आदित्यहृदयी सण (डॉ. आशुतोष जावडेकर)

dr ashutosh javadekar
dr ashutosh javadekar

दिवाळी म्हणजे चैतन्याचा, प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. एकीकडं प्रतीकांच्या रूपांतून उजळवणारी दिवाळी ही खरीच; पण मनं उजळवणारी, सकारात्मकतेचं बीज रुजवणारी हीदेखील तितकीच खरी. सर्व स्तरांतल्या नागरिकांना प्रकाशाच्या धाग्यानं एकत्र आणणारी ही दिवाळी. या आठवड्यात दिवाळी सुरू होते आहे. त्या निमित्तानं या सणाचा लावलेला वेगळा अन्वयार्थ.

सध्या कुठंही गेलं, की एक चर्चा कानावर पडत असते ती म्हणजे ‘आमच्या वेळी’ दिवाळी कशी असायची आणि आता कशी आहे याची! एक सामूहिक नॉस्टॅल्जिया आपल्या भारतीय मनांना आवडत असतो आणि जोवर नव्याला अव्हेरणारी वृत्ती नसेल, तोवर त्यात वाईटही काही नसतं खरं. एक काकू मध्ये मला म्हणत होत्या : ‘‘नरकचतुर्दशीलाही तुम्ही झोपा काढता. तुमच्या बायकांना घरात फराळ करता येत नाही. आजकाल तर थेट बाहेरगावीच निघून जाता दिवाळीला. तुम्हा तरुणांना काही दिवाळी, आपली संस्कृती हे कळायचं नाही.’’ काकूंची सरबत्ती सुरू राहिली. एकीकडे जग तुम्हाला ‘काका’ असं संबोधायला लागलेलं असताना काकूंनी तरुणांमध्येच अद्याप माझी गणती केल्यानं मी काहीच वाद घातला नाही. अगदी आनंदात मी त्यांचं ऐकून घेतलं; पण मला मागाहून जाणवलं, की त्या काकूंसारख्याच गप्पा आता आमच्या ‘जरा मोठ्या-चाळीसच्या-तरुण ग्रुप’मध्येही हरघडी होत आहेतच की! ‘‘काय शाळेत असताना आपण फटाके फोडायचो!’’, ‘‘आम्ही मैत्रिणी कशा खपून रांगोळ्या काढायचो.’’, ‘‘आता तुम्हा भावांना वेळ कसा नसतो नाहीतर आम्ही आत्ताही उटणी लावूच’’, ‘‘ही कॉलेजची पोरं कशी नुसती इन्स्टावरच दिवाळी साजरी करतात...’’ अशी अनेकानेक वाक्यं मला मग आठवली आणि जाणवलं, की ‘दिवाळी पूर्वीची’ विरुद्ध ‘दिवाळी आजची’ अशी टी-२०सारखी फटाकडी शाब्दिक मॅच सर्वत्र जुंपली आहे! आणि त्याचं अनेकदा पर्यवसान होतं, ते एक तर जुना काळ गेल्याची हळहळ व्यक्त करण्यात किंवा मग आपलं ‘कल्चर’ कसं मागे पडत चाललंय हे घोकण्यात. एकीकडे हे चित्र आहे, तर दुसरीकडे आजची विशीची फटाकडी पिढीही सुदैवानं माझ्या वर्तुळात आहे. त्यांचं सणाविषयी (आणि एकूणही) बोलणं ऐकलं, की नित्य गार पडायला होतं. त्यांचा सणांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडक्यात सांगायचं तर ‘फंक्शनल’ आहे. भावनिकरीत्या अजिबात ते कुठल्या सणांमध्ये अडकले आहेत, असं मला वाटत नाही. ‘आदिदास’चे हवे असलेले पाच हजारांचे बूट जर दिवाळीच्या निमित्ताने वडील द्यायला तयार होत असतील, तर दिवाळी ही त्यांच्या लेखी चांगलीच गोष्ट असणार आहे! आणि फॅशनच्या बाबतीत तर ही पिढी इतकी तयार आहे. आर्थिक स्तर कुठलाही असूदे. आपण दिवाळीच्या वेळेस कशा लूकमध्ये सेल्फी किंवा फोटो घ्यायचा आहे हे त्यांना आपसूक कळतं. एक मोठी दृश्य-समज या पिढीकडे आलेली आहे आणि ती त्यांच्या दिवाळीच्या वेळच्या फोटोंमधून सतत आपलं अस्तित्व दाखवत राहते. अर्थात, सण अजिबात न आवडणाराही एक तरुण वर्ग आहे. आणि एक वर्ग असाही आहे, की दिवाळीच्या दिवशीही ‘पबजी’ खेळल्याखेरीज त्यांचं भागत नाही!
