निशाणी डावा अंगठा.. (डॉ. सलील कुलकर्णी)

dr salil kulkarni
dr salil kulkarni

प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांनी पटकथा-संवाद लिहिताना आणि पुरूदादांनी संपूर्ण कथेचा विचार करताना गाण्याच्या जागा इतक्या नेमक्या काढल्या होत्या आणि त्यातून संपूर्ण पुस्तक पाठ असल्यामुळे मला आणि संदीपला सगळ्यात जास्त आनंद दिलेला हा चित्रपट आणि त्यातूनही शेवटचं गाणं म्हणजे, ‘तिक्कड राजा, इक्कड बाजा सगळा नुसता गाजावाजा’ करताना मिळालेला आनंद फार समाधान देणारा होता. साक्षरता अभियान यशस्वी झालं, याचं नाटक करण्यासाठी हे शिक्षक जे जे करतात ते बघून खूप हसूसुद्धा येतं आणि आपल्याकडे कोणतीही योजना कशा पद्धतीनं फक्त कागदावर यशस्वी होते, हे पाहून फार वाईटसुद्धा वाटलं.

सहा मेल, सहा फिमेल
लई बाराचे येक डझन मेल फिमेल...

‘निशाणी डावा अंगठा’ या रमेश उत्रादकर यांच्या पुस्तकाचा मी फार मोठा फॅन होतो आणि आजही आहे. आपल्या आवडत्या पुस्तकांपैकी एका पुस्तकावर चित्रपट होतोय आणि त्याची गाणी आपल्याला करायची आहेत हे जेव्हा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितलं, तेव्हा माझे आणि संदीपचे डोळे चमकले. आपण सतत वेगळं काहीतरी करायचं आहे असं म्हणतो; पण चित्रपटाचा विषयच खूप वेगळा असेल, तर आपल्याला फक्त चित्रपटाच्या कथेत विरघळून जातील अशी गाणी करायची असतात- मग ती आपोआपच वेगळी होतात. पुरू बेर्डेच्या मुलुंडच्या ऑफिसमध्ये स्क्रीनप्ले ऐकत होतो, तेव्हा ते म्हणाले : ‘‘या शाळेत सहा मेल आणि सहा फिमेल शिक्षक आहेत. सगळे अतरंगी आहेत.. यांचं गाणं सुरुवातीला असेल...’’ कवी, गीतकार संदीप खरे यानं तिथंच मुखडा लिहिला आणि मग पुण्याच्या परतीचा प्रवास त्यानं शब्द आणि मी चाल करत, त्याची मजा घेत, हसत, खिदळत साजरा झाला आणि ‘सहा मेल, सहा फिमेल’ गाणं तयार झालं. साक्षरता अभियानाचा बनाव उभा करणाऱ्या या छोट्या गावातल्या इरसाल लोकांचं वर्णन करणारं हे गाणं. या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, दिलीप प्रभावळकर,
डॉ. मोहन आगाशे, विनय आपटे, हृषीकेश जोशी, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे, संदीप पाठक, शर्वाणी पिल्ले आणि अजूनही अनेक गुणी अभिनेते, अभिनेत्री यांच्या भूमिका होत्या. पन्नाशी उलटलेली असूनही सतत चावट बोलणाऱ्या जुंबड नावाच्या शिक्षकांची भूमिका, भारत गणेशपुरे या आमच्या मित्रानं केली होती आणि त्याच्यासाठी एक विशेष कडवं हवं होतं- म्हणून मग संदीपनं,
‘पन्नाशीचे जुंबड राव, मनात जागा हिरवा गाव
अध्यात्माचे हिरवे शेत, सुकली कणसे हिरवा देठ
कधी कीर्तनी नई बसला, कधी तमाशा नई चुकला
आत्मा बीत्मा निव्वळ झेल, बॉडी सोडून बाकी फेल..
सहा मेल...सहा फिमेल..’

असं कडवं लिहिलं आणि हे गाणं माझा मित्र अवधूत गुप्ते आणि समूहस्वरात अनेक गुणी गायकांनी कमाल गायलं.

