सुदामा (दत्तात्रेय उपाध्ये)

dattatrey upadhye
dattatrey upadhye

‘‘पोराच्या नादी लागून लई अडचणीत आलुया सुधाकर...’’ अशी सुरवात करून शिवानं आपली सगळी कर्मकहाणी सुधाकरला सांगून टाकली आणि म्हणाला : ‘‘आता तूच यातनं काय तरी मार्ग काढलास तर...’’ का कुणास ठाऊक; पण सुधाकर एकदम सावध झाल्यासारखा वाटायला लागला. बहुतेक त्याच्यातला व्यावसायिक खबरदार झाला असावा. तो म्हणाला : ‘‘शिवा, तू आणि मी एकाच नावेतले प्रवासी निघालो. मीही मुलाचं ऐकून एक नवीन हॉस्पिटल बांधायला घेतलंय. मी एवढा हिशेबी; पण माझा अंदाज साफ चुकला. आता यातनं कसं बाहेर यायचं याचाच घोर मला लागून राहिलाय.’’ शिवाच्या सगळं लक्षात आलं...

‘कोयना एक्स्प्रेस’च्या त्या जनरल बोगीमधे आज अजिबात गर्दी नव्हती. पिशवी उशाशी घेऊन खिडकीशेजारच्या एका बाकावर शिवा आडवा झाला होता. बाकावर आडवं झाल्यावर त्याच्या शरीराला जरा आराम वाटत होता; पण गेले आठ दिवस सैरभैर झालेलं त्याचं मन मात्र अजूनही अशांतच होतं.
राहून राहून त्याला वाटत होतं- ‘‘पोराच्या नादी लागून आपण लई मोठी चूक केली. सात एकराची आपली काळी आई पोटभर जेवायला घालतिया. खरिपात मोत्यासारखी ज्वारी येतीया. रब्बीत गहू, हरभरा तरारतोय. हिरीवर थोडं माळवं निघतंया, थोडा ऊसबी हाय. सारं कसं झ्याक चाललं होतं.

पोराच्या डोस्क्‍यात काय आलं आणि या द्राक्षबागेच्या फंदात पडलो. तवा वाटत हुतं- या माळव्याच्या आणि उसाच्या जोडीला या द्राक्षबागेलाही हीर पाणी पाजंल; पण अंदाज शाप चुकला. यंदा हिरीचं पाणी मुदलातच कमी झालं. द्राक्षबाग लई लांब उसालाच पाणी पुरंना. बोर न्हाइ मारलं, तर द्राक्षबाग जळूनच जाणार आहे; पण बोर मारायला पैका कुठनं आणायचा? द्राक्षबागांसाठीच बॅंकेचं कर्ज डोक्‍यावर घेतलंय. आता तिथं जायला तोंडच नाही.’’ विचार करूनकरून शिवाच्या डोक्‍याचं भुस्काट झालं होतं. काही सोडणूक दिसंना झाली- तेव्हा नाइलाजानं त्यानं आज पुण्याची वाट धरली होती. तो सुधाकरला भेटायला चालला होता. त्याला सुधाकरची लई सय यायला लागली.

सुधाकरचं घर शिवाच्या घराला लागूनच होतं. सुधाकर आणि आपण एकाच वयाचे. दोघंही आई-बापांना एकुलते एक. दोघंही एकत्र वाढले, खेळले-बागडले. गावच्या शाळेत सातवीपर्यंत एकत्रच शिकले; पण तिथंच त्यांचा सहवास संपला. सातवीच्या परीक्षेत शिवा काही पास झाला नाही. सुधाकर मात्र जिल्ह्यात पहिला आला आणि पुढं शिकायला आजोळी सांगलीला निघून गेला. तरीही सुटीत भेटगाठ व्हायची. गप्पागोष्टीत दिवस कसा जायचा तेच कळायचं नाही. फडक्‍यावर थापून केलेले शिवाच्या आईच्या हातचे धपाटे सुधाकरला खूप आवडायचे. त्याच्या आईनं इलायची घालून केलेला गुळाचा सांजा शिवाही पोटभर खात होता; पण तेही दिवस गेले. सुधाकर पुढं शिकत राहिला. मोठा डॉक्टर झाला आणि पुण्याला एका मोठ्या हस्पिटलात काम करायला लागला. गावाकडं त्याचं जाणं-येणं कमी झालं.
हळूहळू सुधाकरच्या वडिलांचं म्हणजे दादांचंही वय होत गेलं. पहिल्यासारखं शेतीकडं बघायला जमंना. पोरगा तर यात पडणं शक्‍य नव्हतं. सुधाकरनंही तोवर पुण्यात जम बसवला होता. हातपाय आता चालणार नाहीत, असं जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा पुढचा सगळा विचार करून दादांनी शेती विकून टाकली. घरही विकून टाकलं आणि ते पुण्याला मुलाकडं राहायला गेले.

