esakal | गोड-मिठास आणि फायटरही ! (अलका कुबल)
sakal

बोलून बातमी शोधा

alka kubal

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरच्या मालिका, अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयानं ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं मंगळवारी (२२ सप्टेंबर) निधन झालं. कलाकारांच्या तीन पिढ्यांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांच्याशी अत्यंत जवळचं नातं जोडलं गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्याबरोबरच्या आठवणींना दिलेला उजाळा....

गोड-मिठास आणि फायटरही ! (अलका कुबल)

sakal_logo
By
अलका कुबल

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरच्या मालिका, अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयानं ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं मंगळवारी (२२ सप्टेंबर) निधन झालं. कलाकारांच्या तीन पिढ्यांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांच्याशी अत्यंत जवळचं नातं जोडलं गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्याबरोबरच्या आठवणींना दिलेला उजाळा....

आशालता वाबगावकर माझ्यासाठी ताई होत्या. त्यांची माझी पहिली भेट झाली ती ‘युगंधरा’च्या सेटवर. ही गोष्ट आहे ३०-३२ वर्षांपूर्वीची. नायगावला या मालिकेचं चित्रीकरण असायचं. तिथंच आमचे सूर जुळत गेले. त्यानंतर आम्ही 'येरे येरे पैसा’सारख्या काही मालिकांत एकत्र काम केलं, त्यामुळं आमची ओळख घट्ट झाली. आता आम्ही एकमेकींशी फोनवरून गप्पा मारू लागलो आणि आमचं नातं अधिक घट्ट झालं. आमच्यात आई आणि मुलीचं नातं निर्माण झालं. पुढं ‘माहेरची साडी’ आला. त्यांचे विविध कार्यक्रम, काही विशेष सोहळे यानिमित्तानं आम्ही भेटत गेलो. आमच्यातील आई-मुलीचं नातं अधिकाधिक घट्ट झालं. एकमेकींच्या घरी जाणं-येणं… एकमेकींच्या सुख-दुःखांत सहभागी होणं, हे आमचं सगळं सुरूच होतं. कधी चार दिवस ताईंचा मेसेज आला नाही, तर मनात हुरहुर निर्माण व्हायची, चिंता वाटायची. मग त्यांना लगेच मी फोन करायची, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची. कधी गाडी पाठवून त्यांना माझ्या घरी आणायची. इतकं आमचं नातं घट्ट जुळलेलं होतं.

आमच्यातील नातं हे हक्काचं होतं. कधी कधी त्या रागवायच्या, कधी भांडणंदेखील व्हायची; पण थोड्याच वेळात आम्ही पुन्हा प्रेमानं गप्पा मारू लागायचो. त्यांचा राग-रुसवा कधी कायमचा नसायचाच. २००७ मध्ये माझं एक मोठं आॅपरेशन झालं, तेव्हा मला भेटायला त्या रुग्णालयात आल्या होत्या. मला त्यांनी खूप धीर दिला, आधार दिला, आईची माया दिली. आमच्या या इंडस्ट्रीत अशा प्रकारची नाती खूप कमी असतात. आता मी हे सारं मिस करीत आहे. माझी आईच मी गमावली आहे.

एक कलाकार म्हणून त्या कशा होत्या, हे दुनिया जाणते. खूप स्वाभिमानी कलाकार होत्या त्या. फायटर, लढाऊ आणि अष्टपैलू. त्या मूळच्या नाटकातल्या, त्यामुळं त्यांचं पाठांतर खूप चांगलं होतं. एखादी पटकथा हातात आली, की ती त्यांना तोंडपाठच होऊन जायची. संहिता हातात घेऊन बसणं आणि आपल्या सीनच्या मागं-पुढं काय आहे, समोरचा कलाकार कोण आहे, अशा सगळ्या गोष्टींचा या वयातही त्या अभ्यास करायच्या. ८३ व्या वर्षीही त्या तितक्याच उत्साहानं काम करीत होत्या. ‘आई माझी काळूबाई’च्या सेटवर काम करीत असताना या मालिकेचा दिग्दर्शक भीमराव मुडे तर त्यांची कामावरची श्रद्धा पाहून भारावलाच होता. मला तो म्हणालादेखील होता, की या वयातही आशाताई किती उत्साहानं आणि तन्मयतेनं काम करतात.