...असे अनेक संवाद-विसंवाद दिवाळीसंदर्भात जाणवत असताना वाटतं, की काही असलं तरी दिवाळी हा अजून मुळात बव्हंशी लोकांचा प्रेमाचा, लाडका सण आहे! काहींना दुप्पट पगार दिवाळीच्या नावानं मिळतो म्हणून, काहींना घरच्यांसोबत गावी वेळ घालवता येतो म्हणून आणि माझ्यासारख्या अनेक शहरी बाबूंना मुळात कामातून निदान दोन-तीन दिवस सुट्टी मिळते किंवा काढता येते म्हणून! कारण आजचं जगणंच इतकं भयानक ताणाचं आणि गरगरवणाऱ्या वेगाचं झालं आहे, की दिवाळीच्या निमित्तानं त्या गतीला जो विराम मिळतो त्यानंच आधी बरं वाटतं. मुलाबाळांच्या सहामाही परीक्षा संपल्यानं तीही खुशीत असतात. बाकी काही केलं नाही, तरी अद्याप दिवाळीच्या दिवसात भारतभर सगळे नटतात आणि आपले फोटो त्वरेनं व्हॅट्सॲपवर स्टेटसला टाकतात. नातेवाईकांच्या भेटी आवडल्या- नाही आवडल्या तरी होतात. किंवा थेट घर सोडून आठवडाभर लांब ट्रिपला जाता येतं आणि तिथं दिवाळी साजरी करता येते. किंवा काहीही सणाचा लोड न घेता घरात एक आकाशकंदील लावून शांतपणे चार दिवस घरातल्या घरात लोळण्याचा, निवांत बसण्याचा आनंद घेता येतो. काहींना दिवाळी अंकांचा फडशा पाडायचा असतो. काहींना दिवाळीच्या निमित्तानं गप्पाष्टकं झोडायची असतात. आवडते अद्याप दिवाळी... उजव्या आणि डाव्यांना... गरीब आणि श्रीमंतांना... महानगर आणि खेड्यातल्यांना... उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्हींना...

एक गोष्ट मात्र नक्की, की फटाके आता कमी झाले! आणि ते चांगलंही आहेच. शाळांमध्ये इतका पर्यावरण-प्रचार सध्या असतो, की मुलंच स्वतःहून फटाके उडवायला नको म्हणतात. खेरीज, फटाके इतके महागही झाले आहेत, की त्यामुळेही मला वाटतं सध्या सगळीकडे केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जोरदार आवाज फटाक्यांचा येतो. नाहीतर पूर्वी अख्खा आठवडा फटाके वाजत असायचे. एखाद दिवशी आपल्या सोसायटीमध्ये येताना कुणी पोरगं हातातली टिकल्यांचं बंदूक घेऊन एकदम आपल्याला दचकवायचं आणि जाणीव व्हायची, की ‘अरे, दिवाळी आली बरं का काठावर!’ मग वसुबारसेला थोडे फटाक्यांचे आवाज यायचे. धनत्रयोदशीला अजून थोडे आणि नरकचतुर्दशीच्या पहाटे पहिला फटाका कोण फोडतो याची एकच चढाओढ असायची. या तर माझ्या आठवणी; पण माझ्या (मीना घारपुरे या) मावशीशी गप्पा मारत होतो, तेव्हा तिनं तिच्या लहानपणाच्या जुन्या वाड्यातल्या दिवाळीचं चित्रमय वर्णन केलं. रोज संध्याकाळी ते सारेजण वाड्याच्या मधल्या चौकोनात फटाके उडवत आणि सगळा वाडा मावशीच्या भाषेत प्रेक्षक असे! अगदी थ्रिलिंग असणार हे. तेव्हा सगळी मुलं एकत्र येऊन मोठा किल्ला बनवत आणि तो बघायला फक्त पाच पैसे असं तिकीट ठेवत! खेरीज त्याची जोरदार जाहिरात करून किल्ला हा एकंदर नफा देणारा उद्योग होत असे. मी मावशीला विचारलं, की मुळात किल्ला बघायला तिकीट का असे? तर ती म्हणाली, की ‘कोणाच्या घरून किल्ला करायला पैसे मिळायचे नाहीत. त्यामुळे एका वर्षी मिळालेले पैसे पुढच्या वर्षी वापरायचे आणि नवा किल्ला करायचा.’ ते उत्तर ऐकल्यावर मला एकदम वाटलं, की केवढा मोठा बदल आपल्या समाजात निदान या बाबतीत झाला आहे. अनेक जण एका पिढीत आर्थिक स्तर उंचावून वरती गेलेले आहेत. मोठ्या शहरांतल्या सोसायट्यांमध्ये पालक मुलांना रेडिमेड किल्ला कुंभारवाड्याहून आणून देतात. त्यांचं लगेच चूक आहे वगैरे मी अजिबात म्हणत नाही आहे. स्वतःसाठीच जगायला वेळ नसताना मुलांना तयार का असेना ते किल्ला आणून देतात आणि थोडी सजावट त्याच्या आसपास करतात हेही मला चांगलंच वाटतं; पण आता मुलं एका वर्षीच्या किल्ल्याचे तिकिटाचे पैसे पुढच्या वर्षीपर्यंत सांभाळून त्याच पैशांतून एकत्र पुन्हा किल्ला वसवतील हे अशक्यच वाटतं. काळाचा बदलता रेटा सगळ्यात अधिक दृश्यमान कशात होत असेल तर तो सणांमध्ये!

प्रसन्नतेचा ‘कलेक्टिव्ह अनकॉन्शस’
अर्थात, अनेक सण काळाच्या ओघात कालबाह्य होत असताना आणि अनेक सण नावापुरते अनेक जण उरकत असताना दिवाळी मात्र अद्याप अनेकांना मनापासून आवडण्याचं एक कारण मला असं वाटतं, की सर्वत्र एक मुळात प्रसन्नता असते. युंग सांगतो तो जो समाजाचा ‘कलेक्टिव्ह अनकॉन्शस’ असतो तो दिवाळीच्या आसपास अतिशय प्रसन्न, हसरा आणि सकारात्मक असतो. रस्त्याच्या कडेला आकाशकंदिलांचे दिवे स्टॉलवर लागतात आणि रस्ते रात्री जिवंत होतात. बाजारपेठेत, कपड्यांच्या दुकानातली गर्दी या काळात बोचत, जाचत नाही. अनेकदा उच्चभ्रू वर्गात किंवा कॉर्पोरट जगात मग दिवाळी पार्ट्यांचं सत्र सुरू राहतं आणि रोज नटण्याथटण्यात रात्री पार पडतात. मात्र, कितीही दिवाळीतली कितीही झकपक अनुभवली, तरी ज्याच्या त्याच्या मनातली आदर्श दिवाळी ही सहसा त्याच्या बालपणीची असते. माझ्या ‘मुळारंभ’ कादंबरीचा नायक ओम हा त्याच्या पंजाबी मित्रांसोबत दिवाळीच्या वेळेस दिल्लीमध्ये असतो आणि त्याला त्या सगळ्या गलक्यात त्याची बालपणीची दिवाळी त्याच्याही नकळत स्मरते. तीन वर्षांचा पाटावर बसून आईकडून उटणं लावून घेणारा ओम... पहिली फुलबाजी उडवतानाचा थरार... ‘‘छम छम छम सगळे पिवळे तारे सांडू लागले. बाबांनी तो गोल फिरवायला सुरुवात केली, तेव्हा आधी ओमला भीतीच वाटली; पण मग मात्र तो एकदमच धीट बनला. समोरचे तारे फेर धरून वर्तुळात नाचू लागले... त्यांची गोल गोल रेष तयार झाली... ‘दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या- राम- लक्ष्मणाच्या...’’