दिवस जात होते. सुधाकरनं आता स्वतःचंच हॉस्पिटल चालू केलं. भरपूर अनुभव गाठीशी होता. त्यात शेतीच्या पैशाचं थोडं पाठबळ मिळालं. हुशारी आणि कष्टाची तयारी तर रक्तातच होती. हा हा म्हणता सुधाकर पुण्यातल्या मोठ्या सर्जनच्या रांगेत जाऊन बसला, तरीही अजून तो नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला न चुकता येतो. त्याच्या त्या लांबलचक चकचकीत गाडीकडं आणि पांढऱ्याधोप कपड्यातल्या ड्रायव्हरकडं गावकरी अप्रूपानं बघत राहतात; पण हा गडी आहे तसाच साधा. आपणहून शिवाच्या घरात येतो आणि मुद्दाम खुर्ची आणून ठेवली, तरी खाली घोंगडीवर बसून चहा पिऊन जातो. या सलगीच्या जिवावरच शिवा आज त्याला भेटायला चालला होता.

सुधाकरला भेटायला शिवा आजच चालला होता असं नाही. पूर्वीही या ना त्या कारणानं पुण्याला आल्यावर तो सुधाकरला न चुकता भेटून जायचा. परवा परवाच सुधाकरच्या नातवाच्या मुंजीलाही येऊन गेला होता; पण ते जाणं-येणं वेगळं आणि आजचं वेगळं. आज मन तसं मोकळं नव्हतं. खूप दडपण आल्यागत वाटत होतं.
शिवा सुधाकरच्या बंगल्यावर पोचला, तेव्हा पाच वाजून गेले होते. सुधाकर अजून यायचा होता; पण वहिनी लगेच बाहेर आल्या. त्यानी अगत्यानं शिवाचं स्वागत केलं. गेस्टरूम उघडून द्यायला लावली. प्यायला थंड पाणी स्वतः आणून दिलं. कूकला चहा बिस्किटं आणायला सांगितली आणि घरची ख्यालीखुशाली विचारत आपणहून बोलत बसल्या.

तासाभरानं पोर्चमधे कार थांबल्याचा आवाज आला आणि ‘‘हे आले वाटतं,’’ असं म्हणत वहिनी लगबगीनं उठल्या आणि बाहेर आल्या. त्यांच्याबरोबर शिवाही बाहेर आला. शिवाला पाहताच सुधाकरला उत्स्फूर्त आनंद झाला आणि आश्‍चर्यही वाटलं. शिवाचा हात हातात घेत त्यानं विचारलं : ‘‘अरे, आज शिवानं अचानक कसं काय दर्शन दिलं?’’
शिवा काहीच बोलला नाही. फक्त हसला. दोघं बालमित्र आत हॉलमधे आले आणि पत्नीकडं पाहत सुधाकरच पुन्हा म्हणाला : ‘‘अरे, आमच्या मित्राला चहा तर दिला की नाही?’’
मग मात्र शिवानं सांगितलं : ‘‘अरं, चहाच न्हाइ बिस्किटंबी खाल्ली.’’
‘‘बिस्किटांनी काय होतंय? आता माझ्याबरोबर गमागरम पोहे खायला पाहिजेत. जाम भूक लागलीय. कामाच्या व्यापात दुपारचं जेवणच राहून गेलं.’’
दहा मिनिटांतच टेबलावर गरमगरम पोहे आणि ओले पापड हजर झाले. आग्रह करून सुधाकरनं शिवाला पोहे खायला लावले आणि चहा झाल्यावर तो म्हणाला : ‘‘शिवा, आता जरा आराम कर. मी जरा हॉस्पिटलमधे जाऊन येतो. उद्या एक ऑपरेशन आहे. त्याची जरा पूर्वतयारी करायला हवी. रात्री निवांत गप्पा मारत बसू.’’
प्रवासानं शिवाचं अंगही आंबून गेलं होतं. त्यालाही जरा आडवं व्हावंसं वाटतंच होतं. गेस्टरूममधल्या बेडवर त्यानं अंग टाकलं आणि केव्हा गाढ झोप लागली त्याला कळलंच नाही.

