मनात घर करणारं ‘ग्राउंड्‌स’ (राम पराडकर)

ram paradkar
ram paradkar

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी या शहरात एक अनोखं रेस्‍टॉरंट आहे. त्याचं नाव ‘ग्राउंड्स ऑफ अलेक्‍झांड्रिया’. केवळ ‘ग्राउंड्स’ या नावानंच ते ओळखलं जातं. वेगवेगळ्या झाड-झडोऱ्यांनी वेढलेल्या या अनोख्या रेस्‍टॉरंटविषयी...

‘परत निसर्गाकडं’ (Back to nature) ही संकल्पना खरं म्हणजे अनेक वर्षांपासून जगभर लोकप्रिय आहे; विशेषतः रेस्टॉरंटच्या संदर्भात! याचं कारण, माणसाला बंदिस्त जागेत बसून खायला फारसं आवडत नाही. खुल्या वातावरणात आणि निसर्गाच्या सान्निध्यात बसून खाण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर त्याला अधिक पसंती मिळताना दिसते. आणि एकदा का ही अशी संकल्पना पटली, रुजली की
ती अनेक ठिकाणी अनुसरली जाते.

आपल्याकडंही ही कल्पना आली, रुजली आणि लोकप्रिय झाली. तिचे अनेक आविष्कार ठिकठिकाणी पाहायला मिळतात. अहमदाबादचं ‘विशाला रेस्टॉरंट’ हे त्याचं उत्तम उदाहरण. सन १९८० च्या दशकात ते अस्तित्वात आलं आणि पाहता पाहता लोकप्रिय झालं. ‘विशालामध्ये एक दिवस’ अशीच संकल्पना त्यामागं होती. खावं, प्यावं, खेळावं आणि मौज-मजा करावी हाच एकंदर ‘फंडा’ होता. ८० च्या दशकांत मी तिथं गेलो होतो. मला त्या वेळी ते फारच आवडलं होतं.
पुण्यातही ही संकल्पना आली; बऱ्याच उशिरा. मात्र, उशिरा आली असली तरी ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
‘वैशाली’, ‘अभिरुची’, ‘चोखीदाणी’ इत्यादी त्याचीच भावंडं होत. ‘विशाला’चे हे निरनिराळे आविष्कार यशस्वी झाले.

मी गेल्या वेळी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेव्हाची गोष्ट. माझी मुलगी प्राजक्ता त्या वेळी सिडनीत होती. जवळपास तीन महिने माझा मुक्काम त्या शहरात होता. ती माझी ऑस्ट्रेलियातली चौथी खेप होती. प्रत्येक भेटीत एक-दोन तरी नवी ठिकाणं पाहायला मिळायची. त्यानुसार, झाडीत लपलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये या खेपेला प्राजक्ता मला घेऊन गेली. ‘ग्राउंड्स ऑफ अलेक्‍झांड्रिया’ हे त्याचं नाव; पण नुसतं ‘ग्राउंड्स’ म्हणूनच ते जास्त ओळखलं जातं. प्रेमात पडावं असं हे रेस्टॉरंट आहे. संकल्पना तीच...‘परत निसर्गाकडं’! पण आविष्कार मात्र एकदम भन्नाट...
हिरव्यागार वनराईत हे रेस्टॉरंट आहे. जिकडं पाहावं तिकडं झाडीच झाडी! पण बहुतांश झाडं लहान-मोठ्या कुंड्यांमधली. काही अगदी छोट्या कुंड्यामधली, तर काही मोठ्या रांजणांमधली. या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे लटकत्या कुंड्या आणि त्यांतून गच्च भरलेल्या आणि बाहेर ‘ओसंडून वाहणाऱ्या’ वेली, झाडं इत्यादी. फर्न, ॲस्परागत यांसारख्या एक-दोन वेली वगळता बहुतांश वेली मला अनोळखी होत्या. अनोख्या वेलींचंच प्रमाण जास्त होतं. तीच गोष्ट फुलांचीही. तऱ्हेतऱ्हेची फुलं. जर्बेराची वेधक लाल पिवळी फुल...मॅग्नोलियाचं गेंदेदार पांढरं फूल...सोनमोहराची पिवळीधमक फुलं, बिगोनिया आणि लिलीचे प्रकार एवढेच माझ्या परिचयाचे होते. याशिवाय फुलांचे आणखीही बरेच प्रकार तिथं होते. सर्व फुलं फुललेली आणि दिसायला एकदम सुंदर आणि वेधक. नजर खिळवून ठेवणारी. इतक्‍या विविध प्रकारची फुलं एकाच ठिकाणी मी पहिल्यांदाच पाहत होतो.

