६४ घरांच्या खेळात ६४ ग्रँडमास्टर; पण... (रवींद्र मिराशी)

ravindra mirashi
ravindra mirashi

विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१ वर्षांनंतरदेखील भारतीय बुद्धिबळविश्व हे आनंद नावाच्या आसाभोवतीच फिरते आहे. इथंच आनंदचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं.

आज भारतात ६४ घरांच्या खेळात ६४ ग्रँडमास्टर झाले. ही खूपच आनंददायी घटना आहे. मात्र, माजी विश्वविजेता आणि भारतीय बुद्धिबळपटूंचं प्रेरणास्थान बनलेल्या आनंद विश्वनाथनची जागा भविष्यात कोण घेऊ शकेल, याचं नेमकं उत्तर सापडत नाही.

ता. ११ डिसेंबर १९६९ रोजी कृष्णमूर्ती विश्वनाथन यांचं कुटुंब पंचकोनी झालं. विश्वनाथन यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं आनंद. शिवकुमार हा आनंदचा सर्वात मोठा भाऊ आणि अनुराधा ही बहीण. आई सुशीला यांनी आनंदला, रशियन वकिलातीमार्फत चालवल्या जाणाऱ्या चेन्नईमधल्या ‘ताल चेस क्लब’चं प्रथम सभासद बनवलं. आनंदचा बुद्धिबळाचा श्रीगणेशा इथं झाला. आनंद ९ वर्षांचा असताना विश्वनाथन यांची बदली फिलिपाइन्स-मनिला इथं झाली. तिथल्या फक्त चार वर्षांच्या वास्तव्यात आनंद बुद्धिबळाच्या पूर्ण प्रेमात पडला आणि त्याचं पुढं विश्वच बदलून गेलं. प्रारंभीचं २२८४ रेटिंग प्राप्त करून आनंदनं ‘फिडे’च्या प्रगतीपुस्तकात पहिली नोंद केली. जुलै १९८४ मध्ये २३०० चा टप्पा पार करण्यापूर्वी आनंदनं सन १९८३ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय सब-ज्युनिअर स्पर्धा ९ पैकी ९ गुण मिळवून जिंकली. सन १९८४ मध्ये हॉंगकॉंग इथली एशियन ज्युनिअर स्पर्धा खिशात टाकली. याचबरोबर ब्रिटिश लॉइड बँक स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर किताबाचा पहिला नॉर्म, चेस ऑलिम्पियाडमध्ये दुसरा नॉर्म, तर सन १९८५ मध्ये एशियन ज्युनिअर स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करून आनंद इंटरनॅशनल मास्टर बनला. भारतात सन १९६० मध्ये मॅन्युअल एरन यांनी सर्वात प्रथम हा किताब प्राप्त केला होता.

सन १९८५ मध्ये लंडन इथं नववी लॉइड्स बँक मास्टर स्पर्धा झाली. या स्पर्धेत अँड्रयू जोनाथन मेस्टेल याच्या विरुद्ध सिसिलियन ड्रॅगन-युगोस्लाव्ह ॲटॅक पद्धतीत झालेल्या डावात आनंदनं पांढऱ्या बाजूनं केवळ २५ चालींत अँड्रयूला पराभूत केलं. या संपूर्ण डावात आनंदनं कांही मिनिटांचा अवधी घेतला, तर अँड्रयूनं दोन तासांहून अधिक वेळ घेतला. या डावानंतर ‘बीबीसी’नं आनंदला ‘लाइटनिंग किड’ म्हणून नवीन ओळख दिली. सन १९८७ मध्ये आनंदनं २५०० चा ‘फिडे’ रेटिंग टप्पा ओलांडला. याच दरम्यान फिलिपाइन्स-बागिऊ इथं झालेली वर्ल्ड ज्युनिअर स्पर्धा आनंदनं दिमाखदार कामगिरीनं जिंकली. पुढं अल्पावधीतच आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला. त्या क्षणाला भारतात १० इंटरनॅशनल मास्टर्स होते. सन १९८६ मध्ये कोलकता इथल्या शक्ती फायनान्स स्पर्धा आणि त्यानंतरच्या लॉइड्स स्पर्धेत आनंदची अगदी म्हणजे अगदी थोडक्यात ग्रँडमास्टरची संधी हुकली होती. अन्यथा एक वर्ष आधीच तो ग्रँडमास्टर झाला असता. कामगिरीच्या या पायरीवर ‘रायजिंग स्टार’ कोणत्या खेळाडूला म्हणावं, याचे नवीन परिमाण आनंदनं घालून दिलं.