या उताऱ्यातल्या लोकगीतावरून एकदम आठवलं, की दिवाळीच्या केवढ्या म्हणून मिथककथा आहेत आणि अनेकदा त्या केवळ भाकडकथा म्हणून आजकाल लोक अव्हेरतात. त्या कथा या धार्मिक संदर्भांवाचूनही आपण वाचू शकतो. आणि खरं तर या देवादिकांच्या दिवाळीच्या कहाण्या या समाजाच्या तत्कालीन धारणांच्या सावल्या आहेत. समाजमनाच्या जाणिवा बदलत गेल्या आहेत का नाही हे या कहाण्यांमधून कळतं . नरकासुराचा वध कृष्णानं केला आणि तिथल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार बायकांची त्यानं सुटका केली ही कथा आपण अनेकदा नरकचतुर्दशीच्या निमित्तानं लहानपणापासून ऐकलेली असते. मात्र, या कथेचं एक वेगळं व्हर्जनही आहे आणि ते मला फारच आवडतं. आंध्रात , विशेषतः समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात जी कहाणी प्रचलित आहे, त्यानुसार माजलेल्या नरकासुराचा वध कृष्णानं नव्हे, तर सत्यभामेनं केला! मुळात कृष्णाच्या गरुड रथाचं सारथ्य त्या वेळेस सत्यभामाच करत होती (हेच केवढं शक्तिशाली स्त्रीवादी विधान आहे!) आणि नरकासुराला फक्त त्याची आई- भूदेवी हीच त्याला मारू शकेल, अन्य कोणी नाही असा वर प्राप्त झालेला होता. स्त्री असल्यानं सत्यभामेनं ते आईचं रूप घेत त्या असुराचा वध केला. परत घरी आल्यावर कृष्णाच्या कपाळावरच्या रक्ताच्या जखमा तिनं प्रेमानं पुसून घेतल्या- जणू उटणं लावल्यासारख्या- तोच पाडवा!- दुसऱ्या दिवशीचा! मला कहाणीचं हे रूप अधिक आवडतं. नवऱ्यानंच बाहेरचं जग झुंझवत राहावं आणि पत्नीनं घरची मदार सांभाळावी या पारंपरिक गृहितकाला छेद दिला आहे यात. जगातल्या अनेकानेक असुरांना आणि युद्धांना पती आणि पत्नीनं मिळून तोंड द्यायचं असतं असं सांगणारी ती कथा मी पहिल्यांदा गेल्या दिवाळीत वाचली तेव्हा माझं मन उजळून गेलं! आणि दिवाळीची सार्थकता उजळण्याहून अन्य कशात असणार!

शेवटी दिव्याचा, प्रकाशाचाच तर सण आहे हा! ध्रुवीय प्रदेशासारखं आपल्याला अनेक काळ अंधारात राहावं लागत नाही. दिवस मावळतो आणि नेमानं उगवतो. प्रकाश झिरपत राहतो. आपण भारतनिवासी भाग्यवान आहोत. तरीही एकेकदा असतो, तो अंधारही फार नकोसा होतो - पुन्हा प्रकाश येईल हे माहीत असतानाही! अशा वेळेस दिवाळीत घरोघरी लागलेले आकाशकंदील आपलं मन फिरून स्थिर करतात. बृहदारण्य उपनिषदामधलं ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे अशा वेळेस फार आतून जाणवत राहतं! अंधाराकडून उजेडाकडे नेणारा हा सण. याला जुन्या आणि नव्याची किनार का लावायची हे मला समजत नाही. आमच्या घरी असतो फराळ; पण नसेल करायचा कुणाला फराळ तर काही बिघडत नाही. वर्षभर मिळतच असतात सर्वत्र आता फराळ. आम्ही पणत्या जोरदार लावू; पण म्हणून जिवाचा आटापिटा न करून नाही घरभर पणत्या लावल्या एखाद्यानं तरी काही बिघडतं असं मला वाटत नाही. मुख्य हे आहे, की मनातलं औदासिन्य, मनातला अंधार जरा दूर करायला हे समृद्ध निमित्त आहे दिवाळी नावाचं. ते निमित्त मात्र ज्यानं त्यानं आपल्या आवडीनुसार ओळखावं, उपभोगावं. मग दिवाळीत घरात न थांबता हिमालयात ट्रेक करताना तो अंधार एखाद्याचा दूर होणार असेल, तर त्यानं खुशाल ट्रेक करावा. एखाद्या माणसाला शांत बसून अजिबात कोलाहलात, देवळात न जाता दिवाळी अंक वाचून जर तो तमसाचा पडदा दूर करता येणार असेल, तर त्यानं ते करावं. एखाद्याला नुसत्या नातलगांहून समधर्मी माणसांच्या भेटीगाठींमध्ये दिवाळीच्या काळात रमून उजळायला होणार असेल, तर त्यानं तसंच करावं. आणि आपण नटलेल्या कपड्यांच्या आणि उटण्यांच्या सुगंधी मिजाशीत त्यांना नावं ठेवू नयेत.

