प्रमाणामधे सर्व काही असावे!

Book
Bookesakal

सुभाषितवजा वरील काव्यपंक्ती प्रसविणाऱ्या कृष्णाजी नारायण आठल्ये ( १८५३ ते १९२६) यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभूचा होता. त्यांचे घराणे वेदशास्त्रसंपन्न दशग्रंथी पंडिताचे असल्याने वैदीक शिक्षणाचा पैतृक वारसा या कवीला लाभला होता.

कवीचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्ता पावेतो झालेले होते. त्यानंतर कवीने जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर नोकरी निमित्त ते महाराष्ट्रापासून दूर केरळातील कोचिन येथे वास्तव्यास होते तेथील वास्तव्यातच या उद्योगी गृहस्थाने १८८६ साली केरळ कोकिळ या पुढे मराठी मुलुखात विख्यात झालेल्या मासिकाचे प्रकाशन सुरु केले.

केरळात राहून मराठी मासिक प्रकाशित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आगळाच म्हणावा. हे मासिक तत्कालीन मराठी रसिकांना अत्यंत भावले होते. या मासिकात विविध विषयावरचे लेखन प्रकाशित होत असे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet krushnaji athalye nashik news)

Book
बाबा, सोडा हा अबोला!

केरळ कोकिळकारांनी गद्य-पद्य दोहोप्रकारचे लेखन केलेले आहे. भगवद्गीता नि स्वामी विवेकानंदांच्या योगांवरील पुस्तकांचे मराठी भाषांतरादी चाळीसएक पुस्तके कवीच्या नावावर आहेत. मराठीत पहिली विज्ञानकथा लिहिण्याचे नि प्रसिद्धविण्याचे श्रेय आठल्येंनाच जाते.

त्यांनी सन १९०० ते १९०६ दरम्यान केरळ कोकिळमधून ज्यूल्स व्हर्नच्या टू द मून अँड बक ही विज्ञानकथा प्रकाशित केली होती. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी कवीस महाराष्ट्रभाषा चित्रमयूर या सार्थ उपाधिने गौरविले होते. तर प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या गुरुपदाचा मान कवीलाच दिला होता.

कवीची काव्यरचना पुराण वळणाची असून बहुतांशी उपदेशपर आहे. दांपत्यसुखाचा ओनामा, सासरची पाठवणी, माहेरचे मूळ, मुलीचा समाचार अशा अनेकविध विषयांवर कविने कविता लिहीलेल्या आहेत. प्रस्तुत लेखात आपण कवीच्या प्रमाण या वीस श्लोकात विस्तारलेल्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत. 

कवितेचा मुख्य तत्व मांडण्यासाठी कवी प्रमाणामधें सर्व काही असावें । अशा साक्षेपी नि सहज समजण्याजोग्या धृपदाचा उपयोग करतो नीट पाहिले तर हे धृपदच सर्व काही सांगून जाते व पुढील श्लोक फक्त अर्थविस्ताराचे काम करताना दिसतात. पहिल्या श्लोकात कवी सांगतो,

अति कोपता कार्य जाते लयाला
अति नम्रता पात्र होते भयाला ।
अति काम ते कोणतेही नसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।

कोपणे म्हणजे रागराग करणे वा रुसणे होय. खूप लोक असतात जे काम पूर्णत्वास नेण्यापेक्षा एखाद्या छोट्या बाबीला पुढे करीत रुसण्या फुगण्यात वेळ घालवितात. परिणामी काम विस्कटते किंवा त्यातील मजा निघून जाते आणि अती नम्रता म्हणजे नको तेवढी लीनता धारण केली तरी तेच होते.

येथे हे ध्यानांत ठेवणे गरजेचे असते की, राग असो वा नम्रता दोन्ही काम साधून घेण्यासाठीचे साधन आहे, साध्य नव्हे. पण रागराग करणारे किंवा पुढेपुढे करणारे ही बाब विसरतात. तीच कवी अधोरेखित करतो आणि सांगतो कि, दोहोंचे अति प्रमाण टाळावे. राग नि नम्रता दोन्ही असावी, पण ती प्रमाणातच असावी

Book
लढाई आत्मसन्मानाची...

