विक्रमवीर संगीतकार आणि सिंफनीवादकही ! (जयंत टिळक)

jayant tilak
jayant tilak

हजारो अविस्मरणीय गाणी कर्णमधुर सुरावटींमध्ये गुंफणारे, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या संगीतकारांची एक जोडी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीपैकी गेली सात दशकं संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्यारेलाल शर्मा यांनी नुकतीच (३ सप्टेंबर) वयाची ८० वर्षं पूर्ण केली त्यांच्या सुरेल कारकिर्दीचा वेध...

गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे हिंदी चित्रपट संगीतामधलं एक हिट कॉम्बिनेशन. या जोडीनं ३०० चित्रपटांतून तब्बल पंधराशे गाणी हिंदी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत. हिंदी चित्रपटांसाठी सर्वाधिक ६ हजार ३०० गाणी लिहिण्याचा विक्रम आनंद बक्षी यांच्या नावावर आहे, तर सर्वाधिक म्हणजे ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत देण्याची कामगिरी लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीनं केली आहे. त्यांचे समकालीन असलेल्या अन्य संगीतकारांच्या (रोशन - ५० चित्रपट, रवी - ७२, मदन मोहन - ९४, ओ. पी. नय्यर - ७३, कल्याणजी-आनंदजी - २००, शंकर-जयकिशन - १७९, आर. डी. बर्मन - ३३१) कामगिरीवर नजर टाकली, तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा कामाचा झपाटा सहज लक्षात येईल.

आज ४० ते ७० या वयोगटात असलेली पिढी खरोखर भाग्यवान म्हटली पाहिजे, कारण या पिढीनं लता, आशा, रफी, किशोर, तलत, मुकेश, महेंद्र कपूर, मन्ना डे, हेमंतकुमार, गीता दत्त, सुमन कल्याणपूर यांसारख्या गायक-गायिकांच्या गाण्यांचा आनंद लुटला. नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, रवी, रोशन, शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, खैयाम, कल्याणजी-आनंदजी, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकारांनी ही सुश्राव्य गाणी निर्माण केली. ही गाणी ऐकतच ही पिढी लहानाची मोठी झाली आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ही गाणीच त्यांच्या मर्मबंधातली ठेव आहे. मुंबई, ठाण्या-पुण्यातच नाही, तर देशभरात वाद्यवृंदांचे जे कार्यक्रम होतात, त्यांत जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये या ‘गोल्डन इरा’मधल्या हिंदी गाण्यांचाच समावेश असतो.

या संगीतकार जोडीनं ३५ वर्षांत ६३५ (म्हणजेच एका वर्षात सरासरी १८ चित्रपट) या विक्रमी संख्येनं हिंदी चित्रपटांना संगीत देण्याची कामगिरी केली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीमधल्या प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटांना संगीत देण्यात बिलकूल रस नव्हता. वयाच्या आठव्या वर्षीच हातात व्हायोलिन धरलेल्या प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांचं ध्येय होतं ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्ये सिंफनीसम्राट यहूदी मेन्यूहीन यांच्याकडून वेस्टर्न क्लासिकल सिंफनीचे धडे घ्यायचे आणि सिंफनीकार म्हणून नावलौकिक मिळवायचा. गंमत म्हणजे, त्यांनी पुढं तेही साध्य केलं, फक्त घटनाक्रम बदलला इतकंच.. म्हणजे आधी त्यांनी लक्ष्मीकांतजींच्या साथीनं यशस्वी संगीतकार म्हणून नावलौकिक मिळविला आणि नंतर खूप उशिरा सिंफनीकार म्हणून. दुर्दैवानं भारतीयांना प्यारेलाल यांची सिंफनीकार म्हणून फारशी ओळख नाही.

