आहे मनोहर तरी गमते उदास!

Marathi Poet
Marathi Poetesakal


जीवनातील कितीतरी मनोहर नि सुंदर गोष्टींमागे दडलेली न्यूनता आपल्या ध्यानात येत नाही. तीच कवीने प्रस्तुत श्लोकमालिकेत चित्रित केली आहे. या श्लोकमालिकेतून ध्वनित होणारा दुसरा अर्थ असा, की बाह्यात्कारी जे आपल्याला मनोहारी दिसते, ते आंतरिकदृष्ट्या पीडादायीही असू शकते. त्यामुळे वरवरच्या दिखाव्याला भुलू नये. जीवनात कोणतीन् कोणती कमतरता राहणारच, ती आपण स्वीकारायला हवीच, त्यानेच उदास जीवन मनोहारी होऊ शकते. थोडक्यात मनोहर गोष्टींमागील उदासता चितारता चितारता कवी नकळत उदासीन जीवनाला मनोहारी करण्याचा मार्ग न बोलता दाखवून जातो.

र सिका, या काव्यपंक्ती तुझ्या मनांत रुंजी घालत असतील. केवळ तुलाच नाही, तर सुनीताबाईंसारख्या प्रगल्भ विदुषीलाही या पंक्तींनी इतका मोह घातला, की स्वतःच्या आत्मचरित्राचे नावच त्यांनी या पद्यपंक्तीतील ‘आहे मनोहर तरी’ या लक्षवेधी शब्दसमूहाने ठेवले. ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ या विलक्षण काव्यपंक्तींचा जनक कोण असावा? हे सांगणे कठीण आहे! खूप जणांना वाटते, की गणपतराव बापूराव शिंदे अर्थात, सरस्वतीकंठाभरण हे या पद्यपंक्तीचे जनक आहेत, पण ते खरे नाही.

या पंक्तींमागील पार्श्वभूमी अशी आहे, की बाळकृष्ण संतूराम गडकरी हे वैदर्भिय कादंबरीकार ‘महाराष्ट्र वाग्विलास’ या नावाचे मासिक चालवत, हे मासिक उणेपुरे दोन वर्षे चालले. याच मासिकामुळे द्वारकादास माधव पितळे अर्थात, नाथ माधव यांचे नाव कथा कादंबरीकार म्हणून पुढे आले. या मासिकाने एकदा काव्यस्पर्धा घेतली होती. स्पर्धेत समस्यापूर्तीसाठी ‘आहे मनोहर तरी गमते उदास!’ ही चौथी ओळ देण्यात आली होती. ती वापरून काव्य करावयाचे होते. या स्पर्धेत गणपतराव बापूराव शिंदे (१८८१ ते १९७६) अर्थात, सरस्वतीकंठाभरण यांची श्लोकमाला सर्वोत्कृष्ट ठरली. सरस्वती कंठाभरणम् हा भोजराजाचा काव्यविषयक ग्रंथ प्रसिद्ध आहे, कवीने बहुधा त्यापासूनच स्फूर्ती घेत टोपणनाव घेतले असावे. (Saptarang Latest Marathi Article by Dr Neeraj Dev on Marathi Poetry Nashik News)

कवी केवळ कवी नसून विचारवंत नि कृतिशील समाजकारणी होता. तो अगदी आरंभापासून प्रार्थना समाज नि महर्षी वि. रा. शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासशी जोडला होता. कोणत्याही प्रकारचा जातपात, वर्णभेद न करता गरीब नि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी गणपतराव शिंद्यांनी स्वखर्चाने व प्रसंगी पत्नी लक्ष्मीबाईचे दागिने विकून ‘शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग’ स्वतःच्या राहत्या घरात सुरू केले होते. हे सारे कार्य त्यांनी अत्यंत प्रसिद्धी पराङ्मुखतेने, निःस्पृहपणे केले. लोकांना नुसते फळे वाटले, की फोटो काढून ‘समाजसुधारक’ म्हणून मिरविण्याच्या आजच्या काळात गणपतरावांचे कार्य केवळ उजवेच नाही, तर स्फूर्तिप्रद ठरावे. गणपतरावांच्या याच निरलस, निःस्पृहतेमुळे तत्कालीन विद्वान त्यांची गणना विरक्त साधू पुरुषात करीत.

‘आहे मनोहर तरी गमतें उदास!’ ही समस्यपूर्तीसाठी असलेली ओळ निःस्वार्थ तळमळीने निरलस काम करणाऱ्या गणपतरावांना नक्कीच खोलवर भावली असणार नि त्यामुळेच तीतून सुमधूर अशी अष्टश्लोकी प्रसूत झाली असावी. पहिल्याच श्लोकात कवी सांगतो, ‘जो शरीराने सर्वांगसुंदर आहे, ज्याची वाणी, मन नि बुद्धी प्रशस्त आहे. अर्थात, वाणी मधुर, मन उदार नि बुद्धी विशाल आहे. पण जर त्यास चारित्र्यच नसेल तर? चारित्र्य म्हणजे केवळ व्यक्तिगत नसून सामाजिक नि राष्ट्रीय चारित्र्यसुद्धा कवीला अपेक्षित असावे.

