esakal | सर्वार्थानं सक्षम करावं ! (ऋषिकेश जोशी)
sakal

बोलून बातमी शोधा

hrishikesh joshi

पूर्वीच्या काळातलं पालकत्व आणि सध्याच्या काळातलं पालकत्व यांत मूलभूत बदल झालाय. पालकत्व आता अर्थकारण आणि सहवास या दोन गोष्टींपुरतं मर्यादित झालंय. तुमच्या इच्छेनं, अपेक्षेनं मुलांनी वाढणं असा विचार करणं आता चूक आहे. तुम्ही मुलांचे जन्मदाते असलात तरी मुलांकडं ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणूनच बघणं गरजेचं आहे, तरच इथून पुढं गोष्टी सोप्या होऊ शकतील.

सर्वार्थानं सक्षम करावं ! (ऋषिकेश जोशी)

sakal_logo
By
ऋषिकेश जोशी

पूर्वीच्या काळातलं पालकत्व आणि सध्याच्या काळातलं पालकत्व यांत मूलभूत बदल झालाय. पालकत्व आता अर्थकारण आणि सहवास या दोन गोष्टींपुरतं मर्यादित झालंय. तुमच्या इच्छेनं, अपेक्षेनं मुलांनी वाढणं असा विचार करणं आता चूक आहे. तुम्ही मुलांचे जन्मदाते असलात तरी मुलांकडं ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणूनच बघणं गरजेचं आहे, तरच इथून पुढं गोष्टी सोप्या होऊ शकतील.

मी कोल्हापुरात एकत्र कुटुंबात वाढलो. तिथं अजूनही आमचं एकत्र कुटुंब आहे, आमचा जुना वाडा आहे. तिथं वर्षानुवर्षं बिऱ्हाड करून राहणारा शेजार आम्हाला लाभला. त्यामुळं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वच माणसांचा राबता, हे आमच्या घराचं वैशिष्ट्य. ते आजपर्यंत कायम आहे. मी आणि माझी भावंडं माणसं आणि नातेसंबंध याबाबत अतिशय समृद्ध आहोत. कारण पालकत्व याची व्याख्या आमच्यासाठी जन्म दिलेल्या आई-वडिलांपर्यंत इतकी मर्यादित कधीच नव्हती. काका, आत्या, आजूबाजूच्या घरांतील ज्येष्ठ व्यक्ती, हे सारेच मुलांना शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजवायचे. यांच्यापैकी कुणी मुलांना एखादा दणका दिला, तरी पालक काही त्याच्यामध्ये पडायचे नाहीत. आपल्या मुलानं दंगा किंवा आगाऊपणा केला असणार, हे त्यांना माहीत असायचं. त्या वेळी नात्यांमध्ये हा निकोपपणा होता. तरीही मुलांसाठी आई-वडिलांनी ज्या गोष्टी केलेल्या असतात, त्या राहतातच, त्या बदलत नाहीत. माझ्या बालपणी संस्काराच्या व्याख्येत, मुलांना समोर बसवून, समजावून सांगून, चर्चा करून त्याची जाणीव करून देणं, असं काही नव्हतं. कारण, इतका वेळच आमच्या आई-वडिलांना नव्हता. शिवाय, तेव्हा तशी काही पद्धतही नव्हती. एखादी चूक झाली असं लक्षात आल्यावर त्याचा परिणाम म्हणजे, थेट बडवून काढणं असाच होता. त्यामुळं आमच्यात व त्यांच्यात कधी ‘खऱ्या-खोट्याचं’ कोर्ट बसलं आहे, अशी भानगडच नव्हती. आपल्यापर्यंत ही मोहीम आली, म्हणजे आपली काहीतरी चूक झालीए, हे मुलांनी समजून घ्यायचं. थोडक्यात, मारण्यापर्यंत वेळ आली म्हणजे चूक मोठी, यावर आमची आणि त्यांचीही श्रद्धा होती. अर्थात, त्या वेळी आम्हीही काही सरळ नव्हतोच, प्रचंड दंगा असायचा आमचा. त्यावेळच्या पालकांचं वैशिष्ट्य म्हणजे, सांगण्यापेक्षा आपल्या वागणुकीतून कसं वागायचं हे मुलांना कळलं पाहिजे, अशी त्यांची वर्तणूक असायची. त्या वेळी फटकावणं, बदडून काढणं ही समाजमान्य पद्धती होती. आज तसं काही राहिलेलं नाही. बरेचदा मार खाल्ल्यानंतर नेमका कशासाठी मार होता, हे आमचं आम्हालाच जाणून घ्यावं लागायचं आणि ही गोष्ट पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जायची. मला आठवतंय, एकदा शनिवारची शाळा सुटली, मी फुटबॉलची मॅच खेळून घरी गेलो. माझे वडील ज्या शाळेत शिक्षक होते, त्याच शाळेत आम्ही भावंडं शिकलो. घरी गेल्यावर जेवण झाल्यावर वडिलांनी मला मारायचा कार्यक्रम उरकला. मला काही केल्या त्यामागचं कारण कळेना, की हे कशासाठी चाललंय? शेवटी आईनं विचारलं, "काय झालं? काय केलं त्यानं?" तेव्हा वडील एकच वाक्य बोलले, "कुणाबरोबर खेळत होता जरा विचार त्याला!" तेव्हा माझ्या लक्षात आलं, की कुणाची संगत असावी आणि कुणाबरोबर खेळावं याबद्दल त्यांना आक्षेप आहे, खेळण्याबद्दल त्यांना काहीही म्हणायचं नव्हतं.