सुधाकरच्या हाक मारण्यानं शिवाला जाग आली. शिवाशेजारी बेडवरच बसत तो म्हणाला : ‘‘इतका गाढ झोपला होतास, की उठवायचं अगदी जिवावर आलं होतं. आता दोन घास जेवून घे आणि पुन्हा झोपून टाक बिनघोर.’’
पण झोप झाल्यानं शिवाला आता ताजंतवानं वाटत होतं. जेवायला त्या भल्या मोठ्या डायनिंग टेबलाजवळ शिवा आला. शिवासाठी वहिनींनी भारी बेत आखला होता. आम्रखंड होतं, पुऱ्या होत्या, अळूवडी होती, आलू-मटर रस्सा होता आणि पनीर पुलावही होता; पण टेबलावर तीनच ताटं बघून शिवानं विचारलं : ‘‘आपुन तिघंच? आमचा नातू भरत कुठाय?’’
‘‘अरे, तो गेलाय आई-बाबांना घेऊन काश्‍मीर बघायला. आठ-दहा दिवसांनी येईल. बरं, ते राहू दे. माझ्यासाठी धपाटे आणलेस की नाही?’’
मग वहिनींनीच एका डिशमध्ये झाकून ठेवलेले धपाटे त्याच्याकडं सरकवले. सुधाकरनं पानातल्या पुऱ्या काढून ठेवल्या आणि मोठ्या चवीनं ते धपाटे खात म्हणाला : ‘‘वहिनींच्या धपाट्यांनाही अगदी काकूसारखीच चव आहे.’’
जेवणं झाली आणि हॉलमधे दोघं बोलत बसले. ख्याली खुशालीची बोलणी होत होती. गावाकडच्या जुन्या आठवणी निघत होत्या; पण मूळ मुद्द्यावर यायचं शिवाला लई अवघड वाटतं होतं. शेवटी त्यानं विचार केला. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काही अर्थ नाही. त्यात सुधाकरनं जेव्हा पीकपाण्याचा विषय काढला, तेव्हा शिवाला अवसर मिळाला.

‘‘पोराच्या नादी लागून लई अडचणीत आलुया सुधाकर...’’ अशी सुरवात करून शिवानं आपली सगळी कर्मकहाणी सुधाकरला सांगून टाकली आणि म्हणाला : ‘‘आता तूच यातनं काय तरी मार्ग काढलास तर...’’
का कुणास ठाऊक; पण सुधाकर एकदम सावध झाल्यासारखा वाटायला लागला. बहुतेक त्याच्यातला व्यावसायिक खबरदार झाला असावा. ‘‘शिवा, तू आणि मी एकाच नावेतले प्रवासी निघालो. मीही मुलाचं ऐकून एक नवीन हॉस्पिटल बांधायला घेतलंय. मी एवढा हिशेबी; पण माझा अंदाज साफ चुकला. वाटत होतं त्याच्यापेक्षा फारच डोईजड हे काम होऊन बसलंय. आता यातनं कसं बाहेर यायचं याचाच घोर मला लागून राहिलाय.’’
इतकी प्रस्तावना करून जणू मधाचं बोट लावण्यासाठी तो पुढं म्हणाला : ‘‘पण आपण काढूया काहीतरी मार्ग. मला थोडी मुदत दे. आला आहेस तसा चार-आठ दिवस थांब. तेवढ्यात काय करता येतंय ते मी बघतो.’’
शिवाच्या सगळं लक्षात आलं; पण बघू या तरी काय करतोय ते असा विचार करून त्यानं राहायचं ठरवलं. दुसरं म्हणजे परत जाऊन तरी काय करायचं आहे, असंही त्याच्या मनात येऊन गेलं. दुसऱ्या दिवसापासून शिवाचं देवदर्शन सुरू झालं. वहिनींची गाडी आणि ड्रायव्हर शिवाच्या
दिमतीला मिळाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातली देवस्थानं पाहण्यात आठवडा कसा गेला हे कळलंच नाही.