कारण व्यक्तिगत चारित्र्य कसेही असले, तरी त्याचा परिणाम फार फार तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत नि पारिवारिक जीवनावर पडतो. पण व्यक्तिगत चारित्र्य कितीही चांगले असेल व राष्ट्रीय चारित्र्य कलंकीत असेल तर त्याचा प्रभाव येणाऱ्या पिढ्यांवर नि राष्ट्रजीवनावर पडत असतो. मिर्झाराजे जयसिंह उज्ज्वल चारित्र्याचे होते; पण त्यांचे राष्ट्रीय चारित्र्य कलंकीत होते. सामान्यपणे आपणही आसपास पाहतो, की काटकसरीने राहणारे लोकसुद्धा सरकारी खर्चाने म्हटले की लयलूट सुरू करतात.

प्रांत, जातीच्या नावाने कुणी काही बोलले की गदारोळ घालतात. पण देशाविषयी कुणी काही बोलले, तर त्यांना फारसा फरक पडत नाही. व्यक्तिगत स्वार्थाबाबत आपण सजग असतो, राष्ट्रीय स्वार्थाबाबत तितकेच सुप्त! हे नेहमीच जागरूक रीतीने पाहणाऱ्या कवीला वाटते, ‘आहे मनोहर तरी गमते उदास!’ हे आणखी नीट समजून घेण्यासाठी या पहिल्या श्लोकाला शेवटचा अर्थात, आठवा श्लोक जोडून पाहावा लागतो. या श्लोकात कवी लिहितो,

विद्वान सुशिक्षित समाजधुरीण लोक ।
मोठ्या उदार मतिने लिहितात लेख ।।
तैशा कृती न करिती, स्थितिं ही मनास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।

कृतिशून्य लोक कितीही थोर नि विद्वान असले तरी ते कवीच्या मनाला उदास करून जातात. कारण कृतीशूरता जास्त महत्त्वाची असते. कवि कृतिशूर कार्यकर्ता असल्याने तर त्याला हे तीव्रतेने डाचत असेल.

‘घर वैदुर्यादी नानाविध रत्नांनी सजवलेले आहे. त्यात आलिशान फर्निचर नि सजावट केलेली आहे. प्रशस्त दिवाणखाना, आधुनिक सुविधांनीयुक्त स्वयंपाकघर नि सुरम्य शयनागार आहे. उद्यान नि स्नानागार यांनी ते घर सजलेले आहे. पण जर त्यात गृहिणीच नसेल तर? ते घर ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असेच भासेल. कारण घराला घरपण गृहिणीमुळे येत असते.

घरात पुरुष एकटाच वा निव्वळ बाप, मुलगा, भाऊ असे पुरुषच राहत असतील, तरी ते घर घर न वाटता एखादी लॉजच वाटते. मात्र गृहिणीचा स्पर्श होताच त्याचे स्वरूप पार पालटते. येथे कवीला गृहिणी घरात असावी, एवढेच वाटत नसून त्यामागे ‘यत्र नार्यऽस्तु पुज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ अर्थात, त्या घरात नारीचा सन्मान होत असावा, तिची प्रतिष्ठा असावी हाही भाव त्यामागे वाटत असावा.

कोणाला वाटेल केवळ नारीनेच का घर सजते?, ती गृहिणी ! मग गृहस्थाचे काय? गृहस्थ तर असावा; पण नेहमीच घरात राहणारा नसावा. नेहमीच घरात राहणारा असेल, तर त्याला ‘घरकोंबडा’ म्हणतात. गृहसुस्थितीत राहण्यासाठी घराबाहेर जो धडपड करतो, तो गृहस्थ होय. घराबाहेर कष्टत असतानाही जो मनात घराची, घरातल्यांची सतत चिंता वाहतो तो गृहस्थ होय. कवी त्याचेही मोल जाणतो, पण ते गृहस्थ म्हणून नाही तर गृहिणीचा पती, तिचे सौभाग्य म्हणून, त्यामुळेच तो लिहितो,

सौंदर्यखाणि, सुनया, विमला, सुशीला ।
विद्याविभूषित गुणी अशी मुग्ध बाला ।।
दैवेचि हो गतधवा जरि ती जनास ।
आहे मनोहर तरी गमतें उदास ।।

सुंदर, सुनयना, सुशील नि विदुषी असलेली गुणवान अशी कन्या दैवयोगाने विधवा झालेली आहे, हे कळताच उदास वाटते. घराला घरपण येण्यासाठी जशी गृहिणी गरजेची असते तशीच तिची मानसिक स्थिती प्रसन्न राहण्यासाठी तिचा पती असणेही गरजेचे असते. तो नसता, सारे मनोहारी असूनही त्यामागे विषण्णता वास करते, असे कवीला वाटते.

