बळकावला तुहा सौंसार!’’
सावजी वीटभट्टीवरून तडक घरी आला. त्याची बायको अन् पोरं भावाच्या घरी. तो बायकोला म्हणाला : ‘‘मंगल, माह्या दुश्मनाच्या घरी काय करून ऱ्हायली तू?’’
‘‘तुम्चा दुस्मन माहा नवराय आता!’’
‘‘मंग म्या कोनंय?’’
‘‘तुम्च्याशी काडीमोड जाला महा. तुमीच अंगठा देला नं!’’
सावजी काहीच बोलला नाही. मुक्यानंच घराबाहेर पडला अन् गावाबाहेरही. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी तो गावात परतला. त्यानं कुठून तरी शाईचं पॅड पैदा केलं होतं. पिंपळाच्या पारावर बसून भेटेल त्याला तो म्हणू लागला : ‘‘अंगठा देऊ का, अंगठा?’’
असं म्हणत म्हणत थेट अंगठ्याचं निशाण लोकांच्या कपड्यांवरच तो उमटवू लागला. नंतर नंतर तर लोकांच्या मागंच लागू लागला. शहाणीसुरती माणसं त्याच्यापासून पळू लागली. मी मात्र त्याच्याकडे बिनधास्त जायचो हातात वही घेऊन. तो ‘अंगठा देऊ का, अंगठा?’ असं म्हणायच्या आत मी वही त्याच्या पुढ्यात ठेवून द्यायचो. कधी कधी आईनं त्याच्यासाठी भाकर दिलेली असायची. ठसे घेऊन झाले की मी भाकर त्याच्या हातात ठेवायचो. तो भाकरीला ‘भुकेचा ठसा’ म्हणायचा. त्यानं कशालाही ठसा म्हटलं असतं तरी मला पटलं असतं. त्या ठशानंच त्याच्या आयुष्यातून खूप काही हिसकावून घेतलं होतं.

सावजी ज्या भाकरीला ‘भुकेचा ठसा’ म्हणायचा त्या ‘भुकेच्या ठशा’च्या शोधात मी गाव सोडलं. पुढं सावजीचं काय झालं याचाही विचार करायला कुठं वेळ होता? भुकेचा ठसा आपल्याला त्याच्या अवतीभवती कायमचं बंदिस्त करून ठेवतो. नात्यागोत्यापेक्षाही भुकेचा ठसा मोठा होत जातो. आपण लिगाडाच्या माशीगत त्यात गुंतून पडतो.
जेव्हा माझी चुलतआजी वारली तेव्हा मी गावाकडे गेलो तर सावजी भेटला. तो आता खूप म्हातारा झाला होता. मी माझ्या कवितांचं पुस्तक त्याच्यासमोर ठेवलं...
‘‘सावजी, दे की तुझ्या अंगठ्याचा ठसा!’’
सावजी काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यांत घनघोर पाऊस फुटून आला. त्यानं फाटक्या मळक्या शर्टाची बाही वर ओढून हात दाखवला. मी अवाक् होऊन पाहतच राहिलो. त्यानं आपल्या डाव्या हाताचा अंगठाच तोडून टाकला होता. आता कोण फसवणार त्याला!
मी त्याचा निरोप घेऊन निघालो. मात्र, चालता चालता मी माझ्या डाव्या हाताचा अंगठा चाचपून पाहिला...!!
तो होता जागच्या जागीच; पण कुठून न् काय त्याला शाई लागून आली होती...
तुमच्याही डाव्या अंगठ्याला शाई तर नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com