
मनोरंजनविश्वात सध्या अनेक नवी वळणं आली आहेत. वेब सिरीज चक्क टीव्हीवर अवतरल्या आहेत, तर कलाकार वेबवर गप्पा मारायला लागले आहेत. रंगमंचीय कार्यक्रमांचे नेट-अवतारही सादर होत आहेत. ही सगळी वळणं रंजनविश्वाला कुठं घेऊन जाणार, काही नवे ट्रेंड येतील का, त्यातून बरं-वाईट कसं शोधायचं आदी सर्व विषयांबाबत ऊहापोह.
मनोरंजनविश्वात सध्या अनेक नवी वळणं आली आहेत. वेब सिरीज चक्क टीव्हीवर अवतरल्या आहेत, तर कलाकार वेबवर गप्पा मारायला लागले आहेत. रंगमंचीय कार्यक्रमांचे नेट-अवतारही सादर होत आहेत. ही सगळी वळणं रंजनविश्वाला कुठं घेऊन जाणार, काही नवे ट्रेंड येतील का, त्यातून बरं-वाईट कसं शोधायचं आदी सर्व विषयांबाबत ऊहापोह.
इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे वाक्य कितीही गुळगुळीत झालेलं असलं, तरी काहीवेळा ते इतकं चपखल बसतं, की त्यातल्या भावार्थाची महती आपल्याला पटते. बघा ना 30-32 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सुपरहिट झालेल्या "रामायण', "महाभारत' या मालिका आजही त्याच डौलात पडद्यावर झळकत आहेत. हा दूरदर्शनचा एका वेगळ्या अर्थानं सुवर्णकाळ. कर्फ्यूसदृश स्थिती तयार करण्याची ताकद या मालिकांमध्ये होती आणि आज सन 2020मध्ये कर्फ्यू स्थितीत याच मालिका घरात स्थानबद्ध झालेल्या नागरिकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. ब्रॉडकास्ट ऑडिट रिसर्च कौन्सिलनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या पाहणीत दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग हजारो पटीनं वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. याला उत्तर म्हणून खासगी वाहिन्याही सरसावल्या आणि त्यांनी थेट लोकप्रिय वेब मालिका पडद्यावर आणल्या. या वाहिन्यांच्या युद्धात प्रेक्षकवर्गाची चांगली चंगळ होते आहे.
सध्याच्या या कसोटी काळानं मनोरंजन जगताला आणि विशेषतः वाहिन्यांना आपले पवित्रे आणि आडाखे बदलायला लावले आहेत.
फावला वेळ ही एकेकाळची दुर्मीळ गोष्ट मोठ्या प्रमाणात मिळू लागल्यामुळे प्रेक्षकांकडून टीव्ही, मोबाईल या माध्यमांतून मनमुराद आनंद लुटणं सुरू आहे. "बुनियाद', "शक्तिमान', "जंगल बुक', "चिमणराव गुंड्याभाऊ', जुन्या जाणत्या कलावंताच्या मुलाखती यांनी छोटा पडदा आणि घर कसं भरलेलं दिसतं आहे. तरुणांच्या आवडत्या आणि जादा शुल्क भरून वेबवर पाहिल्या जाणाऱ्या मालिकाही आता चक्क टीव्हीवर चकटफू पाहायला मिळू लागल्या आहेत. ही झाली सर्वसाधारण घरातली गोष्ट. एका अर्थानं आपण सर्व रिसिव्हिंग एंडला असलेली माणसं. अचानक हे मिळू लागलेलं दृष्टीसुख ही या संकटसदृश काळानं दिलेली भेट आहे; पण एकूणच मनोरंजन उद्योगाला या अचानक उद्भवलेल्या स्थितीमुळे नियोजनाची फेरमांडणी करावी लागत आहे. वाहिन्यांना आता काही हटके नवे प्रवाह घेऊन यावे लागणार का, प्रेक्षक या संकल्पनेचा आता पुन्हा एक वेगळा धांडोळा घ्यावा लागणार का, अशा चक्रावून सोडणाऱ्या प्रश्नांची आता तड लावावी लागेल. काही खासगी वाहिन्यांनी वेब सिरीज दाखवण्यास केलेली ही सुरवात ही एका माध्यमांतराची सुरवात आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांचा गुंता नजीकच्या भविष्य काळात सतावत राहणार आहे आणि सोडवावाही लागणार आहे.