अति लोभ आणि जना नित्य लाज
अति त्याग तो रोकडा मृत्यु आज

अती लोभ लाजेला तर अती त्याग नाशाला कारण ठरतो. माणसाची मानसिकताच अशी असते की कितीही मिळाले तरी त्याला कमीच वाटते. परिणामी लोभ वाढत जातो. लोभी माणूस म्हणून लोकं पाहायला लागतात.

ही बाब सलज्ज माणसाला लज्जास्पदच असते. कधी कधी वाटते, हाव धरुन नको त्या मार्गाने माया जमविणारे, जगाच्या नजरेत आल्यावरही लाज न वाटणारे नि या गोष्टींकडे पाहताना नजरा मेलेले आजचे लोक कविने पाहिले असते, तर या पंक्ती लिहिण्याची कवीची प्राज्ञाच झाली नसती.
पुढील श्लोकात कवी सांगतो, 

‘अती ज्ञान क्षीण कायेस तर अती खेळणे भीकेस कारण ठरते’ 

येथे कवीला ज्ञान शब्दातून नुसते बैठे वाचन वा आपण ज्याला ‘पुस्तकी कीडा ‘ म्हणतो तो एवढाच अर्थ अपेक्षित आहे तर खेळणे शब्दातून नुसता शारीरिक व्यायाम अपेक्षित आहे. त्यावर उपाय सर्वांगीण अर्थात मानसिक नि शारीरिक व्यायाम आहे, असे कवीला वाटते, तसेच त्याला वाटते की अती दान करणे किंवा अती कंजूष असणे दोन्ही प्रपंचास घातक ठरतात.

त्यामुळे दान करताना उधळेपणा तर काटकसर करताना कंजूषपणा घडणार नाही, याची काळजी घ्यावी. येथे हे सांगणे अनाठायी ठरणार नाही की, संस्कृत सुभाषितकार सांगतात सपात्री दान करावे, म्हणजे व्यक्तीला पारखून, त्याचा समाजोपयोग पाहूनच दान करावे.

दान करताना देणाऱ्यात दातृत्वाचा अन् घेणाऱ्यात दीनतेचा भाव असू नये. हे पाहता आजकाल सरकारी रुग्णालयात जाऊन फळे वाटणारी आणि हे वाटताना फोटो काढणारी मानसिकता या सदरात घ्यायला कवी तयार होणार नाही.

अति भोजने रोग येतो घराला
उपासे अति कष्ट होती नराला

कवीचे हे म्हणणे खादाड नि उपाशी राहणाऱ्या दोहोंना एका पारड्यात मोजणारे आहे. कवीच्या या मताशी असहमत होणारा विरळाच असेल. अती मैत्री ही अवमानाला तर अतिद्वेष हा अधोगतीला कारण होतो. जास्त घसट झाली तर माणसाची किंमत राहत नसते अन् अती मत्सर माणसाचे मूल्य ओळखू शकत नाही. परिणामी दोन्हींही घातकच ठरतात. त्यामुळे दोहोत प्रमाण असावे असे कवीला वाटते यातील  

‘अति स्नेह तेथे अवज्ञा उदंड ‘ हा पहिला चरण सुजाण वाचकाला ‘अतिपरिचयात् अवज्ञा संतत गमनात् अनादरो भवति ‘ या संस्कृत सुभाषिताची आठवण करुन देतो. या दोन्ही बाबी कवीने मोठ्या खुबीने एकाच चरणात गुंफल्याचे पाहून रसिक मनोमन सुखावतो.