प्यारेलाल यांचे वडील पं. रामप्रसाद हे त्यांचे पहिले गुरू. ते नौशाद यांच्याकडं व्हायोलिन वाजवत. आठव्या वर्षीच वडिलांनी त्यांना व्हायोलिनचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढं त्यांना रणजित स्टुडिओत व्हायोलिन वादक म्हणून नोकरी मिळाली. त्याकाळी चित्रपटसृष्टीत २५-३० वादकांचा एक ग्रुप होता, जो सगळ्या संगीतकारांकडं वाजवत असे. या ग्रुपमध्ये प्यारेलालजींचा समावेश झाला. मेंडोलिन वाजविणार्‍या लक्ष्मीकांत यांच्याशी त्यांची दोस्ती तिथंच झाली. प्यारेलालजींचं वादन ऐकून बॉम्बे सिंफनी ऑर्केस्ट्रामध्ये वाजविणार्‍या अँथनी गोन्साल्वेज यांनी प्यारेलाल यांना तिथं बोलावून घेतलं. गोन्साल्वेज यांच्याकडं प्यारेलालजींना बरंच शिकायला मिळालं.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी प्यारेलालजींनी खैयाम यांचं संगीत असलेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटासाठी संगीत संयोजन केलं. या काळातला त्यांचा दिनक्रम पाहिला, तर थक्क व्हायला होतं. सकाळी लवकर उठून ते कीर्ती कॉलेजजवळच्या त्यांच्या निवासस्थानापासून कुलाब्याला गोन्साल्वेज यांच्याकडं व्हायोलिन शिकायला जात. साडेआठ वाजता ते बॉम्बे सिंफनी ऑर्केस्ट्रामध्ये येत. तिथलं काम आटोपून ते ११ वाजता रणजित स्टुडिओत आपल्या नोकरीवर हजर होत. तिथं पाच वाजेपर्यंत काम केल्यानंतर घरी येऊन सात ते दहा या वेळेत वांद्रे इथल्या सेंट मायकेल नाइट स्कूलमध्ये जाऊन शालेय शिक्षण घेत. रात्री १० वाजता चालत दादरला घरी येत. बोटात नुसती कला असून उपयोग नाही, सिंफनी शिकायला व्हिएन्नाला जायचं तर जवळ पैसेही हवेत आणि उत्तम इंग्लिश बोलता यायला हवं, याची त्यांना जाण होती.

प्यारेलालजींच्या ‘व्हिएन्ना स्वप्ना’ला खीळ घातली ती अत्यंत व्यवहारी असणारे त्यांचे जिवलग मित्र लक्ष्मीकांत यांनी. दादर-शिवाजी पार्कला जिथं ’जिप्सी’ हॉटेल आहे, तिथं पूर्वी शेटे रेस्टॉरंट होतं. एक दिवस लक्ष्मीकांतजी प्यारेलालजींना घेऊन ‘शेटे’मध्ये गेले आणि प्यारेलालजींना या स्वप्नापासून परावृत्त केलं. लक्ष्मीकांतजींचं म्हणणं होतं, ‘वेस्टर्न क्लासिकल सिंफनी शिकण्यासाठी परदेशात जाऊन आणि ७-८ वर्षं घालवून तू काय मोठं मिळविणार आहेस? आज इथंच आपल्याला खूप काम आहे. आपण जोडीनं संगीतकार म्हणून काम करू आणि नावलौकिक कमावू!’ प्यारेलालजींना ते पटलं आणि पुढचा इतिहास सर्वज्ञातच आहे.