हे सगळं ठीक होतं. राहण्याखाण्याची व्यवस्थाही उत्तम होती; पण सुधाकर मुद्द्याचं काहीच बोलत नव्हता. आठवडा असाच गेल्यावर एका रात्री शिवानंच विषय काढला : ‘‘सुधाकर, उद्या जातू मी गड्या गावाकडं. समदी लई काळजीत असत्याल.’’
‘‘खरंय आहे तुझं शिवा; पण एक रुखरुख लागून राहिलीय. तुझं काम काही मला करता आलं नाही; पण माझ्या लक्षात आहे हं. लवकरच काही तरी मार्ग काढू. तू बिनघोर राहा.’’ सुधाकरनं पुन्हा मधाचं बोट लावलं.
वहिनी मात्र मनापासून सारं करीत होत्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला वाटेत खायला आलूपराठे बांधून दिले. घरच्यांसाठी बेसन लाडूचा डबा दिला आणि ड्रायव्हरला पाठवून खडकी स्टेशनवर ‘कोयने’त बसवून दिलं.
आज गाडीला थोडी गर्दी होती; पण शिवाला ते बरंच वाटलं. त्या सहप्रवाशांकडे पाहण्यात आणि त्यांची बोलणी ऐकत बसण्यात त्याला स्वतःच्या काळजीचा थोडा तरी विसर पडत होता. मात्र, तरीही सुधाकरच्या मानभावी वागण्याची चीड त्याच्या मनात मध्येमध्ये उसळी मारतच होती. सुधाकरविषयी वाईट वाईट विचार मनात येत होते. हा इतका नाटकी असेल असं त्याला स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. ‘अरं, तुजं म्हननं खरंबी असंल; पन तुज्या लेखी माजी अडचन ती किती? निसता खिसा झाडला असतास तरी पुरी झाली असती. पर असूद्या. तुजी दानत तर दिसून आली,’ शिवा मनात बोलत होता.

शिवा भिलवडी स्टेशनवर उतरला, तेव्हा अंधार पडायला लागला होता. वाट पायाखालची होती; पण ना मनात उमेद होती, ना पायात बळ होतं. कसा तरी पाय ओढीत तो चालला. आपल्या येण्याकडं डोळे लावून बसलेल्या घरच्यांना काय तोंड दाखवायचं या विचारानं त्याला अतिशय बेचैन करून टाकलं होतं.
पुढच्या दारात पायरीवर बसलेल्या नातवानं त्याला प्रथम बघितलं आणि ‘‘आबा आलं, आबा आलं’’ असं म्हणत तो नाचायला लागला. आवाज ऐकून शिवाची बायको बाहेर आली. शिवाच्या हातातली थैली तिनं आपल्या हातात घेतली. बाहेर ठेवलेल्या भगुण्यातल्या पाण्यानं शिवानं हातपाय धुतले आणि बायकोच्या मागून तो घरात आला. आता हिला काय सांगू आणि कसं सांगू या विचारांनी तो अगदी घायाळ होऊन गेला होता. विचारांचं ते भलं मोठं ओझं सावरत तो खाली भिंतीला टेकून बसला. बायकोही बाजूला बसली. तिच्याकडे पाहायचं अवसान काही शिवाच्या डोळ्यात नव्हतं. उगाच बाजूला बघत सारं अवसान गोळा करून तो म्हणाला : ‘‘कायबी उपेग झाला न्हाय गं. गेलो तसाच हात हालवीत परत आलुया.’’