अति द्रव्यही जोडते पापरास
अति घोर दारिद्र्य तो पंकवास

या बाबी कोणाला मान्य होणार नाहीत ? अति धन जोडताना पापांची रास लागते नि घोर दारिद्र्य पापाकडेच घेऊन जाते, यात काहीच शंका नाही. धनाला माणूस जेंव्हा जीवनाचे ध्येय मानतो किंवा कः पदार्थ मानून धनाची उपेक्षा करतो, त्याचवेळी उपरोक्त बाबी घडतात.

त्यामुळे कवी त्यात प्रमाणशीरपणा ठेवायचा सल्ला देतो. अती बोलण्याने लोकं विटतात तर अती मुखदुर्बल राहण्याने नुकसान होते. त्यामुळे मोजके नि नेटके बोलावे, असे तो पुढील श्लोकात सांगतो.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Book
संगीतच आपुले बलस्थान!

त्याचप्रमाणे अती वाद म्हणजे निव्वळ वादासाठी वाद हा सत्य परिस्थितीपासून दूर नेतो, तर केवळ होयबा होणे म्हणजे भीडस्त रहाणे, चुकीच्या बाबींना ही नाही न म्हणणे व्यक्तीला नीचकृत्यात सहभागी करुन घेत असते.  त्यामुळे सारासार विवेक करुन रहावे, असे कवीचे सांगणे आहे.

अति औषधे वाढवितात रोग
उपेक्षा अति आणिते सर्व भोग

कैक लोक गरज नसताना, स्वतःच्या मनाने औषधी घेत बसतात. आताशात गुगल डॉक्टरचा उपयोग करणारे तर खूपच वाढलेत, ते ही याच सदरात मोडतात. तर काही जण ‘मला कोणत्याही उपचाराची गरज नाही ‘ म्हणत दुखणे अंगावर काढतात. या दोन्ही बाबी अंतिमतः रोग वाढविण्यास कारण ठरतात, हे कवीचे निरीक्षण कोणासही मान्य व्हावे.

यासाठी हिताचा उपयोग करावा. म्हणजे डॉक्टरच्या  सल्ल्याने चालावे असाच कवीचा अभिप्राय आहे. मला वाटते कवीचा हा श्लोक किमान डॉक्टरांनी तरी दवाखान्यात दर्शनीभागी लावावा. त्यामुळे मोजकी औषधे देण्याचा नि न चूकता घेण्याचा संदेश वैद्य नि रुग्णास अनायासे जाईल.

अति दाट वस्तीत नाना उपाधी
अति शून्य रानात औदास्य बाधी
लघुग्राम पाहोनि तेथे वसावे

सामान्यतः लोक राहण्यासाठी मोठमोठ्या नगरांकडे धाव घेतात तर काही निर्जन वनात जाऊन राहतात. कवी सांगतो दाट वस्तीत राहणाऱ्यांना नानाप्रकारचा त्रास सहन करावा लागतो. यातील सर्वांत मोठे नुकसान म्हणजे माणसाचे माणूस म्हणून असलेले मूल्यच हरवून जाणे होय.

तर रानात एकटाच असल्याने एकटेपणा दाटून येतो. परिणामी औदासिन्य वाढते. यावरचा उपाय म्हणून लघुग्रामी वस्तीस असावे, असा कवीचा उपदेश आहे. यावर काहीजण म्हणतील, आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात रानावनातूनही इतराशी संपर्क राखता येतो नि महानगरात एखाद्या फ्लॅटमध्ये रानावनासारखे एकांतात राहता येते.

तर त्यांना कवीच्या कथनातील मर्म उमगले नाही, असेच म्हणावे लागेल. कवी मानवी सहवासाच्या उबेला मूल्य देतो ते छोट्याशा नगरातच शक्य आहे. त्याचप्रमाणे पुढे अती शोक दुःख वाढवतो तर अती हर्ष क्षुद्रबुद्धी दाखवितो, असे सांगत नशीबापुढे कोणाचे चालत नाहीची जाणीव तो देतो.