त्यांनी जोडीनं संगीत दिलेल्या ‘पारसमणी’ या पहिल्याच चित्रपटातली 'रोशन तुम्हीसे दुनिया..', ‘वो जब याद आये..', 'मेरे दिलमें हलकीसी..' आणि 'हसता हुआ नूरानी चेहरा..' अशी सर्वच गाणी गाजली. त्यांच्या ‘दोस्ती’ या दुसर्‍याच चित्रपटाला तर (शंकर-जयकिशन यांचं संगीत असलेल्या ‘संगम’ आणि मदन मोहन यांचं संगीत असलेल्या ‘वह कौन थी’ची तगडी स्पर्धा असून) सन १९६४ चा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. पुढं त्यांनी मीलन (१९६८), जीने की राह (१९७०), अमर अकबर अँथनी (१९७८), सत्यम शिवम सुंदरम (१९७९), सरगम (१९८०) आणि कर्ज (१९८१) या चित्रपटांच्या संगीतासाठीही ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळवला.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीनं देशात इतकं नाव मिळवलं, की हे एकाच व्यक्तीचं नाव असणार, असाच अनेकांचा समज होता. याबाबतचा किस्सा प्यारेलालजींशीच बोलताना कळला. इतरांचा गैरसमज कशाला, खुद्द प्यारेलालजींच्या पत्नीचाही. त्यांचं लग्न ठरलं तेव्हा ‘कुणाशी लग्न ठरलंय?’ या प्रश्नावर त्या ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी’ असंच गमतीदार उत्तर देत. मला कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल असं वाटून त्यांनी पत्नीलाच हॉलमध्ये बोलावून विचारलं, "तुम्हारी शादी किससे हुई जरा इन्हे बताओ..." भाभीजी त्वरित उद्गारल्या, ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी!’ भाभीजी हुबळी-धारवाडच्या आहेत आणि अर्थातच उत्तम मराठी बोलतात. आणखी एक अविश्वसनीय बाब त्यांनी भाभीजींकडून वदवून घेतली. "जरा इन्हे बताओ, की तुम्हारे फेव्हरिट संगीतकार कौन है?" भाभीजी क्षणाचाही विलंब न करता उत्तर देत्या झाल्या... ‘शंकर-जयकिशन!’ यावर तोंडाचा 'आ' वासणंच मला क्रमप्राप्त होतं.

लतादीदी आणि राज कपूर यांच्याशी त्यांचे विशेष स्नेहसंबंध होते. राज कपूर यांना लहर आली, की ते रात्री एक वाजतासुद्धा प्यारेलालजींचं दार ठोठावत असत. "राज कपूर यांना संगीताची उत्तम जाण होती आणि अनेक गाण्यांचे मुखडे तयार करून, ते घेऊनच ते स्टुडिओत येत असत. संगीतकारांना सूचना करायचे असं वाचलंय, तुमचा काय अनुभव?" मी प्यारेलालजींना विचारलं.
"हो बरोबर! राजजी ‘बॉबी’च्या वेळी अशाच काही गाण्यांचे मुखडे घेऊन आमच्याकडं आले होते; पण लक्ष्मीकांतनं त्यांना निक्षून सांगितलं, 'आम्हाला आमचं काम स्वतंत्रपणे करायला आवडेल, आम्ही तुमच्या मुखड्यांचा उपयोग नाही करणार!’ राजजींनी ते मान्य केलं आणि नंतर काही प्रश्न उद्भवला नाही."
‘बॉबी’च्या संगीतासाठी राज कपूर शंकर-जयकिशन यांच्याऐवजी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विचार करत आहेत अशी बातमी या दोघांच्या कानावर आली, तेव्हा ते फार हुरळून गेले नाहीत. कारण ते ज्या शंकर-जयकिशन यांना आदर्श मानत, त्यांचं काम हिरावून घेणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. पण, आपण नाकारलं तर तेच काम दुसरं कुणी तरी करतील, मग आपणच केलेलं काय वाईट, या विचारानं त्यांनी ‘बॉबी’ स्वीकारला.

"तुम्ही राज कपूर यांच्यासाठी ‘बॉबी’, 'प्रेमरोग', 'सत्यम शिवम सुंदरम' असे तीन संगीतमय हिट चित्रपट केलेत, तरीही ‘राम तेरी गंगा मैली’साठी त्यांनी तुमच्याऐवजी रवींद्र जैन यांचं संगीत का वापरलं?" असं विचारल्यावर ते म्हणाले, "मगाशी म्हटलं तसं राजजी लहर लागली, की उठून गाडी काढून रात्री-अपरात्री घरी येत. एकदा असंच ते लक्ष्मीकांतच्या घरी गेले, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. त्या वेळी त्यांच्यासाठी ‘पारसमणी’चं (लक्ष्मीकांतजींचं निवासस्थान) दार उघडलं गेलं नाही, हा राजजींना अपमान वाटला आणि त्यामुळं त्यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ आम्हाला दिला नाही."
"प्यारेलालजी, तुम्हा जुन्या संगीतकारांचे अनेक फोटो मी पाहिले आहेत, ज्यांत तुम्ही सगळी ज्येष्ठ संगीतकार मंडळी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून मस्त गप्पागोष्टी करता आहात. प्रत्यक्षात तुमच्यामध्ये एवढे सौहार्द / मैत्रीपूर्ण संबंध होते का?" माझा प्रश्न.