आनंदनं ग्रँडमास्टर ही आपल्या कारकीर्दीची पहिली पायरी मानली. त्याच्या कारकीर्दीच्या स्वप्नाची उंचीच मुळी एव्हरेस्टएवढी होती. पदार्पणात २२८४ रेटिंगसह जागतिक क्रमवारीत १७५२ वं स्थान प्राप्त करणारा आनंद, गॅरी कास्पारोवच्या निवृत्तीनंतर एप्रिल २००७ मध्ये २७८६ रेटिंगसह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोचला. (एप्रिल २०११ मध्ये २८१७ हे सर्वोच्च रेटिंग आणि एकूण ५ वेळा विश्वविजेतेपद.) आज भारतात ६४ ग्रँडमास्टर झाले; परंतु आनंदची जागा कोण घेऊ शकेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यासाठीच थोडक्यात का होईना आनंदच्या कामगिरीचा आणि कारकीर्दीचा हा आलेख पाहणं गरजेचं ठरतं.

आज जगात अधिकृत किताब प्राप्त एकूण १७४७ ग्रँडमास्टर आणि ३९३८ इंटरनॅशनल मास्टर्स आहेत. भारतात आनंदसह ६४ ग्रँडमास्टर आहेत. त्यातील ग्रँडमास्टरसाठी आवश्यक असलेली २५०० रेटिंग ही किमान क्षमता फक्त ३७ खेळाडूंकडंच आहे. केवळ २५०० रेटिंग प्राप्त ग्रँडमास्टर खेळाडू आज जागतिक क्रमवारीत पहिल्या ७५० मध्ये बसू शकत नाही. माजी विश्वविजेता आनंद याच्या नंतर जानेवारी २००७ मध्ये जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानापर्यंत झेप, तसंच मे
२०१२ मध्ये २७२० ‘फिडे’ रेटिंग ही ग्रँडमास्टर कृष्णन शशिकिरण याची स्वतः च्या
कारकीर्दीतली सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये ग्रँडमास्टर पी. हरीनं जागतिक क्रमवारीत २७६८ रेटिंगसह १० व्या स्थानास फक्त एकदाच अपवादानं स्पर्श केला आहे, तर डिसेंबर २०१६ मध्ये २७७० हे त्याच्या कारकीर्दीतलं सर्वोच्च रेटिंग राहिलं. ग्रँडमास्टर विदित गुजराथी २७०० च्या टप्प्यात स्थिरावू पाहतो आहे. ६४ पैकी आनंद, हरी, विदित, शशिकिरण आणि अधिबान हे केवळ पाच भारतीय ग्रँडमास्टर जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० खेळाडूंच्या यादीत आहेत.

कोनेरू हंपी आणि द्रोणावली हरिका या केवळ दोन भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी पुरुषांचा ग्रँडमास्टर किताब प्राप्त केला. आनंदसारखं मोठं स्वप्न उराशी बाळगून ‘गर्ल्स’ऐवजी ‘ओपन’ कॅटेगरीमध्ये सातत्यानं खेळताना दिसणाऱ्या आर. वैशालीसारख्या मोजक्या खेळाडूंचं नक्कीच कौतुक करायला हवं.

