...पिढ्या घडवणारा वैज्ञानिक (डॉ. सायली रानडे)

sayali ranade
sayali ranade

देशातले विविध मानाचे पुरस्कार मिळवणारे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचं नुकतंच (७ सप्टेंबर ) पुण्यात निधन झालं. खगोलशास्त्रातलं त्यांचं ज्ञान अफाट होतं. त्यांनी तयार केलेली दुर्बीण पन्नास वर्षे उत्तम काम करत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा वेध...

भारतात मुळात संशोधन आणि विज्ञान या क्षेत्राला फारसं ग्लॅमर नाही आणि या क्षेत्रात जी मंडळी काम करतात त्यांचं काम म्हणजे आज ‘बी’ पेरा आणि त्याची फळं मिळतील पुढच्या पिढ्यांना अशा स्वरुपाचं. त्यामुळं हे काम त्या अर्थानं कुठल्याही श्रेयाविना केलं जाणारं काम असतं, तसं काम प्रा. गोविंद स्वरूप यांनी केलं. परदेशांत मानाच्या आणि मोठ्या पगाराच्या चांगल्या संधी खुणावत असूनही मायदेशी परतून आपल्या देशवासीयांसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पिढीतले ते एक होते.
विश्वातली कोडी उलगडण्यासाठी मीटरवेव्ह तरंग लांबीची जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) उभारण्यात प्रा. स्वरूप यांचा सिंहाचा वाटा होता. पुण्याजवळच्या खोडद इथल्या महाकाय दुर्बिणीमुळं विश्वाचं अंतरंग धुंडाळता येतं. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि त्यात यशाचे नवे नवे टप्पे गाठणाऱ्या जगभरातल्या काही थोड्या शास्त्रज्ञांमध्ये प्रा. स्वरूप यांची गणना होत होती. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील ठाकूरद्वार इथं २३ मार्च १९२९ चा.

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी मास्टर ऑफ सायन्सची भौतिक शास्त्रातली पदवी अलाहाबाद विद्यापीठातून मिळवली. त्यानंतर जगप्रसिद्ध अशा ‘स्टॅनफोर्ड विद्यापीठा’मध्ये त्यांनी ‘पी.एच.डी.’ साठी प्रवेश घेतला. तिथं त्यांनी डॉ. रॉन ब्रेसवेल यांच्या मार्गदर्शनाखाली रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी (रेडिओ खगोलशास्त्र) या विषयावर संशोधन केलं. त्यांच्या ‘पी.एच.डी.’ च्या प्रबंधाच्या उत्तम गुणवत्तेमुळं स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीनं त्यांना प्राध्यापकपद देऊ केलं. तिथं काही काळ साहाय्यक प्राध्यापक या पदावर त्यांनी काम केलं. त्यानंतर जगप्रसिद्ध अशा ‘ हावर्ड युनिर्व्हसिटी’ मध्ये त्यांनी संशोधक सहकारी (रिसर्च असोसिएट) हे पद भूषवलं.

डॉ. स्वरूप यांना काहीतरी वेगळं व भव्यदिव्य करून दाखवायचं होतं. त्यासाठी ते भारतात परतले. आपल्या देशबांधवांसाठी त्यांनी काम सुरू केलं. डॉ. स्वरूप यांनी त्यानंतर दिल्लीमधल्या ‘नॅशनल फिजीकल लॅबोरेटरी’ मध्ये संशोधक म्हणून कामास सुरुवात केली. तिथंच त्यांनी फ्रुगल इनोव्हेशन अथवा ‘जुगाड’ या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक टाकावू गोष्टींपासून संशोधनात उपयुक्त ठरणारी उत्तमोत्तम अशी नवनवीन उपकरणं तयार केली. दुसऱ्या महायुद्धातल्या रडार या उपकरणांच्या उरलेल्या व टाकावू भागातून त्यांनी विविध ठिकाणी उपयोगी पडू शकतील अशी बहुपर्यायी रेडिओ उपकरणे तयार केली. कमी किंमतीमध्ये तयार झालेल्या या उपकरणांनी संशोधनात खूप मोलाची मदत केली.

डॉ. स्वरूप यांना आपल्या देशात रेडिओ खगोलशास्त्राचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची तीव्र इच्छा होती. त्यासंदर्भात त्यांनी अनेक शास्त्रज्ञांची मदत मागितली. अखेरीस त्यांना यासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) चे संस्थापक व संचालक डॉ. होमी भाभा यांनी योग्य ते सहकार्य आणि मदत देऊ केली. या दोन्ही थोर शास्त्रज्ञांच्या सहकार्यातून देशातला पहिला ‘ रेडिओ खगोलशास्त्र’ विभाग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये सुरू झाला.
यानंतर डॉ. स्वरूप यांच्या मुकुटात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. तामिळनाडू राज्यातील उटी या शहरात त्यांनी
एका महाकाय दुर्बिणीची (जायंट टेलिस्कोप) ची निर्मिती केली. या दुर्बिणीची लांबी अर्धा किलोमीटर तर रूंदी तीस मीटर आहे. अभिमानाची बाब अशी की १९६९ मध्ये उभारली गेलेली ही दुर्बीण आज पन्नास वर्षानंतरसुद्धा उत्तमरीत्या काम करत आहे. या दुर्बिणीनं अनेक संशोधनामध्ये महत्त्वाचं असं योगदान दिलं आहे. तिच्या मदतीनं अनेक उच्च प्रतीचे- दुर्मीळ शोध शक्य झाले आहेत. या दुर्बिणीमुळं आपल्या देशाची जगात वेगळी ओळख निर्माण झाली.

