हम देखेंगे... (डॉ. यशवंत थोरात)

dr yashwant thorat
dr yashwant thorat

हुकूमशहा ही इतिहासाची निर्मिती असते. ते सहज जन्मत नाहीत, तर एखाद्या विशिष्ट वेळी ते ज्या समाजात जन्मले त्या समाजाचाच लपलेला चेहरा त्यांच्या रूपानं प्रतिबिंबित होतो. त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून आतापर्यंत पुढं न आलेली त्या देशाची सर्वात काळी बाजू जगासमोर येते.

मी रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला आणि सामान व्यवस्थित ठेवून पुस्तक वाचत बसलो. तासाभराच्या प्रवासानंतर एका स्टेशनवर चहासाठी खाली उतरलो. परत येऊन पाहतो तर माझ्या डब्यात तरुणांचा एक गट येऊन बसला होता. माझ्या चेहऱ्यावर उमटलेला त्रासिक भाव त्यांना जाणवला असावा. नरमाईच्या सुरात त्यातला एकजण म्हणाला : ‘‘आमच्याकडे आरएसी तिकिटं आहेत. टीसी येईपर्यंत प्लीज, आम्ही इथं बसू का?’’
‘‘बसा’’ असं म्हणत मी पुन्हा पुस्तक हातात घेतलं.
समोरच्या सीटवर एक मॅडम बसल्या होत्या.
माझ्या हातातल्या पुस्तकाकडं पाहत त्या म्हणाल्या : ‘‘तुम्ही फैझ यांचं पुस्तक का वाचताय?’’ त्यांच्या त्या प्रश्नानं थोडंसं गोंधळून मी त्यांच्याकडे पाहिलं. माझा रोख त्यांच्या लक्षात आला असावा.
‘‘नाही, तसं नाही; पण तुम्ही फैझ वाचताय ते त्यांची ‘हम देखेंगे’ ही कविता सध्या सगळीकडे निषेधाचं प्रतीक म्हणून म्हटली जातेय त्यामुळे की सहजच?’’ त्यांनी घाईघाईनं खुलासा करत फेरविचारणा केली.
‘‘मी फैझ वाचतोय...कारण, कवी म्हणून ते मला आवडतात,’’ मी म्हणालो.
आमचं संभाषण तिथंच थांबलं.
थोड्या वेळानं त्या मुलांनी आपापले डबे उघडले आणि तरुणांच्या स्वभावानुरूप ते त्यांवर तुडून पडले. जेवतानाही त्यांची विविध विषयांवर चर्चा सुरू होती. मुख्य विषय होता तो देशात सध्या विविध ठिकाणी चाललेल्या निदर्शनांबद्दल. ‘प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे आणि ते ऐकून घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे,’
असा बहुतेकांचा चर्चेतला सूर होता.
अभिव्यक्ती-स्वातंत्र्यावर त्यांच्यात बरीच चर्चा झाली आणि पोलिसांनी विद्यापीठांमधली स्थिती ज्या कठोरतेनं हाताळली त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. ‘हा निषेध लोकशाहीच्या चौकटीतच झाला पाहिजे आणि तो कधीही हिंसक बनता कामा नये,’ असं मत अनेकांनी व्यक्त केलं. त्यांची चर्चा संपत आहे असं वाटत असतानाच बऱ्यापैकी आवाज असलेल्या एका विद्यार्थ्यानं अचानक गुणगुणायला सुरुवात केली. बाजूच्यानं जवळची सूटकेस पुढं ओढत तबल्याचा ठेका धरला. बाकीच्यांनी टाळ्यांचा ताल धरला आणि सगळ्यांनीच फैझ यांची ‘हम देखेंगे’ ही कविता म्हणायला सुरुवात केली.
‘‘तुम्हाला हे गाणं योग्य वाटतं?’’ समोर बसलेल्या मघाच्या मॅडमनी मला त्रासिक स्वरात विचारलं.
‘‘का?’’
‘‘कारण, या गाण्यात मूर्तिभंजनाचं समर्थन केलं आहे आणि अल्लाच्या सर्वश्रेष्ठत्वावर मोहोर उमटवली आहे.’’
‘‘हो. शाब्दिक अर्थानं ते खरं आहे,’’ मी म्हणालो.