लहानपणी अभ्यासात मार्क कमी पडले तर..., किंवा परीक्षेत जास्त गुण मिळवण्याचं, अभ्यासाचं अतिरिक्त ओझं आमच्यावर कधीच नव्हतं. त्याच्यासाठी आम्हाला कधीही मार पडलेला नाही. मार्क कमी पडण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न केला आहे का, अभ्यास केला आहे का, हे महत्त्वाचं होतं. ‘वर्तन आणि संस्कार’ या गोष्टींसाठीच आम्हाला कायम मार पडलेला आहे. या गोष्टींकडं जास्त लक्ष दिलं जात होतं. ज्येष्ठांचा आदर केला जातोय ना, हे बघितलं जायचं. समोरची व्यक्ती ज्येष्ठ असेल आणि ती चुकली असेल, तरी आपण पडती बाजू घेणं, तोंड वर करून न बोलणं, शालीनता, प्रामाणिकपणा या मूलभूत मूल्यांसाठीच आम्ही लहानपणी मार खाल्लेला आहे. खेळणं, नाटक करणं या कुठल्याही गोष्टीला विरोध नव्हता. आम्ही शाळा-कॉलेजात असताना बऱ्याच राज्य नाट्यस्पर्धा केल्या आहेत. थोडक्यात, एक चांगला माणूस घडवण्याकडं त्याकाळच्या पालकांचा कल असायचा. त्या सर्व लोकांचं जगण्याचं मूल्य कायम त्यागाकडं असायचं. काही कमी पडू नये, पण प्राप्त परिस्थितीत प्रत्येक प्रसंगाला कसं सामोर जाता आलं पाहिजे, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असायचं.

माझ्या आई-वडिलांकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आनंदी जगणं. कितीही विदारक परिस्थिती येवो, आनंदी जगता आलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण माझी आई आहे. घरात काहीही झालेलं असो, कितीही अडचणीची परिस्थिती असो, अशावेळी घरात कोणी अचानक आलं, तर आई त्यांना कायम हसतच सामोरं जाई. ज्या प्रसन्नतेनं आई आल्या व्यक्तीचं स्वागत करायची, त्यावरून समोरच्याला आत काय सुरू होतं, याची जरासुद्धा कल्पना यायची नाही. भावनांवरचा तिचा ताबा कमालीचा होता. भले त्यासाठी तिला अभिनय करावा लागत असेल; पण तिला हे जमायचं. घरातील तणावाची परिस्थिती तिनं कधीही बाहेरच्यांना कळू दिली नाही.

मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यानंतर अडचणींचे अनंत डोंगर होते. माझ्याविषयी तिला जास्त काळजी वाटायची. कारण या क्षेत्रात मी कसा तग धरणार, पुढं कसं होणार, असं तिला सतत वाटत असायचं. मात्र अडचणी येणारच आहेत; पण अडचणींसमोर शरण जाऊन उगाचंच मला ‘पँपरिंग’ कधी केलं गेलं नाही. पँपरिंग हा शब्दच मला खूप उशिरा कळला. कितीही अडचणीची परिस्थिती असली, तरी त्याला सामोरं जाऊन आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे आणि ते उभं राहताना हसतमुखानं परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे, ही आई-वडिलांची शुद्ध शिकवण होती. माझ्या वडिलांचा तर बोलण्यापेक्षा वागून दाखवण्याकडं, जगून दाखवण्याकडंच पूर्ण कल होता. 'तुम्हाला माझ्या वागण्याचा अर्थ वेळ आल्यावर समजेल,' ही त्यांची भूमिका असल्यामुळं त्यांच्या वागण्यातून झालेलं शिक्षण, संस्कार हे अतिशय भक्कम झालं. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा ते सांभाळत होते, त्यामुळं परिस्थिती नाजूकच होती; पण गरिबीत जगतोय हा मुद्दा भावनात्मकदृष्ट्या कधीही नव्हता. परिस्थिती बेताचीच होती; पण आमच्या भावनांचा कोंडमारा त्यांनी कधी होऊ दिला नाही. असंच असतं आयुष्य, आणखी काय वेगळं असतं, हे त्यांनी नकळतपणे दाखवलं. त्यामुळं दुसऱ्या कुटुंबाशी अर्थकारणावरून, परिस्थितीवरून केली जाणारी तुलना आमच्या कानावर कधीही आली नाही.

त्यांच्याकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे, अपार मेहनत आणि कष्टाची तयारी! कारण, कष्टाला पुढं काही आव्हानच नसतं, अशी ही गोष्ट आहे. कष्टानं सगळं मिळतं. अपार मेहनत करावी; पण ती लीनता आणि शालीनतेनं, उर्मटपणानं नाही. त्यामुळे यश कसं पचवायचं हे शिकलो. आई-वडिलांकडून शिकलेल्या अशा हजारो गोष्टी सांगता येतील. म्हणूनच त्याअर्थानं आमचं बालपण अतिशय समृद्ध होतं. वयानुसार पालकत्वाच्या व्याख्या बदलत जातात. आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो, तेव्हा कधी वडिलांनी आमच्या अंगाला हात लावला नाही. माणूस म्हणून एका वयानंतर पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नातं बनवायचं असतं, हेदेखील त्यांनी केलं. ते करताना, 'आजपासून आपण मैत्री करू,' असं सांगून काही नव्हतं, तर त्यांच्या वागणुकीतून त्यांनी ते दाखवलं. मी तरुण वयात असताना वडिलांनी कधी आमच्या आयुष्यात अनाठायी हस्तक्षेप केला नाही. आमचे मित्रमैत्रिणी घरी येत होते, आईदेखील त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांचं खाणंपिणं व्हायचं; पण त्यात अवास्तव दखल कधी नसायची. आमची लग्नं झाल्यावरही अतिरिक्त हस्तक्षेप नाही, निर्णय लादणं नाही. त्यांच्याशी चर्चा व्हायच्या, ते त्यांच्या इच्छाही सांगत. आम्ही काही वेळा त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णयदेखील घेतले आहेत; पण त्याचा त्यांनी राग धरून ठेवला आहे, असं कधी झालं नाही. ‘ तुला पटलंय आणि तू समाधानी आहेस ना, मग बस!’ अशी त्यांची भूमिका असायची. जगण्याच्या पातळीवरच्या अशा कुठल्याही गोष्टी राहिल्या नाहीत, ज्या मी आतापर्यंत माझ्या आई-वडिलांशी बोलू शकलेलो नाही. गेल्याच वर्षी माझी आई गेली... तिच्याशी नेहमी तास-तासभर मैत्रिणीप्रमाणं गप्पा व्हायच्या, हसणं-खिदळणं व्हायचं. वयानुसार बदलणारं हे नातं त्यांना माहीत होतं. मुलांच्या मनात आता काय सुरू आहे हे जाणून, आवश्यक तेवढंच मार्गदर्शन करायचं, तेही मार्गदर्शन म्हणून नव्हतं तर मैत्री म्हणून होतं. अशाप्रकारे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःची भूमिका बदलून आई- वडिलांनी मार्गदर्शन केलं, गरज पडली तेव्हा ते आमचे उत्तम मित्रही बनले.