मात्र डॉ. स्वरूप इतक्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले. इथं त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून एक रेडिओ दुर्बीण रचना रेडिओ टेली स्कोप अॅरे) उभारली. त्यालाही ‘महाकाय मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण’ या नावानं ओळखली जाते. साध्यासुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू वापरून तयार केलेली ही संरचना जवळ जवळ दोन दशकं जगातल्या अव्वल दर्जाच्या खगोल शास्त्रीय संशोधनात उपयुक्त ठरलेली आहे.

देशातल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज ह्या दृष्ट्या शास्त्रज्ञानं ओळखली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक अभ्यास वृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या तत्कालिन कुलगुरुपदी असणाऱ्या डॉ. भिडे या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीनं ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च’ (आयआयएसइआर) या संस्थेची स्थापना केली. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय डॉ. स्वरूप त्यांच्या प्रेरणादायी व दिलखुलास व्यक्तिमत्त्वाकरीता सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनामुळं अनेक नवीन संशोधनांना चालना मिळाली. त्यांचं भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र या दोन विषयातलं महत्त्वाचं योगदान भारतीयच नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांच्या मनात त्यांना कायम जागं ठेवेल याविषयी शंका नाही. त्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात प्रोफेसर के. एस. कृष्णन यांच्यासोबत केलेलं संशोधन हे परा-चुंबकीय अनुवाद (पॅरा मॅग्नेटीक रेसीनंस) या विषयावर होते.

डॉ. गोविंद स्वरूप यांनी निर्माण केलेल्या कल्पक, किफायतशीर आणि शक्तिशाली निरीक्षण सुविधा (ऑबर्जव्हेशनल फॅसिलिटी) या केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातल्या ३१ देशांमधील विविध शास्त्रज्ञांनी संशोधनाकरीता वापरलेल्या आहेत. डॉ. गोविंद स्वरुप यांचे अन्य विषयातील संशोधन जगप्रसिद्ध आहे. त्यांनी टाईप यू प्रकारातील सौरस्फोटचा (सोलर बस्ट्‌स) शोध सर्वप्रथम लावला. त्यांचा दुसरा महत्वाचा शोध जायरो विकिरण (जायरो-रेडीएशन) या विषयात आहे. त्यामध्ये त्यांनी विद्युत परमाणू (इलेक्ट्रॉन) म्हणजे ज्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, त्याच्या मदतीनं मायक्रोव्हेव सौर- विकिरण समजावून सांगितलं. त्यांनी व त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विविध प्रयोग करुन जे निष्कर्ष काढले ते सारे ‘बिग बॅग थिअरी ऑफ युनिव्हर्स ’ ला दुजोरा देणारे ठरले.

त्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात प्राध्यापक के. एस. कृष्णन यांच्यासोबत केलेलं संशोधन हे परा-चुंबकीय अनुनाद (पॅरा मॅग्नेटिक रेसोनंस) या विषयावर होतं. त्यांनी उटीमध्ये बांधलेल्या जायंट टेलिस्कोपमुळं ल्युनार ऑक्युलेशन्स चा मागोवा घेता येणं शक्य झालं. ज्यामुळं अवकाशातील विविध प्रदेशांचे सर्वेक्षण करता येणं सुकर ठरलं याशिवाय अनेक वेगवेगळ्या रेडिओ स्त्रोतांच्या (सोर्सेस) विविध मापदंडांचा (पॅरामिटर्स) अभ्यास करता येऊ शकतो. ही दुर्बीण ज्या काळी उभारली गेली त्या काळी पूर्ण विश्वात ही एकमेव दुर्बीण अशी होती की जिचे असे विविध उपयोग करता येत होते. जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा डॉक्टर स्वरूप यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी व आव्हानात्मक प्रयोग होता. त्यामध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांचा व अभियंत्यांचा सहभाग होता. जी.एस.आर.टी. ही दुर्बीण तिच्या तरंगलांबी श्रेणी (वेव्हलेन्य रेंज) साठी प्रसिद्ध आहे. तिचा उपयोग जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी अतिशय महत्त्वाच्या संशोधनाकरिता केलेला आहे. या जी.एस.आर.टी. प्रकल्पासाठी आवश्यक निधी जेव्हा मंजूर झाला तेव्हा डॉ. स्वरूप साठ वर्षांचे होते. या वयात सर्वसाधारणपणानं अन्य शास्त्रज्ञ निवृत्तीच्या मार्गावर असतात, पण हा चिरतरुण शास्त्रज्ञ ह्या वयात देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं काम करत असे. इतकेच नव्हे तर वयाच्या सत्तराव्या वर्षीसुद्धा ते त्यांच्या इतर अनेक विद्यार्थ्यांपेक्षा नियमितपणे व वेळेवर प्रयोग शाळेत येत असत.
डॉ. गोविंद स्वरूप यांनी निर्माण केलेल्या कल्पक, किफायतशीर आणि शक्तिशाली निरीक्षण सुविधा (ऑबर्जव्हेशनल फॅसिलिटी) या केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातल्या ३१ देशांमधील विविध शास्त्रज्ञांनी संशोधनाकरिता वापरलेल्या आहेत. वयाच्या साठाव्या वर्षी नव्यानं इनिंग सुरू करणाऱ्या या वैज्ञानिकाबद्दल एका वाक्यात सांगायंच झालं तर त्यांनी संशोधकांच्या अनेक पिढ्या घडवल्या.

त्यांना मिळालेले पुरस्कार
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार
पद्मश्री
पी.सी. महालनोबीस पदक
मेघनाद साहा पदक
होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com