पण माझ्या म्हणण्याची दखलही न घेता त्या फणकाऱ्यानं म्हणाल्या : ‘‘या मुलांना जरा जास्तच स्वातंत्र्य मिळतंय. अन्य धर्मीयांच्या दाखल्यातून परमेश्र्वराकडे पाहण्यामुळे आपल्या परंपरागत श्रद्धांना आणि जीवनपद्धतीला बाधा येईल. त्यांनी अधिक योग्य गीत गायलं पाहिजे.’’
मॅडमच्या या भडिमाराकडे सुदैवानं त्या मुलांचं लक्ष नव्हतं. ते त्यांच्याच गाण्यात मग्न होते. वाद संपवण्याच्या हेतूनं मी म्हणालो : ‘‘जाऊ द्या, शेवटी ती तरुण मुलं आहेत.’’
पण मॅडम त्यांचा हेका सोडायला तयार नव्हत्या.
एखाद्या मशिनगनसारखा त्यांचा भडिमार सुरूच होता.
‘‘ते लहान असण्याचा प्रश्नच येत नाही. आपणच त्यांना राष्ट्रीय मूल्यांपासून दूर भरकटायला वाव दिलाय, मोकळीक दिलीय, चूक आपलीच आहे,’’ त्या त्राग्यानं म्हणाल्या.
‘‘तसं काहीच नाही, मी त्यांच्या वयाचा असताना माझ्या मनातसुद्धा जात, वंश या विचारांचा अभिनिवेश आणि समाजातील आर्थिक विषमतेबद्दल खूप चीड होती,’’ मी माझा मुद्दा संयमानं मांडला.
‘‘उगीच काहीपण तुलना करू नका,’’ माझं वाक्य तोडत त्या म्हणाल्या : ‘‘तुम्ही जर ती कविता पूर्णपणे वाचलीत तर आणि ती कविता ज्या परिस्थितीत लिहिली गेली ती परिस्थिती पाहिलीत तर तिचा नेमका अर्थ कळू शकेल.’’
मी थोडा चिडलोच. खरं तर मला त्या वादात अडकायचं नव्हतं; पण मॅडमना उत्तरही द्यायला हवं होतं.
‘‘मॅडम, मी कविता वाचली आहे आणि तिच्या शाब्दिक अर्थापेक्षा ती खूप वेगळी आहे.’’
माझ्या आवाजातला नूर जाणवून त्या काहीशा चपापल्या. मात्र तरीही
‘‘हा मूर्खपणा आहे. खरं तर त्या कवितेवर बंदी घालायला पाहिजे; पण तुम्ही तिची एवढी तरफदारीच करता आहात तर, तुमच्या मते, कवीला काय म्हणायचंय ते आम्हाला सांगा,’’ असं त्यांनी मला सरळसरळ आव्हानच दिलं.
सगळ्या डब्यात क्षणभर शांतता पसरली. त्यांनी मला कोंडीत पकडलं होतं आणि माझ्यापुढं आव्हान स्वीकारण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नव्हता.
‘‘बोला ना...सगळे ऐकायला उत्सुक आहेत,’’ असं म्हणत त्या मला जणू ललकारत होत्या.
शांतपणे, एकेक शब्द उच्चारत मी म्हणालो : ‘‘या कवितेला किंवा गीताला एक निश्चित संदर्भ आहे. एका विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात तीनजणांची ही गोष्ट आहे. ते तिघं म्हणजे एक कवी, एक हुकूमशहा आणि एक गायिका.’’
मी पुढं जरा सविस्तरपणे सांगू लागलो : ‘‘ता. पाच डिसेंबर १९७७ ला पाकिस्तानचे अध्यक्ष झिया उल् हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. देशात लष्करी कायदा जारी केला आणि पाकिस्तानला पूर्णपणे इस्लामी राष्ट्र बनवण्याची प्रकिया सुरू केली. या काळात फैझ हे पाकिस्तानातले एक लोकप्रिय कवी होते आणि एक बुद्धिवान विचारवंत म्हणून त्यांना जनमानसात मान्यता होती. उर्दू भाषेचा पारंपरिक साज ल्यायलेल्या त्यांच्या कवितांमधून ते सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर अतिशय मार्मिक भाष्य करत असत.
झिया यांनी पाकिस्तानला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आणि फैझ व अन्य लोकशाहीवादी घटकांना कळून चुकलं की पाकिस्तान आता एक संकुचित आणि कट्टरवादी इस्लामी राष्ट्राचं स्वरूप घेऊन हुकूमशाहीकडे वळणार. हा बदल कुराण, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना किंवा अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची मूल्यं यांना छेद देणारा होता हे या बुद्धिवंतांनी सरकारच्या लक्षात आणून देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण त्यांच्या म्हणण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. सन १९७९ मध्ये फैझ यांनी याविरोधात सर्वप्रथम आवाज उठवला.