मी वडील झाल्यानंतर त्यांच्या आणि माझ्या पालकत्वात मला आमूलाग्र फरक जाणवतो. माझा मुलगा शार्दूल आता नववीत आहे. तो लहान असताना आणि आतासुद्धा त्याचे फिजिकली जेवढे लाड झाले, तेवढे आमचे कधीच झाले नाहीत. एकत्र कुटुंबातून मुंबईत एकदम एकल कुटुंबात आल्यामुळं; तसंच शहराची, काळाची गरज म्हणून जास्त लाड झाले असावेत. कारण कोल्हापुरात आई-वडील घरी नाहीत, मग त्यांच्या माघारी मुलांकडं कोण बघेल, अशा गोष्टींचं कधी मुळी नियोजनच करावं लगलं नाही. पण, आता इथं संपूर्ण लक्ष मुलावरच केंद्रित असतं, त्यामुळं अपेक्षित असलेले लाड, मस्ती या गोष्टी होतात आणि त्या अत्यंत आनंददायी आहेत. शार्दूल पाच वर्षांचा असताना आणि मी पाच वर्षांचा असताना, आमच्या जाणिवांमधला, अधिकारांमधला आणि 'स्व'च्या जाणिवेचा आमूलाग्र फरक मला दिसून येतो. या गोष्टी आजच्या पिढीत ठळकपणे दिसून येतात. शार्दूलला जर एखादा फटका दिला, तर तो का दिला, याचं न्यायसंगत उत्तर त्याला अपेक्षित असतं. शिवाय, आता सरसकटपणे पालक मुलांवर हात उगारू शकत नाहीत. माझ्या वडिलांना माझ्याशी मैत्री व्हायला इतकी वर्षं लागली; पण माझ्या मुलाची माझ्याकडून मैत्रीची अपेक्षा ही सुरुवातीपासूनच आहे. बरेचदा माझ्या पालकांचे माझ्यावरचे संस्कार नकळतपणे त्याच्यावर प्रतिबिंबित होतात; पण ते जसेच्या तसे प्रतिबिंबित होऊ नयेत, यासाठी माझी पत्नी वैशाली सतत दक्ष असते. कारण काळ खूप बदलला आहे. पूर्वी मुलांशी संवाद हा प्रकार नव्हता, तो आता सगळ्यात जास्त आहे. आता सगळंच बदललं आहे. माझ्या सुदैवानं मी ‘प्रि टीव्ही एरा आणि पोस्ट टीव्ही एरा,’ तसंच ‘प्रि मोबाईल एरा आणि पोस्ट मोबाईल एरा’ अशा दोन काळांत जगलो आहे. त्यामुळं त्याचे सगळे फायदे-तोटे अनुभवले आहेत. तंत्रज्ञान नव्हतंच, त्यामुळं आमचं आधीचं आयुष्य पूर्ण वेगळं होतं. आताची पिढी या सगळ्या गोष्टींबरोबरच जन्माला आलेली आहे. त्यामुळं त्यांचं आयुष्य खूपच वेगळं आहे.

आमचं एकल कुटुंब असल्यानं आधी मी व वैशाली दोघं कामाला बाहेर जायचो; पण शार्दूलच्या जन्मानंतर वैशालीनं त्याच्याकडं लक्ष देणं याला प्राधान्य दिलं. नंतर माझं काम खूप वाढत गेलं, त्यामुळं शार्दूलच्या लहानपणी मला त्याला जितका वेळ देता येत होता, तितका पुढं देता येणं शक्य नाही झालं, याची मला खंत वाटते. शार्दूलच्या संगोपनाचं जास्त श्रेय नक्कीच वैशालीला जातं.