त्या मोहक फुलांनी माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला. परदेशात माझ्याकडं सदैव कॅमेरा असतो. कारण, परदेशात फोटो काढण्यायोग्य जागा असंख्य असतात; पण चांगल्या जागा आहेत, चांगला कॅमेरा आहे म्हणून फोटो चांगले येतीलच याची खात्री नसते! तर चांगलं फोटो काढण्याचं कसब, हातोटी तुमच्याकडं असावी लागते. तंत्र माहीत असावं लागतं. आता मला समोरच्या देखण्या फुलांचे जवळून फोटो (क्लोजअप) काढायचे होते. त्यासाठी मी सोपी युक्ती वापरली. फुलावर ऊन्ह पडत असेल आणि मागं सावली असेल तर फोटो नक्कीच चांगला येतो. फोटो काढताना मी अशा जागा हुडकत असतो. त्यामुळे माझे फोटो हमखास चांगले येतात. (फोटो काढण्याबाबतची ही एक छोटीशी युक्ती मी तुम्हाला सांगितली. तुम्हीही ती वापरून पाहा. तुमचेही फोटो चांगले येतील!) ...तर अशा जागा हुडकत हुडकत माझी फोटोग्राफी चाललेली होती. त्यात माझा एखादा तास तरी सहज गेला असेल. आपली आवडती गोष्ट करत असताना वेळेचं भान राहत नाही हेच खरं.

झाडं आणि फुलं हा या रेस्टॉरंटचा आत्मा आहे असं म्हणावं लागेल. आता तो जर आत्मा असेल तर मग याचा देह कसा असेल याचं चित्र तुमच्यासुद्धा डोळ्यांसमोर उभं राहील. हे रेस्टॉरंट म्हणजे तीन-चार उतरत्या छपरांच्या शेड्‌स! ती छपरंसुद्धा पारदर्शी प्लॅस्टिकची. त्यामुळे ऊन्ह थेट आत झिरपतं. सिडनीत अशा उबदार जागा म्हणजे पर्वणीच समजली जाते. कारण, सुमारे सहा-सात महिने तिथं थंडीच थंडी असते. तीसुद्धा चावरी थंडी. थंडीत अशा जागी कोवळ्या उन्हात बसणं आणि न्याहारी करणं यासारखं दुसरं सुख नाही. शनिवार, रविवार तर हे रेस्टॉरंट अगदी ‘तुडुंब’ भरलेलं असतं. त्यात ते उन्हाचे दिवस असतील तर मग बघायलाच नको. जागा मिळणंही दुरापास्त. (इथं आठवड्यातले निम्मे दिवस ढगाळ हवामान असतं).

इथल्या सगळ्या शेड्‌स प्रशस्त आहेत. प्रत्येक शेडमध्ये ४० ते ६० माणसं अगदी आरामात बसू शकतील एवढ्या त्या ऐसपैस आहेत. आपल्या इथल्यासारख्या गच्च मांडणीच्या अजिबात नाहीत. अगदी मोकळ्याढाकळ्या! आणि सर्व वातावरण एकदम ‘रस्टिक’ असं आहे. नैसर्गिक लाकडी खांब. त्यावर आडवे वासे वगैरे... त्यांना मुद्दामहून जुनाट कळा आणलेली. या खांबांवर आणि वरच्या आडव्या वाशांवर हिरव्यागार वेली चढवलेल्या आहेत. शिवाय, त्यांत बारीक बारीक दिवेही सोडलेले आहेत आणि दिवसाही ते सुरू असतात. वरचे वासे वेलींनी गच्च मढवलेले आहेत. इतके की लाकूड शोधावं लागतं. हेही कमी की काय म्हणून जागाजागी कुंड्या लटकवण्यात आलेल्या आहेत. त्यासुद्धा वेलींनी ‘ओसंडून वाहणाऱ्या’ कुंड्या. त्यामुळे जिकडं पाहावं तिकडं हिरवाईच हिरवाई...
इथलं एक दालन तर नुसत्या रंगीबेरंगी बोगनवेलींचं आहे. किरमिजी, भगवी, लाल, पांढरी अशा रंगांच्या बोगनवेली एकमेकींत मिसळून गेल्यानं हे दालन लक्षवेधक वाटतं. इथलं वरचं छप्पर पाईपच्या साह्यानं अर्धगोलाकार केलेलं असून त्यावर बोगनवेली सोडण्यात आलेल्या आहेत. हे दालन मुख्यतः ग्रुपनं येणाऱ्या मंडळींसाठी होतं. उदाहरणार्थ : वाढदिवसाच्या पार्ट्यांसाठी किंवा आपल्याकडच्या भिशीसारख्या पार्ट्यांसाठी.

हे रेस्टॉरंट केवळ पाहून घेण्यासाठी म्हणून मी याच मुक्कामात इथं आधी एकदा येऊन गेलो होतो. त्याच्या प्रथम दर्शनानंच मी अतिशय प्रभावित झालो. पुढच्या वेळी इथं बसूनच लिखाण करायचं... इथला ‘माहौल’ डोळे भरून पाहायचा...मनात साठवून ठेवायचा...
असं त्याच वेळी ठरवून टाकलं होतं. ही ‘पुढची वेळ’ लगेचच आली. प्राजक्ताला कॉलेजचे पेपर तपासायचे होते.
ती म्हणाली : ‘‘चला, आपण ‘ग्राउंड्‌स’ला जाऊ या. तिथं मी माझे पेपर तपासते आणि तुम्ही लिखाण नाही तर स्केचिंग करा.’’
तिच्या घरापासून जेमतेम दहा मिनिटांच्या अंतरावर हे रेस्टॉरंट आहे. त्यामुळे आम्ही लगेच तिथं पोचलो. कोपऱ्यातली शांत-निवांत जागा हेरून तिथं बसलो. इथं आलं की सगळ्यांचंच मन उल्हसित होतं. तसंच माझंही झालं.
वाटलं तर इथं येऊन काम करत बसावं...वाटलं तर वाचत बसावं...वाटलं तर लिखाण करावं...आणि काहीच करावंसं वाटलं नाही तर स्वस्थ राहावं आणि आजूबाजूच्या ‘पब्लिक’कडं खुशाल पाहात बसावं अशी या रेस्टॉरंटमधली अनेकांची पद्धत! आसपासची माणसं, त्यांचे व्यवहार, त्यांची लगबग, त्यांचं मोकळंढाकळं वावरणं हे सगळं पाहत बसण्यासारखा दुसरा विरंगुळा नाही. वेळ छान जातो. लिखाणाचा विचार मागं सारून मीही तेच करायचं ठरवलं.

थोड्या वेळानं माझी नजर इतरत्र वळली. माझ्या समोर तरुण, सुंदर आयांचा एक ग्रुप बसलेला होता. आपल्या बछड्यांना त्या बाबागाडीतून घेऊन आल्या होत्या. पुरुषमंडळी कामावर गेलेली. त्यामुळे वेळ घालवायला ही उत्तम जागा. गप्पा आणि हास्यविनोदाचा त्यांचा जलसा रंगात आला होता. शेजारच्या टेबलावर वयस्क मंडळींचं टोळकं होतं. त्यांच्याही गप्पा सुरू होत्या. हीही मंडळी खाण्यापेक्षा वेळ घालवण्याच्या उद्देशानंच इथं आलेली दिसली. एका टेबलावर एक-दोन कुटुंबं आपल्या मुला-बाळांसमवेत खाण्यात गर्क दिसली, म्हणजे टेबलांवर बऱ्याच डिशेस दिसत होत्या. माझ्या डावीकडं एक तरुण मुलगी तिच्या मैत्रिणीसह बसलेली होती. तिच्या केसांचा पोनी टेल होता आणि तिनं गॉगल डोक्यावर सरकवलेला होता. थोडी स्टायलिश वाटली. माझ्या उजव्या बाजूला एक मध्यमवर्गीय बाई कॉम्प्युटरवर काम करण्यात दंग होती. शेजारी कॉफीचा ‘टेक अवे’ कागदी ग्लास होता. पलीकडच्या कोपऱ्यात अशीच एक बाई पुस्तक वाचण्यात मग्न होती. इथं जशी मोठी टेबलं होती तशीच छोटी टेबलंही होती. एकट्या-दुकट्या व्यक्तींसाठी.

असं कळलं की इथं लेखक, विचारवंत येऊन बसतात...लेखन करतात...चर्चा करतात वा आपापलं काम करत बसतात. त्यासाठी जागोजागी कॉम्प्युटरसाठी प्लग पॉईंट्‌सचीही सोय करण्यात आलेली आहे. लेखक, विचारवंत अशा लोकांना ही जागा म्हणजे खासच. एका चहाच्या किंवा कॉफीच्या कपावर तुम्ही पाहिजे तेवढा वेळ बसू शकता. तुम्हाला कुणी उठवायला येत नाही किंवा तुमची समाधी कुणी भंग करत नाही. रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अशा शांत; पण उल्हसित करणाऱ्या कोपऱ्यांची नितांत आवश्‍यकता असते. इथं त्यांची प्रतिभा बहरू शकते; नव्हे बहरतेच.

एका जगप्रसिद्ध वास्तुकाराचं यासंदर्भातलं एक उदाहरण द्यावंसं वाटतं.
आल्व्हर आल्टो (Alver Alto) हा फिनिश वास्तुकार. हेलसिंकीचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा. त्याची एक गोष्ट ऐकिवात आहे. तोही जवळच्या अशाच एका निवांत रेस्टॉरंटमध्ये जायचा. त्याचं कोपऱ्यातलं एक टेबल ठरलेलं असायचं. तिथं बसून तो डिझाईनचे गुंतागुंतीचे प्रश्‍न सोडवायचा. एकटाच बसून. हा कोण आहे, काय करतो याची गंधवार्ता इतरांना नसायची. आल्टोचं निधन झाल्यावर त्याची कीर्ती त्या रेस्टॉरंटला समजली आणि त्यानंतर त्या रेस्टॉरंटनं आपलं आधीचं नाव बदलून त्या वास्तुकाराच्या स्मरणार्थ रेस्टॉरंटचं नवं नामकरण केलं : आल्टो!
माझा वास्तुकार मित्र गिरीश दोशी हा किस्सा मला नेहमी सांगायचा, तेसुद्धा आम्ही पुण्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतानाच!

* * *
एव्हाना प्राजक्ताचे पेपर तपासून झाले होते. माझंही भरपूर निरीक्षण झालं होतं. मध्येच मी रेस्टॉरंटच्या परिसरात एक चक्करही मारून आलो. थोडी फोटोग्राफीही झाली होती. एकूण वेळ मजेत केला आणि प्रसन्न मनानं आम्ही घरी परतलो.
या ‘मानवनिर्मित निसर्गा’मधल्या ‘ग्राउंड्स’नं माझ्या मनात कायमचं घर केलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com