आनंदाचा ठेवा (मयूरेश पै)

mayuresh pai
mayuresh pai

आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शनिवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत दीदींबरोबर काम करतानाच्या आठवणी.

लतादीदी माइकसमोर उभ्या राहतात, तेव्हा आम्हा सगळ्या संगीतकारांची, रेकॉर्डिंग तंत्रज्ञांची अक्षरशः पाचावर धारण बसलेली असते. कारण नेहमीच्या लतादीदींपेक्षा या माइसमोर उभ्या असलेल्या दीदी वेगळ्या असतात. माइकसमोर त्या उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्यात अक्षरशः दैवी शक्ती संचारल्यासारखी वाटते. जणू दोन वेगळ्याच व्यक्ती. दीदींची रेकॉर्डिंगची प्रक्रियाही फार छान असते. त्या आधी पूर्ण गाणं ऐकून घेतात. एखाद्या टिपकागदासारखं त्यातल्या जागा टिपतात. काही शंका असल्या तर विचारतात. कागदावर त्यांच्या विशिष्ट खुणा करतात आणि मग माइकसमोर उभ्या राहतात.

लता मंगेशकर नावाच्या जगप्रसिद्ध गायिकेबरोबर तब्बल तेरा वेगवेगळ्या प्रकारचे अल्बम करण्याचं भाग्य मला लाभलं. संगीतकार म्हणून बहुतेक सगळ्या नावाजलेल्या गायक-गायिकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली; पण दीदींबरोबरचं हे काम माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हा सगळा प्रवासच दैवी असल्याची माझी भावना आहे. एक प्रकारचा देवाचा प्रसादच असं मी म्हणीन. त्यांच्याबरोबर पहिला अल्बम मी केला, त्याची एक गंमत आहे. साधारण वीस वर्षांपूर्वी मी स्वरबद्ध केलेलं एक भक्तिगीत उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. त्यावेळी साईबाबांचं एक गीत मी संगीतबद्ध केलं होतं आणि ‘लतादीदी ते गातील का,’ असं उषाताईंना विचारलं होतं. मी ते गाणं माझ्या आवाजात रेकॉर्ड करून लतादीदींना पाठवलं. त्यानंतर दोन-तीन महिने काहीच उत्तर नव्हतं. पण एके दिवशी अचानक लतादीदींचा स्वतःहूनच फोन आला आणि ‘‘तुम्ही माझ्यासाठी एक अल्बम कराल का’’ असं त्यांनी विचारलं. आपण छोटी गोष्ट मागतो आणि देव भरभरून देतो तसंच वाटलं मला. मला सुरेश वाडकर म्हणालेसुद्धा-‘‘लतादीदींनीच फोन केलाय का याची तू खातरजमा करून घे.’’ मी उषाताईंना फोन केला. त्या तेव्हा दीदींबरोबरच होत्या. त्यांनी अर्थातच त्याला दुजोरा दिला. तो दिवस अजून माझ्या आठवणीत आहे.
दीदींबरोबर केलेला पहिला अल्बम होता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा. अटलजींच्या सात कवितांचा आम्ही अल्बम केला. लतादीदींना गाणं शिकवण्याची माझी काय बिशाद? आपण विचारसुद्धा करू शकणार नाही. उलट ते माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. मी सगळ्या कविता संगीतबद्ध करून त्यांना पाठवून दिल्या आणि एके दिवशी हे रेकॉर्डिंग झालं. सात दशकांचा आवाज आपल्यासाठी गात आहे ही कल्पनाच तेव्हा रोमांचित करत होती आणि आजही ती रोमांचित करते. तो अल्बम करताना आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. मी अर्थातच फार बोलत नव्हतो. शेवटी लतादीदी मला म्हणाल्यासुद्धा - ‘अहो मयूरेश काही तरी बोला की? बरोबर झालं आहे का? तुम्हाला रिटेक हवाय का? तुम्ही संगीतकार आहात.’’ लतादीदींपुढं आपण काय बोलणार? पण लतादीदींचं हे एक वैशिष्ट्यही जाणवलं, की संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या गात राहतात.

लतादीदी माइकसमोर उभ्या राहतात, तेव्हा आम्हा सगळ्या संगीतकारांची, रेकॉर्डिंग तंत्रज्ञांची अक्षरशः पाचावर धारण बसलेली असते. कारण नेहमीच्या लतादीदींपेक्षा या माइसमोर उभ्या असलेल्या दीदी वेगळ्या असतात. माइकसमोर त्या उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्यात अक्षरशः दैवी शक्ती संचारल्यासारखी वाटते. जणू दोन वेगळ्याच व्यक्ती. दीदींची रेकॉर्डिंगची प्रक्रियाही फार छान असते. त्या आधी पूर्ण गाणं ऐकून घेतात. एखाद्या टिपकागदासारखं त्यातल्या जागा टिपतात. काही शंका असल्या तर विचारतात. कागदावर त्यांच्या विशिष्ट खुणा करतात आणि मग माइकसमोर उभ्या राहतात. आता पूर्वीसारखी ‘टेक’ची पद्धत नसते; पण दीदींचं गाणं करताना अर्ध्या-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागल्याचं मला आठवत नाही. इतकं बिनचूक गायन असतं त्यांचं. गायक म्हणून दीदी इतक्या विलक्षण, मोठ्या का आहेत ते त्या रेकॉर्डिंगच्या वेळी जाणवतं. त्या सगळे तंत्रज्ञ, वादक यांच्याशी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं बोलतात.

