झिम्माः आकाशात तरंगत ठेवणारी कविता!

Poetry Book
Poetry Bookesakal

रघुनाथ दत्तात्रेय सरंजामे (१८९५) मूळचे उमरावतीचे व वास्तव्यास नागपुरात होते. कवीचा व्यवसाय वकीलीचा होता. कवीने काही स्फूट काव्य केलेले असून मोठा काळ लोटल्याने कवी विषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही.  (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poetry raghunath saranjame nashik news)

Poetry Book
लढणारा कार्यकर्ता

कवीची प्रस्तुत रचना झिम्मा अत्यंत रसाळ असून झिंग लावणारी आहे. खरेतर झिम्मा खेळताना एकतानता लागते, नशा नि आवेश लागतो. त्यातून आपोआपच झिंग तयार होते, धृपदात कवी सांगतो,

झिम्मा खेळूं ये झिम्मा नाचूं ये
आकाशातांले तारें संगे झिम्मा खेळूं ये ।

सामान्यतः झिम्मा खेळताना कोणीही खेळगडी चालतो. मित्र, मैत्रिण, भाऊ-बहिण कोणीही चालते. पण या कवीला झिम्मा खेळायचाय पण तो पृथ्वीतलावरील कोणा सुंदरी सोबत नाही वा स्वर्गातील कोण्या अप्सरेसोबत नाही तर आकाशातील तारकांसोबत होय.

कवीच्या या पंक्तीतील ताल सूर सारेच नादमय अन् लयबध्द आहेत. त्यात झिम्मा खेळण्याची नि नाचण्याची भर घातल्याने झिम्म्याची नशा काव्यारंभीच छान जमलेली दिसते. त्यासोबतच आकाशातील तारकांसोबत झिम्मा खेळण्याची इच्छा व्यक्तविल्याने त्यास वेगळीच भव्यता लाभलेली आहे.

त्या तारकेला तो सांगतो, ‘रात्र काळीकुट्ट अन् अंधारी असल्याने कुणी आपणास पाहणार नाही. तेंव्हा चल चटकन आपण झिम्मा खेळूयात' तितक्यात त्याला आकाशातील सप्तर्षी दिसतात. त्यात अरुंधती एकटीच तारका असते, तिला अनुलक्षून तो म्हणतो,

Poetry Book
समज आणि उमज...

सप्तऋषींमध्यें सती
बैसलीसे अरुंधती
लाडकया या आजीसंगें झिम्मा खेळूं ये।

तसे पाहिले तर आकाशातील सर्वच तारका चिरतरुण असल्या तरी खूप खूप जुन्या पण त्याला अरुंधती जवळची वाटते, लाडकी वाटते कारण ती वसिष्ठांची पत्नी आहे. त्यामुळे कवीचे नि तिचे नाते आजी नातवाचे आहे.

खरे तर ती त्याच्या आजीला, आजीच्या आजीलाही आजी वाटावी एवढी जुनी आहे. पण अडचण येते, ती मानवाच्या क्षणभर आयुष्यातील कणभर नात्याची मानवी नातेबंध फारफार तर फक्त चार पिढ्यांचे राहू शकतात.

त्याहून अधिक नाही. त्यातील पणजी-पणती ही नात्यांची दोन टोके तर स्मरणाच्या अंधुकतेत चटकन विरुन जातात. स्मरणात उरणारे नाजूक बंध आजीचे असतात. त्यामुळे तो तिला आजीच्या नात्यात बांधतो. आजीच्या संगे फुगडी, झिम्मा खेळताना येणारी मजा दुसऱ्या कोणासोबतच येत नाही. तीच कवी या कडव्यात अनुभवतो.

त्याला चांदण्यात असलेली चंद्ररुपी ज्योत हिमगिरीसारखी चमकणारी वाटते. त्या हासऱ्या चंद्रज्योतीसंगे झिम्मा खेळावा, असे वाटून जाते. तितक्यात त्याला चतुर्थीची लोभस अन् लाजरी चंद्रकोर दिसते. तिच्यासोबत झिम्मा खेळावा, असे त्याला वाटून जाते. त्याचा असा गगनी विलास चालला असतानाच त्याला 

काळ्या मेघामागे जाऊ
वीज नाचे पैज लावूं
नाचऱ्या या पोरीसंगें झिम्मा खेळूं ये

काळ्या ढगामागे लपून अधेमधे चमकून जाणारी वीज दिसते. तिच्यासोबत झिम्मा खेळण्याची हौस त्याला वाटते. तितक्यात रानफुले उधळत येणारा दक्षिणेचा झंझावात त्याला दिसतो. तो पाहताच त्या झंझावातातही नि रानफुलांसोबतही झिम्मा खेळण्याची इच्छा त्याला होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Poetry Book
रुग्णस्नेही ‘केवट’

कवितेच्या नादमयेतत रंगलेल्या आणि आकाशात अधांतरी तरंगत असलेल्या रसिकाला झंझावातात सोडून कवी कविता संपवितो, तेंव्हा तो कुठेतरी ताल विसरुन जातो की काय असे वाटून जाते. पण झिम्म्याच्या गुंगीत नि निशेत असे झालेले चालू शकते.

कदाचित रसिकाची झिंग तशीच रहावी, अशी कवीची इच्छा असावी. शेवटी अर्थमय गद्य तुकड्यांपेक्षा कल्पनाविलासाचे लयबध्द भराऱ्या म्हणजेच काव्य होय. केशवसूतांनी सुध्दा अर्थहीनतेत अर्थ शोधण्याच्या प्रयासाला झपूर्झा म्हटले, ते उगाच नाही.

केशवसूतांनी झिम्म्यातील ‘झिम पोरी झिम’ ला झपूर्झाचे रुप दिले होते व झपूर्झातील तन्मयतेची लकेर ओढत ज्ञातातून अज्ञात अन् अज्ञातातून ज्ञाताची वीण विणली होती, तसे काही या कवितेत घडलेले दिसत नाही.

त्यामुळे भवानीशंकर पंडितांसारख्या समीक्षकाला ही कविता पाहताना, ‘कित्येक अर्थहीन कविता नाद माधुर्याच्या जोरावर प्रिय होऊन बसतात. सरंजामे यांची ‘झिम्मा’ ही कविता या विधानाचे अत्त्युत्तम प्रत्यंतर आहे’ असा एकांगी अभिप्राय द्यावासा वाटतो.

तर रविकिरण मंडळाचे संस्थापक कवी व काव्य समीक्षक असलेल्या श्रीधर रानड्यांनी मात्र ती, ''(या कवितेतील) गुंगी नि आवेश ही इतकी तीव्र वाटतात की, एकदा झिम्मा खेळण्याचे वेड डोक्यात शिरल्यावर बेभान होऊन आकाशात जे दिसेल त्याच्याशी, पोरीबाळीशी, म्हाताऱ्या आजीशी सुध्दा झिम्मा खेळण्यास कवी तयार झालेला पाहून गंमत वाटते. अनपेक्षित व असंभव उद्गारांमुळे ही कविता सुंदर भासते''

रसिका ! तू वरील पैकी कोणाशीही सहमत अस वा नस पण वरील कविता तुझ्या मनाला विरंगुळा देऊन जाईल यात शंकाच नाही.

(लेखक हे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ असून दशग्रंथी सावरकर या पीएचडी समतुल्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.)

Poetry Book
एक झोका सुखाचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com