प्रश्नातला रोख लक्षात घेऊन ते उत्तरले, "सौहार्द होतं आणि नव्हतंही. उदाहरणार्थ, शंकर तोंडावर आमचं खूप कौतुक करायचा, आमच्या मागे मात्र आमची ‘लल्लू-पंजू’ अशी संभावना करायचा. राजजी शंकर-जयकिशन जोडीला ‘गेंडे’, तर जयकिशनला छैलाबाबू म्हणायचे."
"आणि तुम्हाला?"
"माझा ते ‘गुणीजन’ या संबोधनानं गौरव करीत. सी. रामचंद्र यांच्या बंगल्यावर ‘संध्याकाळ’चं सर्वांना आमंत्रण असे. तिथं मदन मोहन, रोशन इ. मंडळी जमत. आम्हाला ‘दोस्ती’साठी फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आम्ही दोघंही रात्री उशिरापर्यंत काम करून स्टुडिओतच झोपलो होतो. भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे आणि मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाचे सी. रामचंद्र सकाळी स्टुडिओत आले तेच मुळी ओरडत.. ‘अरे गाढवांनो झोपता काय, उठा.. तुम्हाला फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झालाय!’"
प्यारेलालजी वेळोवेळी वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अशा तीन भूमिका एकाच वेळी पार पाडत. एकदा त्यांनी सकाळी ‘लुटेरा’ या त्यांचंच संगीत असलेल्या चित्रपटाचं गाणं रेकॉर्ड केलं, दुपारी ते रवीजींच्या रेकॉर्डिंगमध्ये व्हायोलिनिस्ट म्हणून सहभागी झाले आणि संध्याकाळी त्यांनी कल्याणजी-आनंदजी यांच्या रेकॉर्डिंगमध्ये संगीत संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली. कल्याणजी-आनंदजी यांच्याव्यतिरिक्त खैयाम, रवी, एस.डी. व आर.डी. बर्मन यांच्याकडंही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केलं आहे.

मराठी माणसांच्या अत्यंत आवडत्या अशा दोन अप्रतिम मराठी भावगीतांची संगीत रचना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी केली आहे. भा. रा. तांबे यांनी लिहिलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ‘कशी काळनागिणी..’ आणि ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या..’ ही ती अवीट गोडीची गीतं. विशेष म्हणजे, गाण्यात संतूरचे जे सुंदर पीसेस ऐकू येतात, ती पं. शिवकुमार शर्मा या ज्येष्ठ-श्रेष्ठ वादकाची कमाल आहे.
एकूणच, लोकांच्या विशेष आवडीची जी गाणी आहेत, त्यातले वैशिष्ट्यपूर्ण म्युझिकचे पीसेस कुणी वाजविले असतील, हे जाणून घेण्याची रसिकांना स्वाभाविक उत्सुकता असते. माझीही होतीच, मग मी त्यांच्या काही गाण्यांबाबतचं कुतूहल शमवून घेतलं. त्यांनी संगीत संयोजन केलेल्या ‘मै तो इक ख्वाब हूँ..’ (हिमालय की गोद में) या गाण्यात गाण्याआधीच्या म्युझिकमधला फ्रेंच हॉर्न मोराइस यानं वाजविला आहे, तर ‘सट्टा बाजार’मधल्या ‘तुम्हें याद होगा..’ या गाण्यातला सॅक्सोफोन मनोहारी सिंग यांनी वाजविला आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘शोर’मधल्या ‘इक प्यार का नगमा है..’चं सुरुवातीचं व्हायोलिन जेरी फर्नांडिस यांनी वाजविलं आहे, तर ‘सुनो सजना..’ मधली सतार जयराम आचार्य यांनी वाजविली आहे. ‘कर्ज’मधला गिटारचा पीस प्यारेलालजींचे धाकटे भाऊ गोरख यांनी वाजविला आहे. बाकी अन्य बहुतेक सर्व गाण्यांत ऐकू येणारी बासरी पं. हरिप्रसाद चौरसिया यांची, तर संतूर पं. शिवकुमार शर्मा यांचं आहे.
‘हसता हुआ नूरानी चेहरा..’ (पारसमणी), ‘चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे..’ (दोस्ती), ‘सुनो सजना..' (आये दिन बहार के), ‘उडके पवन के संग चलूंगी..' (शागीर्द), ‘सावन का महिना..' (मीलन), 'बिंदीया चमकेगी..' (दो रास्ते), ‘आ जाने जा..' (इंतकाम), 'रुक जाना नहीं..' (इम्तेहान), 'अंखियों को रहने दे..' (बॉबी), ‘काटे नहीं कटते..' (मि. इंडिया), ‘इक प्यार का नग़मा है..' (शोर), 'मेरे दिल में आज क्या है..' (दाग), ‘मन क्यूं बहका..’ (उत्सव), ‘इक हसीना थी इक दीवाना था..’ (कर्ज), ‘अच्छा तो हम चलते है..' (आन मिलो सजना), ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम..’ (एक दूजे के लिए), ‘सत्यम शिवम सुंदरम..’ (सत्यम शिवम सुंदरम) अशी क्लासेस आणि मासेस या दोन्ही कॅटेगरीजना भावतील अशी लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि प्रेमगीतांपासून विरहगीतांपर्यंत अफाट रेंज असलेली विविधरंगी शेकडो हिट गाणी देणार्‍या लक्ष्मी-प्यारेंची तब्बल १७४ गाणी साठ-सत्तर या दशकात बिनाका गीतमालाच्या अंतिम फेरीत न झळकती तरच नवल!