आताच्या काळात तंत्रज्ञानापासून, गॅजेट्सपासून मुलांना दूर ठेवणं अशक्य आहे; पण त्यावर नियंत्रण ठेवलं जातं. काय बघायचं आणि काय नाही बघायचं, याकडं लक्ष ठेवलं जातं. शार्दूलचा कल कुठं आहे, त्याला काय आवडतं आहे, हे आम्ही सतत बघत असतो. त्याला चित्रकला अतिशय आवडते, त्यामुळं त्याच्याशी संबधित व्हिडीओ बघणं त्याला आवडतं. त्याला आताच, म्हणजे महिनाभरापूर्वीच मोबाईल घेऊन दिला आहे, तेही सध्या ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत, त्यासाठी घेतला. खरं तर ऑनलाइन शाळेच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. समजा, एक वर्ष गेलं असंच, संकटाचा काळ म्हणून, तर काय फरक पडणार आहे? शिक्षण संस्थांचं अर्थकारण टिकवण्यासाठी सर्व समाजाला वेठीस धरलेलं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. ऐंशी टक्के पालकांचं म्हणणं आहे, की शाळा नाही सुरू झाल्या तरी चालेल. पासष्ट टक्के जनता गरीब आहे, गावांत-खेडोपाडी राहते, त्यांनी कुठून आणायचं डिव्हाइस आणि इंटरनेट? शिवाय, मुलं शाळेत फक्त बौद्धिक धडे शिकायला थोडीच जातात. मित्र, खेळ, कला... अशा खूप गोष्टी शाळेत असतात. घरापेक्षा वेगळं असणारं वातावरण त्यांना हवं असतं. पण, आता तर मुलांना खुराड्यातच बसवल्यासारखं केलं आहे. त्यामुळं नाइलाजानं आम्हीसुद्धा त्याच्यासाठी मोबाईल घेऊन दिला.

पूर्वी एखादी गोष्ट पालकांना विचारायला खूप भीती वाटायची; पण आता मात्र मुलं थेटपणे पालकांना काहीही विचारू शकतात. छोटं उदाहरण सांगतो, शार्दूल मला 'अहो बाबा' म्हणायचा आणि वैशालीलाही 'अहो आई' असं म्हणायचा. त्याचं आनेकांना हसू यायचं; पण त्याच्या डोक्यात होतं, की मी बाबांना 'अहो' म्हणतो तर आईला का नाही म्हणायचं? काही दिवसांनी तो वैशालीला 'ए आई' म्हणू लागल्यानंतर मला म्हणाला, ''बाबा मला काही तुला 'अहो' म्हणणं जमणार नाही, मी तुला 'अरे बाबा'च म्हणणार!" मीही म्हटलं हरकत नाही. त्याचं लॉजिक बरोबर होतं. अशाप्रकारचं लॉजिक डेव्हलप होऊ देणं; मोकळेपणानं बौद्धिक, भावनिक आणि मानसिक वाढ होऊ देणं पालक म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. भावनिक आणि मानसिक वाढीसाठी माझ्यापेक्षा वैशालीनं जास्त कष्ट घेतले आहेत. कुठलीही गोष्ट करताना शार्दूलला आनंद वाटतो आहे ना, हे आम्ही बघितलं. कारण, आनंद न वाटणारी गोष्ट नाही केली तरी फार फरक पडत नाही; पण त्याच वेळी आनंद वाटणाऱ्या गोष्टीसाठी शक्य तितके कष्ट घ्यावेत, असं आमचं म्हणणं असतं. शेवटी मुलांना नेमकं काय आवडतं, याची चाचपणी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी देऊनच करावी लागते. शार्दूल मल्लखांब खेळतो; पण मध्येच क्रिकेट खेळू लागला. आता एखादी कविता घेऊन तिला चाल लावणं, म्हणणं हे सुरू आहे. पण चित्रकला, क्राफ्ट या गोष्टी त्याच्यात जन्मजात आहेत. थोडक्यात, त्याचा कलेकडं जास्त ओढा आहे, असं आम्हाला दिसत आहे. आमच्याकडून, तू अमुक गोष्ट कर, असा हट्ट वा आग्रह कधीच नसतो; पण काही गोष्टींसाठी माझा विरोध नक्कीच असतो, कारण शार्दूलला वस्तूची 'प्राइज' माहीत असते; पण 'व्हॅल्यू' कळत नाही. जसं की, अडीचशे रुपयांचं तिकीट काढून चित्रपट बघायला गेल्यानंतर चारशे रुपयांचं पॉपकॉर्न घेणं मला अजिबात पटत नाही, यावर माझा मस्तकशूळ उठतो. त्याऐवजी आपण तेवढ्याच पैशांत पोतंभर तशाच लाह्या आणू, असं मी सांगितल्यावर त्याला ते पटलं, की हे गरज नसलेलं आहे. हळूहळू त्याला अशा गोष्टींची जाणीव होऊ लागली.