एक गायक म्हणून दीदींच्या आवाजातले ‘डायनॅमिक्स’ मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. समुद्रातल्या लाटांसारखा विशिष्ट लयीत उमटणारा त्यांचा आवाज. या आवाजात त्या शब्दांचा अतिशय प्रभावी आणि कमालीचा नेमका उच्चार करतात. त्या डायनॅमिक्समुळंच त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. मला असंही वाटतं, की भक्तिगीतांना लतादीदी ज्या पद्धतीनं न्याय देतात, ते तितक्या तुलनेत इतर कुणी देऊ शकत नाही. दीदींचा स्वतःचा संपूर्ण सात्त्विक भावही या गीतांमध्ये उमटतो. लतादीदी गायला येतात, तेव्हा हा सगळा अनुभव, सात दशकांचा व्यासंग, सिद्धी घेऊन येतात. ते सगळं अनुभवणं हेही दैवी असतं.

लतादीदी आणि इतर मंगेशकर कुटुंबीयांबरोबर गप्पा मारण्याचं, काम करण्याचं भाग्य मला मिळालं. लतादीदी घरात एरवी खूप शांत, प्रेमळ असतात. इतकी जगप्रसिद्ध गायिका आपल्याबरोबर बोलत आहे असं आपल्याला जाणवतही नाही. लतादीदींशी परिचय वाढल्यानंतर त्यांनी एकदा ‘‘गझलचा एक अल्बम करू या,’’ अशी कल्पना त्यांनी एकदा मांडली. त्यानुसार आम्ही काम केलं आम्ही ‘सादगी’ नावाचा एक अल्बम केला होता. गाणं हे त्यांच्यासाठी एखाद्या पूजेसारखं का असतं, याची एक आठवण याच अल्बमशी संबंधित आहे. या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळी दीदी खूप आजारी होत्या. मात्र, त्यावेळी रेकॉर्डिंग केलं नाही, तर आम्हा सगळ्यांचा हिरमोड होईल हे लक्षात घेऊन त्या गायला आल्या. अर्थातच माइकसमोर त्यांनी केलेलं काम शंभर टक्के परफेक्ट होतं. काही वेळा अगदी १०२ ताप असतानासुद्धा त्या गायल्या आहेत, हे तर आपल्याला माहीत आहेच. दीदींनी त्याआधी ‘सजदा’ हा गझलांचा अल्बम केला होता. त्यानंतर तब्बल सतरा वर्षांनी त्यांनी ‘सादगी’ केला. त्यामुळं अशा प्रोजेक्टमध्ये त्यांच्याबरोबर माझं नाव जोडलं गेलं हेही मला खूप मोलाचं वाटतं.

दीदींबरोबर मी ‘शुरोध्वनी’, ‘हनुमान चालिसा’, ‘मेरे साई’, ‘सर्वमंगल गणेश’, ‘अन्नमाचार्य संकीर्तने’, ‘सरहदे’ असे बरेच अल्बम केले. त्यात भक्तिगीतांपासून गझलेपर्यंत सगळं काही आहे. या रचनांपैकी अटलजींची ‘क्या खोया क्या पाया जगमें’ ही रचना, ‘मेरे साई’ किंवा ‘तिरुपती’च्या काही रचनांना दीदींची दाद मिळाली, ते मला माझं संचित वाटतं. लतादीदींबरोबर मला एक गाणंही गाण्याची संधी मिळाली. ‘२२ जून’ नावाचा चित्रपट होता. या चित्रपटाचं संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. माझं डबिंग सुरू होतं, तेव्हा त्यावर देखरेख ठेवायला खुद्द दीदी, मीनाताई आणि उषाताई होत्या. म्हणजे माझी काय अवस्था झाली असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो! तो क्षण अर्थातच माझ्या आनंदठेव्याचा भाग बनून गेला आहे.
लतादीदी या वयातही गात आहेत. संगीतकार म्हणून मी त्यांच्याबरोब काम केलंय आणि अजूनही करतोय, करणार आहे हे सांगताना मला खूप आनंद वाटतो. अगदी ताजं काम सांगायचं, तर मार्च महिन्यामध्येच आम्ही दीदींचं एक रेकॉर्डिंग केलं. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ ही रचना त्या गायल्या. या रचनेला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. फक्त एवढंच नाही, तर अजूनही काही कामं करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे तपशील देत नाही; पण लवकरच ते कामही रसिकांसमोर नक्की येईल. या वयातसुद्धा दीदी माइकसमोर ज्या तडफेनं, ऊर्जेनं गातात ते बघणं, अनुभवणं हे माझ्यासारख्या संगीतकर्मींसाठी विलक्षण असतं. र्थदीदी वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांच्या रूपानं आठ दशकांचा हा आनंदस्वर आपल्यासमवेत आहे हे मला जास्त मोलाचं वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com