प्यारेलालजी लतादीदींना खूप मानतात. लतादीदींनीच प्रोत्साहित केल्यामुळं त्यांनी ‘वेस्टर्न क्लासिकल सिंफनी’चं राहून गेलेलं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. दीदी शिवभक्त असल्यामुळं आपल्या पहिल्यावहिल्या सिंफनीला त्यांनी ‘ओम शिवम्’ हे नाव दिलं. ‘ओम शिवम्-ए मायनर’ ही सिंफनी त्यांनी साडेचार महिन्यांत, तर ‘ओम शिवम्-डी मायनर’ ही सिंफनी साडेपाच महिन्यांत लिहून पूर्ण केली. जर्मनीत १२ व्या वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये प्यारेलालजींच्या उपस्थितीत या सिंफनीज सादर करण्यात आल्या आणि प्यारेलालजींच्या या दोन्ही सिंफनीजवर जगन्मान्यतेची मोहोर उमटली. या वेळी प्रेक्षागृहातील श्रोत्यांनी तब्बल दीड मिनीट टाळ्यांचा कडकडाट केला. हे दोन्ही व्हिडीओज यू-ट्यूबवर आहेत.

या सिंफनीजबद्दल लतादीदींनी प्यारेलालजींचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांना शंकराची एक सुरेख मूर्ती भेट म्हणून पाठविली. दीदींची समयसूचकता, वेळ पाळण्याचा गुण आणि या भेटीबद्दल प्यारेलालजी सांगतात, " ज्या क्षणी दीदींनी फोन करून या भेटीबद्दल सांगितलं, त्याच क्षणी माझ्या घराची बेल वाजली. दारात दीदींची भेट घेऊन त्यांचा माणूस उभा होता. मी दीदींना म्हटलं, इतकं अचूक टायमिंग केवळ तुम्हीच साधू शकता!"

वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ‘फिट अँड फाइन’ असणारे प्यारेलालजी स्वभावानं अतिशय उमदे, साधे, मनमोकळे, गप्पिष्ट आहेत. आजही ते एखाद्या शोमध्ये पाहुणे म्हणून गेले, तर मंचावरील गायक-वादकांचं मनापासून कौतुक करतात आणि एखादं गाणं व्हायोलिनवर वाजविण्याचा आग्रह झालाच तर अजिबात आढेवेढे न घेता ' एक प्यार का नगमा है...' वाजवून रसिकांना खुश करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com