शार्दूलला चित्रकलेची आवड लहानपणापासून आहे; पण ही आवड जोपासण्यासाठी त्याला मुद्दाम कुठल्या क्लासला घातलं नाही. हा निर्णय वैशालीचा असला, तरी त्याला माझा पूर्ण दुजोरा होता. त्याला जे येतंय ते व्यक्त होऊ द्यावं, हीच आमची भूमिका होती. कारण, व्यक्त होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो, शिकणं हे नंतर येतं, त्या शिकण्यामध्ये आपण मुलांना खूप मर्यादा घालून देतो. त्यांना त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होऊ दिलं पाहिजे. मुलांना जगण्याची जाणीव करून देणं जास्त महत्त्वाचं आहे. परीक्षेचे मार्क्स वगैरे गोष्टी मुलं त्यांच्या समजुतीनं आणि कुवतीनं करतात. मुलांना शिक्षण आवश्यक आहेच, ते दिलंच पाहिजे; पण शिक्षणापेक्षा स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची कुवत वाढवणं, हे पालकांनी केलं पाहिजे. आज मुलांसमोर इतकं विशाल जग आहे, की आपण मुलांना काही शिकवण्यापेक्षा, सभोवतालच्या या विशाल जगातून काय निवड करायची, यासाठी मदत करणं, एवढंच आपण करू शकतो. थोडक्यात, पालक म्हणून समुपदेशन करू शकतो, काही शिकवायला नाही जाऊ शकत. कारण, मुलांची विचार करण्याची पद्धत अगदी तर्कशुद्ध असते, ती मारणं योग्य नाही. त्यांनी विचारलेले प्रश्न दडपण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत, मुलांना त्याची अपेक्षा जास्त असते. हल्ली मुलांशी खूप लवकर मैत्रीपूर्ण वागावं लागतं. आपल्याला कल्पना येणार नाही; पण मुलं खूप पुढचा विचार करतात. त्यामुळं त्यांना आवश्यक त्या गोष्टी पुरवणं, त्याची जाणीव करून देणं, दिशा दाखवणं एवढंच पालकांनी करावं. तुम्ही उगाच त्यांच्या मनाविरुद्ध काही करायला जाल, तर त्याचे वाट्टेल ते परिणाम भोगावे लागू शकतात. शार्दूल पुढं जाऊन काय करणार आहे, हा प्रश्न माझ्या मनाला कधी पडत नाही. तो आज आनंदी आहे आणि पुढं त्याला जे वाटेल, ते तो करू शकेल, असंच मला वाटतं.