आज विद्यमान विश्वविजेता कार्लसन सातत्यानं नवीन उंची गाठतो आहे. त्याचं ‘फिडे’ रेटिंग २८८२ (लाईव्ह) आहे, तर आनंदचं २७५६ (लाईव्ह) आहे. सध्या भारताच्या एकूण ६४ ग्रँडमास्टरपैकी केवळ तीन ग्रँडमास्टर २७०० रेटिंगच्या वर आहेत. आनंद गेली २५-३० वर्षं सातत्यानं जागतिक क्रमवारीत टॉप-५, टॉप-१० मध्ये आहे. या पार्श्वभूमीवर प्रज्ञानंद, अर्जुन, डी. गुकेश, निहाल सरीन, चिदंबरम यांच्यासारख्या प्रतिभावान भारतीय ग्रँडमास्टर्सनी आनंदच्या पाऊलवाटेनं जाण्याची महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न बाळगल्यासच आपल्याला आनंदचा वारसदार मिळू शकेल.

भारताचे ६४ ग्रँडमास्टर
१) विश्वनाथन आनंद (१९८८)
२) दिब्येंदू बारुआ (१९९१)
३) प्रवीण ठिपसे (१९९७)
४) अभिजित कुंटे (२०००)
५) कृष्णन शशिकिरण (२०००)
६) पेंटाला हरिकृष्ण (२००१)
७) कोनेरू हंपी (२००२)
८) सूर्यशेखर गांगुली (२००३)
९) सांदिपन चंदा (२००३)
१०) आर. बी. रमेश (२००३)
११) तेजस बाकरे (२००४)
१२) पंचनाथन मगेश चंद्रन (२००६)
१३) दीपन चक्रवर्ती (२००६)
१४) नीलोत्पल दास (२००६)
१५) परिमार्जन नेगी (२००६)
१६) जी. एन. गोपाल (२००७)
१७) अभिजित गुप्ता (२००८)
१८) एस. अरुणप्रसाद (२००८)
१९) सुंदरराजन किदाम्बी (२००९)
२०) आर. आर. लक्ष्मण (२००९)
२१) श्रीराम झा (२०१०)
२२) दीप सेनगुप्ता (२०१०)
२३) बी. अधिबान (२०१०)
२४) एस. पी. सेतुरामन (२०११)
२५) द्रोणावली हरिका (२०११)
२६) एम. आर. ललितबाबू (२०१२)
२७) वैभव सुरी (२०१२)
२८) एम. आर. वेंकटेश (२०१२)
२९) सहज ग्रोवर (२०१२)
३०) विदित संतोष गुजराती (२०१३)
३१) एम. श्यामसुंदर (२०१३)
३२) अक्षयराज कोरे (२०१३)
३३) विष्णू प्रसन्ना (२०१३)
३४) देबाशिष दास (२०१३)
३५) सप्तर्षी रॉयचौधरी (२०१३)
३६) अंकित राजपारा (२०१४)
३७) अरविंद चिदंबरम (२०१५)
३८) मुरली कार्तिकेयन (२०१५)
३९) अश्विन जयराम (२०१५)
४०) स्वप्नील धोपाडे (२०१६)
४१) एस. एल. नारायणन (२०१६)
४२) शार्दूल गागरे (२०१६)
४३) दीप्तायन घोष (२०१६)
४४) कन्नाप्पन प्रियदर्शन (२०१६)
४५) आर्यन चोप्रा (२०१७)
४६) नारायणन श्रीनाथ (२०१७)
४७) हिमांशू शर्मा (२०१७)
४८) अनुराग महामल (२०१७)
४९) अभिमन्यू पुराणिक (२०१७)
५०) एम. एस. तेजकुमार (२०१७)
५१) सप्तर्षी रॉय (२०१८)
५२) आर. प्रज्ञानंद (२०१८)
५३) निहाल सरीन (२०१८)
५४) ई. अर्जुन (२०१८)
५५) कार्तिक वेंकटरामन (२०१८)
५६) हर्ष भारतकोटी (२०१९)
५७) पी. कार्तिकेयन (२०१९)
५८) जी. ए. स्टॅनी (२०१९)
५९) एन. आर. विसाख (२०१९)
६०) डी. गुकेश (२०१९)
६१) पी. इनियान (२०१९)
६२) स्वयम्स मिश्रा (२०१९)
६३) गिरीश कौशिक (२०१९)
६४) प्रिथू गुप्ता (२०१९)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com