त्यांचा स्वभावही त्यांच्या दिसण्यासारखाच अतिशय गोड आणि नम्र. त्यांचं मिठ्ठास बोलणं समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडायला लावणारं होतं. सेटवर आमच्या खूप गप्पा रंगायच्या. जुने किस्से, जुन्या आठवणी ऐकवत असत त्या अनेकदा. त्यांच्या घरी पं. वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे, छोटा गंधर्व अशी नामवंत मंडळी येत असत, त्यांच्या मैफली रंगत असत. त्यांचं ते घर म्हणजे सोनेरी काळ पाहिलेलं घर. अनेक नामवंतांचे पाय त्या घराला लागलेले आहेत. मोठीच कारकीर्द होती आशाताईंची. ‘संगीत संशयकल्लोळ’ हे त्यांचं पहिलं नाटक. तिथून सुरू झालेला तो गान-अभिनय प्रवास अविरत सुरू होता. मत्स्यगंधा, गुड बाय डाॅक्टर, संगीत मृच्छकटिक, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गारंबीचा बापू, खुद्द पुलंबरोबर
केलेलं वाऱ्यावरची वरात अशी कित्येक नाटकं गाजलेली आहेत त्यांची. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांत त्यांचा वावर राहिला. नाटकांप्रमाणेच त्यांचे चित्रपटही गाजले. केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, अमोल पालेकर अशा अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. बासू चॅटर्जींचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट.

त्यांनी गंभीर, विनोदी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्या गातही असत. ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’ हे नाट्यपद आठवलं, की त्यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. आताही कधी एखाद्या आनंदाच्या क्षणी आम्ही त्यांना म्हणायचो, "आशाताई तुम्ही गायला पाहिजे." मग त्या एखादं गाणं, एखादं पद ऐकवायच्या. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या त्याच जुन्या काळात कधी अडकून पडल्या नाहीत. आजच्या पिढीबरोबरही त्या तितक्याच रमायच्या. काळाबरोबर त्या बदलल्या होत्या.
एवढं प्रचंड काम केलं त्यांनी; पण आपल्या कामाचा बडेजाव कधी मिरवला नाही. एक खंत मात्र जरूर आहे; हिंदी, मराठीत त्यांनी केलेलं हे काम पाहता पुरस्कारांच्या बाबतीत मात्र त्यांची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही. पुरस्कारांच्या बाबतीत डावललं गेलं त्यांना. सरकारनंही त्यांच्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार होता, असं कानावर आलं होतं मध्यंतरी; पण ऐनवेळी कुठं काय गडबड झाली कोण जाणे! असो. त्यांचं जाणं हे मनाला वेदना देणारं आहे. माझ्या मुलीचं आता लग्न होणार आहे आणि या लग्नात मी आईला आणि माझी मुलगी आपल्या आजीला मुकली आहे.

कामावरील अथांग प्रेम
आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मीदेखील तिथंच होते. सतत डॉक्टरांशी त्यांच्या तब्येतीबद्दल चर्चा करीत होते. तेव्हा मला चित्रपटसृष्टीकडूनही खूप सहकार्य मिळालं. अनेकांनी फोन केले. आशाताईंच्या तब्येतीबाबत चौकशी केली. कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास सांगा, असंच सगळ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील फोन केला. काही मदत हवी आहे का, असं त्यांनी विचारलं.
खरंतर तुम्ही शूटिंगला येऊ नका, असं वारंवार आम्ही सांगत होतो त्यांना; पण त्यांनी ते अजिबात ऐकलं नाही. घरात बसून कंटाळल्या होत्या त्या. त्यांना काम करायचं होतं. कलेवरील प्रेमापोटीच त्या शूटिंगला आल्या होत्या. काम करतानाच त्यांना मृत्यूनं कवटाळलं.

(शब्दांकनः संतोष भिंगार्डे)

loading image
go to top