स्वतःचंच ‘दिवा-रूप’
हे लिहिताना मला थोरो आठवतो आहे. आता बोस्टनलाही आपले भारतीय दणक्यात दिवाळी साजरी करत असणार. त्यांना तिथून जवळच राहणारा हा शतकापूर्वीचा विचारवंत माहीत असला पाहिजे. थोरो म्हणतो : ‘‘Only that day dawns to which we are awake.’’
प्रकाशानं उगवणं आणि उजळणं ही गोष्ट अखेर भौगोलिक सूर्योदयाशी निगडित नसून आपल्या मनाशी संबंधित अशी गोष्ट आहे. मन प्रकाशासारखं स्वच्छ पाहिजे; पण विरोधाभास असा, की मन अगदी दुःखानं काळवंडून जावं असेच केवढे तरी क्षण सध्याच्या जगण्यात येत असतात. सगळं काम करूनही बॉस न कंटाळता झापत राहतो तेव्हा. रोज गरम जेवण हातात ठेवूनही पाडव्याच्या दिवशीही घरचे कधी कौतुक करत नाहीत तेव्हा. निरंतर अभ्यास करूनही अफाट आणि बेजार स्पर्धेमुळे परीक्षेत अपयश येतं तेव्हा. अशा सगळ्या वेळांना जीव हताश होतो, झाकोळून जातो. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेत म्हटलं आहे : ‘मिट्टी का हूं, छोटा दीपक...’ त्यातलं छोटेपण तेवढं जाणवत राहतं. आपलं सामान्यपण कळून वाईट वाटतं. नेमक्या त्याच वेळेस मागून कुणी फटाका फोडतं. आपण काहीसे सावध होतो. मातीचे असलो, मर्त्य असलो, साधेसेच आणि मर्यादित कुवतीचेच असतो, तरी मुळात ‘दीपक’ आहोत हे मग जाणवतं. ते आपलं ‘दिवा-रूप’ मग नेमकेपणे समोर आलं, की उत्साह येतो. मागून कधी काळी ऐकलेल्या आदित्यहृदयम स्तोत्राचे बोल नेमके आठवतात : ‘आदित्यहृदयम पुण्यं सर्वशत्रुविनाशनम...’ आदित्य म्हणजे सूर्य. त्याच्याहून प्रकाशमान अधिक काय असणार? ते स्तोत्र म्हटलं, की सगळे शत्रू संपतात, असं हा श्लोक सांगतो; पण मला वाटतं, सर्वांत मोठा आपला शत्रू तर आपणच असतो. सारखा आपल्याला स्पर्धेत ओढणारा, हरलं तर बोल लावणारा, कधी असूयेच्या अधीन होणारा. आपल्या आतल्या त्या शत्रूचं निर्दालन झालं, की हृदय सूर्यासारखं तेजस्वी होणारच. आणि जमेल! या नाहीतर पुढच्या जन्मात! नेट तेवढा लावायला हवा. त्या निश्चयाची आठवण करून देणारा सण म्हणजे दिवाळीचा सण! आपल्या आईच्या, आजीच्या मायेची आठवण नातवंडानं पेटवलेल्या पहिल्या फुलबाजीकडे बघताना आणणारा सण म्हणजे दिवाळीचा सण. माणसांचा, नात्यांचा, पिढ्यांचा दुवा प्रकाशानं जोडणारा हा सण... आदित्यहृदयी सण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com