काही वाहिन्यांवर अतिशय गाजलेल्या वेब सिरीज दूरचित्रवाणी कार्यक्रम बनून अवतरल्या आहेत, त्यालाही मोठा प्रेक्षक वर्ग लाभला आहे. याचा अर्थ वेब सिरीज या आता एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची मक्तेदारी न राहता सर्वसाधारण प्रेक्षकांनाही त्या आवडतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मालिका भविष्यात टीव्हीसाठी बनतील का? का टीव्हीचा सर्वसाधारण प्रेक्षक भविष्यात वेबकडे आकर्षित होऊन टीव्हीचा प्रेक्षकवर्ग घटेल?
सध्या हा झालेला बदल हा एका अपरिहार्यतेमुळे झाला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. ती अपरिहार्यता म्हणजे नवे कार्यक्रम संपर्कविरामाच्या कडक निर्बंधांमुळे तयार होऊ शकत नाहीत. सॅटेलाईट टीव्ही नावाच्या राक्षसाला किमान आठ तासांच्या नव्या कार्यक्रमांचा घास देता येणं सध्या कुणालाच शक्य नाही. बरं, जुन्या कार्यक्रमांतले बरेचसे एकदाच प्रसारित होण्याच्या योग्यतेचेच असल्यामुळे ते पुन्हा दाखवायचं धाडस वाहिन्या सहसा करणार नाहीत. मग वेबवरचे कार्यक्रम दाखवण्याची क्लृप्ती लढवली गेली आणि ती यशस्वी होतानाही दिसते आहे. अर्थात या वेब मालिकाही किती दिवस पुरणार हाही एक प्रश्न आहे. अर्थात ही स्थिती जगभर आहे. ब्रिटन, अमेरिका, ब्राझील, जपान, सिंगापूर या ठिकाणीही कार्यक्रमनिर्मिती पद्धतीत बदल करावे लागत आहेत. अमेरिकेतल्या एबीसी, सीबीएस, एनबीसीसारख्या बड्या वाहिन्यांकडे आठ-आठ महिन्यांची बॅंक असूनही, त्यांचेही धाबे दणाणले आहेत. क्रीडा वाहिन्यांची स्थिती तर आणखी शोचनीय झाली आहे; पण भविष्यात सर्व ठाकठीक झाल्यानंतर हीच परिस्थिती राहील का हा खरा यातला कळीचा मुद्दा आहे.
सर्वच रंजनविश्वासाठी हा एक प्रकारचा वेकअप कॉल आहे. तो यासाठी, की अगदी थोड्या कार्यक्रम बॅंकवर या वाहिन्या कार्यरत असतात. ही पद्धत आता त्यांना बदलावी लागेल. किमान तीन ते चार महिने पुरतील असा नव्या कार्यक्रमांचा साठा त्यांना करून ठेवावा लागेल. महत्त्वाच्या आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या मालिकांची एवढ्या मोठया प्रमाणात निर्मिती करून ठेवणं शक्य नाही; पण एक बी प्लॅन नक्की तयार हवा. थोड्या कमी खर्चिक; पण सगळ्या कुटुंबासोबत पाहता येतील अशा मालिकांची निर्मिती करून ठेवता येईल. आणीबाणी परिस्थिती सतत उद्भवेल, असं नाही- त्यामुळे हा कार्यक्रम साठा काही काळानंतर यथायोग्य स्लॉटमध्ये प्रसारित करून एक नवा प्रेक्षक गट निर्माण करता येईल का हे पाहण्याची ही संधी आहे.
केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे, तर रंगमंचीय सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसत आहेत. प्रेक्षक आपल्याकडे आले नाहीत, तर आपण प्रेक्षकांकडे जायचं हा नव्या युगाचा मंत्र आता या मंडळीना समजून घ्यावा लागत आहे. कवितावाचन, कादंबरीवाचन, मुलाखत एवढंच काय नृत्याचेही कार्यक्रम हे आता प्रेक्षक घरबसल्या आपल्या संगणकावर आणि मोबाईल स्क्रीनवर पाहायला लागले आहेत. गाण्याचे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही नव्या अवतारात बघायला मिळत आहेत. अर्थात यात सुसूत्रता होण्यात काही अडचणी येताहेत हेही खरंच. काहींनी शॉर्ट फिल्म्स स्पर्धा जाहीर केल्या आहेत. हे सगळं मनोरंजन माध्यमाला एका नव्या वळणावर घेऊन जात आहे. विज्ञान संस्थांनी विद्यार्थ्यासाठी शास्त्रीय प्रयोग घरात बसून तयार करायचं, आवाहन केलं आहे आणि ते चित्रित करून महाजालावर टाकण्यास प्रोत्साहित करत आहेत. विविध रेसिपीजही ऑनलाइन टाकल्या जाऊ लागल्या आहेत. या तणावग्रस्त स्थितीत आपल्या दैनंदिनीला, आपल्या मनोरंजनाच्या कल्पनांना एक वेगळं वळण दिलं आहे. हे वळण काही नव्या, आधुनिक सवयींसह आपल्या आयुष्याला कायमचं चिकटणार का हे काळच ठरवेल.
या काळात वाचन संस्कृतीही बहरताना दिसत आहे. युट्यूबवरचे जुने सिनेमे, नाटकं मोबाईलच्या पडद्यावर घराघरात दिसू लागली आहेत. ज्यांना शक्य आहे ती मंडळी तेच मोठ्या पडद्यावर ते पाहत आहेत. (पण हे करताना स्वामित्वहक्क कायद्याचा भंग होतो आहे का याचं भान ठेवले जावे ही अपेक्षा), टिकटॉकसारखं ट्रेंडी ऍपही या काळात खूप भाव खाऊन आहे. या सगळ्या बदलत्या पर्यावरणाशी सर्वांनीच जुळवून घेतलं, तर भविष्यात पारंपरिक सादरीकरणाच्या माध्यमांवर ही नवमाध्यमं मात करतील ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
सर्वसामान्य माणसांबरोबर सेलिब्रिटी मंडळीही फेसबुक, इन्स्टाग्राह लाईव्ह या माध्यमांचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. घरातच राहा हा संदेश देणारा चार-साडेचार मिनिटांचा व्हिडिओ प्रसून जोशी यांनी अमिताभ, रजनीकांत, रणवीर कपूर, प्रियांका चोप्रा आदींना घेऊन तयार केल. हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आपापल्या घरात बसून ही निर्मिती केल्याचं अमिताभ फिल्मच्या शेवटी सांगतो, तेव्हा मर्यादित साधनसामग्रीवर सर्जनशील माणसं कशी मात करू शकतात याचा एक वस्तुपाठच आपल्याला यातून मिळून जातो.
शिक्षण क्षेत्रातही या बदलत्या परिस्थितीचे पडसाद उमटत आहेत. महाविद्यालयीन जगात परीक्षा, चाचण्या या ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जात आहेत. गुगल हॅंग आऊट, झूम यासारख्या सेवांचा वापर केला जात आहे. भविष्यात एकूणच शिक्षणपद्धती ऑनलाईनकेंद्रित झाल्यास ही सध्याची रंगीत तालीम उपयोगी पडू शकते. या समर प्रसंगात शालेय शिक्षणाची स्थिती तर अतिशय बिकट अशी झाली आहे. परीक्षा न घेता सर्व इयत्तांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे आणि तो प्राप्त परिस्थितीत योग्यही आहे; पण एक मात्र नक्की, की यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नसलं, तरी अनेक गोष्टी शिकण्यापासून ते वंचित राहिले आहेत. आता हे थोडं अज्ञानाचं ओझं घेऊन ते पुढच्या वर्गात जातील; पण ही हानी कशी भरून निघणार? मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मदतीनं स्वयम ही स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करण्याचं प्रस्तावित आहे. ती सुरू झाल्यावर मुलं घरबसल्या काही शिकू शकतील आणि अशा प्रसंगात होणारं नुकसान टळूही शकेल. या निमित्ताने शासनाचा धोरणलकवा शैक्षणिक क्षेत्राला कसा हानिकारक ठरला याचा उल्लेख अनिवार्य आहे. हसतखेळत शिक्षण देणारी, मनोरंजनातून सिद्धांताकडे नेणारी "बालचित्रवाणी' कोणतंही सयुक्तिक कारण न देता बंद करण्यात आली. तिथली उपकरणं धूळ खात पडली, "कंट्रीवाईड क्लासरूम' या उच्चशिक्षणासाठी असलेल्या वाहिनीलाही बाजूला टाकलं गेलं. ग्रामीण भागात जिथं डिजिटल संपर्क यंत्रणा काम करत नाही अशा ठिकाणी दूरचित्रवाणी हा एकमेव पर्याय उपयुक्त ठरु शकतो; पण याचं भान ना राज्यकर्त्यांनी दाखवलं, ना बाबू मंडळींनी याचं महत्त्व समजून घेतलं. अजूनही वेळ गेलेली नाही. अशी यंत्रणा प्रत्येक राज्यात केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मुलांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सुरू व्हायला हवी.