साक्षरता अभियानात सहभाग घेतला, तर शाळेत न जाता बायकोबरोबर घरी जास्त वेळ मिळेल या एकमेव कारणासाठी अचानक सामाजिक भान आल्याचं नाटक करत या अभियानात सहभागी होणारा नवविवाहित शिक्षक, पुवेका (पूर्ण वेळ कार्यकर्ता) डुकरे हा आपल्या लाडक्या मक्यानं साकारला होता. त्याच्या तोंडी असणाऱ्या ‘बाप्पा कामच झालं ना!’ या गाण्याची चाल झाल्यावर ती चाल आम्ही अनेक गायकांच्या आवाजात ऐकून बघितली; पण सगळ्यांनी कितीही ‘मस्त वाटेल’ वगैरे म्हटलं, तरी अंतर्मनाला काही पटत नव्हतं. पुरू दादा मला म्हणाले : ‘‘तुझ्या आवाजात छान वाटतंय, करूया रेकॉर्ड..’’ पण.. मला आतून पटत नव्हतं आणि मग एकदम डोक्यात आलं. मक्यावर चित्रीत होणारं गाणं गायला मक्यालाच विचारू या. मग काय, त्याचा उत्साह, स्टुडिओत गाताना खुर्चीवर मांडी घालून बसणं, निर्मितीताईंनी येऊन ओळीओळीला दाद देत एकीकडे खट्याळपणा करणं आणि आम्ही सगळे आणि आमचा संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि रेकॉर्डिस्ट अवधूत वाडकर या सगळ्यांनी या रेकॉर्डिंगच्या अनुभवाचा मनमुराद आनंद लुटणं.. अशी धमाल होती. गाण्यांच्या बाबतीत- किंबहुना कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत, प्रवास फार जास्त सुंदर असतो. पुढे गाण्यांची कुंडली त्यांना त्या त्या ठिकाणी घेऊन जाते; पण आपल्या हातात असतं ते त्या सर्जनाच्या क्षणांचा उत्सव करणं! मिथिलेश पाटणकर हा माझा १९९६ पासूनचा अतिशय जवळचा मित्र. माझ्या कामात त्याच्या संगीत संयोजनाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मला या रेकॉर्डिंगचा एक प्रसंग आठवतो. एका गाण्यात शहनाई रेकॉर्ड करायची होती. तीन वेळेला स्टुडिओ घेऊनसुद्धा काहीतरी कारणानं फक्त शहनाई राहून जात होती. बाकी सगळी वाद्यं झाली. मी पुण्याहून मिथिलेशला फोन केला, की ‘‘अरे, कधी होणार आहे आपली शहनाई’’... तर तो क्षणार्धात म्हणाला : ‘‘शहनाई होत नाही आणि सांगताही येत नाही असं झालंय आपलं...’’ आणि आम्ही मनमुराद हसलो. पुढे शहनाई झाली, गाणी झाली, पुरस्कार मिळाले आणि हे मनमुराद हसण्याचे क्षण कायमचे खास कप्प्यातले झाले.

प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांनी पटकथा-संवाद लिहिताना आणि पुरूदादांनी संपूर्ण कथेचा विचार करताना गाण्याच्या जागा इतक्या नेमक्या काढल्या होत्या आणि त्यातून संपूर्ण पुस्तक पाठ असल्यामुळे मला आणि संदीपला सगळ्यात जास्त आनंद दिलेला हा चित्रपट आणि त्यातूनही शेवटचं गाणं म्हणजे, ‘तिक्कड राजा, इक्कड बाजा सगळा नुसता गाजावाजा’ करताना मिळालेला आनंद फार समाधान देणारा होता. साक्षरता अभियान यशस्वी झालं, याचं नाटक करण्यासाठी हे शिक्षक जे जे करतात ते बघून खूप हसूसुद्धा येतं आणि आपल्याकडे कोणतीही योजना कशा पद्धतीनं फक्त कागदावर यशस्वी होते, हे पाहून फार वाईटसुद्धा वाटलं.
‘बबन नमन कर, छगन भजन कर’ किंवा ‘.. क क कमळातला.. बे एके बे..’ हे सगळे प्राथमिक शाळेतले प्रकार आपल्याला गाण्यात आणता येतील असं स्वप्नांतसुद्धा वाटलं नव्हतं. संपूर्ण टीम रेकॉर्डिंगला येऊन गाण्यांना दाद देत होती. लहानपणापासून फक्त पडद्यावर पाहिलेले अनेक नट यात होते आणि ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यापैकी अनेक जण उपस्थित होते. शिवाय निर्माते दिलीप जाधव आणि विक्रम जोशी या साऱ्यांचा सहवास आणि पाठिंबा. जेव्हा आजही कार्यक्रमांत, ‘तिक्कड राजा’ किंवा ‘बाप्पा कामच झालं ना’ची फर्माईश येते, तेव्हा मी आणि संदीप फक्त एकमेकांकडे बघतो, की... आपलं आवडतं पुस्तक, आवडता चित्रपट आणि आवडती गाणी...

या चित्रपटाच्या निमित्तानं प्रयोग करायचे अट्टाहास न करता, सहज प्रयोग झाले आणि उत्तम लोकांबरोबर काम करून आम्ही समृद्ध झालो. ब्लॅक कॉमेडी हा प्रकार संगीतातून आणि शब्दातून हाताळणं याचा एक रसरशीत अनुभव या चित्रपटानं दिला. लांबच्या प्रवासात, शांत डोळे मिटून बसलं, की गेल्या बावीस वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर येतो आणि त्यात ‘निशाणी डावा अंगठा’ हे गाव खूप मोठं. फार लाडकं!
कोणत्याही क्षेत्रात केवळ साहेबाला खूश करण्यासाठी कामाचं ढोंग केलं, तर तिथं हे गाणं अगदी सहज बसेल..
आला आला, आला आला, साहेब साला, साहेब साला
हाजी हाजी झुकवा माना, सलाम ठोका, थुंकी झेला
मास्तर करून राहिले गणती, सगळी नुसती खोगीरभरती
ज्यांच्या नावे नावे पाटी, शाई त्यांच्या अंगठ्यावरती
केंद्रोकेंद्री पडती धाडी, सगळी गाढवे बनली घोडी
साक्षरतेची धो धो गंगा, निरक्षरांची तरते होडी..!
बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा.. बे चोक.. बे चोक... ??

मी मुद्दाम हा पाढा गाण्यातही इथंच थांबवला आहे... जसं अभियान थांबलं असावं!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com