Marathi Poet
आयुष्याचा सारीपाट

पुढे कवी म्हणतो, ‘उद्यानांत आंब्यादि अनेक गगनचुंबी वृक्ष आहेत, अनेक वेली आहेत; पण त्यांना मोहरच नसेल, तर सारे असून नसल्यासारखेच होतात.’ त्याला जोडून पुढील श्लोकात तो म्हणतो, की ‘फुले, फळे, पक्षी, मुले इतकेच नव्हे, तर सुविचारमाला असतील, आकाशात विशाल नक्षत्रपंक्ती असतील पण जीवनात प्रेमच नसेल तर? सारे असून नसल्यासारखे उदास भासते.’ कवीच्या श्लोकमालेचे हेच वैशिष्ट्य आहे, की एकातून दुसऱ्याचा नि दुसऱ्यातून तिसऱ्याचा अभाव दाखवित तो मनोहरतेतील उदासतेचे चित्र स्पष्ट करीत जातो, जे रसिकमनाला चटकन भावते. याच तंद्रीत पराधीन भारताला पाहून त्याची मति क्षुब्ध होते नि तो विचारतो,

विद्या, कला, कुशलता बहु जेथ होत्या ।
जैं सृष्टिसुंदरिविलासनिवास होत्या ।।
उत्साहहीन बघतां अजि भारतास ।
आहे मनोहर तरी गमतें उदास ।।

कवीची ही मनःस्थिती केवळ देशप्रेमच दाखवत नाही, तर पराधीनतेची चीड नि सोबतच देशाला उन्नतीला नेण्याचा भावच अधोरेखित करते. ही श्लोकमालिका वाचताना विचक्षण वाचकाला भर्तृहरीच्या नीतिशतकातील ‘शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी’ हा श्लोक हटकून आठवत असेल. या श्लोकाचे बेमालूम भाषांतर हरिपंडिताने पुढीलप्रमाणे केले आहे -

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा
पद्मावीण जळे, निरक्षरमुखी जो साजिरा गोजिरा
दात्याला धनलोभ नित्य, वसते दारिद्र्य विव्दतजनी
दुष्टाचा पगडा महीपतिगृही ही सात शल्ये मनी ।।

अर्थात, ‘चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, सौंदर्यवती युवतीला येणारे म्हातारपण, कमळाविण असलेली सरोवरे, नीटनेटका दिसणारा पण निरक्षर असणारा युवक, लोभी राजा वा सत्ताधीश, दरिद्र्यात खितपत पडलेले विद्वान नि सत्ताधीशांवर पडलेला दुष्ट लोकांचा पगडा ही सात शल्ये मनाला सतत डाचत राहतात.’ मला वाटते कवीच्या वाचनातही ही उदास करणारी भर्तृहरीची सात शल्ये असतील.

या सात शल्यांना पाहता यातील पहिली दोन वगळता उर्वरित पाच शल्ये मनुष्यनिर्मित आहेत. ती ठरवली तर दूर सारता येतात, कमी करता येतात. त्याचप्रमाणे प्रस्तूत श्लोकमालिकेतील दैवाधीन असलेली गृहिणी नसणे, वैधव्य येणे वा वसंत नसणे या तीन उदासता वगळता उर्वरित पाच मनुष्यनिर्मित आहेत. त्या टाळता आल्या, तर ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ म्हणायची वेळ माणसावर येणार नाही.

जीवनातील कितीतरी मनोहर नि सुंदर गोष्टींमागे दडलेली न्यूनता आपल्या ध्यानात येत नाही, तीच कवीने प्रस्तुत श्लोकमालिकेत चित्रित केली आहे. या श्लोकमालिकेतून ध्वनित होणारा दुसरा अर्थ असा, की बाह्यात्कारी जे आपल्याला मनोहारी दिसते ते आंतरिकदृष्ट्या पीडादायीही असू शकते. त्यामुळे वरवरच्या दिखाव्याला भुलू नये. तिसरा भाग असा, की जीवनात कोणतीन् कोणती कमतरता ही राहणारच, ती आपण स्वीकारायला हवी, त्यानेच उदास जीवन मनोहारी होऊ शकते. थोडक्यात मनोहर गोष्टींमागील उदासता चितारता चितारता कवी नकळत उदासीन जीवनाला मनोहारी करण्याचा मार्ग न बोलता दाखवून जातो.

(लेखक प्रसिद्ध........... आहेत.)

Marathi Poet
भोकरहट्टीचे मालकपण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com