आता प्रश्न असा आहे की हा सर्वच डिजिटल जगात, मनोरंजन, सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात आलेला हा नवा कार्यक्रम अवतार असाच टिकणार की पुढे सर्व शांत झाल्यावर पुन्हा जुन्या वळणावर जाणार? मला वाटतं, ही तात्पुरती परिस्थिती आहे. विशेषतः रंगमंचीय कार्यक्रम हे समोर बसून पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो. रंगमंच, दाटीवाटीनं बसलेले प्रेक्षक, कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकता, तिथं भेटणारी मित्रमंडळी, कार्यक्रमानंतरची चर्चा हे जिवंत क्षण आपण सहजी हातचे जाऊ देणार नाही.
अर्थात एक मात्र नक्की झालं, या आभासी जगाबद्दल कलावंत, सादरकर्ते सजग झाले. संगणकीय यंत्रणा वापरून थोडक्या जागेत सर्व मदार आशयावर ठेवून कार्यक्रम करण्याचं धाडस ते करू लागलेत. तंत्रशरणतेचं रूपांतर आता तंत्रस्नेहात होतं आहे ही एक अभूतपूर्व गोष्ट या निमित्तानं एक धडा होऊन समोर आली आहे. इतिहासाच्या पुस्तकात एडी आणि बीसी ही कालमापनाची साधनं. आता त्यात एका नव्या संकल्पनेची भर पडली आहे. कोरोनापूर्व काळ आणि कोरोनोत्तर काळ. एखाद्या ब्लॉकब्लस्टर चित्रपटाच्या ताकदवान मध्यवर्ती कल्पनेपेक्षा एक सशक्त वनलायनर काळानं आपल्यासमोर लिहून ठेवला आहे.
या अनिश्चिततेच्या काळात माध्यमनिर्मिती संस्था, वाहिन्या, डिजिटल संकेतस्थळं, रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्था या सर्वांनाच या कॉन्सेप्ट लाईनमधला मथितार्थ ओळखून त्याचा कल्पनाविस्तार करून वाटचाल करायची आहे. भविष्यात अशी वेळ आली तर काय, याची संभाव्य उत्तरं ठोस कार्यवाही आराखड्याच्या स्वरूपात शोधून ठेवायची आहेत. शिक्षण, संस्कृती, मनोरंजन, उत्पन्न, रोजगार, व्यवसाय, स्पर्धा याला केंद्रस्थानी ठेवून या नव्या जॉनरला आपल्याला आता भिडावं लागणार आहे. प्रेक्षकांसमोरही या निमित्तानं नवं आव्हान उभं ठाकलं आहे. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षताही घ्यायची आहे. अपरिहार्यता या भावनेतून बाहेर पडून आपल्या आवडीनिवडी अंतर्मुख होऊन तपासण्याची हीच वेळ आहे. क्षणभंगुरता हे वास्तव नव्यानं आपल्यासमोर उभं ठाकलं आहे. त्याची परीक्षा आपल्या सगळ्यांना दयायची आहे आणि त्यात उत्तीर्णही व्हायचं आहे. एका अर्थानं वास्तव स्वीकारण्याची ताकद हा कसोटीचा क्षण आपल्याला देतो आहे. आणि विपरीत परिस्थितीत पुन्हा उभारी घेऊन कसं लढायचं ही उभारीही. त्याला सकारात्मक पद्धतीनं तोंड देत काळानं लिहिलेल्या या वनलायनरचं रूपांतर एका सुखांतिकेत करणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे.