रस्त्यावर राहणारी माणसं... (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार?

पुण्यात गेल्या महिन्यात येऊन गेलेल्या पुरात डेक्कनच्या पुलाखाली राहणाऱ्या वस्तीत पाणी शिरलं आणि त्या माणसांचे संसार वाहून गेले. आधीच सर्वहारा असलेली ही माणसं आणखीच दीनवाणी झाली. या लोकांना मी मे महिन्यात भेटलो होतो. मोठे उड्डाणपूल हे विकासाचं प्रतीक आणि त्याखाली राहणारे हे सर्वांत उपेक्षित लोक. एकीकडं शहरात करोडपती आणि हे रोडपती एकाच वेळी वाढत आहेत. सुशोभित आणि सुरचित असलेल्या शहरांच्या रचनेत ही माणसं शहरांचं सौंदर्य घालवतात असंही मानणारे काही लोक आहेत. या शहरांना ओझं वाटणारे हे लोक कोण आहेत हे एकदा जवळून बघावंसं वाटत होतं. त्यासाठी पुण्यात गेल्यावर आवर्जून डेक्कनच्या पुलाखाली नदीकाठी राहणारे लोक बघायला गेलो. सोबत ‘फुटपाथवासी परिषदे’चा कार्यकर्ता सुरेश पवार होता. एकुलता एक हापसा खडखडत होता. पाणी भरायला गर्दी उसळली होती. मुली हंडे भरून नेत होत्या. प्रत्येक झोपडीच्या समोर उघड्यावर पुरुष आंघोळ करत होते आणि त्या त्यांच्या इवल्याशा जगासमोरून शहराची वाहतूक वेगानं सुरू होती. या संथ जगाचं आणि त्या वेगवान जगाचं काहीच नातं नव्हतं. खालची जागा ओबडधोबड असल्यानं सर्व झोपड्या खाली-वर होत्या. त्यात एका मोडकळलेल्या झोपडीची जागा ही त्या वस्तीची चावडी होती. हळूहळू सगळे आजूबाजूला जमले. तितक्यात त्यांच्यात भांडणं सुरू झाली. कानडीत चाललेली भांडणं मला समजेनात. पुन्हा साधं बोलणंसुद्धा ओरडून. त्यात मारामारीही सुरू झाली. हताशपणे ते बघणं एवढंच हातात होतं. ता वस्तीत छोटू हा समजूतदार तरुण होता. त्याला भेटलो. शांत बसला होता. तो अंध होता. फुग्यात गॅसचा स्फोट झाला आणि त्याचे डोळे गेले. जमिनी विकून पाच लाख रुपये खर्च केले; पण दृष्टी आली नाही. ज्या फुग्यांनी जन्माचं अपंगत्व दिलं तेच फुगे विकावे लागत आहेत. उदरनिर्वाहाचं तेच साधन. यातली अनेक कुटुंबं कर्नाटकातून आलेली आहेत. गावाकडं सगळे जण बहुतेक भूमिहीन. तिकडं शेतीत फार काम मिळत नाही म्हणून ही कुटुंबं पुण्यात आली. इथल्या पुलाखाली राहू लागली. इथं राहिल्यावर सुरवातीला परिसरातल्या नागरिकांनी प्रशासनाकडं तक्रारी केल्या. त्यातून रेशन आणि इतर मानवी सुविधा मिळायला खूप अडचणी आल्या. मध्यमवर्गीय मानसिकतेचं हे विदारक दर्शन...
***

एका कुटुंबात रडारड सुरू होती म्हणून जवळ गेलो. त्या कुटुंबातलं दीड वर्षाचं लहान मूल आईजवळ झोपलेलं असतानाच्या स्थितीत
आदल्या दिवशी मध्यरात्री कुणी तरी उचलून नेलं होतं. धक्काच बसला. सगळ्या वस्तीत तणाव निर्माण झाला होता. डेक्कनसारख्या गजबजलेल्या भागातून एक लहान मूल आईजवळून उचलून नेलं जातं...त्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर वेदना आणि आपल्या लेकरांसंदर्भातली अपार भीती होती. पोलिस स्टेशनला जावं, असं मी सुरेशला सुचवलं. तक्रार नोंदवली गेली. दोन दिवसांनी मी स्वत: बालगंधर्व पोलिस चौकीत गेलो. ‘सायकलवरून चार माणसं जात आहेत मुलाला घेऊन असं सीसीटीव्हीत दिसत आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. आपापसातली काही भांडणं आहेत का, मुलं विकणारी टोळी आहे का या शक्यताही तपासल्या जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘आता मूल सापडू शकेल,’ हे सांगायला पुन्हा मी त्या वस्तीत गेलो तर त्या हरवलेल्या मुलाचे आई-वडील फुगे विकायला निघून गेलेले! मूल हरवल्याचं दु:ख विसरून बिचाऱ्यांनी पुन्हा कामाला जुंपून घेतलं होतं. तिथं मला पुलाच्या जवळ भानुराम काळे नावाचा माणूस भेटला. मी पोलिस स्टेशनाला जाऊन आल्याचं मी त्याला मोठ्या उत्साहानं सांगितलं. तो खिन्न हसला आणि खिशातून पाकीट काढत त्याच्या मुलाचा फोटो काढून दाखवत म्हणाला : ‘‘हा माझा मुलगा गिरी. नऊ वर्षांपासून असाच हरवला की कुणी पळवून नेला माहीत नाही. सगळ्या पोलिस स्टेशनांत जाऊन आलो. अगदी मंत्रालयातही जाऊन आलो; पण नाही सापडलं माझं पोरगं. आज नऊ वर्षं झाली, ते नाही सापडलं तर हे दीड वर्षाचं पोरगं कुठं सापडणार? गरिबाला कुणी नसतं बाबा...’’ भानुरामच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
तो म्हणाला : ‘‘पोरगं मेलं असतं तर किमान मनाला समजून सांगता आलं असतं की आता ते या जगातच नाही; पण मी आजही रोज वाट बघतोय...गिरी कधीतरी येईल व मला भेटेल असं मला अजूनही वाटतं...’’
मला त्याची ती वेडी आशा समजत होती आणि आपण गरीब असल्यानं कुणीच मदत करणार नाही ही त्याची हताशाही कळत होती...पुढं मी काहीच बोललो नाही..
बहुतेक सगळ्यांचा व्यवसाय हा फुगे आणणं, ते फुगवणं आणि संध्याकाळी सिग्नलजवळ विकणं हाच होता. जिथं कुठं लग्न असेल तिथं जाऊन काहीजण फुगे विकत होते. १२० रुपयांच्या बॅगमध्ये ७० फुगे असतात. २३०० रुपयांचं गॅस सिलिंडर असतं. खर्च जाऊन सरासरी ३०० रुपये उरतात. कधी कमीही मिळत असल्याचं एकानं सांगितलं.
काही महिला फुलांचे गजरे विकत होत्या. काहीजण रेडीमेड वस्तू, खेळणी आणून मंदिराबाहेर विकत होते. गणेशोत्सवात, नवरात्रात हे लोक फिरते स्टॉल लावतात.
सकाळच्या वेळचा स्वयंपाक पुलाखालीच चालतो. संध्याकाळी मात्र चार वाजले की सगळ्यांची जाण्याची घाई. रात्री १० पर्यंत सगळे जण वेगवेगळ्या सिग्नलजवळ आणि मंदिरांच्या परिसरात. त्यामुळे रात्री स्वयंपाक नाही. मिळेल ते खायचं व येऊन झोपायचं असा दिनक्रम. मी हे सारं बघायला संध्याकाळी सिग्नलजवळ जाऊन थांबलो. त्या वेगवान वाहतुकीला त्यांची लहान मुलंही सरावलेली होती. सकाळी भरभरून बोलणारी मोठी माणसं माझी नजर आता टाळत होती, तर सकाळी जी लहान मुलं बोलायला बिचकत होती त्यांच्यात आता वेगळंच धैर्य आलं होतं. ती मुलं वस्तू विकत होती, सराईतपणे भीक मागत होती.
दुसऱ्या दिवशी डेक्कन पुलाच्या नदीकाठी पुन्हा गेलो तर काही नवीन कुटुंबं आलेली दिसली. ही कुटुंबं ओडिशातून आली असल्याचं चौकशीअंती कळलं. शेजारून वाहणारं गटारासारखं पाणी, उगवलेलं गवत आणि तिथंच चुली मांडून स्वयंपाक चालला होता. फक्त भाताचे हंडे शिजत होते. पुरुषमंडळी कामाला गेली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या वेगवान वाहतुकीला या आलेल्या आगंतुक पाहुण्यांचं काही सोयर-सुतक नव्हतं. जवळ जाऊन चौकशी केली. भाषेची अडचण होती. थोडंफार बोललो. तिथं मी उभा असताना नदीकाठचे मोठे डास चावायला लागले. मनात आलं की या लहान मुलांना घेऊन रात्री या डासांच्या हल्ल्यात ही माणसं कशी झोपत असतील? कल्पनाच करवेना.
***

मुंबईच्या फुटपाथवर राहणारी माणसं बघायला मुंबईत गेलो. मुंबईत निराधार नागरिकांसाठी ब्रिजेश आर्य हा कार्यकर्ता ‘पहचान’ नावाची संस्था चालवतो. फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना महापालिका आणि पोलिस यांच्यापासून त्रास होतो. त्यापासून गरिबांचा बचाव करणं, या लोकांना हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, शासकीय कागदपत्रं मिळवून देणं अशी अनेक कामं ‘पहचान’चे कार्यकर्ते करतात. वरळी सी फेसजवळच्या फुटपाथवर राहणारे लोक मला पाहायचे होते. त्यासाठी त्यांची एक कार्यकर्त्री सोबत आली. एकीकडं वरळीचे उंच उंच टॉवर उभे आणि दुसरीकडं नव्यानं सुरू झालेला समुद्रावरचा तो झोकदार पूल...आणि त्या सुंदर दृश्याला छेद देणारी फुटपाथवर राहणारी ही गरीब माणसं. त्या सौंदर्याला बाधा पोचत होती! मी गमतीनं तसं म्हणालो तेव्हा सोबतची ती कार्यकर्त्री म्हणाली : ‘‘अहो सर, खरंच या टॉवरमधल्या लोकांनी अशी तक्रार केली होती महापालिकेकडं व पोलिसांकडं. ‘आम्हाला टॉवरमधून समुद्राकडं बघताना हे फुटपाथवरचे लोक दिसतात व कसंतरीच वाटतं, अशी ती तक्रार होती. ही तक्रार केली गेल्यावर वॉर्ड अधिकारी या मंडळींना हाकलायलाही आले होते.’’
मला धक्काच बसला. केवळ डोळ्यांना बघताना त्रास होतो म्हणून समोर गरीब नकोत ही मानसिकता आकलनापलीकडची होती. या असंवेदनशीलतेला काय म्हणावं ते कळेना.
तिथल्या काही कुटुंबांशी बोललो. फुटपाथवर राहणारे लोक हे नुकतेच कोणत्या तरी राज्यातून आलेले असतात व तात्पुरते राहत असतात असा माझा समज; पण ही माणसं फुटपाथ बदलत बदलत ४० वर्षं याच मुंबईत राहत होती. हा मात्र मला धक्काच होता. मंदा जोशी ही महिला कुटुंबासह ४० वर्षं तिथं राहत आहे. मूळ कोकणातली. नवऱ्याचं निधन झालेलं. काही काळ झोपडपट्टीत राहिली. ते घर तोडलं गेलं आणि मुलांसह हे कुटुंब या फुटपाथवर आलं. सुनंदा कांबळे ही आणखी एक महिला. नवरा पोटाच्या विकारानं वारला. झोपडपट्टीत घरासाठी वर्षाला ३६ हजार रुपये मागितले गेले. ते परवडत नसल्यानं फुटपाथवर राहायला आली.
तिथंच एक निराधार वृद्ध राजाराम रणदिवे भेटले. त्यांची बायको वारलेली. मुलं कामाला गेली होती.
त्यांना रेडिओवरची हिंदी गाणी ऐकण्याचा छंद.
त्यांना किती तरी गाणी पाठ होती. समोर वरळीचं उंच श्रीमंत टॉवर आणि फुटपाथवर हे आजोबा रोमँटिक हिंदी गाणी म्हणून दाखवत होते. त्यांच्या आवाजात विलक्षण कातरता होती. इतक्या प्रतिकूल, दुःखी परिस्थितीत आणि वृद्धापकाळात त्यांचं हे कलेवरचं प्रेम हलवून गेलं. शेजारच्या झोपडीत गुजरातची महिला होती.
नुकतीच तिची प्रसूती झाली होती. ते १५ दिवसांचं लेकरू रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या सावलीत ठेवलेल्या पाळण्यात निवांत झोपलेलं होतं. आपल्या वाट्याला किती उजाड आयुष्य आलेलं आहे याची त्या तान्हुल्याला काहीच कल्पना नव्हती हे किती बरं होतं! प्रसूत आई सध्या काय पोषक पदार्थ खाते हे पाहण्यासाठी तिथलं जर्मनचं पातेलं उघडून पाहिलं तर तळाला गेलेली बटाट्याची भाजी दिसली.
नोकरदार महिलांना मिळणारी प्रसूतीसाठीची रजा आणि डिंकाचे लाडू यांची मला उगाचच आठवण झाली. नुकताच झालेला मुंबईतला पाऊस आठवला.
त्या जीवघेण्या पावसात हे लेकरू कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? हे सगळे लोक भिकारी नाहीत तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग करत असतात. ही माणसं ४० वर्षांपासून या शहरात राहतात. शहराची सेवा करतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार?

बेघरांसाठी काम
मुंबईत ब्रिजेश आर्य यांची ‘पहचान’ ही संस्था बेघर लोकांसाठी काम करते. ‘प्रत्येक एक लाख वस्तीसाठी एक निवारागृह उभारावं’ या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ही संस्था लढत आहे व प्रत्यक्ष ५००० बेघर कुटुंबांचे प्रश्न सोडवत आहे. त्यापैकी ३९५० लोकांना संस्थेनं कागदपत्रं मिळवून दिली. ३०० महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला, तसंच या कुटुंबातल्या ८०० मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनवर्ग चालवले जातात. बेघरांसाठी हेल्पलाईन चालवली जाते. आरोग्यविषयक मदत मिळवून दिली जाते. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात किमान ६०० निवारागृहं उभारण्याची गरज असताना आजवर केवळ ७० निवारागृहं
उभारली गेली आहेत. मुंबईत महानगरपालिका नकारात्मक भूमिका घेत असल्यानं केवळ ७ निवारागृहं तयार झाली आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार, मुंबईत ५७ हजार बेघर नागरिक आहेत.
राज्य सरकारच्या समितीत ब्रिजेश यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
-----------------------
पुण्यात ‘संतुलन’ या संस्थेचे बस्तू रेगे यांची ‘फुटपाथवासी परिषद’ या नावाची संघटना सन २००८ पासून ३५० कुटुंबांसंदर्भात काम करत आहे. रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक खातं, मतदारयादीत नाव, कर्ज आदी बाबी त्यांना संस्थेतर्फे मिळवून देण्यात आल्या आहेत.
या कुटुंबीयांच्या मुलांना शाळेतही प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. या कुटुंबीयांना आता स्वस्त रेशनधान्य मिळत आहे. त्यांना घरं मिळावीत म्हणून मंत्रालयाच्या परिसरात दोन वेळा आंदोलनंही करण्यात आली.
न केलेल्या गुन्ह्यांबद्दलही या फुटपाथवासी लोकांकडं यंत्रणेकडून संशयानं पाहिलं जात असल्याचं काही वेळा अनुभवाला येत असल्यामुळे त्यासंदर्भातही संस्थेला लक्ष घालावं लागतं. महानगरपालिकेकडून या लोकांचं सामान उचलून नेण्यात येतं, ते सोडवून आणावं लागतं. या लोकांना सतत आधार द्यावा लागतो.
‘पंतप्रधान घरकुल योजने’त या कुटुंबांना घरं कर्जाऊ रकमेत न देता मोफत मिळावीत म्हणून ही संघटना प्रयत्नशील आहे. रस्त्यावर राहणारी ही माणसं ते कर्ज फेडूच शकणार नाहीत. घरं मिळावीत म्हणून गेली दहा वर्षं संघर्ष सुरू आहे.

आंदोलकांच्या मागण्या...
फुटपाथवर होणारे अपघात, मृत्यू यांची चौकशी व्हावी, प्रत्येक शहरात निवारागृहं उभारण्यात यावीत, फुटपाथवर विक्री करणाऱ्यासाठी लायसन्स देण्यात यावं, सर्व शासकीय कागदपत्रं देण्यात यावीत, योजनेच्या अंमलबजावणीत प्राधान्यक्रम मिळावा, फुटपाथवर राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात यावी अशा विविध मागण्या या फुटपाथवासी लोकांनी आंदोलनांद्वारे केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com