बायकोनं ते ऐकलं आणि अचानक तारस्वरात ती बोलायला लागली : ‘‘अवं, असं म्हणू नगासा. सारं रान भिजलंय. ऊस भिजलाय, द्राक्षबाग भिजलिया, माळवं भिजलंया.’’
शिवाला माहीत होतं. आपली बायको चंचल स्वभावाची आहे; पण ती एकदम असं वेड लागल्यासारखं बडबडायला लागेल, असं त्याला स्वप्नातसुध्दा वाटलं नव्हतं.तो चटकन उठून बायकोजवळ गेला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला : ‘‘अगं शांत हो शांत हो. ह्यातनंबी भाइर पडू. असं येड्यागत करू नगस. अगं, तूच अशी करायला लागलीस, तर माझ्याबी पायातलं बळ गेल्यागत हुतंय बघ’’
‘‘अवं, असं काय करतायसा? मला काय झालंया?’’
‘‘मग असं येड्यागत काय बडबडतियास?’’
‘‘अवं, येड्यागत कुठं? खरं तेच सांगतुया.’’
तेवढ्यात चहा घेऊन सून बाहेर आली आणि शिवाच्या हातात कप देत म्हणाली : ‘‘मामी खरं तेच सांगत्यात आबा. वावरात पानीच पानी झालंय.’’
‘‘अगं, काय सांगतियास? राजापूरची गंगा आली का काय हिरीत?’’
‘‘अवं, गंगाच आलिया...’’ बायको सांगायला लागली.
‘‘पन ही राजापुराची न्हाय पुन्याची आलिया.’’
आता शिवाच तिच्याकडं वेड्यागत बघत म्हणाला : ‘‘अगं, असं हुमनात बोलल्यावानी बोलू नगंस. काय ते बैजवार सांग. तुमचं ऐकून मलाच आता येड लागायची येळ आलिया.’’
‘‘अवं, सांगू तरी काय? समदं अक्रितच घडलंया..’’ शिवाची बायको पुढं सांगायला लागली.
‘‘तुमी पुन्याला गेलासा आनि दुसऱ्याच दिशी सुधाकरभाऊजींचा मानूस रानात हजर. त्योबी एकला न्हाय. बोरिंग मिशनचा ट्रक आनि मानसं घिऊन! एक म्हनता दोन जागी बोरी मारून दिल्याती. पानीबी बक्कळ लागलया. पंप आनि पायपा बसवूनशान चार दिसांत माघारीबी गेलं. तुमी लई पुन्यवान हायसा म्हनून असा मैतर भेटलाय. त्येंचं उपकार सात जन्मातबी फिटायचं न्हाइत.’’

शिवा सारं आ वासून ऐकत राहिला. ज्यानं एवढे आभाळागत उपकार केले, त्याच्याविषयी आपण मात्र काय काय वंगाळ मनात आणत होतो. त्याचे उपकार तर फिटणार नाहीतच; पण करून ठेवलेलं हे पाप आता कसं फेडायचं? अचानक शिवाच्या डोळ्यात पाणी तरारलं. धोतराच्या सोग्यानं जेव्हा तो डोळे पुसायला लागला, तेव्हा बायको पुन्हा कडाडली : ‘‘अवं, इकतं समदं चांगलं झालंया आनि भरल्या घरात सांच्याला डोळ्यातनं पानी कशापाय काडतायसा?’’
शिवा मनात म्हणाला : ‘‘अगं, तोंडातनं शबुद फुटत न्हाय, तवा डोळं बोलायला लागत्यात. आता डोळं काय बोलत्यात हे तुला कसं सांगू?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com