‘ ‘हम देखेंगे’ ही कविता झिया यांच्या हुकूमशाहीच्या धोरणाच्या विरुद्धची प्रतिक्रिया आहे,’ असं फैझ जाहीरपणे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची तीव्र दखल घेण्यात आली. त्यांच्या कवितेवर बंदी घालण्यात आली. त्यांना अटक करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांना लेबाननमध्ये परागंदा व्हावं लागलं.

झिया यांच्या इस्लामीकरणाचा एक भाग म्हणून सन १९८५ मध्ये पाकिस्तानमध्ये महिलांना साडी नेसण्यास बंदी घालणारा एक फतवा काढण्यात आला. साडी हा पाकिस्तानातल्या महिलांचाही परंपरागत पोशाख होता; पण ‘ही भारतीय परंपरा आहे,’ असं म्हणत ही बंदी घालण्यात आली होती. तो काळ म्हणजे झियांच्या राजवटीचा सर्वोच्च बिंदू होता. त्या अंधकारात इक्बाल बानो या पाकिस्तानातल्या प्रख्यात गायिकेनंसुद्धा दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला. फैझ यांच्या हकालपट्टीच्या निषेधार्थ आयोजिलेल्या एका कार्यक्रमात इक्बाल बानो यांनी बंदी धुडकावून लावत, काळी साडी परिधान करून फैझ यांची ‘हम देखेंगे’ ही कविता म्हटली. त्यांच्या या बंडखोरीमुळे त्यांना अटक होईल असं वाटत होतं; पण त्यांची लोकप्रियता रातोरात एवढी वाढली की त्यांना अटक करायची सरकारची हिंमत झाली नाही. इक्बाल बानो यांना अटक केली तर जनक्षोभ उसळेल या भीतीमुळे सरकार झुकलं. त्यांनी गायलेली ही कविता/हे गाणं त्या काळात एवढं गाजलं की पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापेक्षाही ते अधिक लोकप्रिय ठरेल असं म्हटलं जात असे.’’
‘‘व्वा. खूपच रोमहर्षक कथा आहे ही,’’ तबला वाजवणारा मुलगा म्हणाला.
‘‘ही कथा नाही बेटा, ही सत्यघटना आहे,’’ मी स्पष्ट केलं.
बाकीचे सगळे सुन्न होऊन बसले होते.
हळूहळू ते विद्यार्थी पांगले. आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याच्या आविर्भावात असलेल्या त्या मॅडमनीही ‘मी आता झोपते’ असं म्हणत माघार घेतली.
मी माझं बेडिंग उलगडून त्यावर पहुडलो; पण काही केल्या झोप येईना. खूप वेळ मी जागाच होतो. विचारांचं थैमान डोक्यात सुरू होतं. झियांसारखी माणसं जन्मालाच का येतात आणि फैझ किंवा इक्बाल बानो यांच्यासारखी माणसं मोठ्या संख्येनं जन्माला का येत नाहीत हा प्रश्न मला सतावत होता. हुकूमशहा ही इतिहासाची निर्मिती असते. ते सहज जन्मत नाहीत, तर एखाद्या विशिष्ट वेळी ते ज्या समाजात जन्मले त्या समाजाचाच लपलेला चेहरा त्यांच्या रूपानं प्रतिबिंबित होतो. त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून आतापर्यंत पुढं न आलेली त्या देशाची सर्वात काळी बाजू जगासमोर येते.
पाकिस्तानच्या या लपलेल्या चेहऱ्याची चार मुख्य कारणं होती आणि आहेत.
पहिली समस्या म्हणजे, पाकिस्तानचा विस्कळित भूगोल. जन्मापासून या देशाचे तीन प्रमुख भाग तीन प्रमुख समस्यांनी ग्रासलेले आहेत. पहिला बंगालचा (पूर्व पाकिस्तान) भाग, ज्यात बंगालींची संख्या सगळ्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती; पण त्यांची पश्चिम पाकिस्तानशी कसलीही सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक नाळ जुळलेली नव्हती. तिथं डाव्या विचारांच्या नेत्यांना निवडून देण्याची परंपरा होती. पश्चिम भागात मात्र उजव्या विचारांचे नेते होते. दुसरा भाग वायव्य सरहद्द प्रांत या नावानं ओळखला जातो. तिथली संस्कृती पूर्णपणे स्वतंत्र आणि परंपरागत रीतीनं स्वायत्त आहे. तिसरा भाग हा आर्थिकदृष्ट्या सधन आणि प्रभावी असलेल्या पंजाबी लोकांचा. या सरंजामी भागातल्या लोकांच्या मनात ‘आपणच सत्ता गाजवू शकतो’ अशी महत्त्वाकांक्षा रुजलेली आहे.