येथे शोक म्हणजे स्वतःच्या परिस्थितीला हीन लेखत रडणे तर हर्ष म्हणजे दुसऱ्याच्या दीन परिस्थितीवर हसणे होय. सोबतच कोणासमोर नको तितके पुढे पुढे करणे श्वानवृत्ती दाखविते तर उगाच निंदानालस्ती करत सुटणे दुष्टपणा दाखवितो तो टाळण्याचा सल्ला देत शब्दांनी कोणाला डसू नये, सांगताना कवी लिहितो,

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे

यातील शब्द स्पर्श हा शब्दप्रयोग कवीच्या विचारांची गहनताच दाखवून जातो.

जुन्याचे अतिभक्त ते हट्टवादी

नव्याचे अतिलाडके शुद्ध नादी

Book
‘सिलीकॉन’चे अर्थसंकट

सामान्यतः जुन्याचे अभिमानी नव्यात काही राम नाही, म्हणत हटवाद करतात तर नव्याचे भोक्ते जुने ते सारे चुकीचे म्हणत धिक्कारतात यात दोघेही नव्या - जुन्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टी नाकारतात अन् दोहोत असलेल्या उणीवांना उगाच जपत असतात.

खरेतर जीवनांत नवेजुने काही नसते जीवनापयोगी नि मनुष्योपयोगी ते वापरणेच इष्ट ठरते. जुन्या नव्याच्या वादात सुटणारे सारतत्व कवी या श्लोकात सहज पकडतो. ज्याकाळी कवीने हा श्लोक लिहिला त्याकाळी महाराष्ट्रात पुराणमतवादी नि सुधारकांचे युद्धच रंगलेले होते. त्या पार्श्वभूमीवर पाहता कवीचा हा श्लोक कोणत्याही वादाकडे तटस्थपणे पाहण्याची त्याची वृत्ती दाखवतो.

जी त्याच्या पक्षपातरहित पत्रकारितेचा नमूना ठरावी. शेवटच्या कडव्यात तर श्लोककर्त्यासह त्याच्यातील संपादकही जागा होतो, असे मिश्किलपणे म्हणावेसे वाटते,

सदा पद्य घोकोनियां शीण येतो
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो
कधी ते कधी हेंहि वाचीत जावे

यातील कधी हे तर कधी ते वाचीत जावे म्हणताना वाचन चालू ठेवावे, असा सल्ला देत तो ही कविता संपवितो. कवितेचा शेवट वृत्तपत्रीय लिखाणाला साजेसा वाटत असला तरी समर्पक वाटतो.

प्रस्तुत कविता वीस श्लोकात आहे. यातील एखादा श्लोक वगळला किंवा वाढविला तरी चालू शकते, हे सहज लक्षात येते. या श्लोक मालिकेतील श्लोक क्रमांक  ३, ८, १५, १७ व १८ हे योग्य प्रमाणात जुळलेले नाहीत.

दोन विरुद्ध अती मांडताना कवीकडून गफलत झालेली दिसते. असे असले तरी हिला कविता न म्हणता श्लोकमालिका म्हणत हिची बोळवण करता येणार नाही. कारण केरळ कोकिळकारांनी सर्व श्लोकांचा सूर ‘प्रमाणामधें सर्व काही असावे’ या धृपदाशी बेमालूम जुळविलेला आहे. कवीचे हे सूत्र ‘अति सर्वत्र वर्जयेत’ या सुभाषित पंक्तीची आठवण देणारा आहे.

कवितेचा हा सूर चिरंतन सत्याचा उद्घोष करणारा असल्याने नित्यनुतन आहे. तसेच तो सर्वाठायी नि सर्वत्र वापरता येण्याजोगा आहे. विशेषतः या किंवा त्या ‘टोका’ला पकडून वाहवत जाणाच्या आजच्या काळांत मार्गदर्शक नि प्रासंगिक ठरणारा आहे.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.) 

Book
पाण्यासाठी धावा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com