वैशाली नॅशनल रोप मल्लखांबाची चॅम्पियन असल्यामुळं तिनं शार्दूलला व्यायामाची चांगली सवय लावली, तो उत्तम मल्लखांब खेळतो. आता त्याला शरीरसंपदा कमावण्याची आवड लागली आहे. लॉकडाउनमध्ये तो मला म्हणाला, "बाबा कोरोनावर काही लस व औषध नाही, म्हणून तुमची प्रतिकारशक्ती उत्तम असली पाहिजे, त्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. तेव्हा तुम्हीपण व्यायाम करत जा." तो स्वतः दोन-दोन तास व्यायाम करतो. मुलांना त्यांची जबाबदारी समजली, की वेळेचं महत्त्व आपोआप कळतं. लहान असताना मुंबईसारख्या ठिकाणी शार्दूलला एकटं घरी सोडून जाणं शक्य नसायचं, तेव्हा त्याची इच्छा नसतानाही आमच्याबरोबर नेणं हाच पर्याय असायचा. आता तोच म्हणतो, मी एकटा लोकलनं जातो; पण आमची हिंमत होत नाही. जवळच्या मित्रांकडं वगैरे रिक्षानं मात्र एकटा जातो. मुलांची मानसिक गरज म्हणून त्यांना मित्रांकडं पाठवणं, मित्रांना घरी बोलवणं हे गरजेचं असतं. मुलांना सर्वार्थानं सक्षम करणं हे महत्त्वाचं असतं. पुढं जाऊन तो काय करेल, याचा विचार आम्ही फार करत नाही. कारण, त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी होत असतात. उगाच त्याचं ओझं आता घेऊन त्याला त्यानुसार वागवत बसायचं, हे पटत नाही.

शार्दूल मला बऱ्याच गोष्टी शिकवतो. राग आल्यानंतर तो सोडून, तो योग्य दिशेला वळवून, परत सामान्य पातळीवर येणं, हे शार्दूलला जमलेलं आहे. मला ते करण्यासाठी वेळ लागतो; पण ती गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो आहे. शाळेत शिक्षकांनी सांगितलेले, सध्या आवश्यक असणारे सामाजिक नियम पाळण्यात तो काटेकोर आहे. मोबाईल इथं सायलेंटवर करा, फोनवर आता बोलू नका, यांसारख्या गोष्टी तो मला सांगतो. घरात भलेही तो तितकासा जबाबदारीनं वागत नसेल; पण बाहेर गेल्यावर मात्र त्याचं बोलणं, वागणं, बसणं, उठणं सगळंच बदलतं; अतिशय जबाबदारीनं वागतो.

मी 'गर्वनिर्वाण' नावाचं नाटक बसवलं होतं. भक्त प्रल्हादाची ती गोष्ट होती. शार्दूल त्या वेळी चौथी-पाचवीत असेल. त्यानं नंतर सोसायटीतल्या मित्रांना एकत्र करून, पंधरा-वीस दिवस तालमी करून, मला कशाचाही थांगपत्ता लागू न देता, माझ्या वाढदिवशी स्वतः बसवलेल्या 'गर्वनिर्वाण'चा प्रयोग मला दाखवला. यासाठी वैशालीनंही जबाबदारी घेऊन नेपथ्य, प्रकाश योजना या गोष्टींसाठी त्याला मदत केली. तो प्रयोग अनेक भाषांतला होता. कारण सोसायटीत विविध भाषक मुलं होती, ती आपआपल्या भाषेत संवाद बोलत होती. शार्दूलनं दिलेली ही भेट मी कधीच विसरू शकत नाही. अलीकडं माझ्या व्यग्रतेमुळं शार्दूलला वेळ देऊ शकत नाही; पण पूर्वी मी तो देत होतो. मी वेळ न देऊ शकल्यानं अनेकदा त्याचा विरसही झाला आहे; पण या सुट्ट्यांमध्ये त्याची भरपाई करण्याचा माझा मानस आहे. पूर्वीच्या काळी मुलांचं शिक्षण, नोकरी, लग्न होईपर्यंत ती पालकांवर अवलंबून असायची. आता तसं राहिलं नाही. आता ती गरज अर्थकारण आणि सहवास या दोन गोष्टींपुरती अपेक्षित राहिलेली आहे. तुमच्या इच्छेनं, अपेक्षेनं मुलांनी वाढणं, असा विचार करणं आता चूक आहे. तुम्ही मुलांचे जन्मदाते असलात तरी 'स्वतंत्र व्यक्ती' म्हणूनच आपल्या अपत्याकडं बघणं गरजेचं आहे, तरच इथून पुढं गोष्टी सोप्या होऊ शकतात.
( शब्दांकन : मोना भावसार )