या विस्कळित भूभागाबरोबरच दुसरी समस्या म्हणजे पाकिस्तानला भारताप्रमाणे सुसूत्र राज्यव्यवस्था उभी करता आली नाही. पाकिस्ताननं निर्माण केलेली कॉन्स्टिट्युअन्ट असेम्ब्ली (संसद) अयशस्वी ठरली आहे. मात्र, हे लक्षात न घेता आपल्या देशाला अतिशय चांगलं आणि लोकोत्तर नेतृत्व लाभेल अशा भ्रमात पाकिस्तान होता. पाकिस्तानला जे योग्य दिशेला नेऊ शकले असते असे त्या वेळी एकमेव नेते होते व ते म्हणजे महंमद अली जीना. मात्र, पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासूनच जीना यांची प्रकृती खूपच खालावली होती. पाकिस्तानची राजकीय स्थिती सुधारली जाण्यापूर्वी अवघ्या १३ महिन्यांतच त्यांचं निधन झालं. एवढंच नव्हे तर, मुस्लिम लीग हा त्यांचा पक्षही तिकडे अयशस्वी ठरला. कारण, या पक्षाला पाकिस्तानातूनच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व भारताच्या - मुस्लिमांची प्रभावी संख्या असलेल्या - उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल किंवा मुंबई प्रांत या प्रदेशांतूनही जास्त पाठबळ मिळत असे.

या फसलेल्या गोष्टींमध्ये पाकिस्तानजवळ स्वातंत्र्याच्या वेळी आयतं मिळालेलं लष्कर ही एकमेव प्रभावी गोष्ट होती. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या १० आठवड्यांत युद्ध झालं. त्यामुळे लष्कर हाच आपला त्राता आहे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली; पण या वृत्तीमुळे पाकिस्तानच्या लोकशाहीवर
दूरगामी असं गडद सावट पडेल हे त्या वेळी कुणाच्या लक्षात आलं नाही.
पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर आपल्याला दिसून येतं की त्या देशात लष्करी आणि मुलकी प्रशासन आलटून-पालटून सत्तेवर येतं.
हे का घडतं? सर्वसाधारणपणे चांगल्या प्रशासनामुळे समृद्धी निर्माण होते. कोणत्याही देशात व्यापारातून वा उद्योगातून संपत्ती निर्माण होत असते. मात्र, त्यासाठी प्रशासनाला शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि व्यापारवाढीसाठीचं आश्र्वासक वातावरण यांची हमी हवी असते. हे घडतं तेव्हा उद्योग आणि व्यापार यांची भरभराट होते. त्यातून नवा रोजगार निर्माण होतो. मालवाहतुकीत सुधारणा होते. करसंकलन वाढतं. एकूण भरभराटीचं वातावरण निर्माण होतं. पाकिस्तानही याला अपवाद नाही. तिथल्या मध्यमवर्गीय उद्योजकांना लष्करी राजवटीची हडेलहप्पी त्रासदायक वाटत असली तरी अशा राजवटीतून जे स्थैर्य निर्माण होतं, त्याचं ते सुप्त स्वागतच करतात. अस्थिरता निर्माण होत आहे असं दिसताच हा वर्ग लष्करी राजवटीला पाठिंबा देतो; पण जेव्हा हुकूमशाही खूपच कठोर होते तेव्हा व्यापारीवर्ग लोकशाही राजवटीला पाठिंबा देतो. त्यातूनच लष्करी राजवट आणि लोकशाही राजवट यांचा खेळ पाकिस्तानात आलटून-पालटून सुरू असतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, पाकिस्ताननं भारताप्रमाणे विविधतेचा कधीही स्वीकार केलेला नाही. उलट, राष्ट्रीय ऐक्य आणि इस्लामी पुराणमतवाद यांच्या अतिरेकातून त्यानं विविधता नेहमीच नाकारलेली आहे. यामुळे त्या देशातील लोकशाही वेळोवेळी खचत गेली. यामागचा तर्क अगदी साधा आहे. देशाची राजकीय व्यवस्था ठरवताना जर मौलवींनी सांगितलेल्या अर्थानुसार, परमेश्वराची इच्छा ही जर प्रमाण मानली तर मग लोकांची इच्छा आपोआपच दुय्यम ठरते.
आश्र्चर्याची बाब म्हणजे, धर्माधारित राजकीय पक्षांना पाकिस्तानातल्या निवडणुकीत कधीही फारसं चांगलं यश मिळालं नसलं तरी पाकिस्तानातलं राजकारण नेहमीच धर्माभोवती केंद्रित राहिलं आहे. परिणामी, सत्तेत असलेले नेते ‘धर्माच्या राजकारणावरील नियंत्रणाला उत्तेजन देता कामा नये’ असं खासगीत बोलत असले तरी प्रत्यक्षात त्यांना धर्माची भाषाच बोलणं भाग पडतं. इस्लामीकरण करणं सोपं होतं, मात्र त्यापासून दूर जाणं अशक्य आहे हेच खरं आहे.
अशा स्थितीत पाकिस्तानला वाचवलं ते तिथल्या बुद्धिवंतांनी, कवींनी आणि साहित्यिकांनी. एका अर्थानं हुकूमशाही ही पाकिस्तानच्या
चेहऱ्याची एक बाजू असली तरी तिथले निष्ठावान साहित्यिक आणि कवी ही त्याच्या चेहऱ्याची दुसरी बाजू आहे. हे खरं आहे की जिथं चर्चा आणि संवाद यांच्याऐवजी नियंत्रण आणि आदेश यांची निवड केली जाते आणि मुक्त विचार व स्वातंत्र्य यांच्याऐवजी शिस्तीचा धाक आणि ताठरपणा यांचा आधार घेतला जातो तिथं हुकूमशहा निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. मात्र, हेही खरं आहे की जोपर्यंत सत्ताधीश आपल्यावरच्या मर्यादा मान्य करत नाहीत आणि सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी आपण स्वीकारलेली जबाबदारी आहे असं त्यांना वाटत नाही तोपर्यंत कवी आणि साहित्यिक दडपलेल्या, पीडित जनतेच्या बाजूनं बोलणारच. ते सत्ताधाऱ्यांना त्यांच्या दुबळेपणाची जाणीव करून देणारच. लोकांचं लक्ष त्यांच्या व्यक्तिगत जीवनापेक्षा त्यांना पुढं नेणाऱ्या अन्य महत्त्वाच्या मूल्यांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न ते करणारच.
कितीतरी वेळ मी माझ्या विचारांच्या तंद्रीतच होतो. अचानक माझं मुलांकडे लक्ष गेलं. ते सगळे जण शांतपणे झोपले होते. माझं मन त्यांच्यासाठी भरून आलं. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हा ग्रंथ किंवा लिंकन यांचं गेट्सबर्ग इथलं भाषण किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे शब्द किंवा समाजाचा रक्षक म्हणून असलेली एखाद्या कलावंताची भूमिका यांतली अमर्याद ताकद मला जाणवली. ती कविता लिहिणाऱ्या फैझ यांच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं. ते गीत गाणाऱ्या इक्वाल बानो यांच्या हिमतीचं मला कौतुक वाटलं. आपल्या साहसाचे परिणाम काय होतील हे त्यांना माहीत होतं; पण तरीही त्यांनी हिमतीनं त्यात उडी घेतली.

मुलं झोपली होती. त्या मुलांना पाहून त्या वेळी काय झालं मला माहीत नाही; पण मी देवाला मनोमन प्रार्थना केली : ‘परमेश्वरा, या मुलांसाठी नकाशावरच्या सीमा फक्त नकाशावरच राहू दे...त्या त्यांच्या मनावर उमटू देऊ नकोस. या मुलांना मित्र आणि शत्रू या दोघांनाही माणुसकीच्या भावनेतून पाहण्याची दृष्टी दे. त्यांना शिकव की खऱ्या शौर्यात मनाची विशालता आणि उदारता असते. असं झालं तरच ही पिढी आपल्या संस्कृतीतल्या त्या मूल्यांचा सन्मान करू शकेल, ज्यामुळे आपण माणूस म्हणून ओळखले जातो.’

सहजच मला उपनिषदातल्या ओळी आठवल्या.
सर्वे भवन्तु सुखिनो, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु...

आणि त्या आठवणीतच मला केव्हातरी झोप लागून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com